धांव पंचानना रे!

विवेक मराठी    28-Mar-2025   
Total Views |
Karunastake
रामभेटीवाचून होणारी व्यथा सहन न होऊन भक्त रामालाच अत्यंत तळमळीने आतुरतेने विनवणी करीत आहे की, रामराया तू आता सिंहाप्रमाणे झेप घेऊन वेगाने धावत ये व मला या वासनांपासून सोडव, नाहीतर या वासना मला तुझ्यापासून दूर नेतील. रामराया धावून येईल यावर भक्ताचा दृढ विश्वास आहे.
दृश्य जगाच्या घडामोडीतील शाश्वतता अथवा अशाश्वतता यांचा विचार न केल्याने माझी देहबुद्धी आणि अहंकारादी भाव सतत वाढत गेले. माझे चंचल मन कामक्रोधादी शत्रूंना आवर घालू शकत नाही आणि वासनांत माझे मन गुंतल्याने मी जन्ममृत्यूच्या फेर्‍यांत अडकलो आहे. हे भक्ताने मागील ओवीत सांगितले आहे. कामक्रोधादी विकार, वासना मला भगवंतापासून दूर नेत आहेत, रामा, हे सर्व तू जाणतोस. माझ्या मनीची व्यथा फक्त तुलाच कळू शकते असे भक्त पुढील ओवीत सांगत आहे.
 
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी।
शिणत शिणत पोटीं पाहिली वाट तुझी।
झडकरि झड घालीं धांव पंचानना रे ।
तुजविण मज नेते जंबुकी वासना रे ॥7॥
 
(हे रामराया, तुझ्या वियोगाने निर्माण झालेली माझ्या मनातील आर्तता तुझ्याशिवाय कोणालाही कळणार नाही. काकुळतीला येऊन मी (प्रत्येक जन्मात) तुझी वाट पाहिली. हे वासनारूपी कोल्हे तुझ्या भेटीशिवाय (तळमळणार्‍या) मला घेऊन जात आहेत. तेव्हा (आता) सिंहाप्रमाणे झडप घालून (त्या वेगाने) धावत ये (आणि मला भेट दे.)
 
 
या उक्तीतून भक्ताने आपल्या मनाची करुण अवस्था उघड करून अत्यंत काकुळतीने भगवंताचा धावा केला आहे असे दिसून येते. भक्ताचे रामाला सांगणे आहे की, माझी करुणास्पद, दया यावी अशी स्थिती तुझ्याशिवाय दुसरा कोणी जाणू शकत नाही, भक्त अनन्यभावाने आपल्या आराध्यदैवत रामाशी एकरूप झाल्याने आपली व्यथा रामच ओळखू शकेल असे त्याला वाटते, भक्ताने आपली रामभेटीवाचून झालेली करुणस्थिती इतरांना सांगितली तर ऐकणार्‍याच्या ठिकाणी रामभेटीच्या आर्ततेची अनुभूती नसल्याने ऐकणार्‍याला त्यामागील व्यथा समजणार नाही. भक्ताची मनःस्थिती कोणीही समजून घेऊ शकत नाही, अशावेळी जर भक्त आपली, रामभेटीवाचून होणारी व्यथा लोकांना सांगू लागला तर त्यासाठी काहीजण भक्ताची टिंगलटवाळी करतील व त्याला हास्यापद ठरवायलाही मागेपुढे पाहणार नाहीत, असे झाले तर भक्ताला आपल्या व्यथेबरोबर जननिंदेचेही दुःख सहन करावे लागेल. म्हणून भक्त रामाला विनवीत आहे की, ’तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी’ हे स्वामींच्या मनातील आंतरिक उद्गार आहेत, कारण रामदासस्वामींनी नाशिकला साधकदशेत ही स्थिती प्रत्यक्षात अनुभवली असावी अशी शक्यता आहे. स्वामींच्या साधकदशेचा काळ आचरायला कठीण होता. समर्थ बालवयातच घरादाराचा, आप्तेष्ट, नातेवाइकांचा, कुटुंबाचा, मित्र, सवंगडी यांचा त्याग करून रामरायाच्या साक्षात्कारासाठी, त्याच्या भक्तीस्तव, श्रीरामाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या नाशिकच्या भूमीत गोदावरीतिरी राममंदिराच्या सान्निध्यात येऊन राहिले होते. तेथे त्यांची पुरश्चरण, नामस्मरण वगैैरे तप:साधना नियमितपणे चालू होती. तथापि नाशिक हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे भाविकांची सतत ये-जा चालू होती. बाहेरगावाहून तीर्थक्षेत्री येणारे सर्वच लोक भक्तिभावाने आलेले भाविक असतात असे नाही. त्यात काही रिकामटेकडे आणि टवाळखोरही असतात, उगीच इकडे तिकडे फिरून दिसेल त्यावर उपरोधिक भाष्य करण्याची त्यांना सवय असते. त्यात त्यांना आनंद मिळतो. रामदासांना पाहून त्यांना वाटले असेल की, ’हा बारा वर्षांचा मुलगा घरी कोणाशी तरी भांडून किंवा कोणावर रागावून वैतागाने येथे आला आहे. अशा लहान वयात का कोणी घरदार सोडून भक्तिमार्गाकडे वळतो, त्याचे पुरश्चरण, नामस्मरण रामभक्ती हे सारे ढोंग आहे.’ हे निरुद्योगी टवाळखोर तसे मुद्दाम, रामदासांना ऐकू जाईल अशा आवाजात स्वामींसमोर आपापसात बोललेही असतील, पण ही लोकनिंदा पचवून समर्थांनी निष्ठेने आपली साधना अखंडपणे चालू ठेवली.
 
