@प्रा. आनंद काटीकर
9421610704
जागतिक पातळीवर वाचनसंस्कृतीच्या दिशेने आत्मविश्वासपूर्वक पाऊल म्हणजे पुणे पुस्तक महोत्सव. वाचनसंस्कृतीशी संबंधित चार विश्वविक्रम या महोत्सवाने आपल्या नावे नोंदविली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व वयोगटातल्या व्यक्तींचा विचार करुन महोत्सवात पुस्तके प्रदर्शने, सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद यांचे आयोजन करण्यात आले होते. वाचनसंस्कृती लोप पावत चालली आहे, हे म्हणणे खोटे ठरवून वाचनसंस्कृतीला बळ देण्याचे सर्वात मोठे योगदान पुणे पुस्तक महोत्सवाने केले आहे.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने दिनांक 16 ते 24 डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पटांगणावर खर्या अर्थाने भव्य असा पुणे पुस्तक महोत्सव पार पडला. यात 276 विक्री केंद्रे (स्टॉल्स) घेऊन सुमारे 200 प्रकाशक सहभागी झाले होते. 11 भारतीय भाषांमधील लाखो पुस्तके पाहायला आणि खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी चांगलीच गर्दी केली होती. राष्ट्रीय पुस्तक न्यास, फर्ग्युसन महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, महाराष्ट्र शासनाचा उच्चशिक्षण आणि शालेय शिक्षण विभाग, पुणे श्रमिक पत्रकार संघ यांनी एकत्रितपणे, पुण्यात पहिल्यांदाच झालेल्या पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन केले होते. महोत्सवासाठी भारतीय विचार साधना आणि खडकी शिक्षण संस्थेचे विशेष सहकार्य लाभले.
राष्ट्रीय पुस्तक न्यास ही भारत सरकारची पुस्तकांच्या व्यवहारासाठी आणि वाचनसंस्कृतीच्या विकासासाठी निर्माण झालेली एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. एका न्यासाच्या माध्यमातून तिचे काम चालते. न्यासाचे अध्यक्ष मुंबईतील निवृत्त प्राध्यापक मिलिंद मराठे आणि संचालक कर्नल युवराज मलिक यांच्या मन:पूर्वक प्रयत्नांमुळे हा पुणे पुस्तक महोत्सव इतक्या भव्य स्वरूपात आयोजित होऊ शकला.
नकारात्मक पार्श्वभूमीवर
पुण्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रातच नियमितपणे पुस्तक प्रदर्शने भरवली जात असत. पुस्तकांची दुकाने विविध पुस्तके ठेवून वाचकांना आकर्षित करत असत. मात्र हा भूतकाळ झाला, असे (विशेषत्वाने कोरोनानंतर) वाटू लागले होते. सगळीकडेच वाचन कमी होते आहे किंवा प्रत्यक्ष पुस्तकांचे वाचन कमी होत आहे, अशी नकारात्मक आणि कदाचित काही प्रमाणात वास्तवातली चिंता व्यक्त होऊ लागली होती. ऑनलाइन किंवा ई-स्वरूपात वाचन जास्त प्रमाणात सुरू आहे, अशी मानसिकता झालेली होती. पुस्तकांची विक्री झपाट्याने कमी झालेली होती. पुस्तकांची दुकाने आणि ग्रंथालये बंद पडायला लागली होती. पुण्यामध्ये खाजगी पातळीवर भरवल्या जाणार्या पुस्तक प्रदर्शनांनाही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र उभे राहिले होते. अशा पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या या कल्पनेला पुण्यातील वर उल्लेख केलेल्या सर्व संस्थांनी सहर्ष पाठिंबा दिला आणि त्याआधारे डिसेंबर महिन्याच्या तिसर्या आठवड्यात पुणे पुस्तक महोत्सव आयोजित झाला.
