गोदावरीच्या प्रवाहातील समतेचे दीप - श्री काळाराम मंदिर ते गोदावरी पूजन

विवेक मराठी    21-Apr-2025
Total Views |
 @मुकुंद खोचे -  9422246903
 

nashik 
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या माध्यामातून डॉ. आंबेडकर जयंती दिवशी काळाराम मंदिरप्रवेशानंतर संध्याकाळी गोदावरी मातेच्या पवित्र तीरावर भव्य महाआरती पार पडली. नाशिकच्या या पुण्यप्रवाहात, समतेचा प्रकाश अधिक उजळला गेला. हा उपक्रम केवळ सवर्ण आणि आंबेडकरी अनुयायांचा संगम नव्हता, तर तो इतिहासाच्या काळ्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिलेले वर्तमान ठरला व समरसतेच्या उज्वल भविष्याचे बीजारोपण ठरला.
 
रामतीर्थ गोदावरी सेवा समिती हा केवळ एक उपक्रम नाही, तर एका उदात्त ध्येयाने प्रेरित झालेली सेवा चळवळ आहे. गोदावरीच्या पावनतीरी, समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग वाढवून, गंगेच्या समान भावनेने सर्वांना एकत्र आणावे, हा तिचा आत्मा आहे.
 
 
या ध्येयाची पहिली ठळक पायरी म्हणजे गोदावरी महाआरतीची सुरुवात. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या सामाजिक समरसतेच्या कार्यप्रवाहाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह अतुलजी लिमये यांची प्रेरणा लाभली. गोदावरीमातेच्या तीरावर आरतीच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि समतेचा संदेश देण्याची ही प्रेरणा, ‘एक दीप, एक तीर्थ, एक भारत’ या मूल्यांच्या उजेडात साकारत गेली.
 
 
वेगवेगळ्या 27 ज्ञातींतील बंधूंना सपत्नीक पूजेकरिता आमंत्रित करून महाआरतीला सुरुवात झाली. ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर एका विशाल सामाजिक एकतेचे, स्नेहसंवादाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. विशेष म्हणजे प्रत्येक समाजगटाला सन्मानपूर्वक सहकुटुंब आमंत्रित करून, त्यांच्या हस्ते आरती घडवून आणली जात होती. उदाहरणार्थ, नाभिक समाज - जो अनेक पिढ्यांपासून गोदावरीतीरी आपली उपजीविका करतो, त्यांना जेव्हा आरती करण्यासाठी आमंत्रण मिळाले, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबेनात. त्यांनी सांगितले,‘हे आम्हास स्वप्नातही वाटले नव्हते. गोदावरी मातेच्या चरणी आरती करायला मिळणे, हे आमचे परमभाग्य. आमची सेवा आज खर्‍या अर्थाने फळली.’
 
nashik 
 
या शब्दांमध्ये हजारो वर्षांचा सामाजिक इतिहास दाटून आला होता. ही महाआरती समतेची, सहभावाची, आणि गोदावरीमातेच्या पदराखाली सर्वांना सामावून घेणार्‍या करुणेची होती.
 
 
महाआरतीचा हा प्रवाह वाढत गेला. त्याच दरम्यान एका विशिष्ट टप्प्यावर काही अनुलोम कार्यकर्त्यांची भेट झाली. दीपक भगत हे या समन्वयाचे केंद्रबिंदू ठरले. त्यांच्या सहभागामुळे हे कार्य नव्याने प्रेरित झाले आणि ध्येयाच्या दिशेने वाटचाल अधिक सशक्त झाली.
 
 
याच दरम्यान कॅप्टन कुणाल गायकवाड यांच्याशी संपर्क झाला. पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे हे नातू. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव संवादातून कार्यकर्त्यांपर्यंत पोचला. त्यामुळे त्यांच्याशी झालेला संवाद हा एक दुग्धशर्करा योग ठरला.
 
 
या संवादातून एक विचार पुढे आला - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण आज कशा प्रकारे अभिवादन करू शकतो? अर्थातच, भाषणांपेक्षा कृती प्रभावी. म्हणूनच, प्रज्ञा प्रवाहातील विचारशील आंबेडकरी अनुयायांना एकत्र करून रामतीर्थ समितीने एक संकल्प केला - आंबेडकर जयंतीच्या दिवशी काळाराम मंदिर प्रवेश आणि गोदावरी महाआरतीचा ऐतिहासिक सोहळा घडवायचा.
 

nashik 
 
हा कार्यक्रम धार्मिक क्रिया नव्हती, तर ती होती - समाजमनात समरसतेचा दीप प्रज्वलित करण्याची प्रक्रिया.
 
