सुबियांतो यांचे हे कथन येथील वेगळेपण जोपासणार्या समूहाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे ठरावे, कारण वक्फ बोर्ड कायद्यातील सुधारणांना विरोध, समान नागरी कायद्याला विरोध, महाकुंभमेळ्याची कुचेष्टा, हिंदू प्रतीके आणि श्रद्धास्थाने यांच्या पुनर्स्थापनेला अपशकुन या सर्व माध्यमांतून आपण आपल्या राष्ट्राला व पर्यायाने नागरिक म्हणून आपल्यालाही जागतिक पटलावर दुर्बळ बनवीत असतो व एक महासत्ता म्हणून उभे ठाकण्याच्या देशाच्या गंभीर प्रयासांना खीळ घालण्याचा उद्योगही करीत असतो, हे आपल्या समूहासाठी सर्वसाधारणपणे ‘अल्पसंख्य’ संबोधन वापरणार्या नागरिकांनी लक्षात घेणे...

नुकताच भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा झाला. राजधानी नवी दिल्लीत झालेल्या या सोहळ्यासाठी यंदा प्रमुख पाहुणे म्हणून इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो उपस्थित होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुबियांतो यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते. या वेळी सुबियांतो असे म्हणाले की, जेव्हा मी भारतीय संगीत ऐकतो, तेव्हा मी नृत्य करण्यास सुरुवात करतो. ते माझ्या भारतीय जनुकांचा एक भाग असले पाहिजे. मला भारतात आल्याचा खूप अभिमान आहे. मी व्यावसायिक राजकारणी नाही, मी चांगला मुत्सद्दी नाही, माझ्या मनात जे आहे ते मी सांगतो. काही आठवड्यांपूर्वी, माझी डीएनए चाचणी झाली आणि माझा भारतीय डीएनए असल्याचे दिसून आले.
एकूण, सुबियांतो यांनी या प्रसंगाचा उपयोग भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांवर प्रकाश टाकण्यासाठी केला. सुबियांतो यांनी भारतीय डीएनए संदर्भात जे भाष्य केले त्यावर खरे पाहाता अंतर्मुख होऊन सर्वांनीच विचार केला पाहिजे. खरे तर इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांना भारतीयांनी धन्यवादच द्यायला हवेत, कारण त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या, की ते काही हंगामी राजकारणी नाहीत आणि फार मोठे गाजलेले मुत्सद्दी नाहीत. विविधतेतही खोलवरची आंतरिक एकात्मता असलेला हा आपला भारतीय समाज आहे, असे पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितलेले आहे.
आज आपण जागतिक पार्श्वभूमीवर महासत्तांचा विचार करताना आपल्या जवळ असलेला चीन हा देश आणि अमेरिका व रशिया यांचा विचार करतो, तेव्हा भारताला आपले हितसंबंध जपून जर त्यांच्या नजरेला नजर भिडवून उभे राहायचे असेल, तर आपण सर्व भारतीय एक आहोत, ही भावनाच ते सामर्थ्य देणारी ठरणार आहे. मग आपल्या शासकांनी काय करायला हवे? तर ही भावना सतत जागती राहील याचीच चिंता करायला हवी हे सोपे उत्तर आहे; पण भारताच्या फाळणीनंतर या देशात राहिलेला जो मुसलमान समाज आहे तो अन्य भारतीयांपेक्षा वेगळा आहे, त्याची काही तरी वेगळी ओळख आहे, काही तरी वेगळ्या अस्मिता आहेत, असे भ्रामक कथ्य स्वीकारून ते त्यांच्या मनात सतत कसे जागते राहील याचीच काळजी दीर्घकाळ सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाने वाहिलेली दिसून येते. मग त्या दृष्टीने सतत त्यांना विशेष पक्षपाती वागणूक देणे व त्यांना ‘अल्पसंख्य’ संबोधून त्यांच्या दृष्टीने विशेष वेगळे कायदे करणे आणि वेगळ्या व्यवस्था उभारणे यातून हे वेगळेपण सतत जपले गेले व त्या संपूर्ण समाजाला येथील मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील होऊ दिले नाही. त्यातून देशबाह्य निष्ठा जपणार्या वर्गाचा तर विशेष सन्मानच होत राहिला. मग अशा मार्गाने आपण काही तरी चुकीचे करीत आहोत, असे त्यांना वाटावे तरी कसे? देशाच्या सर्वोच्च संसदेत ‘जय फिलिस्तीन’ अशी घोषणा देणे व येथील देशभक्त जनतेला दूषणावह वाटेल अशी नावे अत्यंत आवडीने आपल्या मुलाबाळांना देणे आणि याच्या विरोधात कोणी आवाज उठविला तर गळचेपी होत असल्याचा कांगावा करणे, हे सर्व वेगळेपण भासविण्याचे उद्योग यातूनच जन्माला येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे द्रष्टे नेते जेव्हा अल्पसंख्य आणि बहुसंख्य असा विचार न करता ‘सब का साथ आणि सब का विकास’ हाच हेतू ठेवून अशा वेगळेपणाने फटकून वागणार्या समाजाला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचा प्रयास करतात, तेव्हा ते जणू संविधानच धोक्यात आणतात की काय, असे मानून त्यांच्या विरोधात थयथयाट केला जातो.
