संघशाखा म्हणजे विस्तारित कुटुंबच. संघशाखेत आपल्याच कुटुंबाचे काम आपण करत आहोत ही भावना पू.डॉ. हेडगेवारांनी संघस्वयंसेवकांच्या मनात रुजवली. संघशाखेचा आधार स्वयंसेवकांचा प्रामाणिकपणा व परस्परविश्वासच आहे. संघ वाढतो आहे तो शाखेत सहज होणार्या आत्मियतेच्या व्यवहारामुळेच. गेल्या शंभर वर्षात संघाला कुटुंब भावना निर्माण करण्यामध्ये चांगले यश मिळाले आहे. संघाचा स्वयंसेवक जिथे असेल तिथे कुटुंब भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो.
पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे संघनिर्माता म्हणून सुपरिचित आहेत. भारत सरकारने त्यांच्या जीवनावर एक ग्रंथ प्रकाशित केला आहे. अनेक प्रादेशिक भाषांमध्ये तो अनुवादित झाला आहे. स्वातंत्र्यासाठी चाललेल्या सर्व प्रकारच्या प्रयत्नात ते सक्रीय सहभागी होते. कोणत्याही प्रश्नाच्या मुळात जाऊन विचार करणे हा त्यांचा स्वभाव होता. स्वातंत्र्य प्राप्त केलेच पाहिजे. प्रसंगी बलिदान देऊनही केले पाहिजे. पण स्वातंत्र्य गेलेच का? जसे ब्रिटिश परके तसे मोगल, तुर्क, ग्रीक हेही परकेच होते ना? या सर्व परकीय लोकांशी संघर्ष करणारा मूळ समाज कोणता? या देशाला आपला मानणारा, आपली मातृभूमी मानणारा समाज कोणता?
या देशाला देशपण देणारा हिंदू समाज आहे. हिंदू समाजामध्ये आलेली आत्मविस्मृती, यामुळे क्षीण झालेली राष्ट्रभक्तीची भावना, त्यामुळे उत्पन्न झालेली समाजाची विघटित अवस्था, त्याचा परिणाम म्हणून आपल्यापुरता विचार करण्याची संकुचित मानसिकता ही पारतंत्र्याची मूळ कारणे आहेत या निष्कर्षाप्रत ते आले. म्हणून हिंदू समाजाला आत्मविस्मृती, विघटन व संकुचित मानसिकता या त्रिदोषांपासून मुक्त करणे हे राष्ट्रोन्नतीसाठी आवश्यक आहे असे त्यांचे मन त्यांना सांगू लागले.
आसेतुहिमाचल पसरलेल्या विराट हिंदू समाजाला संघटित करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रारंभ केला.
हिंदू समाज संघटित करणे हे शब्द, बोलायला फारच सोपे आहे. संपूर्ण हिंदू समाजाचे संघटन ही संकल्पनापण मनाला आकर्षित करणारी आहे, क्रांतिकारी आहे.
पण व्यावहारिक पातळीवर काय करायचे? सदस्य कोण असतील? विस्तार करण्याकरता कार्यक्रम काय? संघटनेचे स्वरूप काय असेल? डॉ. हेडगेवार यांनी याबाबतीत काहीच लिखित नियमावली तयार केली नाही. कार्यपद्धती म्हणून दैनंदिन चालवायला शाखा दिली. त्रिदोष दूर करणारे कार्यक्रम दिले. भगव्या ध्वजामुळे आत्मविस्मृती दूर होते व आपण सारे हिंदू आहोत याची जाणीव उत्पन्न होते.
सामूहिक कार्यक्रमामुळे विघटनेच्या स्वभावात परिवर्तन येते. प्रार्थनेमुळे राष्ट्रभक्तीचा भाव मजबूत होतो. संकुचित विचारात बदल होऊन सामाजिक कर्तव्याची भावना निर्माण होते.
डॉक्टरच संघनिर्माता असल्यामुळे स्वाभाविकच त्यांचे उठणे, बसणे, बोलणे, पत्र लिहिणे, भेटी घेणे, सर्व काही संघासाठीच असे. त्यांच्या आचरणातून संघटनेची रिती-नीती तयार होत गेली.