पुस्तक प्रदर्शनाऐवजी पुस्तक महोत्सव
हा पुस्तक महोत्सव घडवून आणायचा, तर त्याचे ‘महोत्सवी’ रूप नेमके कसे असावे, यावर चर्चा करणे आवश्यक होते. या महोत्सवाच्या संयोजनाची धुरा ज्यांनी आपल्या शिरावर घेतली आणि समर्थपणे सांभाळली, अशा राजेश पांडे यांच्याकडे त्याचे श्रेय खर्या अर्थाने जाते. यांनी या पुस्तक महोत्सवात पुण्यातील प्रत्येक स्तरातील प्रत्येक क्षेत्रातील नागरिक कसा सामील होईल, या दिशेने प्रयत्न सुरू केले. विविध उद्योजक, शिक्षण संस्था, सामाजिक संस्था, विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, पत्रकार, संपादक, वाचन चळवळीतील कार्यकर्ते, सरकारी यंत्रणा अशा विविध जणांना सहभागी करून घेत त्यांनी बैठकांचा सपाटा लावला आणि त्या मंथनातून या पुस्तक महोत्सवाचे स्वरूप नेमके कसे असावे, याचे चित्र हळूहळू उमटू लागले.
पुणे आता मोठ्या प्रमाणावर बहुभाषक नागरिकांचे शहर झाले आहे, त्यामुळे हा पुस्तक महोत्सव केवळ मराठीकेंद्री न होता सर्व भाषकांचा व्हावा, सर्व भाषांमधील पुस्तके येथे यावीत याचा आग्रह जसा धरला गेला, तसाच पुण्यातील विविध भाषा बोलणारे समूहदेखील येथे यावेत आणि त्यांनी हा पुस्तक महोत्सव यशस्वी होण्याच्या दृष्टीने हातभार लावावा, यासाठीही प्रयत्न करण्यात आले.
पुस्तक महोत्सवाच्या स्थानाला एक वेगळेच महत्त्व होते. फर्ग्युसन महाविद्यालयाला पुण्याच्या भावजीवनात, इतिहासात आणि सांस्कृतिक वाटचालीत मोलाचे स्थान लाभलेले आहे. तसेच आज या महाविद्यालयाचे भौगोलिक स्थानही पुण्यात अतिशय मोक्याचे आहे. वाहनतळाची व्यवस्था मुबलक स्वरूपात उपलब्ध होती. त्यामुळे पुस्तक महोत्सव आयोजित करण्यासाठी दुसरी कुठलीही आदर्श जागा उपलब्ध नव्हती.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पटांगणावर भव्य मंडप घालून अडीचशे-तीनशे पुस्तकांची विक्री केंद्रे उभी करता यावीत, अशी योजना केली. त्याच जोडीला दोन हजार लोक बसू शकतील असे मोठे खुले सभागृह आणि भव्य व्यासपीठ निर्माण करण्यात आले. पुस्तके पाहायला, विकत घ्यायला आलेली माणसे प्रत्येक विक्री केंद्रात जावी, अशी इच्छा असल्यामुळे त्यांना अधूनमधून रेंगाळता येण्यासाठी उत्तम आहाराची विशेष व्यवस्था करण्यात आली. पुण्यातील सुप्रसिद्ध व्यावसायिक सुहाना मसालेवाले यांनी अतिशय उत्तम विक्री केंद्र उभी केली आणि पूना गेस्ट हाउसचे किशोर सरपोतदार यांच्या व्यवस्थापनाखाली या सर्व उपाहारगृहांना योग्य त्या पद्धतीने सादर करण्यात आले. ही योजना अतिशय यशस्वी ठरली आणि त्यामुळे पुस्तक पाहायला आलेले अनेक जण कळत-नकळत या आहार केंद्रांवरही विसावले आणि पुन्हा एकदा ताजेतवाने होऊन पुस्तके खरेदी करण्यासाठी नव्या जोमाने येत-जात राहिले.
साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी
केवळ पुस्तक प्रदर्शन आणि विक्री असे स्वरूप न ठेवता विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची मालिकाही या कालावधीमध्ये रसिकांसाठी उपलब्ध होती. सकाळी 10 ते दुपारी 1पर्यंत शालेय विद्यार्थी डोळ्यांसमोर ठेवून विविध कार्यक्रम आयोजित केले होते, तर दुपारी दोननंतर महाविद्यालयीन विद्यार्थी आणि खुला गट डोळ्यांसमोर ठेवून कार्यक्रमांची आखणी करण्यात आली होती.