14 एप्रिल 2025. नाशिक नगरीतील रामतीर्थ क्षेत्र. आंबेडकरी अनुयायांसाठी केवळ स्मरणाचा दिवस नव्हता, तर तो अनुभवाचा, समतेच्या स्पर्शाचा आणि ऐतिहासिक न्यायाच्या उर्जेचा दिवस ठरला. या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी गायकवाड कुटुंबियांमधील - दादासाहेब गायकवाड यांचे पुतणे, गेली 45 वर्षे, नाशिक जिल्हा दलित शिक्षण प्रसारक संस्था या महत्त्वाच्या संस्थेचे सचिव असलेले पी. के. गायकवाड हे पूर्णवेळ उपस्थित होते.
 
 
आखाडा परिषदेचे प्रवक्ते वसंत, तसेच समुदायाचे प्रतिनिधी भक्तीचरणदास महाराज, स्वतः सर्वांचं स्वागत करण्यास सज्ज होते.
काळाराम मंदिर प्रवेश
 
धर्माचे मुक्त वळण
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनाचे साक्षीदार असलेले श्री काळाराम मंदिर या नव्या इतिहासाचे साक्षीस्थान ठरले. याच मंदिरात, 1930च्या दशकात, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी सत्याग्रह केला होता. डोळ्यांत श्रद्धा आणि हृदयात ज्वाळा घेऊन त्यांनी त्या काळी मंदिर प्रवेशासाठी झगडताना समाजाचे दगडगोटे सहन करत समाजाला जागे केले होते.
 
 
नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात दादासाहेबांचे नातेवाईक आणि विचारसृष्टीतील अनुयायी यांच्यासमवेत दलित माता, भगिनी, युवक आणि 180 विद्यार्थिनी - हे सर्व पूजेसाठी आणि दर्शनासाठी उपस्थित होते. प्रतिनिधी म्हणून पुजारी वर्गाचे नरेंद्र पुजारी आणि मंदार जानोरकर यांच्यासह पुजार्‍यांनी या सर्वांचे वाजतगाजत स्वागत करून, रामरायाच्या चरणी आरती व पूजेसाठी आमंत्रित केले.
प्रत्यक्ष पूजेमध्ये सहभागी होताना पी. के. गायकवाड गहिवरले.
 
nashik 
 
गोदावरी महाआरती
 
या दिवशी, मंदिरप्रवेशानंतर संध्याकाळी गोदावरी मातेच्या पवित्र तीरावर भव्य महाआरती पार पडली. नाशिकच्या या पुण्यप्रवाहात, समतेचा प्रकाश अधिक उजळला गेला.
 
महाआरतीच्या प्रमुख ठिकाणी रामतीर्थ समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी, तीर्थ पुरोहित नृसिंह कृपादास, धनंजय बेळे, वैभव क्षेमकल्याणी, इत्यादींनी या दलित बांधवांचे आत्मीयतेने स्वागत केले. आरतीत सहभागी झालेल्या 180 विद्यार्थिनींच्या भावमुद्रा, त्यांच्या उजळलेल्या चेहर्‍यावर दिसणारा श्रद्धाभाव - या सर्वांतून एक नवा अध्याय लिहिला जात होता. ही समतेचे ब्रीद मनावर कोरण्याची क्रिया होती.
 
 
 
समतेची भव्य सुरावट
 
ही घटना केवळ एका दिवसाचा कार्यक्रम नव्हती. ती होती - दशकांनंतर फुलणार्‍या विश्वासाची, समर्पणाची आणि प्रज्ञेच्या शाश्वत प्रवाहाची साक्ष. ज्यांना एकेकाळी या मंदिराच्या उंबरठ्याबाहेर थांबावं लागलं, त्यांची आजची पिढी गंगा-गोदावरीच्या आरतीत सहभागी होताना, सर्व समाजासाठी परिवर्तन, समंजसपणा आणि सद्भावना घेऊन आली.
 
 
या निमित्ताने परिवारातील सर्व मंडळी एकत्र आली आणि एका भव्य, दिव्य, अलौकिक अशा ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार झाली.
या प्रसंगी ज्येष्ठ संघस्वयंसेवक डॉ. रमेशजी पांडव यांचे उद्बोधन इतके प्रभावी आणि अंतःकरणाला स्पर्श करणारे होते, की उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रूधारा ओघळल्या. जयंतराव गायधनी यांचं कुशल मार्गदर्शन तर होतेच त्याचबरोबर अनुलोमचे प्रांत प्रमुख स्वानंद ओक यांची प्रेरणा आणि भक्कम साथ या कार्यक्रमाला लाभली. अमोल गायकवाड यांचे सहकार्य उल्लेखनीय होते.
हा उपक्रम केवळ सवर्ण आणि आंबेडकरी अनुयायांचा संगम नव्हता, तर तो इतिहासाच्या काळ्या पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिलेले वर्तमान ठरला व समरसतेच्या उज्वल भविष्याचे बीजारोपण ठरला.
 
लेखक रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे सचिव आहेत.