1. कुमार माधव, अकरावीची परीक्षा देऊन नागपूरहून कोकणात घरी चालला होता. दुपारी त्याची रेल्वेगाडी होती. डॉक्टर भरपावसात पायी चालत त्याला निरोप द्यायला रेल्वे स्थानकावर आले होते. घरी गेल्यावर पोचल्याचे पत्र पाठवण्याचे सांगितले. तो मुलगा संघाकरता कायमचा जोडला गेला. पंजाबमध्ये संघप्रचारक म्हणून गेला. (श्री. माधवराव मुळे)
2. यवतमाळचा एक नववीत शिकणारा विद्यार्थी सुट्टीच्या दिवसांत त्याच्या मावशीकडे आला होता. मावशीच्या घराशेजारीच विद्यार्थी-शाखा लागत होती. खेळाच्या आकर्षणाने हा मुलगापण शाखेत येऊ लागला. डॉक्टर त्या शाखेवर गेले असता त्यांची ओळख झाली. शाखेनंतर डॉक्टर त्याच्याबरोबर मावशीच्या घरी गेले. डॉक्टर नागपुरात प्रसिद्ध होते. आपल्या लहान मुलांमुळे एवढा मोठा माणूस घरी आला, याचा घरच्या लोकांना खूप आनंद झाला. या मुलामुळे यवतमाळला एक नवी शाखा प्रारंभ झाली.
3. श्री. नानाजी देशमुख (चित्रकूट ग्रामविकास प्रकल्पाचे प्रणेते) यांनी ते सहावीला शिकत असतांनाची आठवण नोंद करून ठेवली आहे. श्री. गंधे वकिलांचे घर शेजारीच होते. एक दिवस त्यांच्याकडे खूप मंडळींची ये-जा चालू होती. डॉक्टर हेडगेवार आले आहेत असे समजले. डॉक्टरांना पाहिले नव्हते; डॉक्टरांना पाहण्याची इच्छा होती. आमची परीक्षा होती. चार मित्रांबरोबर श्री. गंधे वकिलांकडे गेलो. डॉक्टरांनी आम्हाला चार जणांना आपल्याजवळ बोलावले. अत्यंत आपुलकीने एकेकाची चौकशी केली. आमची भीती मोडली. आम्ही परीक्षेला चाललो आहोत. हे कळल्यावर गंधे वकिलांना दहीसाखर आणावयाला सांगितले व आमच्या प्रत्येकाच्या हातावर दहीसाखर दिली व म्हणाले, जा तुमचा पेपर चांगला जाईल.
4. प्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे यांनी एक आठवण लिहून ठेवली आहे. डॉक्टर आमच्याकडे आले. त्यांचे व्यक्तिमत्व अतिभव्य, गंभीर व शांत होते. घरात आल्यापासूनच आम्हाला असे वाटू लागले की, जणू आमच्या घरातीलच कोणी वडीलधारा मनुष्य बाहेरगावाहून आला आहे. त्यांनी सरळपणे व सहजपणे गप्पा गोष्टींना प्रारंभ केला. वातावरणातील औपचारिकता केंव्हाच दूर होऊन प्रसन्नता वाटू लागली.
5. विदर्भ प्रांताचे समरसता महाशिबीर झाले. तीस हजारांहून अधिक संख्या होती. परम पूजनीय डॉक्टरांच्या काळापासूनच स्वयंसेवक असलेली शंभर-सव्वाशे प्रौढ वयाची मंडळी एक दिवस शिबीर पाहण्यास आली होती. प. पू. सरसंघचालक राजेंद्रसिंहजी आणि मा. सरकार्यवाह शेषाद्रीजी यांच्याबरोबर परिचयाची बैठक झाली. मा. शेषाद्रीजी म्हणाले, मी व माननीय रज्जूभैयांनी पूजनीय डॉक्टरांना पाहिले नाही. तुम्ही मंडळींनी पाहिले आहे, त्यांना ऐकलेपण आहे. तुम्ही आम्हाला काही सांगा. चार-पाच ज्येष्ठ स्वयंसेवकांनी काही सांगायचा प्रयत्न केला. बोलायला सुरुवात केली की, त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागत. डॉक्टर म्हणजे प्रेम, प्रेम, प्रेम! म्हणून खाली बसत.