तरुण आणि खुला गट डोळ्यासमोर ठेवून कुमार विश्वास, सौरभ द्विवेदी आणि विक्रम संपत यांच्या व्याख्यानांचे किंवा मुलाखतीचे आयोजनही करण्यात आले होते. पुस्तकांनी आम्हाला काय दिले? आणि आपल्या जीवनात पुस्तकांचे महत्त्व काय? हा सूर लक्षात ठेवून तिन्ही मान्यवरांनी त्यांच्या त्यांच्या अभ्यासाचे विषय रसिकांसमोर उलगडले. तिघांच्याही कार्यक्रमांना तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विश्वास पाटील, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. सदानंद मोरे, अभिराम भडकमकर, योगेश सोमण इत्यादी लेखक आवर्जून येऊन गेले. नंदेश उमप यांचा ‘लोकरंग’ हा सांस्कृतिक कार्यक्रम, ‘तुकाराम दर्शन’ हे महानाट्य, ‘ज्ञानपीठातील ज्ञानतपस्वी’ हा मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांवर केलेला कार्यक्रम, इंद्रधनुष्य हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी केलेला सांकृतिक कार्यक्रम, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची प्रकट मुलाखत, शिवरायांवरील गीतांचा आणि शिवराज्याभिषेक महानाट्याचा कार्यक्रम ‘श्रीमंत योगी’, राजकीय नेते काय वाचतात? यावर डॉ. नीलम गोर्हे, माधव भांडारी, अनिल शिदोरे यांनी मारलेल्या गप्पा, मालिनी अवस्थी यांचा उत्तर भारतीय लोकसंगीताचा खास कार्यक्रम इत्यादी भरगच्च कार्यक्रमांनी हा पुस्तक महोत्सव श्रोत्यांना अनुभवसमृद्ध करून गेला.
उद्याच्या सशक्त वाचकवर्गासाठी पायाभरणी
रविवार, दिनांक 17 डिसेंबर रोजी माधवी वैद्य यांनी बसवलेला शांता शेळके यांच्या बालगीतांवर आधारित ‘सुट्टी आली, सुट्टी आली’ या कार्यक्रमाने या महोत्सवाची सुरुवात झाली. पुढे रोज सकाळी 11 वाजता विसुभाऊ बापट यांचे ‘कुटुंब रंगलंय काव्यात’, चारुहास पंडित यांचे चिंटू या व्यंगचित्र मालिकेवर सप्रयोग व्याख्यान, मोहन शेटे यांचे शिवाजी महाराजांवरील कथाकथन तर अभिजित भिसे यांचे संभाजी महाराजांवरील कथाकथन, राजीव तांबे यांनी मुलांशी हसतखेळत मारलेल्या गप्पा या कार्यक्रमांनी बालगट रंगून गेला. आपल्याला केवळ आजच्या वाचकांसाठी कार्यक्रम करायचा नसून भविष्यातील वाचकांनाही घडवायचे आहे, ही जाणीव या कार्यक्रम आयोजनामागे होती. याच जोडीला 50-60 जणांच्या बालगटांना घेऊन चित्रकला, गोष्ट सादरीकरण, गप्पा मारणे असे उपक्रमही नियमित सुरू होतेच. त्यामुळे या पुस्तक महोत्सवाने उद्याचा सशक्त वाचक घडवण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेले आहेत, हे येथे अधोरेखित करावेसे वाटते.
महोत्सवात घडलेल्या वेगळ्या गोष्टी
एकाच वेळेस 32 अनुवादित बालसाहित्यकृतींचे प्रकाशन
फर्ग्युसन महाविद्यालयाने गेली 2 वर्षे भाषांतरावर विशेष लक्ष देऊन भाषांतर कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. त्यामुळे 2021च्या डिसेंबरमध्ये, राष्ट्रीय पुस्तक न्यासाबरोबर एक कार्यशाळा घेण्यात आली. त्यात 18 जणांनी सुमारे 32 बालसाहित्याची पुस्तके भाषांतरित केली होती. सुप्रसिद्ध भाषांतरकार रवींद्र गुर्जर यांच्या हस्ते या पुस्तकांचे औपचारिक प्रकाशन झाले. या प्रसंगी पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे आणि संचालक युवराज मलिक उपस्थित होते.
