निवड

विवेक मराठी    09-Nov-2024
Total Views |
@सुरेश बा. शेलार
 
 
vivek
चहाचा टपरीवाला आणि मुलाच्या घटनेवरून एक गोष्ट लक्षात आली की, ‘आपण त्या दिवशी त्या गृहस्थासारखा मार्ग निवडला असता तर कदाचित असं घडलं नसतं आणि जरी घडलं असतं तरी आज जे अस्वस्थपण आणि अपराधीपण जाणवतंय ते जाणवलं नसतं’, या विचाराने तो त्या चौकात बराच वेळ उभा राहिला. चार रस्ते; पण आपल्या मार्गाची निवडच त्याला करता येईना!
सा तो गोष्टी रंगवून सांगण्यात फार पटाईत. लोकांना हसवणं, त्यांच्या ताणाचा निचरा करणं त्याला सहज जमत असे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूला सतत मित्रांचा राबता असे. त्याच्या या कौशल्यामुळे मित्रांमध्ये तो नेहमीच भाव खाऊन जायचा. सगळ्यांनाच त्याच्या या स्किलचा हेवा वाटायचा. शाळा-कॉलेजमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धा, वाद-विवाद स्पर्धा, कथाकथन स्पर्धा यांसारख्या विविध स्पर्धांमध्ये तो नेहमीच बक्षीस मिळवत असे. त्याच्या रूममधल्या कपाटात बक्षिसांचा आणि फाइलमध्ये प्रमाणपत्रांचा अक्षरशः ढीग होता. नुकताच त्याने सध्याच्या नवीन ट्रेंडनुसार स्टँड अप कॉमेडी हा प्रकार सुरू केला होता. त्यातही त्याचा परफॉर्मन्स प्रेक्षक डोक्यावर घ्यायचे.
 
 
त्याची मुलगीही त्याच्या तालमीत तयार होत होती. मात्र तिला अभिनयात जास्त रस आहे, हे ती लहान असतानाच त्याच्या लक्षात आलं. म्हणून त्याने तिला एका नाटकाच्या संस्थेमध्ये घातलं. तिथे नाटक शिकवणारे सर गेल्या अनेक वर्षांपासून ती संस्था चालवत होते. त्यांच्या हाताखाली अनेक नट-नट्या, लेखक-दिग्दर्शक, तंत्रज्ञ तयार झाले होते आणि आज नाटक, सिनेमा आणि सीरियल अशा सर्वच ठिकाणी काम करत होते, असं त्याला तिथे त्यांच्या ऑफिसात लावलेल्या फोटोवरून कळलं.
 
 
मुलीच्या पहिल्या सादरीकरणाच्या वेळी मुलीला नाटक शिकवणार्‍या सरांनी प्रमुख पाहुणे म्हणून त्याला निमंत्रण दिलं.
“पण आपलं हे क्षेत्र नाही, तर आपण का?” अशी काहीशी शंका त्याने उपस्थित केली.
 
 
“कसं नाही! सर्वच कलांचा एकमेकांशी संबंध असतोच. तुमच्याकडून आमच्या मुलांना तुमचे अनुभव ऐकायला आणि तुमचा एखादा छोटा परफॉर्मन्स पाहायला मिळाला, तर त्यातून बरंच शिकता येईल. तेव्हा नाही म्हणू नका,” अशी त्यांनी गळ घातली, तेव्हा तो तयार झाला.
 
 
तो दिवस छानच होता. मुलीचं नाटक छान झालं. त्याचे अनुभव आणि त्याने सादर केलेला स्टँड अप सगळ्यांनाच खूपच आवडला. कार्यक्रम संपल्यानंतर नाटकाचे सर आणि एक-दोघे मान्यवर, त्या संस्थेची दोन-तीन मोठी माणसं आणि तो असे सगळे चहापानाला बसले तेव्हा नाटकाचे सर त्याला म्हणाले, “तुम्ही लिहिता का?”
 
“म्हणजे?” त्याला सरांचा प्रश्न कळला नाही.
 
“म्हणजे लेखन करता का? नाटक, एकांकिका, कथा वगैरे.”
 
“नाटक, कथा वगैरे नाही; पण मला जे सादर करायचं असतं, ते लिहावंच लागतं.”
 
“तुमच्यासारख्या माणसाने नाटक लिहायला हवं.” सर अगदी जोर देऊन म्हणाले.
 
“नाही हो, तो माझा प्रांत नाही.” त्याने सरांचं बोलणं अगदीच झटकून टाकलं.
 
