अरबी समुद्रात सापडले खनिज तेलाचे नवीन साठे

विवेक मराठी    31-Mar-2025
Total Views | 31
@डॉ. श्रीकांत कार्लेकर
डहाणू आणि तळ कोकणात सिंधुदुर्गजवळील समुद्रात खनिज तेलाचे नवे साठे अलीकडेच समोर आले आहेत. हे दोन्ही तेलसाठे आधीपेक्षा तुलनेत खूप मोठे आहेत. 1974 नंतर पहिल्यांदाच मुंबई किंवा महाराष्ट्र ऑफशोअरवर असे साठे समोर आले आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत.

oil
 
अरबी समुद्रात 1974 मधल्या तत्कालिन ‘बॉम्बे हाय’नंतर आणि 2018 नंतर पहिल्यांदाच तब्बल 18 हजार चौरस किमी क्षेत्रफळाहून जास्त क्षेत्रांत असलेले खनिज तेलाचे नवे साठे अलीकडेच समोर आले आहेत. हे साठे डहाणू व सिंधुदुर्गाजवळील समुद्रात सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत. याच मुंबईच्या समुद्रात जवळपास 75 सागरी मैल अंतरावर 1974मध्ये ‘बॉम्बे हाय’ येथे खनिज तेलाचा मोठा साठा सापडला होता. ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनीकडून (ओएनजीसी) त्याठिकाणी आजतागायत मोठ्या प्रमाणावर खनिज तेल उत्खनन होत आहे. त्यानंतर 2017मध्ये ‘अमृत’ व ‘मुंगा’ या दोन तेल विहिरींवर काम सुरू झाले. आता मात्र अमृत व मुंगा यांच्यापेक्षा चारपट अधिक परिघ असलेले दोन साठे समोर आले आहेत. भारताचा सार्वभौम अधिकार असलेल्या किनार्‍यापासून 200 सागरी मैल अंतरापर्यंतच्या भागात खनिज तेल व वायूच्या डहाणू व तळ कोकणातील या साठ्यांचा समावेश आहे .
 
 
डहाणूच्या समुद्रात 5,838 चौरस किमी व तळ कोकणात सिंधुदुर्गजवळील समुद्रात 13 हजार 132 चौरस किमी क्षेत्रफळावर असे संभाव्य खनिज तेलसाठे समोर आले आहेत. हे दोन्ही तेलसाठे 2017च्या तुलनेत खूप मोठे आहेत. 1974 नंतर पहिल्यांदाच मुंबई किंवा महाराष्ट्र ऑफशोअरवर असे साठे समोर आले आहेत, असे केंद्र सरकारी तेल उत्पादन कंपन्यांमधील सूत्रांनी म्हटले आहे. महाराष्ट्राशी निगडित असलेले हे दोन्ही साठे उथळ समुद्रातील असून, त्यांचे अंतर किनार्‍यापासून 160 किमीपर्यंत आहे.
 
 
’बॉम्बे हाय’ तथा मुंबई हाय हे अरबी समुद्रात मुंबईपासून 176 कि.मी. पश्चिमेस असलेले नैसर्गिक तेल क्षेत्र आहे. भूपृष्ठाखालील खडकांच्या संरचनेचे वर्णन करताना ‘हाय’ हा शब्द वापरला जातो ज्याचा अर्थ समुद्रतळावरील उंचवटा असा होतो. हे तेल क्षेत्र मुंबईच्या वायव्येस उथळ पाण्यातील भागात आहे. येथे पाणी सु. 75 ते 90 मी. खोल आहे. बॉम्बे हाय क्षेत्रातील खणलेल्या पहिल्या विहिरीत मे 1974मध्ये तेल लागले. या तेल क्षेत्राची संरचना घुमटाकार आहे. या क्षेत्रातून पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू उरण येथे आणून साठवला जातो. मुंबई हाय तेलक्षेत्राचा शोध 1964-67 च्या दरम्यान भारत आणि रशियाच्या संयुक्त तेल संशोधन संघाला भूगर्भ संशोधन जहाजातून खंबायतच्या आखातात केलेल्या मोहिमेत लागला होता.
 
