वेदनेवर सेवेची मात

विवेक मराठी    05-Apr-2025   
Total Views | 180
Vivekanand Hospital, Latur
Vivekanand Hospital Latur 
लातूर येथील विवेकानंद रुग्णालय सर्वपरिचित आहे. स्थानिक वैद्यकीय गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्यासाठी रुग्णालय सदैव तत्पर असते. बारा-तेरा वर्षांपूर्वी रुग्णालयाला कर्करोग चिकित्सा व उपचार हा नवा आयाम जोडला गेला आणि त्या कामातून आणखी एका आयामाचा जन्म झाला. तो आयाम म्हणजे रुग्णसेवा सदन. ग्रामीण भागातील कर्करोगाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना उपयुक्त ठरलेला हा आयाम आहे.
सकाळी लातूर रेल्वे स्थानकात उतरलो. पुढच्या प्रवासाची व्यवस्था झाली होती. रेल्वे स्थानकाबाहेर गाडी उभी होती. गाडीत बसलो आणि दहापंधरा मिनिटात एका प्रशस्त वास्तूमध्ये पोहोचलो. पायर्‍या चढू लागलो तो कानावर सुमधुर प्रार्थनेचे स्वर पडले. माझ्यासाठी आरक्षित केलेल्या खोलीमध्ये जाईपर्यंत कारुण्यमूर्ती ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान कानात गुंजू लागले. जवळजवळ पाच एकर परिसरात सर्व सोर्यींनी युक्त अशा या प्रशस्त वास्तूत प्रवेश करतांना काही क्षण असे वाटले की, आपण एखाद्या आध्यात्मिक मनःशांती केंद्रात तर आलो नाही ना? एकूण परिसर पाहता प्रथमदर्शनी असे कोणाला वाटले तर कोणतेही नवल नव्हते. इतके प्रसन्न आणि शांत वातावरण अनुभवत मी खोलीमध्ये बसलो आणि रात्रीच्या प्रवासाचा शिणवटा नकळतपणे विरुन गेला. बहुदा त्या परिसरातील वातावरणाचा तो परिणाम असावा.
 
 
न्याहारीला अजून अवधी होता. म्हणून एकूण परिसर पाहण्यासाठी बाहेर पडलो, आणि जसं जसा वास्तूच्या आतील भागात मी जाऊ लागलो तसेतसे एक वेगळे जग समोर उभे राहिले. वेदनेने ग्रासलेले. मृत्यूशी दोन हात करता करता जगण्याची उमेद मनाशी जपणारे. कर्करोगाने ग्रासलेले, शस्त्रक्रिया झालेले, केमोथेरपी उपाचार, रेडिएशनची प्रक्रिया चालू असणारे हे व्याधीग्रस्त बंधू आणि माताभगिनी आपापल्या रुममध्ये बसलेले होते. कुणाच्या नाकात नळी घातली होती. कुणाच्या डोक्यावरचे केस गेले होते. कुणाच्या गळ्याला बँडेज केलेले होते. हीच सारी मंडळी सकाळी एकत्र येऊन विश्वकल्याणाची प्रार्थना करत होती. या प्रार्थनाकाळापुरती तरी ते आपली वेदना विसरले होते आणि ते क्षण त्यांना पुढच्या प्रार्थनेपर्यंत आनंदाचे वरदान देऊन जात असावेत.
 
vivekanand hospital latur 
 
मी ज्या वास्तूत उतरलो होतो ती वास्तू होती, विवेकानंद रुग्णसेवा सदन लातूर. साठ वर्षे निरामय आरोग्यसेवा पुरवणार्‍या विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरद्वारा संचालित विवेकानंद हॉस्पिटलचा नवा आयाम. सर्वे सन्तु निरामयाः हे ब्रीदवाक्य घेऊन 1960च्या दशकात चार ध्येयवेड्या डॉक्टर मित्रांनी सुरू केलेला हा वैद्यकीय सेवेचा प्रपंच. काळाच्या गतीशी बरोबरी साधत नित्यनूतन तरीही शाश्वत सेवेचे व्रत अंगीकारून सुरू असलेला हा प्रवास. त्यातील रुग्ण सेवा सदन हा अलिकडच्या काळातील महत्वाचा टप्पा.
 
