‘ग्रोक’ नावाचे नवे गारुड!

विवेक मराठी    28-Mar-2025   
Total Views | 44
 
Grok
ग्रोकचे गारुड सध्या भारतीयांवर आहे; पण एकदा त्यातील नावीन्य संपले की त्या गारुडाचा प्रभावही कमी होईल. प्रश्न ग्रोक की चॅटजीपीटी की डीपसीक एवढाच नाही. प्रश्न केवळ उजवी विचारसरणी की डावी विचारसरणी एवढयापुरता मर्यादितही नाही. प्रश्न व्यापक आहे आणि तो म्हणजे नित्यनूतन तंत्रज्ञानाच्या लाटांना सामोरे जाण्यासाठी समाजाला तयार कसे करायचे हा.
 
कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ हा सध्या परवलीचा शब्द बनला आहे. शेतीपासून शिक्षण क्षेत्रापर्यंत सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याच्या योजना आखण्यात येत आहेत. कोणतेही तंत्रज्ञान हे इष्ट की अनिष्ट हे त्याच्या वापरावर ठरते हा नियम कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानालादेखील लागू पडतो. तंत्रज्ञानाला स्वतःचे म्हणून काही मत नसते; किंवा कल नसतो. अणुशक्ती ऊर्जानिर्मितीसाठी उपयोगात येते तशीच ती अणुबॉम्ब तयार करण्यासाठीदेखील. तंत्रज्ञान तेच. विज्ञानाचे मूलभूत नियम तेच; मात्र त्याचा वापर सर्जनशीलतेसाठी करायचा की विध्वंसासाठी हे मानव ठरवतो. तेव्हा दोष तंत्रज्ञानाचा नव्हे; त्याचा वापर करणार्‍या मानवाचा असतो. तेच सूत्र कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानालादेखील तंतोतंत लागू पडते. समाजात चांगले परिवर्तन घडवून आणण्यासाठी, व्यापक हित साधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर होत असेल तर ते स्वागतार्ह. पण तेच तंत्रज्ञान राजकीय-वैचारिक लढाईतील शस्त्र होते तेव्हा मात्र त्याचे प्रयोजनच बदलते. गेल्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान सामान्यांच्या हातात वापरण्यासाठी आले आहे- मग ते ओपन एआयचे चॅटजीपीटी असो; अथवा चीनमधील डीपसीक असो किंवा परप्लेक्सिटी असो वा गुगलचे जेमिनाय असो; अशांनी सामान्यांना भुरळ पाडली आहे यात शंका नाही. मात्र याच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाने अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.
 
 
त्यांतील महत्त्वाचा म्हणजे त्याने रोजगारावर परिणाम होईल का हा. या प्रश्नामागे दडलेली भीती ही आहे की हे तंत्रज्ञान माणूस करीत असलेल्या सर्वच गोष्टी अधिक वेगाने, जास्त दर्जेदार आणि तरीही किफायतशीर रीतीने करीत असेल तर माणसाची गरजच काय? गेल्या वर्षी हॉलिवूडमधील चित्रपट पटकथाकार आणि लेखकांनी याच मुद्द्यावरून संप पुकारला होता आणि अखेरीस पाच महिन्यांनी दिलासा देणारी आश्वासने मिळाल्यानंतर तो संप मागे घेण्यात आला होता. अमेरिकेसारख्या राष्ट्रात हे होऊ शकते तर जेथे लोकसंख्या अवाढव्य आहे तेथे ती भीती अनाठायी नाही हे नाकारता येणार नाही. तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान जितके स्वागतार्ह तितकेच अनेक नवे प्रश्न निर्माण करणारे आहे हे तर खरेच. मात्र यातील आणखी एक तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे तो विशेषतः राजकीय-वैचारिक बाबतीत या तंत्रज्ञानाच्या विश्वासार्हतेचा, तथ्यांचा व सत्यतेचा. कोणतेही तंत्रज्ञान वापरायचे तर जितका विवेक आवश्यक तितकेच तारतम्य त्याच्या आहारी न जाण्यात असायला लागते. एरव्ही तंत्रज्ञान म्हणजे सार्वकालीन सत्य असे मानण्याचा अगोचरपणा घडू शकतो. सध्या तो तसाच घडतो आहे अशी शंका येण्याचे कारण म्हणजे एलन मस्क यांच्या एक्स कंपनीने जारी केलेल्या ’ग्रोक’ या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर बेतलेल्या व्यासपीठावरून विशेषतः भारतात उडालेली राळ. राजकीय हिशेब चुकते करण्यापर्यंत त्याच्या वापरकर्त्यांची मजल गेली असल्याने आणि ग्रोकची भाषा काहीदा असभ्य आणि म्हणून आक्षेपार्ह असल्याने ग्रोक हा तूर्तास चर्चेचा मुद्दा बनला आहे. तेव्हा त्याची दखल घेणे गरजेचे.
 