“कशावरून? तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? तुम्ही स्टँड अप लिहिता, मग नाटक का नाही लिहू शकत?... बरं नाटक नाही; निदान एकांकिका तरी!” सरांच्या या बोलण्यावर त्याने कसंनुसं हसत पुन्हा नकार दिला.
 
“तुम्ही खरंच लिहा. नाटकवाले जे लिहितात. त्यात बर्‍याचदा तोचतोचपणा असतो; पण तुमच्यासारख्या नाटकाची बॅकग्राऊंड नसणार्‍याने लिहिलं तर कदाचित काही नवं घडेल. तुम्ही लिहिलं तर मी माझ्या ग्रुपमधून ती एकांकिका सादर करेन.”
सर याबाबत फारच गंभीर आहेत हे त्याच्या लक्षात आलं; पण तो शेवटपर्यंत नकारच देत राहिला.
 
पुढच्या आठवड्यात सरांचा एकदा त्याला फोन आला. “काय हो, कुठवर आलं एकांकिकेचं?”
“सर, मला जमेल असं वाटत नाही.”
 
“जमेल, जमेल. तुम्ही सुरू तर करा. काही अडलं तर मी आहेच की!”
 
पुढल्या एक-दोन आठवड्यांत दोनचार वेळा सरांचा त्याला फोन झाला आणि दर वेळी अशाच आशयाचं संभाषण झालं. मग एक दिवस तो मुद्दाम मुलीला सोडायला जाण्याच्या बहाण्याने सरांना भेटला आणि त्याने सरांना थेट प्रश्न विचारला, “तुम्हाला खरंच वाटतं, मी एकांकिका लिहू शकतो?”
 
त्यावर सेकंदही वाया न घालवता सर म्हणाले, “अर्थात! म्हणून तर एवढ्या दिवसांपासून तुमच्या मागे लागलोय मी!”
“कशावरून?”
“माझ्या अनुभवावरून. मी अनेक असे लेखक तयार केले आहेत” आणि त्यांनी सहज चार-पाच लेखकांची नावं सांगितली. ज्यांना सरांनी लिहितं केलं होतं त्यातले काही आज टीव्ही, सीरियल, नाटकं लिहीत होते.
 
 
vivek
 
शेवटी सर एकच वाक्य म्हणाले, “मला विश्वास आहे, तुम्ही नाटकही लिहू शकाल. आता एकांकिकेने सुरुवात करा.”
‘मी काहीही करू शकतो’ या वाक्यातून वक्त्याचा अहंकार दिसतो आणि ‘तू काहीही करू शकतोस’ या वाक्यातून श्रोत्याचा वक्त्याविषयीचा विश्वास दिसून येतो. आपण कितीही मोठे झालो तरी आपल्याला बर्‍याचदा आत्मविश्वासापेक्षा दुसर्‍याने दाखवलेल्या विश्वासावर जास्त विश्वास असतो. (अर्थात हा काही फार मोठ्या लोकांना लागू होणारा नियम नाहीये.) आपल्या कथेतला तो म्हणजे एक सर्वसाधारण माणूस असल्यामुळे त्याचाही सरांनी दाखवलेल्या विश्वासावर अधिक विश्वास बसला आणि तो कामाला लागला.
 
 
आता एकांकिका लेखन म्हणजे तो करतो तशी नेहमीची बडबड नाही, हे त्याला सरांनी सांगितलं होतं. त्याच्या स्टँड अपमध्ये वेगवेगळ्या विनोदांची पेरणी असते. एकांकिकेमध्ये एखाद्या अनुभवाचं दर्शन असतं. त्यात चांगली कथा असायला हवी. त्यामुळे त्याचा कथेसाठी शोध सुरू झाला. चांगली कथा शोधायची कुठे? या त्याने स्वतःलाच विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सरांशी एकदा बोलता बोलता, किंबहुना त्याचं ऐकता ऐकता त्याला सापडलं.
 
 
“चांगली गोष्ट आपल्या आसपास असते. आपल्याला तिला पाहता यायला हवं.”
 
