दि. 7 ते 9 मार्च 2025 या तीन दिवसीय कालावधीत चिपळूण येथे राष्ट्रसाधक शिबिर संपन्न झाले. या शिबिराविषयीचे अनुभव कथन करणारा लेख.
निसर्गरम्य वातावरण लाभलेले, माड, पोफळी, आंबा, रातांबा (कोकम) या वृक्षांनी नटलेले खाडी काठावरचे टुमदार गाव ‘मालदोली’. मोक्षगुंडम विश्वेश्वरैयांसारख्या तज्ज्ञ इंजिनिअरने दिलेल्या आराखड्यानुसार बांधलेली पुरातन वास्तू, आजही दिमाखात टिकून आहे ती म्हणजे मराठे यांचे घर, जे आज ‘मराठे न्यास’ म्हणून परिचित आहे. येथेच आमचे ‘राष्ट्रसाधक’ शिबिर भरले होते.
दि. 7,8,9 मार्च 2025 हे तीन दिवस म्हणजे त्रिगुणांना ओळखून, त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी म्हटलेले मुक्ताईचे ताटीचे अभंगच! यात स्वतःला ‘माऊली’ किंवा ‘मुक्ताई’ समजणारे कोणीही नाहीत हं! सर्वच स्वयंसेवक वृत्तीचे विद्यार्थी! विवेक व्यासपीठ, श्री संत मुक्ताई विद्यापीठ, चिपळूणच्या श्रीपाद सेवा मंडळाचे अनुयायी आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते यांच्या सहकार्याने हे शिबिर संपन्न झाले.
आम्ही विद्यार्थी होतो; तरीही ही शाळा नव्हती. आम्ही भक्त होतो; तरीही हे मंदिर नव्हते. शाळेतील ज्ञान आणि मंदिरातील पावित्र्य येथे 100% होते. मात्र वातावरण होते ते घरातील दिवाळी-दसर्याचे, आनंदाची भुईचक्र होती, हास्याचे फुलबाजे होते, खेळीमेळीचे वातावरण होते आणि अनुभवांच्या ताटातील पंचपक्वान्नं होती.
संतसाहित्याचे अभ्यासक, प्रवचनकार धनंजय चितळे यांनी ‘राष्ट्र्साधक’ भूमिका स्पष्ट केली. राष्ट्राची, समाजाची सेवा ही साधना व्हावी, त्यासाठी प्रथम स्वतःतील गुणांचा विकास व्हावा, अध्यात्माची बैठक असावी, अंतर्मुख व्हावे, छोट्या-छोट्या कामांतून सामाजिक भान जपत कामाचा डोंगर उभा राहतो. त्यासाठी संतांनी सांगितलेल्या मार्गाचा अभ्यास गरजेचा असतो. कर्मसिद्धांत जाणल्याने निष्काम कर्मयोगापर्यंत हळूहळू आपला विकास साधता येतो. प्रत्यक्ष कार्य करताना येणारे अनुभव, अडचणी आणि मार्गक्रमण, पात्रता आणि मर्यादांची जाणीव असे सर्वांगीण विकासासाठीचे आवश्यक सर्व पैलू तीन दिवसांच्या शिबिरात विविध वक्त्यांनी उलगडून दाखवले.
रोहन उपळेकर यांचे लेख वाचले होते. मुलाखत पाहिली होती. त्यांना प्रत्यक्ष पाहता, ऐकता आले. प.पू. शकुंतलाताईंचा आणि सर्वच गुरुतुल्य व्यक्तींच्या सहवासात राहिलेल्या रोहनदादांचा सहवास आणि प्रवचन ऐकताना सर्वांनाच ‘अहो भाग्यम्’ असे वाटले. त्यांची सहज, ओघवती, अनुभवामृताने भरलेली वाणी म्हणजे ‘या हृदयाचे त्या हृदयी’ अशीच!
आगामी शिबिर
दिनांक 18,19,20 जुलै 2025 पुणे येथे....
