आर्यकृषक - मोहन देशपांडे

विवेक मराठी    25-Mar-2025
Total Views | 46
@विजय सांबरे-  9421329944
 
krushivivek
देशी गोवंश आधारित सेंद्रिय शेतीची मुहूर्तमेढ रोवणारे, ऋषी-कृषी तंत्र विकसित करणारे आणि सर्वसामान्य शेतकर्‍यांना देशी गायी पाळण्यास प्रवृत्त करणारे गो-कृषी संशोधक मोहन देशपांडे यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांचे, कार्याचे स्मरण...
सव्वीस वर्षे उलटली या घटनेला. वर्ष 1999, तिथी चैत्र शुद्ध त्रयोदशी, भगवान महावीर जन्मदिन, ठिकाण बडनगर जि. उज्जैन (मध्यप्रदेश), 29 मार्च रोजी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ, गोपुरी-वर्धा यांचा पारितोषिक वितरण समारंभ सुरू होता. देशी गोवंशाच्या संरक्षण व संवर्धनासाठी कार्य करणार्‍या दोन महानुभावांचा सन्मान केला जात होता. पहिले सन्मानार्थी नीमच येथे गोशाळा चालवणारे, देशी-गोवंशाची तस्करी रोखणारे हसमुखभाई शहा यांना ‘गौभक्त’ पदवी देऊन सन्मानित केले व दुसरे सन्मानार्थी होते महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मडिलगे खेडेगावाचे मोहन शंकर देशपांडे. देशी गोवंश आधारित सेंद्रिय शेतीची मुहूर्तमेढ रोवणारे, ऋषी-कृषी तंत्र विकसित करणारे. सर्वसामान्य शेतकर्‍यांना गावरान गायी पाळण्यास प्रवृत्त करणारे गो-कृषी संशोधक म्हणून मोहन देशपांडे यांना ‘आर्यकृषक’ पदवी बहाल केली.
 
 
इतक्या वर्षांनी या कार्यक्रमाच्या स्मरणाचे निमित्त हे की, आपल्या मनोगतात दिवंगत मोहन देशपांडे यांनी देशी गोवंश संवर्धन याविषयी केलेली काहीशी वादग्रस्त पण मूलगामी-सत्य अशी मांडणी. ते म्हणाले होते की, आपण शेतकर्‍यांना त्यांनीच जपलेला देशी-गोवंश पाळण्यास प्रवृत्त नव्हे तर परावृत्त करत आहोत. आजघडीला गोवंश आधारित सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले तर शेतकर्‍यांच्याच गोठ्यात उत्तम देशी गोवंश स्वस्थळी (खप-ीर्ळीीं) संरक्षित व संवर्धित होईल. भविष्यात गोशाळांची गरजच भासणार नाही. आर्यकृषक देशपांडे यांचे एकांगी वाटणारे विचार वर्तमानात अगदी सत्य ठरत आहेत. अशा या प्रवाहाविरुद्ध जगलेल्या बंडखोर संशोधक-शेतकर्‍याचे 87 व्या जन्मदिनी स्मरण करणे अगत्याचे वाटते.
 
 
कौटुंबिक पार्श्वभूमी व जीवन प्रवास
 
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका हा राज्याच्या एका कोपर्‍यात सह्याद्री पर्वतमालेत वसलेला आहे. कर्नाटक व गोवा या राज्यांच्या सीमा अगदी हाकेच्या अंतरावर. आजरा परिसरातील देशपांडे हे वतनदार कुटुंब. हजारो एकर जमिनींची मालकी. राजकारणात प्रभाव. कर्नाटकातील सुपे-हल्याळ परिसरातील सुप्रसिद्ध देशपांडे घराण्याशी पण आजरेकर देशपांडे कुटुंबाचा नातेसंबंध होता. मोहन देशपांडे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात आजरा येथे 11 मार्च 1938 रोजी झाला. आईवडील, दोन बहिणी व चार भाऊ असे त्यांचे मोठे कुटुंब होते. शालेय शिक्षण आजरा व कोल्हापूर येथे झाले. पुढे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील सर परशुराम कॉलेजात झाले. गणित विषयात बी.एस्सी. पदवी मिळाल्यावर कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य सोनोपंत दांडेकर यांच्या आग्रहाने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी गणिताची शिकवणी सुरू केली. सदाशिव पेठेत राहात असतानाच पुष्पा देवधर या तरुणीशी प्रेमविवाह झाला व एके दिवशी दोघांनी ठरवले की, पुण्यातील सुखद असे शहरी जीवन सोडून मूळ गावी शेती करायला परतायचे. उभयतांनी घेतलेल्या निर्णयाला सर्वच नातलगांनी विरोध केला, पण दोघांचा निर्णय पक्का होता व संघर्ष करण्याची पूर्ण तयारीही होती. गांधीहत्येच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील खेडेगावी परतण्याचा निर्णय निश्चितच धाडसी होता.
 
