राम लावण्यपेटी

विवेक मराठी    05-Apr-2025   
Total Views | 36
shreeram
रामदासांनी रामाचे लावण्यसंपन्न रूप पाहिले नव्हते. रामभेटीची ते उत्कट इच्छा प्रगट करतात. त्या भेटीच्या अगोदरच स्वामी रामरूपाला ’लावण्यपेटी’का म्हणाले असावेत, ही शंका प्रथमदर्शनी योग्य वाटली तरी स्वामींनी तपाचरणापूर्वी रामाला पाहिले नव्हते, हे म्हणणे संयुक्तिक नाही. समर्थचरित्रकारांनी स्वामींच्या पूर्वायुष्यातील एक प्रसंग दिला आहे. त्यावरून त्यांनी रामाचे रूप पाहिले होते, असे वाटते.
रामभेटीची आतुरतेने वाट पाहाणारा भक्त, या भेटीसाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागेल, याची निश्चितता नसल्याने, काकुळतीला येऊन रामाचा धावा करीत आहे हे आपण यापूर्वी पाहिले. भक्ताने पुढे अशी खंत व्यक्त केली आहे की या वासना मला तुझ्यापासून दूर ओढून नेत आहेत. तेव्हा रामाने सिंहाच्या चपळगतीने येऊन मला भेटावे अशी आशा व्यक्त केली आहे. अशी एकरूपता साधली की भक्ताला आराध्य दैवताविषयी अनामिक ओढ निर्माण होते. या ओढीतून त्याच्या रूपगुणांचे वर्णन करावे, असे भक्ताला वाटू लागते त्या भावावस्थेतून आता स्वामी रामाच्या सगुण रूपाचे वर्णन करीत आहेत. तो ’अनुदिनी अनुतापे--’या करुणाष्टकाचा पुढील श्लोक असा आहे.
 
सबळ जनक माझा राम लावण्यपेटी ।
म्हणवुनि मज पोटी लागली आस मोठी ।
दिवस गणित बोटीं प्राण ठेवोनि कंठीं ।
अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥ 8 ॥
 
 
(पराक्रमी, माझा जनक असा हा माझा राम सौंदर्याचे भांडार आहे. (अत्यंत रूपवान आहे), त्यामुळे त्याला भेटण्याची (उत्कट) मनीषा माझ्या अंतरंगात (निर्माण) झाली आहे. मी प्राण कंठाशी आणून (भेटीसाठी) प्रत्येक दिवस बोटाने मोजत आहे. अचानकपणे मला तुझी भेट झाली तर मी ( तुझ्या पायाला) मिठी मारीन.)
 

Karunastake 
 
आपले साध्य गाठण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली तरी साधना किती. काळ चालू ठेवावी हे साधकाला माहीत नसते, ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते. रामभेटीचे ध्येय मनात बाळगून भक्त भक्तिपूर्वक मार्गक्रमणा करीत आहे. ज्याच्या भेटीसाठी हा प्रपंच मांडला आहे, तो आपले आराध्य दैवत राम आहे, तरी कसा हे या श्लोकातून सांगायाचा स्वामी प्रयत्न करीत आहेत. सुरुवातीस भक्ताने सांगून टाकले की या रामाने मला घडवले आहे. सर्वार्थाने हा रामच माझा जनक आहे. स्वामी हे मनापासून सांगत आहेत. स्वामींचा रामावर प्रचंड विश्वास आहे. एका काव्यात समर्थ म्हणतात..
 
म्हणोनि आम्ही रामदास। रामचरणीं आमुचा विश्वास ।
कोसळोन पडो आकाश। आणिकाची वास न पाहू ॥
 
कुठलेही महासंकट जरी आले तरी आम्ही दुसर्‍या कुणाची वाट पाहात बसणार नाही, राम त्यातून सोडवेल, असा दृढ विश्वास स्वामी प्रगट करतात. समर्थ पुढे म्हणतात की हनुमंत तुम्हाला रामाकडे घेऊन जाईल. या हनुमंत वेलीवरून राममंडपावर जाता येते, तेथे गेल्यावर आत्मज्ञानाचे फळ प्राप्त होते. रामावरच्या दृढ विश्वासाने समर्थांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदूधर्म व संस्कृतिरक्षण, रामोपासना, मठ स्थापना इत्यादी अनेक गोष्टी साध्य करून घेतल्या, समर्थ म्हणतात...
 
साथ आम्हां हनुमंत । आराध्य दैवत रघुनाथ।
गुरू श्रीराम समर्थ। काय उणे दासासी ॥
 
भक्त पुढे म्हणतो की, माझा राम अत्यंत पराक्रमी (सबल) शूर बलवान् सुरुवातीच्या काळातच त्याने ऋषीमुनींना अकारण त्रास देणार्‍या अनेक राक्षसांना ठार मारले आहे. रावणासारख्या बलाढ्य मायावी दुराचारी शत्रूला युद्ध करून संपवले. एवढेच नव्हे तर मनाच्या श्लोकांत सांगितल्याप्रमाणे, रामभक्तांच्या शत्रूंना धनुष्यदंड त्यांच्या डोक्यावर आपटून राम त्या शत्रूंचा नाश करतो. (बळे भक्तरीपू शिरी कांबिवाजे। श्लोक 29), असा हा माझा सबल रणकर्कश राम भक्तांपुढे सौम्य मुद्रा धारण करतो. त्यामुळे या रामाचे रूप लावण्यमयी आहे, सौंदर्याचे भांडार (लावण्यपेटी) असलेल्या रामाचे रूप पाहताच भक्ताला अतीव आनंद होतो.
 