 
आपले ध्येय साध्य करून घेतले आणि म्हणूनच ’तुजवीण करुणा कोण जाणेल माझी’ ही मनातील खंत, समर्थांच्या अंतरंगातून आली असल्यास नवल नाही. त्यामुळे समर्थांच्या करुणाष्टकांना मराठी साहित्यात आत्मनिष्ठ काव्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. सर्वच करुणाष्टके उत्कृष्ट ’भावकाव्ये’ आहेत,
 
 
भक्ताने यापूर्वी सांगितले आहे की, माझे हृदय कोट्यान्कोटी जन्म तुझ्या भेटीशिवाय वियोगाने जळत आहे. त्यामुळे तुझ्या भेटीच्या आशेने वाट पाहून माझे मन आता शिणले आहे. माझ्या मनाने काकुळतीला येऊन (शिणत शिणत पोटी) तुझ्या भेटीची वाट पाहिली, पण अजून तुझी भेट होत नाही. येथे समर्थांनी सगुणोपासनेतील आर्तता स्पष्ट केली आहे. परमेश्वरभेटीची इच्छा करायची तर त्यासाठी परमेश्वराची अनन्यभावाने केलेली भक्ती आणि शरणागतता तर हवीच पण त्या बरोबर साधनेची चिकाटी, तेवढे मनोधैर्य आवश्यक आहे. रामभेटीची आतुरता तशीच सोडून देता येत नाही. त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागते. तसेच हेही लक्षात घ्यावे लागते की रामाची भेट म्हणजेच आत्मसाक्षात्कार अमुक क्रिया करून, भजन, पूजन, ध्यान, धारणा करून वा अन्य मार्गाने अमुक कालावधीत होईल असे कोणत्याही प्रकारचे गणित मांडता येत नाही, ती अनुभूती इंद्रियातीत व सूक्ष्म असल्याने त्यासाठी निश्चित असे सूत्र (Formula) कोणी सांगू शकत नाही. ती ब्रह्मसाक्षात्काराची अनुभूती अर्थात रामाची भेट अंतःकरणाच्या शुद्धतेवर, इच्छाशक्तीच्या जोरावर भावभक्तीच्या व ईश्वरप्रेमाच्या अनन्यतेवर तसेच पूर्वपुण्याईवर अवलंबून असल्याने प्रत्येक भक्ताच्या ठिकाणी तीची तीव्रता, आतुरता कमी अधिक प्रमाणात असू शकते. यासाठी रामभेटीची तळमळ शांत व्हावी म्हणून प्रयत्न चिकाटी सोडता येत नाही. हे रामराया, ’शिणत शिणत पोटी’ मी तुझी वाट पाहात आलो तरी तुझ्या भेटीसाठी अजून किती प्रतिक्षा करावी लागेल हे मला माहीत नाही. तुझा धावा करणे एवढेच माझ्या हातात आहे. तेव्हा हे रामराया आता ’झडकरी झड घाली ’असे मी तुला विनवीत आहे.
 
 
यापुढील दोन ओळीत स्वामींनी सिंह आणि कोल्हा यांचे दृष्टान्त देऊन आपला मुद्दा स्पष्ट केला आहे. समर्थ म्हणतात की, तुझी भेट नसल्याने या वासनारूपी कोल्ह्यांनी माझा ताबा घेतला आहे व ते मला तुझ्यापासून दूर नेत आहेत. तेव्हा वेळ न घालविता तू त्वरीत सिंहाप्रमाणे/झेप (झड) घेऊन माझ्याकडे धावत ये व या वासनारूपी कोल्ह्यांपासून वाचव. अरण्यात विद्ध झालेले सावज असेल तर कोल्हे तेथे जमा होऊन ते भक्षण करण्यासाठी दूर ओढून नेतात. त्याप्रमाणे विकारांत सापडलेल्या माणसाचा ताबा वासना घेतात व या वासना जीवाला आत्मोद्धारापासून दूर ठेवतात, वासना जीवाला आनंदाचे आमिष दाखवतात. पण वासना कधीही तृप्त होत नाहीत. त्यामुळे वासनांचा त्याग केल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती संभवत नाही. सिंहांची डरकाळी ऐकूनच कोल्हे दूर पळतात. कारण त्यांना सिंहांची झेप, त्याचा वेग माहीत असतो. म्हणून भक्त या ठिकाणी रामाला विनंती करीत आहे की, हे रामराया तू आता सिंहाप्रमाणे झेप घेऊन वेगाने धावत ये व मला या वासनांपासून सोडव, नाहीतर या वासना मला तुझ्यापासून दूर नेतील, मी तुला अत्यंत तळमळीने आतुरतेने विनवणी करीत आहे. रामराया धावून येईल यावर भक्ताचा दृढ विश्वास आहे. त्यासाठी रामरायाच्या सामर्थ्यांची, रूपगुणांची स्तुती भक्ती यापुढील ओवीतून करणार आहे. तो पुढील लेखाचा विषय आहे.

सुरेश जाखडी

'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..
राजकारण
लेख
संपादकीय