“संघ ही प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे” - सुहास हिरेमठ

विवेक मराठी    01-Feb-2025
Total Views | 169
‘सा. विवेक’ प्रकाशित आणि ज्येष्ठ स्वयंसेवक व सुप्रसिद्ध विचारवंत पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘आम्ही संघात का आहोत...’ या पुस्तकाचे प्रकाशन 17 जानेवारी 2025 रोजी नाशिक येथे झाले. या कार्यक्रमास नाशिक विभाग संघचालक कैलास साळुंखे, नाशिक शहर संघचालक विजय मालपाठक इ. मान्यवर आणि नाशिक परिसरातील श्रोतृवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमात संघ स्वयंसेवकांची अनेक उदाहरणे देऊन संघ समजून घेण्याची व्यापक दृष्टी आपल्या बौद्धिकातून मांडली.
rss
 
“‘आम्ही संघात का आहोत...’ या पुस्तक प्रकाशनासाठी येण्यासंबंधी आणि अध्यक्षीय भाषण करण्यासंबंधी मंगेशजी खाडिलकर यांनी काही दिवसांपूर्वी आग्रह केला. पुस्तकाचं शीर्षक कोणत्याही सामान्य स्वयंसेवकाला कळेल आणि आवडेल असंच आहे आणि पतंगे यांनी ते अतिशय सोप्या भाषेत मांडले आहे. मुळात या पुस्तकाचा उद्देश, समाजातील संघात न आलेला वर्ग, ज्यांनी संघाची कधी अनुभूती घेतली नाही; परंतु जो विचारी वर्ग आहे, त्या वर्गाला संघाची सर्वांगीण माहिती होण्याकरिता लिहिलेले अतिशय उत्कृष्ट असे हे पुस्तक आहे.
 
 
खरं तर कितीही विद्वान असला तरी संघ ही बाहेरून बघून समजण्याची गोष्ट नाही. पुस्तक वाचूनही संघ समजू शकत नाही. संघ ही प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे. अर्धवट माहितीच्या आधारे किंवा अज्ञानाद्वारे संघ समजून घेतल्यामुळे अनेक घोटाळे आणि गडबडी होतात, असा आतापर्यंतचा अनुभव आहे, कारण प्रत्यक्ष संघ हा वेगळाच आहे. ‘दहा आंधळे एक हत्ती’ अशी एक गोष्ट आहे. ज्या आंधळ्या व्यक्तीला हत्तीचा जो अवयव हाती लागतो, त्याप्रमाणे तो हत्तीचे वर्णन करू लागतो, तसेच बाहेरून संघ बघणार्‍यांची अवस्था असते.
  
संघामध्ये प्रचारक व्यवस्था आहे. हे प्रचारक आपले आयुष्य समर्पित करून संघकाम करीत असतात; पण काठावर बसलेल्या लोकांना प्रचारक म्हणजे काय हे माहीतच नसतं. कधी कधी ते प्रचारकांची तुलना सेल्समनशी करतात. म्हणजे संघ खपविण्याचे काम बहुतेक हे लोक करत असतील, असा त्यांचा गैरसमज तयार होतो.
 
‘संघात जाऊन तुम्हाला काय मिळते? तुम्ही ब्राह्मणेतर असून संघात कसे? तुम्ही बुद्धिवादी असूनही बंदिस्त विचारसरणी असलेल्या संघात कसे काय रमू शकता?’ या सर्व प्रश्नांची उत्तरे ..

 https://www.vivekprakashan.in/books/why-we-are-in-sangha/
 मी सातारा जिल्ह्यात प्रचारक असताना किशोरपंत बापट जिल्हा सरकार्यवाह होते. पेशाने ते सिव्हिल इंजिनीअर होते. कामासाठी त्यांनी आंध्रमधील एक सिव्हिल इंजिनीयर मदतनीस रुजू केला होता. कामानिमित्त माझे किशोरपंतांच्या घरी सतत जाणे-येणे आणि चर्चाविनिमय होत असे. हातातील काम सोडून किशोरपंत नेहमीच माझ्याशी बोलायला तत्पर असत, हे पाहून त्याने ‘नक्की हा माणूस आहे तरी कोण,’ असे किशोरपंतांना विचारलेच. किशोरपंतांनीदेखील माझी ओळख करून देताना, प्रचारकाची खडतर जीवनशैली आणि ते राष्ट्रीय संन्याशासारखे आयुष्य जगणारे असतात, असे सांगितले. असे आयुष्यही काही माणसे जगतात याचा कधी त्याने अनुभव न घेतल्यामुळे त्याचा विश्वासच बसला नाही. संघाच्या कित्येक गोष्टी अशा आहेत की, समाजातील इतर लोकांच्या समजण्यापलीकडे आहेत. अशा गोष्टी समजण्यासाठी अशा प्रकारची पुस्तके येणे आवश्यक आहे.
 