मग काय, त्याचं ‘पाहणं’ त्या दिशेने सुरू झालं आणि त्याला पहिल्यांदा जाणवलं की, आईबाबा आणि बायको-मुलीचं बोलणं आता त्याला ’ऐकू’ येऊ लागलं आहे. तो जिथं असेल तिथले वेगवेगळे आवाज त्याला ऐकायला येऊ लागले आहेत. आजूबाजूच्या घरातील माणसांचे, बाजारातून हिंडताना फेरीवाल्यांचे, गाड्यांचे आवाज, पक्षी-प्राण्यांचं ओरडणं, रडणं, केकाटणं, गल्लीतल्या भांडणाचे-गाण्याचे सगळेच आवाज तो ‘ऐकू’ लागला. घामेजलेले-थकलेले-हसणारे-रडणारे चेहरे, रस्त्यावरचे खड्डे, खड्ड्यातल्या मातीचा-दगडांचा रंग, झाडांचे रंग, आकार, आसपासच्या इमारती हे सगळं तो ‘पाहायला’ लागला. त्याची पंचेंद्रिये जरा जास्तच सजग झाली.
 
 
पावसाळा सुरू झाला तसे मित्रामित्रांचे पिकनिकचे प्लॅन ठरले. तो त्याच्या बिल्डिंगमधल्या मित्रांबरोबर बाइकने जवळच्या घाटात पिकनिकसाठी निघाला. त्यांच्या नेहमीच्या दुकानांमधून त्यांनी ‘गरजेचं सामान’ घेतलं आणि निघाले गडी आनंद लुटायला. तो नेहमी जायचाच; पण या वेळी जाण्याचा उद्देश काही वेगळा होता.
 
 
आपल्याकडे पहिल्या पावसात काही तरी अचाट शक्ती असते बहुतेक. पहिल्या पावसामुळे उन्हाळ्यात कोरडेठण्ण पडलेले नाले एवढे भरतात, की त्यांचं पात्र सोडून ते रस्ताही जलमय करतात. घाटातल्या डोंगराचा भाग दरडीच्या रूपाने दरीच्या दिशेने झेप घेऊ लागतो. हे दरवर्षी अगदी न चुकता घडतं. त्या वर्षीही घडलं. काही काळापुरता रस्ता बंद झाला. तो आणि त्याच्या मित्रांच्या आनंदावर पाणी फिरलं, दरड कोसळली. मग काय, एका झोपडीवजा टपरीमध्ये रस्ता मोकळा होण्याची वाट पाहत बसले सगळे.
त्या झोपडीवजा टपरीचा मालक तिथला कोणी स्थानिक गाववाला होता. अंगावर लुंगी आणि कळकट बनियन. सत्तर-ऐंशीच्या दशकातल्या हिंदी सिनेमातले गुंड असायचे तसा राकट. तो नुसतंच तिथे बसू देणार नाही असं सगळ्यांना वाटलं म्हणून त्यांनी भजी आणि चहाची ऑर्डर सोडली. शिवाय त्या मौसमात भजी-चहाची लज्जत काही औरच असते.
 
 
टपरीवाला म्हणाला, “पाच मिनिटं थांबाया लागंल. गॅस संपलाय. पोर्‍या गेलाय आनायला.”
 
 
‘पाच मिनिटं’ या शब्दांची मोठी गंमत असते. त्यांचा काळ कधीच बोलणार्‍याला ’पाच मिनिटं’ असा अपेक्षित नसतो आणि इथे तर सिलेंडर आणायला गेलेला पोर्‍या सिलेंडर घेऊन येणार, मग तो जोडला जाणार, तेल गरम होणार, त्यात भजी शिजणार. हे सगळं आजच्या तारखेच्या कोणत्याही टेक्नॉलॉजीचा वापर करून पाच मिनिटांत होणारं काम नव्हतं; पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. शिवाय भजी-चहा हे फक्त निमित्त होतं. त्या शेडखाली थांबायला मिळणं गरजेचं होतं.
 
 
बाहेर छान पाऊस होता, त्यामुळे दोघा-तिघांनी सिगारेटी शिलगावल्या आणि ते मस्त कश मारायला लागले. गप्पांचा अड्डा तिथेच सुरू झाला. दरडीच्या ’रास्ता रोको’मुळे जुनं प्लॅनिंग बिघडलं म्हणून नव्याने प्लॅनिंग सुरू झालं.
 
 
सुरुवातीला इथलेतिथले काही बिनमहत्त्वाचे विषय निघाले. बिल्डिंगच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधले किस्से, तिथे अनुपस्थित असलेले मेंबर आणि त्यांच्या जगावेगळ्या तर्‍हा वगैरे वगैरे. त्याला त्या गप्पांमध्ये ‘काही विशेष नाही’ हे जाणवलं तसा तो हळूच तिथून उठला आणि बाहेर रस्त्यावरची ट्रॅफिक, आजूबाजूचे दुकानदार, गिर्‍हाईक यांना न्याहाळू लागला.
 
