“राष्ट्रीय विचारांचे नॅरेटिव्ह प्रस्थापित करण्यास सा. विवेक कटिबद्ध” - सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे
“भूमी, जन, संस्कृती या तिघांचे मिळून राष्ट्र होते. राष्ट्र केवळ भूमीचा तुकडा नाही, तेथील मनुष्य कसा आहे, तेथील संस्कृती कशी आहे यावरून त्या राष्ट्राची महत्ता समजते. राष्ट्र उन्नतीसाठी राष्ट्रातील व्यक्तींच्या आचरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.” असे वक्तव्य सा. विवेक प्रकाशित ‘राष्ट्रोत्थान’ ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
पंच परिवर्तन सूत्रांचा आढावा घेणार्या ‘राष्ट्रोत्थान’ या ग्रंथाचे प्रकाशन मा. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या शुभहस्ते सोमवार दि. 7 एप्रिल 2025 रोजी निको हॉल, वडाळा येथे संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर स्कॉन इन्फ्रा प्रेसट्रेस एलएलपीचे संस्थापक सदस्य उमेश भुजबळराव, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री रमेश पतंगे, सा. विवेकचे कार्यकारी प्रमुख राहुल पाठारे आणि राष्ट्रोत्थान ग्रंथाचे संपादक रवींद्र गोळे उपस्थित होते. तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि राष्ट्रप्रेमी सज्जनशक्ती या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित होती.
“‘राष्ट्र सर्वतोपरि’ हा ध्येयवाद अग्रक्रम मानून श्रेष्ठ व समृद्धशाली राष्ट्र घडविण्यासाठी समाजातील सज्जनशक्ती क्रियाशील व्हायला हवी. त्यासाठी समाजातील व्यक्ती राष्ट्रीय विचार करणार्या आणि भारतीय जीवनमूल्ये आचरणार्या बनल्या पाहिजेत. यासाठी संघशताब्दी वाटचालीत संस्कारित व्यक्तीनिर्माणावर भर दिला गेला आहे. अशा सज्जनशक्ती निर्माण होऊन ती संघटित झाली तर राष्ट्र परमवैभवाकडे जाईल आणि भारत जगासाठी दीपस्तंभ ठरेल. राष्ट्रयज्ञात अशा अनेक विभूतींनी समिधा वाहिल्या म्हणून कालसुसंगत समाजपरिवर्तन झाले. याचेच आधुनिक रूप म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघाचे विचार हे भारतभूमीचेच विचार आहेत. संघ कोणताही वेगळा विचार मांडीत नाही. समाजात काही काळानंतर आपले भारतीय मूल्यविचार प्रकटीकरणावर शिथिलता आली. ‘स्व’ची ओळख हरवून बसलो आणि म्हणून भारत पारतंत्र्यात गेला. ही ‘स्व’ ओळख आणि राष्ट्रीय विचार दृढ करण्याचे कार्य म्हणजे संघ. ‘राष्ट्र सर्वोपरी’ हाच भाव जागृत ठेवून संघाने शंभर वर्षांची वाटचाल केली आहे. संघ केवळ एक संघटन नसून समाज संघटित करणारी चळवळ आहे. जीवनाच्या प्रत्येक आयामाला स्पर्श करणारी आणि त्या आयामांना योग्य दिशा देणारी चळवळ आहे. संघ स्थापनाकाळात डॉक्टरांचा विचारच हा होता की, संघ लवकरात लवकर विसर्जित व्हावा, याचा अर्थ संपूर्ण समाज संघमय व्हावा. संघमय होणे म्हणजे भारतीय मूल्यांचे प्रकटीकरण होणे.
सध्या नॅरेटिव्हचे युग फोफावले आहे. भारताचा इतिहास व संस्कृतीचे विकृतीकरण करून कथ्य पसरवून समाज कलुषित करण्याचा जोरकस प्रयत्न चालू आहे. मात्र हिंदुत्व आजच्या युगासाठी नव्हे तर पुढील काळासाठीही प्रासंगिक आहे. फेक नॅरेटिव्ह खोडून काढण्यासाठीदेखील आणि सत्य हेच तथ्य आहे यासाठी राष्ट्रीय विचारांचे नॅरेटिव्ह प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे. प्रसारमाध्यमांत सा. विवेक ही भूमिका ठाममणे निभावत आहे. तसेच विविध क्षेत्रांतही राष्ट्रीय विचारांचे नॅरेटिव्ह प्रस्थापित करणे आवश्यक आहे.