rss 
 
संघ वाटचालीत 1948 साल हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. 1948 पूर्वी संघाचे काम खूप प्रचंड होते. जर गांधीहत्या झाली नसती तर देशाचे चित्र बदलून गेले असते. हा कालखंड संघ आणि समाजाच्या दृष्टीने अत्यंत दु:खद होता. त्या एका गोष्टीचा फायदा अनेकांनी घेतला आणि संघाविरुद्ध अपप्रचार सुरू केला, हे सर्वश्रुत आहेच. वस्तुत: गांधीहत्या करणार्‍या गोडसेचा आणि संघाचा काहीही संबंध नाही. गांधीहत्येचा आणि ब्राह्मणांचाही काही संबंध नाही. मात्र तो एक धागा पकडून त्या वेळी विनाकारण अनेक ब्राह्मणांची घरे जाळली गेली. तिथपासून जे अखंड अपप्रचार आणि टीकासत्र सुरू झाले, ते आजतागायत. आपला स्वार्थ साधण्यासाठी त्या काळातील काँग्रेस धुरीणांनी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी संघविरोधी अपप्रचार सुरू केला आणि लोकांच्या डोक्यात एक गोष्ट पक्की बसवली की, संघ बामणांचा आहे. त्यातून एक समीकरण तयार झाले की, ‘जो जो संघात जातो, तो ब्राह्मण आहे’. असे प्रकार दिवसेंदिवस वाढत गेले, जेणेकरून ब्राह्मणेतर समाज संघापासून दूर राहील. त्यांच्या या कावेबाज धोरणामुळे फार मोठा वर्ग संघापासून दूर राहिला. गांधीहत्या हे त्यांच्यासाठी केवळ साधन झाले. या जाळपोळीत संघाची कार्यालयेही जाळली गेली. बेळगावातील संघ कार्यालयातील अनेक फोटो जाळले गेले, त्या फोटोंतील एक फोटो गांधीजींचा पाहून त्यातील एकाने सावध केले. त्यावर तो म्हणाला की, हा तर ’संघाचा गांधी’ आहे. यातून एक प्रश्न निर्माण होतो की, या लोकांना गांधीहत्या झाल्याचे दु:ख किती होते?
 
 
2016 साली प. महाराष्ट्राचा पुण्यामध्ये शिवशक्ती संगम हा मोठा कार्यक्रम संपन्न झाला. त्या वेळेस संघाच्या प्रांत कार्यकर्त्यांनी जी जी मंडळी संघविचारधारेपासून दूर आहेत, अशांना विचारपूर्वक संघाच्या कार्यक्रमात पाहुणे म्हणून बोलवायला सुरुवात केली. हे निमंत्रण शरद पवारांनादेखील दिलं. त्यांनी धूर्तपणाने कारणे सांगून आपले ज्येष्ठ बंधू अप्पासाहेब पवार यांचे पुत्र राजेंद्र पवार (पुतणे) यांना निमंत्रण द्यायला सांगितले.
 
 
संघाचे चार-पाच कार्यकर्ते निमंत्रण देण्यास गेले; पण राजेंद्र पवारांनी कार्यक्रमास येण्यास नकार दिला. कार्यकर्त्यांनी कारण विचारल्यावर ते म्हणाले की, अहो, संघ ब्राह्मणांचा आहे. त्यावर कार्यकर्ते उत्तरले, आपणास निमंत्रण देण्यास आलेल्या पाचपैकी चार जण थोरात, जाधव, पाटील आणि भोसले अशा आडनावांंचे आहेत. यातील एक जणच ब्राह्मण आहे आणि तोही बारामतीचा आहे. तरीदेखील तुम्ही म्हणता संघ बामणाचा आहे, हे कसं काय? त्यावर क्षणभर ते थांबले आणि म्हणाले, असं आहे का, मला संघासंबंधी काहीच माहीत नाही हो. किंबहुना आहे ती माहिती चुकीचीच आहे. राजेंद्र पवार अतिशय बुद्धिमान उद्योजक मनुष्य असूनदेखील त्यांनी संघाविषयी चुकीची धारणा पक्की बसवून घेतली होती की, संघ हा बामणांचा आहे. हा एक प्रकारे बौद्धिक दहशतवाद आहे. खरे तर संघाच्या व्यासपीठावर जो कुणी जाईल त्याच्यावर अजूनही काही प्रमाणात बहिष्कार टाकला जातो.
 