अलीकडे हिंदूंच्या सण-उत्सवप्रसंगी अन्य धर्मीयांकडून विशेषत: मुस्लीमांकडून काही खरेदी करू नये आणि अशा धार्मिक कार्यक्रमांच्या ठिकाणी त्यांना स्टॉल लावून विक्रीस परवानगी दिली जाउ नये अशी भूमिका घेतली जाते. आपल्या संदर्भात असे आक्षेप का घेतले जातात, यावर त्या समाजाला विचारमंथन करण्याची गरज आहे. अशा तीव्र प्रतिक्रिया का उमटतात, हे जाणून घेणे व आपल्या सामंजस्यपूर्ण व्यवहाराने ही विरोधाची धार बोथट करणे यासाठी त्यांच्याकडून प्रामाणिक प्रयत्न होण्याची गरज आहे. त्याकडे त्यांनी काणाडोळा करून चालणार नाही.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत जेव्हा येथील मुसलमानांचा व हिंदूंचा डीएनए एक आहे, असे सांगतात, तेव्हा ते विधान अशा समूहांच्या गळी उतरत नाही. जेव्हा योगी आदित्यनाथ इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो यांचे उदाहरण देऊन एतद्देशीय मुस्लीम समाजाला भगवान रामचंद्र हे आपले पूर्वज होते, हे सत्य स्वीकारण्याचे आवाहन करतात, तेव्हाही त्यात या समूहाला भगवे राजकारण दिसते; पण नको तो मुत्सद्दीपणा व नको ते राजकारण करण्याचा कोणताच हितसंबंध गुंतलेला नसल्यामुळे सुबियांतो अभिमानाने सांगतात की, इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लीम देश आहे; पण आमच्या भाषेचा अतिशय महत्त्वाचा भाग संस्कृतमधून आला आहे. इंडोनेशियाची अनेक नावे प्रत्यक्षात संस्कृत नावे आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनात प्राचीन भारतीय सभ्यतेचा प्रभाव खूप मोठा आहे. गरुड ही आमची राष्ट्रीय एअरलाइन्स आहे, गणपतीचे छायाचित्र आमच्या चलनावर अंकित केलेले आहे आणि रामलीला हा आमचा पारंपरिक उत्सव आहे, कारण भगवान राम हे आमचे पूर्वज आहेत.
सुबियांतो यांचे हे कथन येथील वेगळेपण जोपासणार्या समूहाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे ठरावे, कारण वक्फ बोर्ड कायद्यातील सुधारणांना विरोध, समान नागरी कायद्याला विरोध, महाकुंभमेळ्याची कुचेष्टा, हिंदू प्रतीके आणि श्रद्धास्थाने यांच्या पुनर्स्थापनेला अपशकुन या सर्व माध्यमांतून आपण आपल्या राष्ट्राला व पर्यायाने नागरिक म्हणून आपल्यालाही जागतिक पटलावर दुर्बळ बनवीत असतो व एक महासत्ता म्हणून उभे ठाकण्याच्या देशाच्या गंभीर प्रयासांना खीळ घालण्याचा उद्योगही करीत असतो, हे आपल्या समूहासाठी सर्वसाधारणपणे ‘अल्पसंख्य’ संबोधन वापरणार्या नागरिकांनी लक्षात घेणे व राजकारण्यांच्या हातातील बाहुले बनण्यास नकार देणे, हे समर्थ राष्ट्र घडविण्याची भरभक्कम आधारशिला ठरणार आहे, हे ओळखणे व आपल्यातील हा भारतीय डीएनए अधिक प्रभावी करणे, ही काळाची गरज आहे.