मस्क यांनी ग्रोक व्यासपीठ 2023 सालच्या नोव्हेंबर महिन्यात वापरकर्त्यांना खुले केले. ग्रोक हा शब्द घेण्यात आला आहे तो रॉबर्ट हाइनलाइन या विज्ञानकाल्पनिका लिहिणार्‍या साहित्यिकाच्या 1961 सालच्या ’स्ट्रेन्जर्स इन स्ट्रेंज लँड’ या साहित्यकृतीमधून. आयझॅक असिमोव्ह, आर्थर क्लार्क आणि हाइनलाइन हे इंग्रज भाषेतील महान विज्ञानकाल्पनिका-लेखकांचे त्रिकूट मानले जाते. हाइनलाइन यांनी ग्रोक हा शब्द योजला आणि नंतर तो लोकप्रिय ठरला. त्याचा शब्दशः अर्थ ’पिणे’ असा तर लाक्षणिक अर्थ ’समजून घेणे’ असा. तेव्हा त्या अर्थाने मस्क यांनी तो शब्द उधार घेतला असावा.


Grok
 
 
’ग्रोक’चे अनोखेपण
 
एलन मस्क हे उजव्या विचारसरणीचे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटच्या वर्तुळातील. ते ओपन एआयचे सहसंस्थापक आहेत. याच कंपनीने चॅटजीपीटी तयार केले. मात्र तत्पूर्वीच म्हणजे 2018 साली मस्क यांनी त्या कंपनीच्या संचालकमंडळातून काढता पाय घेतला होता. 2022 साली मस्क यांनी ट्विटर विकत घेतले. त्याचे त्यांनी नामांतर केले हा भाग अलहिदा. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात त्यांनी पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला ते जास्त महत्त्वाचे. अमेरिकेतील उजव्या विचारसरणीचे राजकीय विश्लेषक टकर कार्लसन यांना गेल्या वर्षी दिलेल्या मुलाखतीत मस्क यांनी ग्रोक सुरू करण्यामागील आपली कल्पना काय होती यावर प्रकाश टाकला होता. ग्रोक सुरू होण्यापूर्वी कृत्रिम बुद्धिमत्तेची जी व्यासपीठे उपलब्ध होती ती सर्व डाव्या विचारसरणीकडे झुकलेली होती; तेव्हा त्याला पर्याय म्हणून आपल्याला नव्या व्यासपीठाची गरज भासली असे मस्क यांनी सांगितले होते. तेव्हा खरे तर त्यांच्या त्या उत्तरातच हे तंत्रज्ञान कसे चालते याचे उत्तर दडलेले आहे. तंत्रज्ञानाला स्वतःची म्हणून कोणतीही विचारधारा नसते; कल नसतो; बुद्धीही नसते. ज्या विदावर (डेटा) ते तंत्रज्ञान उभे राहते तसे ते वागते. तेव्हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा पायाच मुळी माहितीच्या जंजाळातून धुंडाळून साररूपाने उत्तर देणे हा होय. शेतात टोमॅटोची लागवड केली तर बटाट्यांचे पीक येणार नाही इतके हे साधे समीकरण. जितकी माहिती अचूक तितके उत्तर अचूक हे त्याचे सूत्र. गुगल असो; अथवा ओपन एआय असो त्यांनी ज्या माहितीच्या साठ्याचा पाया आपापल्या कृत्रिम बुद्धिमत्ता व्यासपीठांना दिला तो कदाचित डाव्या विचारसरणीकडे कल असणारा असेल. मस्क यांचा दावा असा होता की आपण जे व्यासपीठ तयार करू ते ’बंडखोर’ स्वरूपाचे असेल; जे प्रश्न अन्य व्यासपीठे नाकारतात किंवा बेतास बात उत्तरे देतात असे चटपटीत प्रश्न घेण्यासदेखील ग्रोक आढेवेढे घेणार नाही. त्यानुसार मस्क यांनी ग्रोक व्यासपीठ 2023 सालच्या नोव्हेंबर महिन्यात वापरकर्त्यांना खुले केले. ग्रोक हा शब्द घेण्यात आला आहे तो रॉबर्ट हाइनलाइन या विज्ञानकाल्पनिका लिहिणार्‍या साहित्यिकाच्या 1961 सालच्या ’स्ट्रेन्जर्स इन स्ट्रेंज लँड’ या साहित्यकृतीमधून. आयझॅक असिमोव्ह, आर्थर क्लार्क आणि हाइनलाइन हे इंग्रज भाषेतील महान विज्ञानकाल्पनिका-लेखकांचे त्रिकूट मानले जाते. हाइनलाइन यांनी ग्रोक हा शब्द योजला आणि नंतर तो लोकप्रिय ठरला. त्याचा शब्दशः अर्थ ’पिणे’ असा तर लाक्षणिक अर्थ ’समजून घेणे’ असा. तेव्हा त्या अर्थाने मस्क यांनी तो शब्द उधार घेतला असावा.
 