 
असेच एक दुसरे उदाहरण. समरसता मंचाच्या वतीने कोल्हापूरमध्ये एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमास कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील डॉक्टरेट मिळवलेले प्राध्यापक आणि विभागप्रमुखांना पाहुणे म्हणून बोलावले होते. सूत्रसंचालकाने परिचय करून देताना त्या प्राध्यापकांच्या नावापुढील ‘डॉक्टर’ हा पदोल्लेख वगळला. प्राध्यापकांनी लागलीच शेजारी बसलेल्या दादा इदातेंच्या ही गोष्ट निदर्शनास आणून देत ते म्हणाले, ‘अहो इदाते, मी पीएच.डी. आहे. या विषयात डॉक्टरेट मिळविली आहे. त्यांनी माझ्या नावापुढे ‘डॉक्टर’ म्हणून उल्लेख करायला हवा होता. अहो, आमच्यासारख्यांना पीएच.डी. मिळवायला किती कष्ट करावे लागतात, हे तुम्हा बामणांना काय समजणार?’
 
 
खरं तर दादा इदाते भटके विमुक्त समाजातील आहेत. प्राध्यापकांच्या म्हणण्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे ‘जो संघात जातो तो ब्राह्मण आहे’ याच चुकीच्या धारणेमुळेच असा विचारी वर्ग संघापासून दूर राहिला आणि समाजाचे खूप मोठे नुकसान झाले.
 
 
मात्र आता चित्र बदललेले दिसत आहे. मी 1977 साली संघाचा जिल्हा प्रचारक झालो, तेव्हा संघात 60% लोक ब्राह्मण आणि 40% ब्राह्मणेतर असत. आता मी अखिल भारतीय स्तरावर काम करतो, तेव्हा कधी निदर्शनास येते की, काही काही बैठकांत ब्राह्मण अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात, बाकी ब्राह्मणेतर समाज संघात पाहायला मिळतो. याचा अर्थ काय की, आज सगळा हिंदू समाज संघात येऊ लागला आहे. आता संघ शताब्दी वर्ष चालू आहे, म्हणजे जवळजवळ 90 ते 95 वर्षे उर्वरित समाज संघापासून दुरावला होता; पण संघात येऊ लागल्यानंतर अनुभवातून त्यांना कळू लागलं आहे की, आपल्या संघाबद्दल चुकीच्याच धारणा होत्या. त्यामुळे एका अर्थाने आपले आणि समाजाचेच नुकसान झाले आहे, कारण हे लोक बाहेरून संघाबद्दल माहिती घेतात व त्यांच्या मनात चुकीची धारणा पक्की केली जाते आणि मग ते नको ती धारणा करून संघापासून अंतर राखून राहतात.
 
 
संघाच्या स्थापनेपासून उपेक्षा, विरोध, टीका, अपप्रचार, अन्याय, अत्याचार आणि स्वयंसेवकांचे प्रचंड नुकसान हे चालू राहिलं. जेवढं संघानं आणि स्वयंसेवकांनी सोसलं, तेवढं देशात अन्य कुणी सोसलं असेल असं मला वाटत नाही. एवढी प्रतिकूल परिस्थिती असतानाही संघाचे काम न थांबता वाढतच गेले. 1948च्या गांधीहत्येमुळे आलेल्या बंदीचा थोडा परिणाम म्हणून शाखा कमी लागल्या. मात्र त्यानंतर चिकाटीने काम करीत राहिल्यामुळे संघकाम जोमाने वाढले, अशा सर्व स्वयंसेवकांना साष्टांग दंडवत.
 