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.
 वेगवेगळ्या खोल्यांमध्ये रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक निवासाला होते. चौकशी केल्यावर कळले, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, नांदेड या जिल्ह्यासोबतच आंध्र प्रदेश व कर्नाटकातील सीमावर्ती जिल्ह्यातील रुग्ण येथेे उपचारासाठी येतात. विवेकानंद रुग्णालयातील सेवाभावाच्या पायावर आणि पारदर्शक व्यवहाराच्या आधारावर हे रुग्णसेवा सदन उभे राहिले आहे आणि त्याची अनुभूती त्या परिसरात सतत येत राहते. या स्वच्छ परिसरात फिरताना कोठेही आपण रुग्णालयात किंवा रुग्ण निवासात असल्याची जाणीव होत नाही. या रुग्णसेवा सदनात निवास करणार्‍या सर्वांना एक दिवसाचा निवास आणि दोन वेळचे भोजन, दोन वेळची न्याहारी अत्यंत अल्पदरात उपलब्ध करून दिली जाते, केवळ 250 रूपये. आणि ही रक्कमही देण्याची ज्याची क्षमता नाही, अशांसाठी विवेकानंद रुग्णालय स्वतः खर्च करते. वैद्यकीय क्षेत्रातील नफेखोरीच्या अनेक बातम्या आपण वाचतो तेव्हा विवेकानंद रुग्णालय व त्यांच्या सर्व सदस्यांनी चेतवलेला हा सामाजिक सेवेचा यज्ञ प्रेरणादायी ठरतो. विवेकानंद मेडिकल फाऊंडेशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरची स्थापना ज्या उद्देशाने झाली, तो उद्देश आजवरच्या प्रवासात कुठे धूसर झालेला नाही. तर तो अधिक सघन झाल्याची प्रचिती येत राहते. आपण वैद्यकीय क्षेत्रात काम करतो. या कामामागची प्रेरणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार. त्यामुळे भारतमातेच्या सर्व लेकरांच्या स्वास्थ्यासाठी आपण आपले ज्ञान, कौशल्य पणाला लावले पाहिजे, हा भाव सुरुवातीपासून जपला आणि नवागतांमध्ये रुजवला गेला आहे. याची क्षणोक्षणी प्रचिती येते.
 
vivekanand hospital latur 
 
लातूरसारख्या ग्रामीण भागात रुग्णसेवा करण्यासाठी पुण्याहून आलेल्या डॉ. कुकडे, डॉ. भराडीया, डॉ. अलूरकर, डॉ. ज्योत्स्ना कुकडे या चार मित्रांनी विवेकानंद रुग्णालय सुरू केले. सुरुवातीला लातूरमधील रुग्णालयासोबत परिसरातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन या मंडळींनी वैद्यकीय सेवा दिली. सेवेचे रोपटे वाढत गेले असून तो आता बहुविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारा वटवृक्ष झाला आहे. आजघडीला हृदयरोग चिकित्सा विभाग, मेडिसिन विभाग, मनोविकार विभाग, सर्जरी विभाग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, रेडिओलॉजी व इमेजिंग विभाग, पॅथॉलॉजी लॅब इत्यादी सुसज्ज विभाग कार्यरत असून त्याच्या माध्यमातून रुग्णसेवा उपलब्ध करून दिली जाते. ही आरोग्य सेवा देण्यासाठी 65 तज्ज्ञ डॉक्टर, 21 वैद्यकीय अधिकारी, 398 इतर कर्मचारी कार्यरत असून शासनाने जाहीर केलेल्या विविध योजना या ठिकाणी राबविण्यात येतात. त्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत, माजी सैनिक अंशदायी स्वास्थ्य योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना इत्यादींचा समावेश आहे. एखादा रुग्ण या योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल झाला की त्याचे अनुदान किती मिळेल? कधी मिळेल? याचा विचार न करता तातडीने उपचार सुरू केले जातात. रुग्ण बरा होऊन घरी गेल्यावर काही महिन्यांनी सरकारी योजनेची रक्कम जमा होते, असे असले तरी रुग्णालयातील उपचार आणि सेवाभाव यामध्ये तसूभरही फरक पडत नाही.
 