 
ग्रोक व्यासपीठाची मेख अशी की त्यासाठी जो माहितीचा आधार दिला तो एक्सचा. तेथे जगभरातून लक्षावधी वापरकर्ते संवाद साधत असतात; माहितीची देवाणघेवाण करीत असतात; मतांचे खंडन-मंडन करीत असतात. तेव्हा ’रियल टाइम’- म्हणजे अगदी त्या क्षणाला माहिती अद्ययावत होत असते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ग्रोक हे एक्सशी एकात्मिक (इंटिग्रेट) करण्यात आले आहे. याचाच अर्थ एक्सच्या वापरकर्त्याने ग्रोकला टॅग केले की झाले. ग्रोक केवळ उत्तरेच देत नाही तर एक्समुळे ते सर्वदूर क्षणार्धात पोचते. ही ग्रोकची उपयुक्तता म्हणायची की उपद्रव हे येणार्‍या काळात समजेलच. पण त्या उपद्रवतेचा पदरव मात्र ऐकू यायला लागला आहे यात शंका नाही. मस्क यांचा हेतू होता तो या व्यासपीठाला ’उजवे’ बनविण्याचा; ’वोक-विरोधी बनविण्याचा. त्यांचा हा इरादा असला तरी अखेरीस ती कृत्रिम बुद्धिमता होय. तेव्हा बुद्धिमता असली तरी ती कृत्रिम म्हणून त्याला राजकीय मतमतांतरांच्या बाबतीत फारशा गांभीर्याने घेऊ नये की कृत्रिम असली तरी शेवटी ती बुद्धिमत्ताच म्हणून त्याने दिलेल्या उत्तरांना सत्य मानावे या पेचात सध्या सर्वजण आहेत. भारतात काही दिवसांपासून ग्रोकचा गवगवा झाला याचे कारण एकीकडे त्या व्यासपीठावरून काही आक्षेपार्ह शब्दांची झालेली उधळण आणि दुसरीकडे भारतातील राजकीय विचारधारा आणि राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या बाबतीत ग्रोकने दिलेली उत्तरे आणि त्याआडून चुकते केले जाणारे राजकीय हिशेब. हे तसे सगळे नवीन आणि नाविन्याचे आकर्षण असतेच.
 