संघाचे सर्व कामच प्रेम, स्नेह व आत्मीयता यावर आधारलेले आहे. ‘शुद्ध सात्विक प्रेम अपने कार्य का आधार है’ असे एक गीत शाखेत गायिले जाते. भावंडभाव जसा कुटुंबात असतो तसाच शाखेत असतो. कुटुंबात लहान-मोठ्या प्रत्येक व्यक्तीला महत्त्व असते. शाखेत शिशु, बाल, तरुण, प्रौढ प्रत्येक वयोगटाला स्वतंत्र महत्त्व आहे. एक व्यक्ती आजारी पडली तर सर्व कुटुंबाला काळजी असते. तसेच आजारी स्वयंसेवकाबद्दल संपूर्ण संघशाखेला चिंता असते. मंगलप्रसंगी सर्व घर काम करते. शाखेतील एखाद्या स्वयंसेवकाच्या घरी मोठा मंगलप्रसंग असेल तर शाखेचे अनेक स्वयंसेवक त्याच्या घरी काम करतांना दिसतात. सर्वांचा प्रामाणिकपणा हा कुटुंबाचा आत्मा आहे. संघशाखेचा आधार स्वयंसेवकांचा प्रामाणिकपणा व परस्पर विश्वासाच आहे. संघशाखा म्हणजे विस्तारित कुटुंबच! संघ वाढतो आहे तो शाखेत सहज होणार्या आत्मियतेच्या व्यवहारामुळेच! डॉक्टरांच्या हयातीत म्हणजे 1940 पर्यंत संघटनेला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले होते. डॉक्टरांच्या आत्मीयतेचा सर्वत्र अनुभव येत होता. आपण संघाचे म्हणजे दुसर्या कुणाचे काम करतो आहोत असे कोणाच्याच मनात येत नव्हते. आपल्याच कुटुंबाचे काम आपण करत आहोत ही भावना डॉक्टरांनी स्वयंसेवकांच्या मनात रुजवली.
1940 च्या नागपूर येथील तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्ग दीक्षांत समारोहात झालेले उद्बोधन म्हणजे हिंदू समाज संघटनेच्या स्वरूपाची स्पष्टता / व्याख्याच आहे. ते म्हणाले, माझा व आपला यत्किचितही परिचय नसताना अशी कोणती गोष्ट आहे की, जिच्यामुळे तुमची अंत:करणे माझ्याकडे व माझे अंत:करण तुमच्याकडे धाव घेते? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्त्वज्ञानच असे प्रभावी आहे की ज्या स्वयंसेवकांचा परस्परांशी परिचय नाही त्यांनादेखील पाहताक्षणीच एकमेकांविषयी प्रेम वाटते. बोलता बोलता क्षणभरात ते एकमेकांचे बनून जातात. नुसते परस्परांना पाहून स्मितहास्य करताच त्यांची एकमेकांना ओळख पटते. भाषा भिन्नता व आचार भिन्नता असूनही पंजाब, बंगाल, मद्रास, मुंबई, सिंध येथील स्वयंसेवकांचे परस्परांवर इतके प्रेम का? तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घटक आहेत म्हणून. आपल्या संघात प्रत्येक स्वयंसेवक दुसर्या स्वयंसेवकावर सख्ख्या भावापेक्षाही जास्त प्रेम करतो.