vivekanand hospital latur 
 
बदलती जीवनशैली आणि मानवी आरोग्य हा गंभीर चिंतेचा विषय झाला आहे. विशेषतः कर्करोगाचे वाढते प्रमाण आणि सर्व वयोगटातील रुग्ण ही केवळ शहरी भागातील समस्या नाही, तर गाव-खेड्यातही कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येतात. विवेकानंद रुग्णालय कर्करोगाच्या संबंधित शस्त्रक्रिया होत होत्या. पण त्याला जोडून जे अन्य उपचार होते त्यांची पुरेशी सोय नव्हती. कर्करोगाचे निदान झाले, शस्त्रक्रिया झाली म्हणजे रुग्ण पूर्णपणे बरा झाला असे म्हणता येत नाही. कारण शस्त्रक्रियेनंतर दीर्घकाळ रेडिएशन, केमोथेरपीची आवश्यकता असते आणि ही सुविधा मोठ्या शहरात उपलब्ध होते. खर्चिक उपचार, अनोळखी ठिकाण, भिती, गैरसमज इत्यादी गोष्टीमुळे रुग्ण उपचार घेत नसत आणि मुत्यूची वाट पाहत बसत. विवेकानंद रुग्णालयात कर्करोगावरील शस्त्रक्रिया होत असत. 2012 च्या आसपास मुंबईच्या टाटा हॉस्पिटलचे डॉ. बडवे अन्य कार्यक्रमासाठी लातूर येथे आले होते, त्यांनी विवेकानंद रुग्णालयास सदिच्छा भेट दिली. रुग्णालय, रुग्णसेवा, व्यवस्थापन, पारदर्शक व्यवहार इत्यादी गोष्टी त्यांनी पाहिल्या आणि रेडिएशनसाठी लागणारी यंत्रणा देण्याचे मान्य केले. त्यातूनच विवेकानंद मेडिकल फाऊंडेशनच्या कामात आणखी एक आयाम जोडला गेला. तो म्हणजे विवेकानंद कॅन्सर अ‍ॅण्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. लातूरच्या एमआयडीसीमध्ये हे सुसज्ज हॉस्पिटल कार्यरत आहे. आज डॉ. बडवे यांनी दिलेल्या यंत्रणेपेक्षाही अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रणा वापरून या रुग्णालयात उपचार केले जातात. कर्करोगाचे निदान झाल्यावर आवश्यक ते औषधोपचार, शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन अशी अनेक प्रकारची कामे या रुग्णालयात सुरू असतात. दिवसाला बाह्यरुग्ण विभागाला सत्तर ते ऐंशी रूग्ण भेट देत असतात. दिवसभरात पाच ते सहा शस्त्रक्रिया होतात. त्याच प्रमाणे दररोज ऐंशी रूग्ण केमोथेरपी किंवा रेडिएशनचा उपचार घेत असतात. आणि हे सर्व घडवून आणण्यासाठी 13 तज्ज्ञ डॉक्टर, 5 वैद्यकीय अधिकारी, 92 इतर कर्मचारी कार्यरत असतात.
 