 
माळशिरस तालुक्यात संघपोषक वातावरण नसतानाही संघशाखा चालू होती. तेथील सत्ताधीशांनी त्या स्वयंसेवकाला धमकीवजा इशारा दिला होता की, शाखा बंद केली नाही तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्या कार्यकर्त्यास चरितार्थ चालविण्यासाठी ज्या पूरक व्यवस्था लागतील त्या सर्व ठिकाणांहून बहिष्कृत केले गेले. केवळ गांधीहत्या घडवून आणली, या गैरसमजातून हा बहिष्कार. त्यांनी सरतेशेवटी त्या स्वयंसेवकाच्या शेतातील उसाला आग लावली; पण तो सत्ताधीशांना शरण गेला नाही. त्याने संघशाखा चालू ठेवली. कुठून येते हे बळ? अशा कार्यकर्त्यांची सहनशीलता, साहस, चिकाटी आणि जिद्द यातूनच संघकार्य अविरत चालू आहे.
 
 
संघ हा आचरणातून शिकण्याची गोष्ट आहे. लाखो-करोडो सामान्य माणसांच्या असामान्यत्वातून संघप्रेरणा मिळते आणि स्वयंसेवक घडतो. एका खेडेगावात मी विस्तारक असताना ज्यांच्याकडे माझ्या निवासाची व्यवस्था होती, त्यांच्याकडे अठराविसे दारिद्य्र होते. त्यांचा कुटुंबकबिलाही मोठा होता, त्यात माझी भर पडली. तरीदेखील जेवढे दिवस मी त्यांच्याकडे होतो, तेवढे दिवस पंचपक्वानाचे भोजन होते. पुढे चौकशीअंती मला समजले की, त्या गृहस्थांनी घरातील तांब्याचा हंडा विकून माझ्या जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांच्या या कृतीने माझ्या मनात आयुष्यभर संघात काम करण्याचे बीजारोपण झाले. अशी संघात लाखो उदाहरणे आहेत.
 
 
1974 साली प्रचारक म्हणून मी बत्तीस शिराळा तालुक्यात गेलो. जिल्हा प्रचारक होते भिडे गुरुजी. परिचयासाठी एके दिवशी भिडे गुरुजी आणि माझा प्रवास ठरला. परिचय करता करता दिवस संपत आला; पण कुणी भोजनाची विचारपूस केली नाही. परिचयासाठी शेवटचं घर शिल्लक होतं; पण त्या घरातील गृहस्थ व्यसनाधीन होते. आम्ही चाचरत त्या घरात गेलो आणि बसताक्षणीच त्यांचा पहिला प्रश्न, ‘जेवण झाले का? मी असा व्यसनी, माझं आता काही होऊ शकत नाही; पण गावाचं भलं करणारी तुम्ही माणसं. आमच्या गावात आल्यावर उपाशी जायचं नाही.’ तिथेच संघात काम करण्याचे दुसरे बळ मिळाले.
 
 
चित्रपटमहर्षी भालजी पेंढारकर कोल्हापूर संघचालक होते तेव्हाचा प्रसंग. गांधीहत्येनंतर त्यांच्या प्रभात स्टुडिओला आग लावली. आपल्या डोळ्यांसमोर आयुष्यभराची पुंजी खाक होतानाही ते शांत होते. त्यांच्या पत्नीने ‘पुढे काय?’ असा प्रश्न विचारताच म्हणाले, आता आपण कोळशाची वखार चालवायची. अशी एकापेक्षा एक तेजस्वी जीवन जगणारी सामान्यांतील असामान्य माणसे संघात होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्पर्श झाल्यावर सामान्य लोकांनी असामान्य त्याग, पराक्रम आणि बलिदान केले. असेच कार्य संघातील स्वयंसेवकांनी केले आहे. संघकार्य हे ईश्वरी कार्य आहे आणि ते करणारे आपण ईश्वरी दूत आहोत, या भावनेने स्वयंसेवक काम करतात. म्हणून काळासोबत संघ वाढतच गेला.
 
 
अहिल्यानगरमध्ये पूर्वी लाल बावटा फडकायचा. तिथे संघ स्वयंसेवकांच्या अथक प्रयत्नातून भगवा फडकू लागला. रोजंदारीवर काम करणार्‍या एका तरुणाने आपले ठरलेले लग्न, संघ प्रशिक्षण वर्गास जाण्यासाठी पुढे ढकलले. हे कसे झाले? तर आपल्या ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या आचरणातून. संघ हा आचरणातून शिकता येतो आणि त्यामुळेच संघ हा दिवसेंदिवस वाढत आहे.
 