 
भारतात वादळ
 
या सगळ्याला सुरुवात झाली ती काही दिवसांपूर्वी टोका नावाच्या वापरकर्त्याने ग्रोकला विचारलेल्या एका प्रश्नाने. आपले दहा ’बेस्ट म्युचल’ सांग असा साधा प्रश्न त्याने ग्रोकला विचारला. म्युचल याचा अर्थ जे एकमेकांना ’फॉलो’ करतात इत्यादी. हा अगदीच वैयक्तिक प्रश्न. त्यात इतरांना रस असण्याचे कारण नव्हते आणि नाही. मात्र ग्रोकने उत्तर द्यायला काहीसा वेळ घेतला तेव्हा वैतागलेल्या टोकाने ग्रोकला सुनावले. ग्रोकने टोकाला त्याच्या मूळच्या प्रश्नाचे त्यानंतर उत्तर दिले. पण ते देताना त्याने वापरकर्त्याला उद्देशून हिंदीतील काही अपशब्द वापरले. बोली भाषेतील त्या शब्दांनी वणवा पेटला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा मानवी चेहरा आहे का येथपासून असल्या अपशब्दांना स्थान असणे गैर नाही का इत्यादींपर्यंत मतमतांतरांना ऊत आला. मात्र हा शब्दखेळ तेथेच संपला नाही. ग्रोकने नंतर त्या अपशब्दांच्या वापराबद्दल स्पष्टीकरण दिले ते म्हणजे आपण जराशी गंमत करीत होतो आणि आपला तोल जरासा ढळला वगैरे. त्या स्पष्टीकरणाला वीस लाख ’व्ह्यू’ मिळाले आणि मग ते लोणच पसरले. कुतूहल, जिज्ञासा यांतून वापरकर्त्यांनी ग्रोकवर प्रश्नांचा भडीमार केला. एखाद्या धरणाचे दरवाजे उघडले जावेत आणि पाण्याचे लोट बाहेर यावेत असेच रूप या प्रश्नांच्या भडिमाराला आले. ग्रोकला वैयक्तिक माहितीसाठीचे प्रश्न विचारून वापरकर्ते थांबले नाहीत; तर क्रिकेटमधील ’गॉसिप’ पासून राजकीय बोलभांडपणापर्यंत आणि बॉलिवूडमधील ’भानगडीं’पर्यंत प्रश्नांचा मारा वापरकर्त्यांनी ग्रोकवर केला. त्याचे बीज त्या हिंदीतील अपशब्दांमध्ये दडले होते. ग्रोक मानवासारखा विचार करतो की काय आणि तसे असेल तर त्याने दिलेली उत्तरे सत्याजवळ जाणारी आहेत किंवा काय या उत्सुकतेपासून सुरु झालेला हा प्रवास ती उत्तरे जणू काही जनमानसाचे प्रतिबिंबच आहेत असे मानण्यापर्यंत किंवा तसा दावा करण्यापर्यंत झाला. त्याचे कारण ग्रोकने काही प्रश्नांना दिलेली उत्तरे भाजपा, नरेंद्र मोदी, अदाणी, अंबानी यांच्याविषयी होती हेच केवळ नाही; तर ती उत्तरे भाजप आणि मोदींच्या विरोधकांना ‘दिलासा’ देणारी किंवा भाजपा आणि मोदींविरोधात राजकीय दारुगोळा देणारी होती. त्या सर्व प्रश्नोत्तरांच्या तपशिलात जाण्याचे कारण नाही. कारण त्यात फारसा शहाणपणा नव्हे. पण काल-परवापर्यंत देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही, ट्रम्प यांना मस्क यांनी खिशात घातले आहे, मस्क यांनी जर्मनीच्या निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचे कारण काय इत्यादी मुद्दे मांडून नाके मुरडणार्‍यांना त्याच मस्क यांच्या ग्रोकवर अचानक अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा सूर्योदय झाल्याचा भास झाला. ग्रोक म्हणजे अंतिम सत्य सांगणारे व्यासपीठ एवढे बिरुद लावणे काय ते बाकी होते.
 
हे व्यासपीठ कृत्रिम बुद्धिमत्तेवर बेतलेले असले तरी ते देत असलेली उत्तरे कोणताही आडपडदा न ठेवता परखडपणे देत असल्याचा साक्षात्कार या महाभागांना झाला. मात्र हे असे का झाले याचा शोध घेण्याचे भान त्यांना राहिले नाही. एक तर हे व्यासपीठ एक्सवर बेतलेले आहे. त्यामुळे तेथे जी संभाषणे, संवाद, मतमतांतरांची अभिव्यक्ती होते त्याचेच प्रतिबिंब ग्रोकवर पडते. दुसरे म्हणजे प्रश्न ज्या पद्धतीने विचारला जातो त्याच पद्धतीचे उत्तर मिळते. याचा अर्थ प्रश्नकर्त्याचा ‘रोख’ आणि प्रश्न नेम धरून विचारला असेल; तर प्रश्नकर्त्याला अपेक्षित असेच उत्तर ग्रोक देते. कृत्रिम बुद्धिमत्तेची अन्य व्यासपीठे इतकी स्पष्टवक्ती नव्हती. त्यांनी दिलेली उत्तरे राजकीयदृष्ट्या सोयीस्कर (पॉलिटिकली करेक्ट) असत व असतात. ग्रोकच्या बाबतीत मात्र नावीन्य आहे आणि त्या नाविन्याचे गारुड भारतीयांवर पसरले यात शंका नाही. मात्र त्या नादात वावदूकपणाच्या पातळीवर जाण्याचे कारण नव्हते. पण मस्कनिर्मित व्यासपीठाने मोदी व भाजपाला कात्रीत पकडतील अशी उत्तरे दिल्याने विरोधकांचा आनंद द्विगुणित झाला. तथापि त्या आनंदाला विवेकाचा स्पर्श नव्हता; होता तो केवळ उथळपणा. हे सगळे झाल्यावर भाजपासमर्थक तोंडावर बोट ठेवून बसणे शक्यच नव्हते. त्यांनी असेच ’रोख’ धरून प्रश्न राहुल गांधी यांच्याविषयी विचारले आणि त्या प्रश्नांची उत्तरे देखील प्रश्नकर्त्याला अपेक्षित अशीच मिळाली. हा सगळा वाद होत असताना केंद्र सरकार एक्सच्या संपर्कात असल्याची वृत्ते आली. ग्रोकवर भडक, वादग्रस्त विधाने केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एकाकडे नाराजी व्यक्त केली असल्याचेही वृत्त आहे. जाणकार असे सांगतात की कायद्यानुसार ग्रोकविरोधात गुन्हाही दाखल होऊ शकतो. अर्थात अशा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्यासपीठाची अशी ’टपोरीगिरी’ करण्याची ही पहिलीच वेळ नव्हे किंवा असा उथळपणा करण्याचा ग्रोकच्या बाबतीतदेखील हा पहिला प्रसंग नव्हे.
 