संपर्क : किरण दुधाने 9552841581
शिरीष आपटे आणि शिरीष गाडगीळ यांनी तर संघकार्याच्या पायाचे आणि कळसाचेही दर्शन घडवले. शिरीष गाडगीळ यांनी षड्र्िपूंची पानगळ कशी झडझडावी ते सोदाहरण आणि साभिनय सदर करताना धम्माल केली.
सर्वच वक्त्यांची भाषणे कार्यकर्तृत्वातून, आंतरिक उमाळ्यातून, राष्ट्रभावनेतून आणि भारतीय परंपरेच्या, तत्त्वज्ञानाच्या विचारधारेतून सह्जोद्वेगाने वैखरीत आलेली! त्यामुळे त्याचे वर्णन ते काय, कसे, किती करावे? ‘शब्द बापुडे केविलवाणे’!
उद्घाटनासाठी उपस्थित राहिलेले ग्रंथालय तसेच इतिहाससंशोधन क्षेत्रातील प्रकाश देशपांडे; तसेच डी.बी.जे महाविद्यालयाचे प्राचार्य माधव बापट आणि समारोपासाठी आलेल्या भारतीय स्त्रीशक्ती, कोकणप्रमुख आणि शि.प्र.मंडळी, पुणे यांच्या चिपळूण येथील महाविद्यालयाच्या निवृत्त प्राचार्या अर्चना बक्षी सर्वांच्याच विचारांनी आणि अनुभवाने आम्ही अंतर्मुख झालो.
हे सर्व दिवस प्रेमाने, आर्जवाने, नम्रतेने जेवण वाढणारे सर्व स्वयंसेवक, शिबिरासाठी व्यवस्थापक म्हणून सातार्याहून आलेले सुभाष कुलकर्णी हे पी.एस.आय. निवृत्त आहेत, हे कळल्यावर आम्हाला सुखद धक्काच बसला. त्यांच्या वागण्याबोलण्यात, चालण्यात ‘तो रुबाब’ कोठेही दिसला नाही. ‘अहंकाराचा वारा न लागो’ म्हणजे कसा ते त्यांच्याकडून शिकावे.
‘आज पैशांच्या मागे धावणारा माणूस यंत्रवत जगतो आहे. तो सहसंवेदना हरवत चालला आहे.’ अशी खंत सर्वत्र व्यक्त होताना दिसते आहे; मात्र त्यासाठी कृतिशील व्यवस्था निर्माण करण्याची धडपड कितीजण करताना दिसतात? मला वाटते, या संस्थांनी अशा राष्ट्रसाधक शिबिरातून हे कार्य सुरू केले आहे, ते सर्वांसमोर यावे म्हणून हा लेखप्रपंच! ‘आधी केले मग सांगितले’ या वृत्तीतून घेतलेली ही शिबिरे म्हणूनच परिणामकारक ठरणारी आहेत.
आता आम्हा शिबिरार्थींची अवस्था, ‘तुका म्हणे होय मनाशी संवाद। आपुलाच वाद आपुल्याशी॥’ गाभार्यातल्या घंटानादाची किणकिणणारी आवर्तने निनादत आहेत. सगुणाच्या दर्शनानंतर डोळे मिटायचे आणि आता अंतरंगात डोकवायचे अशी प्रत्येक शिबिरार्थींची भावावस्था आहे. मदतीला पुस्तकसंच आहे, ‘अंतरंग आणि बहिरंग’ दोन्हींच्या विकासाने आम्ही सर्वच शिबिरार्थी खर्या अर्थाने ज्ञानाने ‘मालामाल’ झालो, हे नक्की.
याही पुढे ही शिबिरे होतील. तरुणांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवर्जून सांगून मी लेखनविराम घेते.
आगामी शिबिर :
दिनांक 18,19,20 जुलै 2025 पुणे येथे....
संपर्क : किरण दुधाने 9552841581