 
मोहन देशपांडे यांना शेती कसायची नव्हती म्हणून वडिलांकडे त्यांनी हौसेने उताराचे बरड माळरान मागितले होते. गावी परतल्यावर मोहन व पुष्पा या जोडीने अत्यंत साधे कौलारू घर बांधून आजूबाजूच्या कुणब्यांसारखे जीवन सुरू केले. उताराच्या बरड रानाची बांधबंदिस्ती करून घेतली. गरजेपुरते भात खाचरे तयार केले. बांधावर विविध देशी वृक्ष व उपयोगी झाडोरा लावला. काजूची कलमे लावली. दैनंदिन गरजेसाठी व बाजारात विक्रीसाठी भाजीपाला घेऊ लागले. मोहन यांच्या वेड्या उद्योगात, शेतीची पार्श्वभूमी नसणार्‍या पुणेरी पुष्पाताईंनी उत्तम साथ दिली. त्या सर्व कृषी-कौशल्य मेहनतीने शिकल्या. ‘आम्ही दोघे शेतीतील पारंपारिक वाटा शोधायला आलेलो नव्हतो, तर नवीन वाट निर्माण करण्यासाठी खेडेगावी परतलो होतो’, असे त्या आजही सांगतात.
 
 
गोआधारित सेंद्रिय शेतीतील संशोधन
 
प्रचलित रासायनिक पद्धतीने शेती कसत असताना एक शेतकरी म्हणून मोहन देशपांडे यांना अनेक अडचणी व आव्हानांना तोंड द्यावे लागत होते. हरितक्रांतीमुळे होत असलेले माती, पाणी व अन्न यांचे सर्वांगी प्रदूषण याला पर्याय निर्माण करण्याची ते धडपड करत होते, विविध प्रयोग करत होते. रिचेल कार्सन लिखित ‘सायलेंट स्प्रिंग्ज’ पुस्तकामुळे सत्तरी-ऐंशीच्या दशकात निसर्गस्नेही जैविक शेतीची चर्चा जगभर सुरू झाली. मातीची सुपीकता टिकवत कृषी जैवविविधता जपण्याचा आग्रह सर्वदूर सुरू झाला. पण त्यासाठी निश्चित अशी शेती-पद्धती तयार नव्हती. कृषितज्ज्ञ व अभ्यासकांमध्ये मतमतांतरे होती. या गोंधळात देशपांडे यांनी मूळ भारतीय कृषी ज्ञान परंपरेचा अभ्यास सुरू केला. पाश्चात्यांच्या प्रभावापासून भारतीय शेतीला वाचवायचे असेल तर स्वदेशी पारंपारिक कृषी ज्ञान व कौशल्याची गरज आहे, हे त्यांनी ताडले. वेद, उपनिषदे ते कृषी पराशर, बृहदसंहिता, गीता, ज्ञानेश्वरी आदि वाड्मयाचा आधार घेत तब्बल चाळीस वर्षे सातत्यपूर्ण कार्य करत अस्सल भारतीय कृषी-तंत्र स्वत:च्या शेतावर विकसित केले. ऋषी-मुनींचे कृषी ज्ञान हा त्याचा आधार होता. अमृतपाणी म्हणजे देशी गायीचे शेण, तूप, जंगली मधाचा वापर करून जमिनीत सूक्ष्म जीवाणू वाढवणे. वडाच्या झाडाखालची माती एकरी फक्त पंधरा किलो, एकदाच ‘अंगारा’ (राख खत) म्हणून वापरली तर जमिनीला सच्छिद्र करणारी गांडुळे निर्माण करता येतात. तसेच गोमूत्र व दशपर्णी अर्काची फवारणी केली तर रोगकिडींना अटकाव होतो. असे साधे सोपे ऋषी-कृषी तंत्र आहे.
 
krushivivek 
 
प्रत्येक वनस्पतीची स्वत:ची एक भाषा असते. ती जमिनीतील जीवजीवाणूंना कळते आणि प्रत्येक झाडांचे खाणे भिन्न असते. त्यामुळे रासायनिक खते ही कोणत्याही पीकाचे अन्न असूच शकत नाही. सूर्यप्रकाशात वनस्पती अन्न निर्मिती करते पण तिची वाढ ही चंद्रप्रकाशात होते, हे सत्य मोहन देशपांडे यांनी संशोधनातून सिद्ध केले.
 