Grok 
 
2016 साली मायक्रोसॉफ्टने चॅटबॉट पण त्यांने वर्णविद्वेषी विधाने केली; चुकीची माहिती पसरवली त्यामुळे काही तासांतच ते गुंडाळावे लागले होते.
 
2016 साली मायक्रोसॉफ्टने चॅटबॉट तयार केले होते ’टे’ या नावाने. पण ते इतके ’गुंड’ निघाले की त्याने अनेक वर्णविद्वेषी विधाने केली; चुकीची माहिती पसरवली आणि निरर्गल राजकीय मतप्रदर्शन केले. परिणामतः काही तासांतच ते गुंडाळावे लागले. तो प्रयोग होता; पण कृत्रिम बुद्धिमत्ता कोणत्या थराला जाऊ शकते याची कल्पना त्यातून आली. होती. नंतर आलेल्या चॅटबॉटने बहुधा त्यावरून धडा घेतला असावा. मात्र तरीही वाद उत्पन्न होत राहतातच. फेब्रुवारी 2024 मध्ये जेमीनाय या गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्ता व्यासपीठावरून असाच वाद भारतात झाला होता. गुगलकडून माहिती तंत्रज्ञान नियमांचे उल्लंघन होत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. एका पत्रकाराने जेमीनायला मोदींसंबंधी एक प्रश्न विचारला आणि जेमीनायने त्यास उत्तर दिले ते वादग्रस्त होते. ते एका अन्य पत्रकाराच्या नजरेस पडले. त्याने तत्कालीन केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या निदर्शनास ती बाब आणून दिली होती. मग सरकारने त्याची दखल घेत गुगलला इशारा दिला होता. नुकत्याच पार पडलेल्या अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या संदर्भात ग्रोकने काही राज्यांतील मतदारांची दिशाभूल करणारी माहिती प्रसृत केली होती. त्यामुळे कमला हॅरिस यांना फटका बसणार होता. तेव्हा त्या राज्यांच्या मंत्र्यांनी ग्रोकला पत्र लिहून प्रणालीत सुधारणा करण्याची सूचना केली होती.
 