 
ती टपरी एका चौकात होती. समोरच्या दिशेने पुढे सरळ जाणारा रस्ता घाटाकडे जात होता आणि बाजूचा रस्ता एका छोट्या डॅमकडे जात होता. इथे पावसाळ्यातच बरी गर्दी असते. बाकी वेळ तसा शुकशुकाटच! अचानक त्याचं लक्ष त्या टपरीवाल्याकडं गेलं. तो प्राण डोळ्यात आणून पोर्‍याची म्हणजे खरं तर सिलेंडरची वाट पाहत होता. त्याला टपरीवाल्याशी बोलण्याचा मोह झाला. मात्र टपरीवाल्याचं ते राकट रूप पाहून त्याला धीर झाला नाही. शिवाय आता ताटकळलेल्या गिर्‍हाईकांमुळे टपरीवाला भलताच वैतागलेला होता.
 
 
इतक्यात त्याला रस्त्यावरच्या गाड्यांच्या येण्या-जाण्याच्या रिदममध्ये काही बदल जाणवले. त्याने चौकशी केल्यावर कळलं की, थोड्या वेळात रस्ता सुरू होईल. त्याच्या मित्रांनाही ते कळलं. मित्रांनी त्याला जवळ बोलावलं आणि टपरीवाल्याला ’जरा घाई कर. नाही तर आम्ही जातो,’ असं सांगायला सांगितलं. तो टपरीवाल्याजवळ आला तेव्हा सिलेंडर आणायला गेलेला पोर्‍या परत आला होता आणि टपरीवाला त्या पोर्‍याशी तावातावाने बोलत होता. “काय रं, गॅस का नाही आनला?”
 
 
“तो म्हन्ला, मागचे पैशे दिल्याबिगर गॅस देनार नाय.” तेरा-चौदा वर्षांचा, किडकिडीत अंगाचा तो पोर्‍या एवढंसं तोंड करून उत्तरला.
 
 
“काय? च्यामायला! माजलाय का तो!” असं म्हणत टपरीवाल्याने रागारागाने त्या सिलेंडरवाल्याला फोन लावला.
“काय रं, तुजे पैशे ठेवलेत का याच्या आदी कदी? गॅस द्यायाला न्हाई म्हनलाच कसा तू? इथं गिराईकं थांबून हाईत अन् तुजी नाटकं चाललीत!” यानंतर टपरीवाला त्या सिलेंडरवाल्याचं फक्त ऐकत राहिला. काही मिनिटं अशीच गेली.
 
 
मग मध्येच काही वेळानंतर टपरीवाला म्हणाला, “पन ह्यो भाडखाऊ तर मला असं काई बोलला न्हाई! थांब जरा, बघतोच याच्याकडं,” असं म्हणत टपरीवाल्याने एक अतिशय रागीट नजर त्या पोर्‍यावर टाकली. ’आता काय होणार’ या कल्पनेने तो डोळे खोल गेलेला, पोट खपाटीला लागलेला पोर्‍या थरथर कापायला लागला.
 
 
“तू लवकर एक गॅस पाठव.” असं एक शेवटचं वाक्य म्हणत टपरीवाल्याने फोन कट केला. टपरीवाल्याची विखारी नजर अजूनही त्या पोर्‍यावरच होती. टपरीवाल्याने फोन ठेवल्यानंतर पोर्‍याचं थरथरणं आणखीनच वाढलं.
 
 
“काय रे भाडखाऊ! गाडी आल्यावर गॅस पाठवीन बोलला ना तो! तू हे पैशाचं काय सांगत होता मला? खोटं बोलतो! ुुु...तुझ्या!” टपरीवाला रागाने लाल होऊन त्या पोर्‍यावर खेकसला. रस्ता सुरू झाल्यामुळे त्याचे बरेचशे गिर्‍हाईक उठून गेले होते. हा सगळा राग त्या पोर्‍यावर निघत होता.
 
 
“नाय दादा, तो पैशाचं बोलला मला. आय शप्पथ!” पोर्‍या रडकुंडीला येऊन बोलला.
 
 
“आय शप्पथ घाल तुझ्या ुुु...” त्यांच्यातलं हे संभाषण ऐकून ’जरा घाई कर मित्रा’ असं सांगायला आलेल्या त्याचे शब्दही घशातच अडकले. टपरीवाला आणि तो पोर्‍या या दोघांमध्ये मागच्या आठ-दहा मिनिटांत जे घडलं, त्या पूर्ण घटनेचा तो साक्षीदार होता. आता पुढे काय होईल याचा त्याला अंदाज आला होता. तो आणि त्याचे मित्र आणि चार-दोन गिर्‍हाईकं या सगळ्यांना पाहून टपरीवाला गप्प बसला. मात्र त्याची नजर ’हे गिर्‍हाईक जाऊ दे, मग बघतो तुला’ असंच काही त्या पोर्‍याशी बोलत होती.
पोर्‍या टपरीवाल्याची ती नजर टाळून बाजूला टबमध्ये पडलेल्या खरकट्या डिश धुऊ लागला.
 
