आदि शंकराचार्य व आळ्वार परंपरेने वैदिक-क्षत्रिय तेज तळपायला अत्यंत हातभार लावला. आळ्वारांनी ’भक्ती संप्रदायाची’ मुहूर्तमेढ रोवली व नाथमुनी या पहिल्या वैष्णव आचार्यांनी ही परंपरा पुढे नेली. पाचव्या शतकात आळ्वार संतांची परंपरा कशी चालू होती, त्याचा वेध आपण या लेखातून घेणार आहोत.
मागच्या भागात आपण दिव्य देसम् मंदिरांसाठी पासुरामी रचण्याची सुरुवात कशी झाली हे बघितले. आळ्वार, तामिळनाडूमधून असल्याने त्यांनी केरळ व तामिळनाडूच्या महत्त्वाच्या मंदिरांना या शृंखलेत गुंफले. मात्र आळ्वारांचे कार्य केरळ व तामिळनाडूपुरतेच मर्यादित राहिले नाही. या शृंखलेत त्यांनी उत्तरेकडील महत्त्वाच्या महाविष्णु मंदिरांचा समावेश केला होता. जी सर्वार्थाने अत्यंत महत्त्वाची मंदिरे होती. आळ्वारांनी 108 मंदिरांचे त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार वर्गीकरण केले. एका अर्थाने पाहिले तर, आळ्वार हे इतिहास संशोधक होते असेच मानायला लागेल. कारण वेचक अशी अतिप्राचीन मंदिरे त्यांनी नव्याने प्रकाशात आणली. विविध पासुरामी कानावर पडल्यामुळे तात्कालिक प्रजाजनांचे तीर्थाटन सुरू झाले होते. मौखिक परंपरेने ही परंपरा पिढी दर पिढी पुढे जाऊ लागली. शैव परंपरेत नायन्मार यांनीही ’पाडल पेट्र स्थाने’ म्हणजे शैवस्थाने शोधून काढली. त्यांत उत्तरेच्या केदारनाथ, गौरीकुंड, वाराणसी येथील काशीविश्वनाथ, कैलास पर्वत, गोकर्ण-महाबळेश्वर यांचा समावेश केला.
थोडक्यात नायन्मार व आळ्वारांचा समांतर प्रवास सुरू होता. कदाचित अशीही शक्यता असेल की, आळ्वार व नायन्मार यांच्या काळात उत्तरेत गुप्त साम्राज्य होते. समुद्रगुप्ताने दक्षिणपथ इथल्या बारा राजांचा पराभव केला होता. मात्र उत्तर-दक्षिण मिळून अवाढव्य अशा साम्राज्यावर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याने, त्याने दक्षिणेकडील राज्यांचे नियंत्रण स्वतःकडे घेऊन त्या राजांना त्यांचे राज्य परत देऊन टाकले. दक्षिणपथात झालेल्या या खळबळीने उत्तर- दक्षिण संबंध अधिकाधिक वेगाने विकसित व्हायला सुरुवात झाली. आदि शंकराचार्य व आळ्वार परंपरेने वैदिक-क्षत्रिय तेज तळपायला अत्यंत हातभार लावला. आळ्वारांनी ’भक्ती संप्रदायाची’ मुहूर्तमेढ रोवली व नाथमुनी या पहिल्या वैष्णव आचार्यांनी ही परंपरा पुढे नेली. पण आळ्वार काळ व नाथमुनींचा काळ या मधल्या वर्षांत मात्र दक्षिणेत काही घडामोडी सुरू होत्या.
आठव्या शतकांपर्यंत आळ्वारांनी रचलेल्या पासुरामी एकत्रित न झाल्याने कुठे कुठे विखुरल्या गेल्या होत्या. तोपर्यंत सर्वच आळ्वारांची जीवनयात्रा समाप्त झाली होती. प्रत्येक आळ्वारांचे ते आयुष्यभराचे कार्य होते. तरीही पासुरामी विस्मृतीच्या गर्तेत गेल्या. एका महान परंपरेचा लय होत चालला होता. पासुरामींची संख्या पाहता आणि त्या काळची परिस्थिती पाहता ही गोष्ट अगदीच शक्य होती. जशी वर्षांमागून वर्षे गेली तसे पासुरामी, आळ्वार हे सगळंच एक लोकश्रुती बनून राहिले होते. पण लवकरच ’नाथमुनींनी’ यावरील पडदा हटवला.
