@ प्रा. रवींद्र भुसारी
ज्येष्ठ संघप्रचारक श्री. शंकरराव तत्त्ववादी यांच्या निधनाने संघ-क्षितिजावरील एक देदीप्यमान तारा निखळला आहे. 1987 साली शंकरराव पूर्णकालीन संघप्रचारक निघाले. प्रारंभी, विदेश विभागात इंग्लडमधील संघ दृढ करण्याचे दायित्व त्यांच्यावर आले होते. 1994 ते 2012 असे सलग 18 वर्षे शंकरराव, 'विश्व विभाग प्रमुख’ म्हणून काम बघत होते. याकाळात 50 पेक्षा अधिक देशात त्यांचा प्रवास होत असे. विदेशातील कित्येक कुटुंबांना शंकरराव आपल्याच परिवारातील घटक वाटायचे. एवढी आत्मीयता त्यांनी घराघरांत निर्माण केली होती.
होळीच्या शुभदिनी, ज्येष्ठ संघप्रचारक श्री. शंकरराव तत्त्ववादी यांच्या निधनाने संघ-क्षितिजावरील एक देदीप्यमान तारा निखळला आहे. मा. शंकरराव मूळ नागपूरचे. शालेय शिक्षणात, 1950मध्ये नागपूर बोर्डातून मॅट्रिकला प्रथम क्रमांक शंकररावांनी पटकावला. आणि.. योगायोग असा की, त्यावर्षीच्या नागपूर विजयादशमी उत्सवात त्यांनी वैयक्तिक गीत गायले.
अत्यंत तल्लक बुद्धी व सुरेल गळा असा संगम असलेले शंकरराव M.sc नंतर बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून नियुक्त झाले. पुढे, फार्मसी विभाग प्रमुखाची जवाबदारी त्यांनी सांभाळली. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेला रवाना झाले. उच्चशिक्षणासोबत शंकररावांचे संघकार्य अविरत सुरू होते.
1987 ला शंकरराव पूर्णकालीन संघप्रचारक निघाले. प्रारंभी, विदेश विभागात इंग्लडमधील संघ दृढ करण्याचे दायित्व त्यांच्यावर आले. 1994 ते 2012 असे सलग 18 वर्षे शंकरराव, ’विश्व विभाग प्रमुख’ म्हणून काम बघत होते. या काळात 50 पेक्षा अधिक देशात त्यांचा प्रवास होत असे. विदेशातील कित्येक कुटुंबांना शंकरराव आपल्याच परिवारातील घटक वाटत. एवढी आत्मीयता त्यांनी घराघरांत निर्माण केली.
2012पासून शंकरराव, नागपूरच्या महाल कार्यालयात वास्तव्यास आले. देश-विदेशातून त्यांना भेटण्याकरिता अनेक परिवार येत असत. अत्यंत आपुलकीने शंकरराव प्रत्येकाशी बोलत. गेल्या महिन्यापासून त्यांच्या तब्येतीची कुरबुर सुरू झाली. अखेर, आज होळीच्या दिवशी महालस्थित डॉ. हेडगेवार भवनात सकाळी 10च्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला.
त्यांचे माधव नेत्रालयाला नेत्रदान झाले व त्यांच्या इच्छेप्रमाणे देहदान -AIIMS मध्ये झाले. आयुष्यभर समाजासाठी झीजणारे शंकरराव; मृत्यू पश्चातही समाजासाठीच स्वतःला अर्पण करून गेले. पूर्णतः समर्पण काय असते याचे बोलके उदाहरण देऊन गेले.
तेच खरोखर विजयी जीवन, राष्ट्रास्तव झीजले कण कण..!
भारतमातेच्या थोर पुत्रास भावपूर्ण आदरांजली..!