 
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या उक्तीप्रमाणे सतीचे वाण संघाने घेतले आहे. केरळमध्ये संघाच्या द्वेेषापोटी तीनशे संघ कार्यकर्त्यांची हत्या झाली. कित्येक जण विकलांग झाले. दीडशे कार्यकर्त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. तेव्हा त्यांच्या घरांची जबाबदारी संघाने उचलली होती. मा. रज्जूभय्या सरसंघचालक झाल्यावर त्यांच्या केरळमधील प्रवासात तेथील या जन्मठेप झालेल्या तरुण कार्यकर्त्यांना भेटायला कन्नूर जेलमध्ये गेले. त्या वेळी ‘तुम्ही संघात आल्यामुळे, संघकार्य केल्यामुळे, ही शिक्षा झाली. यामुळे तुमचे नुकसान झाले. आपली चूक झाली, असे तुम्हाला वाटत नाही का? याचा तुम्हाला पश्चात्ताप होतो का?’ असे प्रश्न त्यांनी त्या कार्यकर्त्यांना विचारले. त्यावरील आलेले उत्तर अंगावर काटा आणणारे होते. एका कार्यकर्त्याने उत्तर दिले की, ‘आपण हिंदू आहोत. हिंदूंचा पुनर्जन्मावर विश्वास आहे. त्यामुळे या जन्मातील तारुण्याचे उपभोग आम्ही पुढील जन्मी घेऊ. आमचा हा जन्म आम्ही संघकार्यासाठी अर्पण केला आहे आणि यातच आम्हाला धन्यता वाटते.’ राष्ट्रयज्ञात आपल्या जीवनाच्या समिधा अर्पण करणार्‍या अशा कार्यकर्त्यांमुळेच संघ, समाज आणि राष्ट्र घडत आहे.
 
 
संघाने या देशात जे जे सत्य आणि श्रेष्ठ आहे ते ते रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. जन्माधिष्ठित उच्चवर्णीयता आपल्या हातात नाही. त्यामुळे समाजातील एक वर्ग कायम दुर्लक्षित राहिला. हा भेदभाव संपवून समरसता आणण्याकरिता संघ प्रयत्नशील आहे. सामाजिक समरसता संघाने शिकवली आहे. वाई जिल्ह्यात हर्षे नावाचे संघाचे स्वयंसेवक होते. व्यवसायाने ते शिक्षक होते. योग्यता असूनही शासननियमांमुळे त्यांच्या संस्थेने त्यांना डावलून एका अनुसूचित जातीतील महिलेस मुख्याध्यापक पद दिले. हा निर्णय स्वागताहर्र् मानून अनुसूचित जातीतील भगिनी ही आपलीच भगिनी आहे, तिलाही संधी मिळाली पाहिजे, हा समरसता भाव हर्षे यांनी जपला.
 
 
स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी ‘स्वातंत्र्य’ हे मूल्य होते. आता ‘सामाजिक समरसता’ हे मूल्य आहे. हे मूल्य जपण्याचा स्वयंसेवकांनी कायम प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे संघाचे काम आत्यंतिक निष्ठेने करत हे संघ कार्यकर्ते जगले. आज संघाची सहावी पिढी कार्यरत असून त्याच जोमाने ती कार्यरत आहे. समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये संघाचे काम गतीने वाढत आहे. संघाला प्रचंड अनुकूलता आहे. काम करता करता संघ पुढे नेणार्‍या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना याचे समाधान वाटत आहे. ‘ओवाळावी चरणी काया, शब्द तुझे जातील वाया, हीच भावना जगवावया येथवरी आलो, कृतार्थ मी झालो राया, कृतार्थ मी झालो’. सफल होणे वेगळे आणि कृतार्थ होणे वेगळे आहे. माझ्या कुटुंबाच्याही पलीकडे समाजासाठी काही करणे, याला कृतार्थ जीवन म्हणतात. अशा कृतार्थ जीवन जगणार्‍या संघात तीन पिढ्या आहेत. पिढ्यान्पिढ्या हे होते आहे. यापुढील काळात आपण जे जे कार्य करू त्याचे सोने होणार आहे. ‘आम्ही संघात का आहोत...’ या पुस्तकाचे लिखाण त्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणारे आहे. अशा या समृद्धसंपन्न करणार्‍या पुस्तकाच्या दोन प्रती घ्यायला हव्यात. एक प्रत स्वतःसाठी आणि एक प्रत संघाबाहेरील व्यक्तीसाठी तरच या पुस्तकाचा उद्देश सफल होईल.”
 
शब्दांकन - कौमुदी परांजपे
राजकारण
लेख
संपादकीय