“स्वातंत्र्यपूर्व काळात समाजजागरण आणि समाजप्रबोधन या कार्यांसाठी वृत्तपत्रांचा प्रारंभ झाला. मिशन म्हणून सुरू असलेली पत्रकारिता नंतर प्रोफेशन स्वरूपात स्वीकारली गेली. प्रोफेशन म्हणून हाती घेतलेल्या काही प्रसारमाध्यमांना आपल्या ध्येयाचा विसर पडला. सत्य समाजासमोर मांडणे हीच पत्रकार धर्माची नैतिकता असते. साप्ताहिक विवेकने ही नैतिकता जीवनव्रत म्हणून जोपासली. विवेक समाचार, प्रचार आणि विचार या तिन्ही गोष्टींचा मेळ घालून कार्य करत आहे. राष्ट्रसाधनेच्या कामातील एक घटक विवेक आहे. ‘प्रसारमाध्यमातून समाजपरिवर्तन’ हे ब्रीद घेऊन समाजाला योग्य दिशा देण्याचे विचारप्रवर्तक साप्ताहिक म्हणून आज माध्यमांत विवेकची ओळख (ब्रँड नेम) निर्माण झाली आहे.
एखाद्या स्पृहणीय कामाची अथवा समाजोपयोगी कामाची दखल सा. विवेकने घेतल्यास वाचकांचाही उदंड प्रतिसाद असतो आणि त्या संस्थेस देणगी देण्यासाठी अनेक दाते उभे राहतात, ही विश्वासार्हता सा. विवेकने मिळविली आहे. तथ्य मांडणारे प्रसारमाध्यम म्हणून समाजाने घेतलेली ही दखल म्हणावी लागेल. राष्ट्रोत्थान ग्रंथदेखील भारतीय जीवनमूल्यांवर आधारित पंचसूत्रीचे स्मरण आणि आचरणास प्रवृत्त करणारा ग्रंथ ठरेल, अशी आशाही सरकार्यवाह होसबाळे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी आपल्या प्रास्ताविकात सा. विवेकचा आढावा घेतानाच त्यांनी संघशताब्दी वर्षानिमित्त ग्राहक वृद्धी योजनेची माहिती देताना, सा. विवेकच्या प्रत्येक वाचकाने ‘फक्त एकच’ वर्गणीदार करण्याचे आवाहनदेखील केले. याच ग्राहक वृद्धी अभियानाचा शुभारंभ सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यानंतर ‘राष्ट्रोत्थान’ ग्रंथाचे संपादक रवींद्र गोळे यांनी ग्रंथ निर्मितीमागील भूमिका आणि ग्रंथाची वैशिष्ट्ये विशद केली.
या ग्रंथांच्या निर्मितीसाठी असंख्य हितचिंतकांनी अर्थपूर्ण सहकार्य केले आहे, यात मुख्य प्रायोजक रत्नमोहन ग्रुप पुणे येथील लक्ष्मीकांत खाबिया, एबीएम नॉलेजवेअरचे प्रकाश राणे, म्हैसकर फांऊडेशनच्या सुधाताई म्हैसकर, शोगिनी टेक्नोआर्टस प्रा. लि. पुणे येथील गीताताई ताम्हणकर यांचे सहकार्य लाभले. त्यापैकी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे येथील अॅड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर यांचा सत्कार सरकार्यवाह होसबाळे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सा. विवेकचे पुणे जिल्हा पालक डॉ. दिलीप कुलकर्णी, सा. विवेकचे नागपूर जिल्हा प्रतिनिधी महेश राव, सा. विवेकचे पुणे महानगर प्रतिनिधी रमेश देवी, सा. विवेकचे रत्नागिरी जिल्हा पालक मोहन भिडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
निलेश ताटकर यांनी वैयक्तिक गीत सादर केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सा. विवेकचे जाहिरात विभाग प्रमुख अजय कोतवडेकर यांनी केले. सूत्रसंचालन शिबानी जोशी यांनी केले. दीपश्री केतकर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.