मराठीच्या बोलींचे प्रतिमांकन या विषयावर सप्रयोग व्याख्यान
राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने डेक्कन कॉलेज, पुणे यांच्या भाषाविज्ञान विभागाने सोनल कुलकर्णी-जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत जाऊन मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण केले. या सर्व भागांतून मराठीच्या बोलींचे विविध नमुने गोळा केले. याचे एक उत्तम संकेतस्थळ तयार झाले आहे. मराठीमध्ये झालेले हे सर्वेक्षण स्वातंत्र्योत्तर भारतातील एकमेव भाषिक सर्वेक्षण आहे, याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा.
गंधर्वसख्यम् हा संस्कृत गाण्यांचा बँड
आज तरुण पिढी सर्व प्रकारचे संगीत ऐकते. संगीताने भाषेचे बंध केव्हाच ओलांडले आहेत. पण भारतीय तरुणाईने भारतातील संस्कृत भाषेचा अंगीकार करून जर संगीताचा ताल धरला, तर ते अभिनव असेल असा विचार करून प्रांजल अक्कलकोटकर या तरुणाने ‘गंधर्वसख्यम्’ या नावाने संस्कृत गाण्यांचा बँड तयार केला आहे. या बँडला एक मोठे व्यासपीठ मिळवून देण्याचे कामही या महोत्सवाने केले. या बँडला मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी होता.
वाचन चळवळीतील घटकांचा प्रातिनिधिक सत्कार
वाचकांची भूक भागवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या विविध घटकांचा प्रातिनिधिक सत्कार हे या महोत्सवाचे एक वैशिष्ट्य ठरले. डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी आणि कार्यवाह सुनीताराजे पवार आणि पुण्यातील सर्वात जुने वाचनालय असणार्या पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहेंदळे यांचा सत्कार करण्यात आला.
महापुरुषांच्या नावाने ग्रंथदिंडी
भारतीय संविधान आणि संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जोडीने महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद, वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे अशा विविध 29 महापुरुषांच्या नावाने विविध महाविद्यालयाने आणलेल्या ग्रंथदिंडीचे वेगळेपण या पुस्तक महोत्सवात उठून दिसले.
हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सव साजरे करणारे होते. त्या निमित्ताने दोन वेगळे कार्यक्रम झाले.
कारागृहातील कल्लोळ
स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी सजा भोगलेल्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी कारागृहात साहित्यनिर्मिती केलेली आहे. अशा निवडक स्वातंत्र्यसैनिकांच्या साहित्यावर ’कारागृहातील कल्लोळ’ हा अभिवाचन आणि दृक-श्राव्य कार्यक्रम हेदेखील एक वेगळेपण लोकांना भावले.
‘हिंदुस्थानची रक्तरंजित फाळणी’ ही भारतीय मनाला हादरवून सोडणारी शोकांतिका आहे. यावर एक खास परिसंवाद आयोजित करण्यात आला. त्याच्या अध्यक्षस्थानी प्रतिभाताई रानडे होत्या, तर वक्ते म्हणून प्रशांत पोळ, डॉ. गिरीश आफ़ळे आणि सुनीलजी आंबेकर उपस्थित होते. याच परिसंवादात ‘व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची’ या डॉ. गिरीश आफ़ळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
वाचनसंस्कृतीशी संबंधित चार विश्वविक्रम
वाचनव्यवहार चैतन्यमय होण्यासाठी, काळाची पावले ओळखून आपल्याला बरेच काही करावे लागणार आहे, याची खूणगाठ आयोजकांनी बांधली होती. त्यामुळे विविधांगी आकर्षक उपक्रमांच्या कल्पना कार्यकर्त्यांच्या सुपीक डोक्यातून निघत गेल्या. त्यातून निर्माण झालेले वाचनसंस्कृतीशी संबंधित चार विश्वविक्रम ही या पुस्तक महोत्सवाची जमेची बाजू.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यंतरी ‘मन की बात’ या कार्यक्रमांमध्ये आजी-आजोबा किंवा आई-बाबा आपल्या मुलांना गोष्टी सांगताहेत, ही एक सुंदर कल्पना आहे आणि राजमाता जिजाऊंनी शिवबाला सांगितलेल्या गोष्टींमुळेच छोट्या शिवबाच्या मनात छत्रपती शिवराय होण्याचे बीज रोवले गेले आहे, याची आठवण करून दिली होती. तीच भूमिका डोळ्यासमोर ठेवून दिनांक 14 डिसेंबर, 2023 रोजी 3011 पालक आपल्या मुलांना गोष्ट सांगत आहेत हा पहिला विश्वविक्रम या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये नोंदवला गेला आहे. पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या पटांगणावर पुणे महानगरपालिकेच्या आयोजनातून हा विश्वविक्रम साकारला.