 
3 फेब्रुवारी, 1974 रोजी बॉम्बे हाय येथे सागरसम्राट ही पहिली खनिज तेल विहीर खणली गेली. इ.स. 2004पर्यंत मुंबई हाय भारताच्या एकूण नैसर्गिक तेल मागणीच्या 14% मागणीची पूर्तता करत होती. या क्षेत्रातून पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू उरण येथे आणून साठवला जातो. पश्चिम किनार्‍याजवळ गुजरातमध्ये अंकलेश्वर, कलोल, मेहसाणा, खंबायत इ. क्षेत्रांतून खनिज तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन त्या काळांत चालू होतेच. हे लक्षात ठेवून खंबायतच्या आखातातील उथळ समुद्रात आणि गुजरात व महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात विशेष काळजीपूर्वक शोध घेण्यात आला. याचा परिणाम म्हणजे बॉम्बेे हाय तेल क्षेत्राचा शोध.
 
 
 
‘बॉम्बे हाय’ या तेल क्षेत्राजवळच खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा वर्ष 2018 मध्येही सापडला होता. ऑईल अँण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या अग्रगण्य सरकारी तेल कंपनीला हा साठा मिळाला. 1974पासून जेथून उत्पादन घेतले जाते त्या ‘मुंबई हाय तेलक्षेत्रा’च्या पश्चिमेस खोदलेल्या ‘डब्ल्यूओ-24-3’ या विहिरीमुळे या नव्या साठ्यांचा शोध लागला. खोदकामाच्या वेळी जी काही माहिती मिळत गेली, त्याआधारे नऊ ठिकाणची चाचणी करून, खोदकाम केले गेले. यानंतर या सर्व ठिकाणांतून तेल/वायू प्रवाहित झाला. भारताच्या दृष्टीकोनातून तेल आणि नैसर्गिक वायूसाठी ‘मुंबई हाय’ हे अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. देशाच्या एकूण तेल उत्पादनापैकी 44% मुंबई हायमधून मिळते. मुंबई हायचे वार्षिक उत्पादन 16 दशलक्ष टनच्या जवळपास आहे.
तसे पाहाता खूप जुन्या कोणत्याही खडकांमध्ये पेट्रोलियम आढळू शकते, परंतु आशियातील सर्वात उत्पादक पेट्रोलियम असलेले गाळाचे स्तर 20 कोटी ते 14.5 कोटीपासून ते 2 कोटी ते 50 लक्ष वर्षांपूर्वीच्या युगातील आहेत. पूर्वी म्यानमारमध्ये हातपंपांचा वापर करून खोदलेल्या विहिरींमधून मोठ्या प्रमाणात खोलवर असे तेल मिळवले जात असे आणि ते लाकडाची कामे टिकून रहावीत म्हणून, औषध म्हणून आणि वंगण घालण्यासाठी म्हणून वापरले जात असे. हे तेल वली पर्वतांच्या शिखरावर आढळते आणि खूप खोलवर खोदून मिळवले जाते. आसाममध्ये मिळणारे असे तेल 3.4 ते 2.3 कोटी वर्षांपूर्वीचे, तर पंजाबमध्ये व गुजरात क्षेत्रात ते 5. 6 ते 3.4 कोटी वर्षांपूर्वीचे आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ मिळणारे पेट्रोलियम तेल 2 कोटी ते 50 लक्ष वर्ष जुने आहे. पेट्रोलियमचे साठे सामान्यतः मिथेन, इथेन अशा नैसर्गिक वायूंशी संबंधित असतात.
या पेट्रोलियमच्या उत्पत्तीबद्दल खूप वादविवाद झाले आहेत. एकेकाळी असे मानले जात होते की त्याचे मूळ अग्निजन्य आहे. आता सामान्यतः असे मानले जाते की या तेलाचे मूळ सेंद्रिय आहे. ज्या काळात भूचर आणि जलचर प्राणी, विशेषतः सूक्ष्म वनस्पती आणि सूक्ष्म प्राणी मुबलक प्रमाणात होते त्या काळात या सेंद्रिय पदार्थांमुळे पेट्रोलियम बनले. वाळू, गाळ आणि चिकणमातीसारख्या उथळ सागरी गाळात गाडल्या गेलेल्या प्राणी आणि वनस्पतीपासून भारतात मिळालेल्या तेलामुळे पेट्रोलियमच्या या सेंद्रिय उत्पत्तीचे समर्थन करता येते.