छद्म विज्ञान म्हणून हेटाळणी
 
मोहन देशपांडे यांनी श्री समर्थ शेती संशोधन केंद्राच्या माध्यमातून कार्य सुरू ठेवले. त्यांची मांडणी अनेकांना अशास्त्रीय वाटली. हितसंबंधी गटांना अडचणीची झाली. छद्म-विज्ञान म्हणून तथाकथित कृषितज्ज्ञांनी हेटाळणी केली. जिथे नदीकाठची बागायती शेती क्षारपड झाली होती, अशा शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीसाठीचे ‘ऋषी-कृषी तंत्र’ अधिकच उपयुक्त ठरले. जपानमधून त्यांना बोलवणे आले. एक वनस्पती वाढत नव्हती. तेथे जाऊन प्रात्यक्षिक करून दाखवले व त्या वनस्पतीची नैसर्गिक वाढ होऊ लागली. आपणास भारतीय कृषी परंपरेचा अभिमान नसल्याने शास्त्रीय संशोधन करण्यासाठी कोणी हाडाचा संशोधक पुढे आला नाही. देशपांडे यांच्या स्पष्ट स्वभावाने अनेकांची पंचाईत व्हायची. श्रीकृष्ण व समर्थ रामदास हे त्यांचे आयडॉल.
 
सत्य कळावया कारणे ! बोलली नाना निरुपणे !
तरी उठेना धरणे असत्याचे !!
सत्य असोन आच्छादिलेे ! मिथ्य ते सत्य जाहले !
ऐसे विपरीत वर्तले ! देखता देखता !!
 
हा दासबोधातील विचार सांगत भारतीय शेती कशी स्वार्थी घटकांकडून नागवली जात आहे, याचे ते स्पष्टीकरण देत.
उल्लेखनीय असे
 
खेडे येथील शेतात चंदन रोपांची यशस्वी लागवड असेल, आयुर्वेदिक नरक्या वनस्पतीच्या लागवडीचा प्रयोग वा विविध वृक्ष-वनस्पतींनीयुक्त उजाड माळावरील कृषि-वानिकी तथा Analogue Forestry मॉडेल त्यांनी उभारले. आयुष्याच्या उत्तरार्धात ‘मोपुशैशवम’ नावाने संस्कृती, शिक्षण व संशोधन संस्था सुरू केली. दरवर्षी देशपांडे कुटुंबीय सामाजिक भान जपत ‘पुष्पा-मोहन सामाजिक पुरस्कार’ देत असतात.
 
लिखित साहित्य
 
मोहन देशपांडे यांचे ‘ऋषी-कृषी (देशपांडे कृषी तंत्र)’ हे पुस्तक मराठी, हिंदी व इंग्रजी या तीनही भाषांत उपलब्ध आहे. सोबत श्रद्धा-अंधश्रद्धा, गोमाता एक वरदान, वीर हनुमान, बरखास्त करा वेतन आयोग इ. विषयी विपुल लेखन केले व विविध ठिकाणी एक हजारपेक्षा अधिक व्याख्याने दिली.
 
पुरस्कार व सन्मान
 
कोल्हापूर येथील पंचगंगा विज्ञान पुरस्कार, राज्यस्तरीय वसंतराव नाईक कृषी पुरस्कार, पुण्याच्या सहकार-भारती संस्थेचा संशोधक पुरस्कार, वर्धा येथील भारतीय कृषी-गोसेवा संस्थेचा ‘आर्यकृषक’ पुरस्कार.
 
 
आज घडीला देशातील असंख्य शेतकरी त्यांचे अनुयायी आहेत. मुलगा शैलेश देशपांडे व जावई राजेंद्र सांबरे हे ऋषी-कृषी तंत्राचा प्रचार-प्रसार करताहेत. नातू शंतनू सांबरे मृदा-विज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेऊन संशोधन करत आहे. आपल्या आजोबांचे संशोधन कार्य सुरू ठेवत, त्याची शास्रशुद्ध भाषेत मांडणी तो करत आहे.
 
 
सतत कार्यमग्न असणारे ऋषितुल्य मोहन देशपांडे यांचे 22 डिसेंबर 2015 रोजी वयाच्या 77 व्या वर्षी अकस्मात निधन झाले. त्यांची मुलगी शीतल या नेहमी वडिलांच्या आठवणी सांगतात. लहानपणी बाबांना एक प्रश्न केला होता, नक्की तुम्ही कोण आहात...? तेव्हा ते म्हणाले....
 
मी कोण ? कुणाचा ?
प्रश्न आहे गंमतीचा
थोड्याशा आपुलकीचा, सर्वांनाच पडणारा
मी तर तुमचा आमचा सर्वांचा
असून नसलेल्या विश्वाचा
भासात्मक आभासाचा
नेति नेति संस्कृतीचा
ऋषीमुनींचा वारसा सांगणारा
एक शेतकरी...
राजकारण
लेख
संपादकीय