7500हून अधिक पुस्तकांच्या आधारे भारत असा शब्द तयार करणे, हा विश्वविक्रमदेखील खूप महत्त्वाचा ठरला. राष्ट्रीय पुस्तक न्यासाची बालसाहित्याची विविध पुस्तके येथे ठेवली गेली. त्या निमित्तने स्वयंसेवकांनी ही पुस्तके वाचून काढली. हा या विश्वविक्रमाचा नकळत झालेला एक फायदा.
‘जयतु भारत’ असे एक वाक्य लिहून विश्वविक्रम करताना 18,800 पुस्तके रचली गेली आणि भारताचे नाव जगाच्या इतिहासात नोंदवले गेले. येथे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘एक्झाम वॉरिअर्स’ ह्या पुस्तकाच्या प्रतीच सर्वत्र ठेवल्या गेल्या.
चौथा विक्रम या पुस्तक महोत्सवाला भेट दिलेल्या विविध नागरिकांच्या सहकार्यामुळे झाला. या विक्रमात एकच कथा अधिकाधिक नागरिकांनी वाचून दाखवणे अपेक्षित होते. त्याच्या ऑनलाइन चित्रफिती तयार करायच्या होत्या. त्यामध्ये सुमारे 11 हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले.
केवळ विश्वविक्रम करणे हे यामागचे उद्दिष्ट नव्हते, तर त्या निमित्ताने पुस्तकांच्या जगात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वावरणे, पुस्तके हाताळणे, पुस्तकांचा वास घेणे, एखाद्या पुस्तकाचे नाव लक्षात ठेवणे, काम करता करता सहज ते पुस्तक चाळणे, त्यातून एखादे वाक्य, एखादा शब्द त्यांच्या मनावर कोरला जाणे, या गोष्टी घडल्या. म्हणून विश्वविक्रमाच्या उपक्रमाचा हेतूही वाचनसंस्कृती विकसित करण्याचाच होता.
फलश्रुती
प्रचंड संख्येने - म्हणजे अंदाजे 4 लाख नागरिकांची महोत्सवाला भेट. त्यातील निम्म्याहून अधिक संख्या तरुणांची.
तब्बल अकरा कोटी रुपयांची आणि 7 लाखांहून अधिक पुस्तकांची विक्री.
वाचन चळवळीतील प्रकाशकवर्गाची अक्षरश: दिवाळी. ज्यांनी विक्री केंद्रे उभी केली नाहीत, अशा प्रकाशकांनी आम्ही खूप मोठी संधी गमावली असा अभिप्राय नोंदवला.
उत्तम प्रतिसादाचा विचार केला, तर दिल्लीतील विश्व पुस्तक मेळ्यानंतर सर्वात मोठा पुस्तक महोत्सव पुण्यातच झाला.
युनेस्कोच्या पुस्तकांची राजधानी घोषित होण्याच्या दिशेने पुण्याचे पाऊल पडते पुढे!
पुस्तक महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता पुण्यात दर वर्षी असा पुस्तक महोत्सव आयोजित होणार अशी घोषणा.
थोडक्यात, जागतिक पातळीवर वाचनसंस्कृतीच्या दिशेने आत्मविश्वासपूर्वक पाऊल या निमित्ताने टाकले.
लेखक फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे मराठी विभागामध्ये प्राध्यापक आहेत.