वर्गात सुमारे दीड हजार स्वयंसेवक होते ते (सर्व) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ’घटक’ आहेत असे डॉक्टर म्हणाले. ’सदस्य’ आहेत असे म्हणाले नाहीत. मी संघाचा सदस्य आहे असे म्हणणे म्हणजे ’मी’ आणि ’संघ’ वेगळा आहे असा होतो. माझी इच्छा आहे तोपर्यंत सदस्य राहीन. घटक आहे असे म्हणणे म्हणजे मी संघच आहे. आम्ही सर्व, वर्ग संपल्यावर संघ म्हणूनच आपापल्या गावी जाणार आहोत. नवजात बालकदेखील जन्म होताच त्या कुटुंबाचे घटक होते. ते बालक म्हणजे पूर्ण कुटुंबच असते. माझा हिंदू समाजात जन्म झाला, मी हिंदू समाजाचा घटक झालो. घटक झालो म्हटल्यावर हिंदू समाजाचा आनंद व माझा आनंद वेगळा असू शकत नाही. अशी घटक भावना व्यक्ती-व्यक्तीमध्ये निर्माण करणे म्हणजेच हिंदू समाज संघटन करणे होय.
‘एक बड़ा परिवार हमारा पुरखें सबके हिंदू है’ अशी कुटुंब भावना सर्व देशात उत्पन्न व्हावी असे काम संघाला करावयाचे आहे. 1940 च्या वर्गातील दीक्षांत उद्बोधनामध्ये डॉक्टरांनी आग्रहाने याचे प्रतिपादन केले आहे. हिंदू जातीचे अंतिम कल्याण या संघटनेनेच होणार आहे. दुसरे कोणतेही काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला करावयाचे नाही. संघ पुढे काय करणार आहे? हा प्रश्न निरर्थक आहे. संघ हेच संघटनेचे कार्य पुढेही कितीतरी वेगाने करणार आहे. हा मार्ग आक्रमण करता-करता असा एक सोन्याचा दिवस निश्चित उगवेल की त्या दिवशी सर्व हिंदुस्तान संघमय झालेला दिसेल.
’संघ विचारधारा आणि कार्यपद्धती म्हणजे डॉ. हेडगेवार यांच्या कल्पनांचे उत्तरोत्तर होत गेलेले आविष्करण आहे’ असे स्व. दत्तोपंत ठेंगडी म्हणत असत. दिनांक 15 जून 1940ला मा. यादवराव जोशींना जवळ बोलावून घेतले व विचारले की, संघाचा सर्वात वरिष्ठ अधिकारी दिवंगत झाला तर त्याचा अंतिम संस्कार लष्करी थाटात कराल काय? व स्वतः स्पष्टीकरण केले. संघ हे एक मोठे कुटुंब आहे. ही काही लष्करी संघटना नाही. कुटुंबाची मंडळी कुटुंब प्रमुखाचा जसा अंत्यसंस्कार करतात तसेच त्याचे साधे व नेहमीचे रूप असावे.
डॉक्टरांनी संघात गणवेश स्वीकारला. अनुशासन निर्माण व्हावे म्हणून समता (परेड), पथसंचलन (रूटमार्च) असे कार्यक्रम स्वीकारले. आत्मविश्वास वाढवणारे लाठीकाठीचे शिक्षण प्रारंभ केले पण यामागे हिंदू समाजाचे रक्षण करण्याकरता इकडे-तिकडे धावत सुटणारे हिंदू समाजाच्या अंतर्गत लढाऊ तरुणांचे एखादे दल उभे करण्याची कल्पना डॉक्टरांच्या मनात पहिल्या दिवसापासून नव्हती.
आसेतुहिमालय पसरलेला विराट हिंदू समाज पारिवारिक भावनेने उभा राहिला तर हिंदू समाजाकडे वाकड्या डोळ्याने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही आणि सर्व सामाजिक प्रश्न सहज सोडवता येतील. ही आवश्यकता लक्षात घेऊन नागपूरला एक अनाथ विद्यार्थिगृह डॉक्टरांनी प्रारंभ केले. या विद्यार्थिगृहात अस्पृश्यता, जातीभेद याला मुळीच स्थान नव्हते. या विद्यार्थिगृहाला महात्मा गांधी, सर शंकर नारायण, पंडित मदनमोहन मालवीय, लाला लजपतराय आदी मंडळींनी भेटी दिल्या आहेत. (भारत सरकार प्रकाशन, डॉक्टर हेडगेवार) डॉ. हेडगेवारही, लहानपणीच आई-वडील गेल्यामुळे एका अर्थाने अनाथच म्हणायचे. पण मोठे भाऊ, वहिनी असे कुटुंब होते. अनाथ विद्यार्थिगृह चालू करताना ते सहजपणे म्हणून गेले, सार्या समाजालाच कुटुंबरूपात परिवर्तित केल्यास अशा समस्यावर सहजपणे मार्ग निघू शकेल. कोणी अनाथ का राहावा ?