भारतातील काही ’गाळ निक्षेप’ झालेल्या ठिकाणांच्या पूर्व इतिहासावरून पेट्रोलियम निर्मितीसाठी तिथे अशी अनुकूल परिस्थिती असल्याचे दिसून येते. त्या काळात आखाते, खाड्या आणि त्रिभुज प्रदेश आणि त्यांच्या सभोवतालच्या भागात दाट जंगले आणि समृद्ध प्लँक्टन (तरंगणारे किंवा मुक्त-पोहणारे शैवाल, तण आणि ताज्या किंवा समुद्राच्या पाण्यातील इतर जीव) ची भरपूर वाढ झाली होती. भूवेष्टित समुद्र किंवा खाडी किंवा दलदलीत झालेल्या या चिखलाच्या गाळाच्या साठ्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे ऑक्सिडेशन आणि विघटन होणे थांबले आणि विविध हायड्रोकार्बन्स तयार होण्यास कारणीभूत ठरणारे जीवाणू आणि जैवरासायनिक क्रियेला चालना मिळाली.
आधुनिक सागरी गाळातील 60% सेंद्रिय पदार्थ वनस्पतींपासून मिळवले जातात. यामध्ये सर्वाधिक योगदान देणारे पदार्थ म्हणजे उथळ पाण्यातील प्लँक्टन असतात.
पेट्रोलियमच्या भूगर्भातील साठवणुकीत समुद्रासारख्या जलाशयातील खडकांच्या सच्छिद्रतेचे प्रमाण महत्त्वाचे असते. खडकांची सच्छिद्रता गाळाच्या घट्ट थरात 1 ते 5% इतकी असू शकते आणि काही वाळू आणि वाळूच्या खडकांमध्ये ती 30 ते 40% पर्यंत वाढू शकते. पेट्रोलियम सामान्यपणे वाळूच्या छिद्रांमध्ये आणि चुनखडीच्या भेगांमध्ये आढळते; आणि ते नेहमीच उथळ पाण्यातील, सामान्यतः सागरी, गाळाशी संबंधित असते. गाळात असलेल्या सेंद्रिय पदार्थांच्या विघटनातून तेल मिळवले जाते, परंतु पेट्रोलियममध्ये रूपांतर कोणत्या पद्धतीने होते हे अद्याप पूर्णपणे ज्ञात नाही. हे स्पष्ट आहे की कार्बन आणि हायड्रोजनचे अपूर्ण ऑक्सिडेशन होण्यासाठी विशेष परिस्थिती असणे आवश्यक असते आणि या प्रक्रियांमध्ये, विशेषतः प्राण्यांच्या पेशींमधून नायट्रोजन काढून टाकण्यात जीवाणूंची क्रिया हा एक मुख्य घटक आहे.
सुरुवातीला पेट्रोलियमचा फैलाव त्याच्या उत्पत्तीच्या ठिकाणी असलेल्या भूगर्भीय रचनेनुसार होतो, परंतु त्याच्या वरच्या थरांचा दाब त्याला सर्वात सच्छिद्र खडकांमध्ये स्थलांतर करण्यास भाग पाडतो आणि परिणामी ते सामान्यतः चिकणमाती आणि शेलमध्ये मिसळलेल्या वाळूच्या थरात आणि वाळूच्या दगडांमध्ये पाझरते. काही भागात ते चुनखडीच्या फटी आणि भेगांमध्ये आढळते. ते क्वचितच वायूशिवाय आढळते आणि तेलाशी संबंधित खारट पाणीदेखील त्यात असते.
व्यावसायिक प्रमाणात हे तेल सहसा गाळाचे आडवे थर असलेल्या ठिकाणी आढळत नाही. परंतु कलत्या आणि वलीकरण झालेल्या गाळाच्या थरात तेल आणि वायू एका प्रकारच्या नैसर्गिक पोकळीत जमा झालेले आढळतात. शक्य तितक्या उंचावर डोंगर वळीच्या शिखरावर तेल व वायू गोळा होतो आणि त्याच्या अगदी खाली तेल असते. तेल आणि वायू बाहेर पडू नये म्हणून वर खडकाचा एक अभेद्य थर असणे नेहमीच आवश्यक असते.
राजकारण
लेख
संपादकीय