 
येथे सामान्य माणसाच्या मनात अशी शंका येते की, रामदासांनी रामाचे लावण्यसंपन्न रूप पाहिले नव्हते. रामभेटीची ते उत्कट इच्छा प्रगट करतात. त्या भेटीच्या अगोदरच स्वामी रामरूपाला ’लावण्यपेटी’का म्हणाले असावेत, ही शंका प्रथमदर्शनी योग्य वाटली तरी स्वामींनी तपाचरणापूर्वी रामाला पाहिले नव्हते, हे म्हणणे संयुक्तिक नाही. समर्थचरित्रकारांनी स्वामींच्या पूर्वायुष्यातील एक प्रसंग दिला आहे. त्यावरून त्यांनी रामाचे रूप पाहिले होते. असे वाटते. तो प्रसंग असा आहे. नारायणाचे वय अंदाजे आठ वर्षांचे असतानाची ही कथा आहे. एक दिवस कोणीतरी दूतवेषाने ठोसरांचे घर शोधत जांबगावात आला. त्यावेळी नारायणाचे वडील आणि मोठे बंधू काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. नारायण घरी एकटाच होता. त्या दूताने नारायणाला पकडून, खेचत, फरपटत गावाबाहेर नेले, तेथे एका शिबिकेत बसलेल्या माणसाने नारायणाला विचारले. ’बर्‍या बोलाने सांग तुझा बाप कोठे आहे?’ घाबरून गेलेल्या आठ वर्षांच्या नारायणाला काय बोलावे सुचेना. हा मुलगा काहीच बोलत नाही हे पाहिल्यावर शिबिकेतील माणसाने नारायणाला जवळ बोलवून आपला राकट हात नारायणाच्या डोक्यावरून फिरवून एक पत्र त्याच्या हातात कोंबले व ’जा, हे ठोसरला दे‘ असे सांगितले, या अनपेक्षित प्रसंगाने नारायणाची स्थिती पालटली. त्याला घाम फुटला. त्याची स्थिती, घाबरल्याने, भ्रमिष्टासारखी झाली. त्याला घराचा रस्ता सापडेना. विमनस्क स्थितीत तो अरण्यात दिशाहीन झाला. त्यावेळी अचानक त्याला राम, लक्ष्मण, हनुमान यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले, रामाने नारायणाला त्रयोदशाक्षरी मंत्र, एक बाण, निशाण दिले व सांगितले की, तुझ्या हातून मोठे कार्य घडणार आहे. यापुढे तुझ्या रक्षणाची जबाबदारी हनुमंतावर आहे, काळजी करू नको. ’नारायण भानावर आला आणि ते दृश्य अंतर्धान पावले. (टिप - ही हकिगत डॉ. शं. दा. पेंडसे यांच्या ’राष्ट्रगुरु समर्थ रामदास’ या पुस्तकात आली आहे.) तेव्हा रामदासांनी रामाचे ‘लावण्यपेटी’ रूप प्रत्यक्षात पाहिले होते. ते त्यांच्या अंतरंगात साठवले गेले. त्यामुळे रामरूपाची थोरवी वर्णन करताना त्यांच्या मुखातून उद्गार बाहेर पडले की,
’सबळ जनक माझा राम लावण्यपेटी‘
 
या पूर्वानुभवाने पुन्हा केव्हा एकदा रामाला पाहीन, भेटेन अशी तळमळ त्यांच्या अंत:करणात उत्पन्न झाली आहे. साधना तर चालू आहेच. जय, तप, पुरश्चरण यात खंड नाही. तरीही रामभेट दूरच आहे. त्यामुळे काकुळतीला येऊन प्राण कंठाशी आणून मी एकेक दिवस बोटाने मोजत आहे. रामभेटीला किती वेळ लागेल ते माहीत नाही असे भक्त म्हणतो. पण अचानकपणे भेट झालीच तर मी लगेच, आनंदाने रामाच्या पायाला मिठी मारीन असे भक्त सांगतो.
 
 
करुणाष्टकातील श्लोक रचनादृष्ट्याही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. समर्थ भाषाप्रभू आहेत. त्यांच्या कोशात शब्दांची कमतरता नाही. प्रस्तुत श्लोकातील रचना-कौशल्य छान आहे. रूपवान सौंदर्याचा खजिना असलेला राम यासाठी ’लावण्यपेटी’ शब्दप्रयोग केल्यावर पुढील ओळीतून ‘ट, ठ’ ची द्विरुक्ती साधत अनुप्रास अलंकाराचा प्रयोग स्वामी करतात. त्यात ’पोटी’, ’मोठी’, ’बोटी’, ’कंठी’ ’भेरी’ ’मीठी’ या शब्दांचा प्रयोग केल्याने, श्लोक म्हणताना वेगळीच मजा येते. शिवाय पाठांतरासाठी सोपे जाते.
भक्ताला रामाच्या सगुण साक्षात्काराची ओढ लागल्याने रामाच्या रूप-गुणाचे वर्णन साधकाने केले. रामाच्या ठिकाणी आईची माया आहे, तरी सुद्धा लेकराला घडवण्यासाठी आईला काही प्रसंगी कठोर व्हावे लागते. त्या कठोरपणातील माया लेकराला कळत नाही. हा मुद्दा स्वामींनी पुढील श्लोकात विशद केला आहे, त्यावर चर्चा पुढील लेखात होईल.
 
 

सुरेश जाखडी

'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..
राजकारण
लेख
संपादकीय