नाथमुनींच्या पूर्वायुष्यावर अगदीच त्रोटक माहीती उपलब्ध आहे. त्यांचा जन्म आठव्या शतकात झाला असं मानतात. नाथमुनींचे नाव होते, ’रंगनाथमुनी’. वैष्णव परंपरेने त्यांना चारशे वर्षांचे आयुष्य बहाल केले होते, पण तार्किकदृष्टया पाहिले तरीही त्यांचा जीवनकाळ हा नक्कीच जास्त होता. ते तामिळनाडूच्या कुड्डलोर इथल्या चिदंबरम मंदिराजवळच्या ’कट्टूमन्नर कोविलचे’ म्हणजेच ’वीर नारायण’ मंदिराचे पुजारी होते. नाथमुनींच्या घराण्यात पूर्वांपार नारायणावर अतूट श्रद्धा होती. नाथमुनींच्या वडिलांनी, ’ईश्वर भट्टर’ यांनी नाथमुनींना लहानपणापासून पासुरामी, आळ्वार व पेरुमाळ मंदिरांच्या गोष्टी सांगितल्या होत्या. ईश्वर भट्टर यांनी असंही सांगितलं होतं की पासुरामी आता पूर्णपणे हरवल्या गेल्यात व त्यांना शोधून एकत्रित करणे ही अशक्यकोटीची गोष्ट आहे. जर नारायणाची कृपा झाली तरच हा चमत्कार होऊ शकतो... पासुरामी अशा प्रकारे हरवल्या गेल्या याचे नाथमुनींना अतिशय वाईट वाटत होते. त्यांनी मनापासून नारायणाची आराधना सुरू ठेवली आणि एके दिवशी नारायण कृपेचा त्यांना प्रत्यय आलाच. एकदा वीर नारायण मंदिरात, ते पूजा करत असताना दक्षिण कर्नाटकच्या मेळूकोटे येथील ’चेरूवू नारायण’ मंदिराशी संबंधित काही जण मंदिरात आले. कट्टूमन्नरच्या वीर नारायणाची पूजा करताना त्यांनी नम्मळवारांच्या पासुरामीने, नारायणाची स्तुती करायला सुरुवात केली. ’अरा अमूदे’ असे शब्द ऐकून अंधारात चाचपडणार्या नाथमुनींना प्रकाशाचा किरण मिळाला. मेळूकोटेमधून आलेल्या प्रवाशांकडून नाथमुनींना ही नम्मळवारांनी रचलेली पासुरामी आहे याची माहिती कळली. त्यानंतर विखुरलेल्या पासुरामी एकत्र करणे हे नाथमुनींनी आपल्या जीवनाचे इतिकर्तव्य मानले व त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले. त्याकाळी कुड्डलोरपासून जवळ असलेले ’कुंभकोणम’ हे अतिशय महत्त्वाचे तीर्थक्षेत्र होते. आजही कुंभकोणम अतिशय प्रसिद्ध आहे. पुढील शोधकार्यासाठी त्यांनी कुंभकोणमचे ’सारंगपाणी’ मंदिर गाठले. मंदिरातील पुजार्यांकडून नाथमुनींना, नम्मळवार आळ्वारांनी सारंगपाणीच्या मूळावरमवर (मंदिरातील मुख्य विग्रह) म्हणजे ’अरवाअमुधन’वर रचलेल्या पहिल्या दहा पासुरामी मिळाल्या. असंही म्हटलं जातं की, नाथमुनींना पहिल्या दहा पासुरामी सारंगपाणी मंदिरातील तळघरात मिळाल्या. दिव्य देसम् संबंधित दोन्ही दुवे हे नम्मळवारांशी जोडलेले असल्याने नाथमुनींनी, नम्मळवारांच्या जन्मगावी ’आळ्वारथिरूनागरी’ येथे जायचा निर्णय घेतला. मंदिरातील पुजार्यांकडून, नम्मळवारांनी एकूण 1296 पासुरामी रचल्याची माहिती नाथमुनींना मिळाली होती. आळ्वारथिरूनागरी येथे नाथमुनींची भेट ’मधुराकवी आळ्वारांच्या’ शिष्याबरोबर झाली. नाथमुनींकडून नम्मळवारांच्या पासुरामी एकत्रित करण्याचा मानस व्यक्त होताच, मधुराकवी आळ्वारांच्या शिष्याने त्यांना मधुराकवींच्या दहा पासुरामी दिल्या व सांगितले, की जो कोणी पूर्ण भक्तिभावाने या दहा पासुरामींचा बारा हजार वेळा जप करेल त्याला प्रत्यक्ष नम्मळवार मार्गदर्शन करतील. सारंगपाणीच्या अरवाअमुधनवर अत्यंत विश्वास ठेवून नाथमुनींनी दहा पासुरामींचा जप करण्याचा