हिंदू युवक परिषदेकरता डॉक्टर पुण्याला गेले होते. डॉक्टरांची रथातून मिरवणूक काढण्यात आली. इतक्या मिरवणुकीच्या गजरातही डॉक्टरांना त्यांच्या रथामागून अर्धांग झालेला एक मुलगा काठीचा आधार घेऊन उत्साहाने धावताना दिसला. चौकात रथ थोडा थांबताच त्यांनी त्या मुलाला जवळ बोलावले व फुलाप्रमाणे अलगद उचलून रथात बसवले. परका कोणी नाहीच! सगळेच आपले कुटुंबीय. भटके, विमुक्त, गिरीवासी, वनवासी, मत्स्यकार, वंचित, पीडित, अपंग, गरीब, निरक्षर सर्वच आपले, परका कोणीच नाही. ‘शिवरायांचे कैसे बोलणे । शिवरायांचे कैसे चालणे॥ शिवरायांचे सलगी देणे । कैसे असे ॥’ समर्थ रामदास स्वामींच्या या उक्तीची इथे आठवण होते. संघ पुढे काय करणार आहे? हा प्रश्नच निरर्थक आहे. संघ हेच संघटनेचे कार्य पुढेही कितीतरी वेगाने करणार आहे. या डॉक्टरांच्या अंतिम उद्बोधनातील वाक्याची खोली व भविष्याचा वेध उलगडत चालला आहे.
गेल्या शंभर वर्षात संघाला कुटुंब भावना निर्माण करण्यामध्ये चांगले यश मिळाले आहे. कोणताही प्रांत, स्वयंसेवकांना परका वाटत नाही. भाषा आडवी येत नाही, जात आडवी येत नाही. एखाद्या प्रांतात काही आपत्ती आली तर संपूर्ण देशातून मदतीचा ओघ प्रारंभ होतो. संघाचा स्वयंसेवक जिथे असेल तिथे कुटुंब भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. काही स्वयंसेवक समाजाच्या विशिष्ट वर्गात काम करतात. तिथेही ते परिवार भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. जसे किसान परिवार, शिक्षा परिवार, उद्योग परिवार, क्रीडा परिवार, कला परिवार, साहित्य परिवार इ.
‘हिंदू कुटुंब’ विश्व-कुटुंबाची सर्वात छोटी संस्था आहे. हिंदू कुटुंब म्हणजे केवळ पती-पत्नी व त्यांच्या शरीरसंबंधातून उत्पन्न झालेले संतान एवढीच कल्पना नाही. हिंदू कुटुंबात आई- वडिलांबरोबर आजी-आजोबा, काका-काकी, मामा-मामी, आत्या, मावशी, अशी नाती तयार होतात. हिंदू कुटुंबात चंद्र ’मामा’ असतो. मनी ’मावशी’ असते. चिमणी ’चिऊताई’ होते. कावळा ’पाहुणा’ होतो. हिंदू कुटुंबात वासराची पूजा, गाईची पूजा, बैलांची पूजा, वडाची पूजा असते. सर्व मानवतेच्या कल्याणाची प्रार्थना ‘सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे संतु निरामया। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दु:खभागभवेत।’ ही हिंदू कुटुंबातच म्हटली जाते. म्हणून ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही कल्पना प्रस्थापित करावयाची असेल तर हिंदू कुटुंबांनाच पुरोधा (अग्रेसर) व्हावे लागेल. भारताच्या बाहेर 60 देशांमध्ये हिंदू संघटनेचे काम चालू आहे. हिंदू कुटुंबाचा परीघ कितीही मोठा करता येऊ शकतो.
वसुंधरा हे कुटुंब अवघे, भारतभूचे विशाल चिंतन ।
हिंदू जीवनदर्शन सार्या, मानवतेला करील पावन ॥