 
माहिती, तथ्य, सत्य
 
ग्रोक हे नवीन व्यासपीठ असल्याने भारतीयांना त्याने भुरळ घातली असली तरी प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल किती सतर्क आणि सावध असणे गरजेचे आहे याची जाणीवही गेल्या काही दिवसांतील अनुषंगिक घडामोडींनी करून दिली आहे. अल्गोरिदम्सच्या काळात सध्या जग आहे. मात्र त्यामुळे समोर येणारी आव्हाने तितकीच जटिल आहेत. समाजमाध्यमांवरून होणारी संभाषणे ही किती असभ्य असू शकतात याची अगणित उदाहरणे रोजच्या रोज अनुभवास येतात. डीपफेकसारख्या तंत्रज्ञानाने कोणाचेही चारित्र्यहनन करणे किती सोपे झाले आहे याचीही उदाहरणे कमी नाहीत. तीच गोष्ट कृत्रिम बुद्धिमत्तेची. त्यावरून जे प्रसृत होते ते पूर्ण सत्य नसते आणि तसे ते आहे किंवा नाही हे तपासण्याची व्यवस्था नसते. उपलब्ध माहितीवरून अनुमान लावून माहिती प्रसृत करणे ही त्याची प्रक्रिया. उपलब्ध माहिती कलुषित असेल तर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उत्तरे कलुषितच देणार यात आश्चर्यकारक काही नाही. प्रश्न विचारण्याची रीत, कल, शैली यावर कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उत्तर देत असते याचीही जाणीव ठेवणे गरजेचे. तेव्हा या तंत्रज्ञानाचा व्यापक हितासाठी उपयोग करणे हितावह असले तरी मुख्यतः राजकीय प्रश्नांवर देण्यात येणार्‍या उत्तरांकडे सावध दृष्टिकोनातून पाहणे शहाणपणाचे. त्याचा वापर राजकीय विरोधकांना कोंडीत किंवा कात्रीत पकडण्यासाठी करणे हा निव्वळ बाष्कळपणा. तेव्हा सरकारने देखील कितपत कठोर व्हावे हाही प्रश्न. याचे कारण तसे केले की आपसूक कृत्रिम बुद्धिमत्तेला ’सत्यतेची’ वैधता प्राप्त करून देण्यास हातभार लावण्याची भीती असते. उलट, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे माहितीचा स्रोत आहे; सत्याचा वा तथ्यांचा असेलच असे नाही हे बिंबविण्यासाठी सरकारने जास्त प्रयत्न करावयास हवेत.
 
 
Grok
 
फेब्रुवारी 2024 मध्ये जेमीनाय या गुगलच्या कृत्रिम बुद्धिमत्तावरून आक्षेपार्ह मजकूर आल्याने भारतात वाद निर्माण झाला होता.
 
एकीकडे या तंत्रज्ञानाकडे सोयीस्करपणे पाहणे जितके शहाजोगपणाचे तितकाच त्याचा बाऊ करणेही अवाजवी. ग्रोकचे गारुड सध्या भारतीयांवर आहे; पण एकदा त्यातील नावीन्य संपले की त्या गारुडाचा प्रभावही कमी होईल. प्रश्न ग्रोक की चॅटजीपीटी की डीपसीक एवढाच नाही. प्रश्न केवळ उजवी विचारसरणी की डावी विचारसरणी एवढयापुरता मर्यादितही नाही. प्रश्न व्यापक आहे आणि तो म्हणजे नित्यनूतन तंत्रज्ञानाच्या लाटांना सामोरे जाण्यासाठी समाजाला तयार कसे करायचे हा. तंत्रज्ञानाला स्वतःची म्हणून विचार करण्याची क्षमता नसते आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटले तरी शेवटी ती ‘कागदी फुले’च असतात हेही विसरून चालणार नाही. त्यासमोर मानवी बुद्धी नेहेमीच सरस ठरणार; अर्थात तंत्रज्ञानाला ती गहाण ठेवली नाही तर. अखेरीस तंत्रज्ञानाला जन्म मानवच देत असतो आणि तोच तंत्रज्ञानाचा हेतू ठरवत असतो. आज ग्रोक आहे; उद्या नवे व्यासपीठ येईल. अशावेळी वैयक्तिक आणि सार्वजनिक शहाणपण आणि विवेक शाबूत ठेवणे हे जास्त गरजेचे. तरच त्या तंत्रज्ञानाचा मानवी व्यापक हितासाठी उपयोग होऊ शकेल. त्याकरिता सतत प्रबोधन हाच मार्ग आहे. आततायी, उतावीळ आणि अतिरंजित प्रतिक्रिया हा त्यावरील तोडगा नव्हे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे स्वयंप्रेरणेने विचार करणारी व्यवस्था नव्हे याची साक्षरता निर्माण करणे त्यादृष्टीने अगत्याचे.
 
 
आधुनिक काळातील ही सर्वसामान्यांच्या हातातील शस्त्रेच. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1938 साली लिहिलेल्या कवितेतील पंक्ती इशारा म्हणून कालातीत आहेत:
 
शस्त्र पाप ना स्वयेंचि, शस्त्र पुण्य ना स्वयें
इष्टता अनिष्टताही त्यास हेतूनेच ये

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार
राजकारण
लेख
संपादकीय