vivekanand hospital latur 
 
रुग्णसेवा हा मुख्य विषय असल्याने रुग्ण, रुग्णालय व्यवस्थापन व डॉक्टर यांचा समन्वय उत्तम राहावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात. आपण वैद्यकीय व्यवसाय करत नाही, तर आपल्या क्षमता, गुणवत्ता, सेवाभाव यांच्या आधारे रुग्णाला बरे करण्याचा प्रयत्न करत आहोत. हा भाव प्रत्येकाच्या मनात कायम वास करतो. आणि त्यामुळे पॅथीचे डॉक्टर एकत्र बसून विचार करतात. कोणता उपचार आधी दिला तर रुग्णास फायदा होईल. याचा विचार करून उपचार पद्धती ठरवली जाते. लातूर येथील कर्करोगाचे निदान व उपचार करणारे एकमेव रुग्णालय नाही. पण इथे इतरांपेक्षा वेगळे काही तरी आहे. ते म्हणजे आत्मीय भाव. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार बीज घेऊन सुरू झालेला प्रवास आज अत्यंत खर्चिक व वेदनादायी व्याधींवर उपचार करताना हा रुग्ण आपला बांधव आहे. आणि त्यांचे स्वास्थ्य ठीक करणे हे आपले कर्तव्य आहे. हीच भावना मनात ठेवून वाटचाल होते आहे. संस्था धर्मादाय आहे. स्वाभाविकपणे इथे होणारे उपचार ही अल्प दरात होणारे आहेत. अनेकवेळा तर रुग्णाची परिस्थिती अशी असते की काहीही खर्च करू शकत नाही. अशा वेळी संस्थेच्या वतीने सर्व खर्च केला जातो म्हणजे विनामूल्य उपचार केले जातात.
रुग्णालय ग्रामीण भागात असले तरी येथे कार्यरत असणारे सर्व डॉक्टर अनुभवी आहेत. उदाहरणार्थ डॉ. ब्रिजमोहन झंवर यांचे देता येईल. मुंबईत टाटा कॅन्सर रुग्णालयचा अनुभव घेऊन आलेल्या डॉ. झंवर यांनी लातूरमध्ये स्वतःची ओपीडी सुरू केली होती. आसपासच्या जिल्ह्यातील रुग्ण त्यांच्याकडे येत असत. शस्त्रक्रिया करण्यासाठी ते विवेकानंद रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटर वापरत असत. कालांतराने त्यांनी स्वतःची ओपीडी बंद केली आणि पूर्णवेळ विवेकानंद कॅन्सर अ‍ॅण्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलशी जोडले गेले. हे कशामुळे शक्य झाले? या प्रश्नाचे उत्तर आहे, इथला पारदर्शक व्यवहार, आत्मीयता आणि आपल्या बांधवाविषयीची आत्मीयता. या गोष्टी आज दुर्मिळ होताना दिसत असताना मात्र विवेकानंद कॅन्सर अ‍ॅण्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व विवेकानंद रुग्णालयातील प्रत्येक व्यक्ती ही मूल्ये जगताना दिसते आहे. स्वाभाविकपणे त्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष परिणाम होत असतोच.
 
 
vivekanand hospital latur
 
कॅन्सर व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू झाले, अत्याधुनिक उपचारासाठी लागणारी यंत्रणा विकसित झाली, आणि या सेवेचा लाभ घेण्यासाठी येणार्‍या रुग्णाची संख्याही वाढू लागली. शस्त्रक्रिया होऊ लागल्या. शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारासाठी रुग्णालयात लोक येऊ लागले आणि एक नवीन समस्या समोर आली. केमोथेरपी, रेडिएशन यासारखे उपचार आठवड्यात दोन ते चार वेळा घ्यावे लागतात. अशावेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची खूप ओढाताण होते. खर्च खूप होतो. या सार्‍यामुळे रुग्ण उपचार घेण्याचे टाळतो. आणि वेदनांना कवटाळून मुत्यूची वाट पाहत राहतो. या गोष्टी लक्षात घेऊन कॅन्सर हॉस्पिटलच्या बाजूलाच संस्थेचे रुग्णसेवा सदन उभे राहिले आणि 2021 पासून कार्यरत झाले.
 
 
रेडिएशन, केमोथेरपीसाठी येणार्‍या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची निवास व्यवस्था उभी करण्याचे ठरले. तेव्हा या कामाला समाजाकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. शासकीय पातळीवरही खूप चांगले सहकार्य मिळाले. म्हणून आज रुग्णसेवा सदन उभे राहिले आहे. हे कशामुळे शक्य झाले? याचे उत्तर द्यायचे तर असे म्हणता येईल की, दीर्घकालीन केलेली सेवासाधना आणि त्यातून मिळालेली समाजमान्यता, शासनमान्यता या गोष्टीमुळे लोकांनी भरभरून मदत केली आहेच पण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवेकानंद रुग्णालयाने आपल्या आचार विचारातून जो राष्ट्रीय, सामाजिक भाव जपला आहे. तो भाव या सर्व विस्ताराचा मूळ आधार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्त्वज्ञान प्रत्यक्ष कृतीतून साकार करून मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रासाठी वैद्यकीय क्षेत्रातील पथदर्शी प्रकल्प कार्यरत आहे. आणि पुढेही तो विस्तारत जाणार आहे.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001

 

 

राजकारण
लेख
संपादकीय