संकल्प केला. आळ्वारथिरूनागरीतील, दिव्य देसम् पेरूमाळ मंदिरात असलेल्या ज्या चिंचेच्या वृक्षाजवळ नम्मळवार आयुष्यभर बसून राहिले होते, तिथेच बसून नाथमुनींनी बारा हजार पासुरामींचे पठन केले. ’डीप मेडिटेशन’ मध्ये असताना नम्मळवारांकडून नाथमुनींना 3990 पासुरामींचा बोध झाला. बाकी दहा पासुरामी त्यांना सारंगपाणीच्या मंदिरात मिळाल्या होत्या. नम्मळवारांनी नाथमुनींना, फक्त स्वरचित पासुरामी न देता सर्वच बारा आळ्वारांनी रचलेल्या पासुरामींची दिक्षा दिली. म्हणूनच असे म्हटले जाते की, जर नम्मळवार आळ्वार व नाथमुनी नसते तर ’नालयिरा दिव्य प्रबंधम’ ग्रंथ नसता... वैष्णव जगतात अशी श्रद्धा आहे की, अरवाअमुधनने म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णुने नाथमुनींच्या प्रार्थनेमुळे प्रसन्न होऊन वैकुंठातील आपल्या सेनापतीला, विष्वक्सेनाला नाथमुनींच्या मदतीला धाडले. विष्वक्सेन म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून प्रत्यक्ष नम्मळवारांचेच रूप होते. नाथमुनींना पेरुमाळचा आशीर्वाद मिळाला होता. अत्यंत हर्षभरीत होऊन नाथमुनींनी संपूर्ण चार हजार पासुरामी एकत्रित केल्या. त्यांनी एकेक हजाराचे चार भाग करून पासुरामींना विभागले आणि पुढील सर्व आयुष्य ’नालयिरा दिव्य प्रबंधम’ म्हणजेच वैष्णव भक्तीसंप्रदायासाठी व्यतीत केले. आजही तामिळ वैष्णवांमध्ये, नम्मळवार आळ्वारांना अत्यंत मान आहे. तसेच तामिळ वैष्णव नाथमुनींसाठी अतिशय कृतज्ञ आहेत. पुढे नाथमुनींचे तामिळनाडूमधे, गंगैकोंडचोळपुरम येथे देहावसान झाले.
नाथमुनींनी भक्ती संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी आसेतुहिमाचल प्रवास केला. आपल्या महाराष्ट्रात झालेल्या संतपरंपरा या भक्ती संप्रदायातूनच सुरू झाल्यात. नाथमुनी पूर्ण कुटुंबासह उत्तरेकडे असताना, त्यांना नातू झाला. यमुनेच्या तीरावर जन्माला आलेले हे प्रसिद्ध आचार्य म्हणजेच ’यमुनाचार्य’. नाथमुनींनंतर भक्ती परंपरा यमुनाचार्यांनी पुढे नेली. यमुनाचार्यांचे उत्तराधिकारी म्हणजेच वैष्णवांचे अतिशय प्रसिद्ध, लोकप्रिय व अनन्यसाधारण आचार्य ’श्रीरामानुजाचार्य’. पुढच्या भागात आपण श्रीरामानुजाचार्यांची अधिक माहीती जाणून घेऊ. श्रीरामानुजाचार्य आणि श्रीरंगम येथील श्रीरंगनाथन पेरूमाळ हे परस्परपूरक असे समीकरण आहे.
आज मला हे सांगायला खूप आवडेल की कट्टूमन्नरचे वीर नारायण मंदिर सोडले तर नालयिरा ग्रंथ एकत्रित करण्याच्या प्रयत्नातील प्रत्येक मंदिराच्या दर्शनाचा मला लाभ झालाय. मग ते मेळूकोटे येथील चेरूवू नारायण असो, सारंगपाणीचे अरवाअमुम असो किंवा आळ्वारथिरूनागरी असो. यांपैकी मेळूकोटे व वीर नारायण ही दोन्ही मंदिरे दिव्य देसम् मंदिरांत येत नाहीत परंतु सारंगपाणी आणि आळ्वरथिरूनागरी ही मंदिरे दिव्य देसम् आहेत. विषयानुरूप मी या मंदिरांची माहिती देईनच. या मंदिरांच्या मूळावरमचे दर्शन घेताना, मंदिराच्या आवारात फिरताना आपल्याला अत्यंत सकारात्मकतेचा भास होतो. तसंही अतिप्राचीन मंदिरे विशेषतः दिव्य देसम् व पाडल पेट्र स्थाने बघणे हा एक माझ्यासाठी अतीव आनंददायक अनुभव आहे. यांविषयीही पुढच्या काही भागांत आपण जाणून घेणार आहोत.