“अरे, सांग ना त्याला चहा-भजी द्यायला लवकर.” एक मित्र त्याला म्हणाला.
 
“थांबा रे थोडा वेळ. आता रस्ता मोकळा झाला आहे. गर्दी ओसरू दे जरा.” तिथली गर्दी कमी झाल्यावर तो पोर्‍या आणि टपरीवाला यांच्यात नेमकं काय होईल हे जाणून घेण्यात त्याला विशेष रस वाटत होता. त्या सगळ्या घटनेमध्ये त्याला कथेचा अंश जाणवत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या डोक्यात सतत कथेचाच विषय घोळत होता.
 
 
‘काय होईल आपण सगळे इथून गेल्यावर?’ तो टपरीवाला पोर्‍याला मारेल? कदाचित मारेल, कारण त्या पोर्‍यामुळे त्याचं आज फार नुकसान झालं असेल. खरं तर टपरीवाल्याचं नुकसान पोर्‍यामुळे झालं नव्हतं; पण राग काढायला कुणी तरी हवं ना! सगळे असंच तर करत असतात. ’बळी तो कान पिळी’ हाच न्याय तर सर्वत्र चालतो. त्या टपरीवाल्यासाठी राग काढायला तो पोर्‍या होता. तो त्याचा कान पिळणारच! मग आपण काय करू शकतो का यामध्ये? आपण त्या टपरीवाल्याला समजावून सांगितलं तर? टपरीवाला ऐकेल? आणि नाही ऐकलं तर? आपण समजावून सांगायला गेल्यामुळे भलतंच काही झालं तर? भलतंच म्हणजे? कदाचित त्या टपरीवाल्याला आणखी राग येईल. ‘आपल्या गिर्‍हाईकांसमोर हा पोर्‍या आपल्याला घाबरला आणि गिर्‍हाईकं आपल्याला समजावून सांगायला आले’ असा विचार डोक्यात येऊन त्याचा इगो दुखावला तर? तर त्या पोर्‍याला जास्त मार बसेल. कदाचित हे त्या पोर्‍या आणि टपरीवाल्यासाठी नेहमीचं असेल. रागावणं, शिव्या देणं वगैरे वगैरे. आपल्या पांढरपेशा शहरी मध्यमवर्गासाठी हे काही तरी भयंकर आहे. त्यांचं ते रूटीन असेल कदाचित.’ उलट-सुलट किती तरी विचार त्या काही मिनिटांमध्ये त्याच्या डोक्यात घोळत राहिले.
 
 
खूप प्रयत्न करूनही त्याला तिथे फार वेळ थांबता आलं नाही. मित्रांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला तिथून निघावं लागलं. त्यांनी तिथून सरळ पुढे
जाणारा रस्ता धरला. थोड्या वेळातच ते घाटाच्या वळणावळणाच्या रस्त्याला लागले. त्या वळणांवरून जाताना त्याच्या डोक्यात तो पोर्‍या आणि टपरीवालाच फिरत होता.
 
 
दुसर्‍या दिवशी परत येताना तो हटकून त्या टपरीवर थांबला; पण रात्र फार झाली असल्यामुळे टपरी बंद होती. पुढचे दोन-तीन दिवस तो अस्वस्थच होता. आपण त्या दिवशी काही चुकलो का, असंच राहून राहून त्याच्या मनात येत होतं.
 
 
संध्याकाळी सरांचा ‘एकांकिका लेखनात काय प्रगती’ असं विचारायला फोन आला. “नाही हो, माझ्याकडून काही होईल असं वाटत नाही.” त्याने हताश सुरात सरांना सांगितलं. थोडं खोदून खोदून विचारल्यावर त्याने टपरीवाला आणि त्या पोर्‍याचा पूर्ण किस्सा सरांना सांगितला.
 
 
“अहो, हा अनुभवच मांडा ना एकांकिकेत.” सर उत्साहाने म्हणाले, “मी म्हटलं होतं ना, चांगली गोष्ट आसपासच असते. लेखकाला ती पाहता यायला हवी. हे तुमच्या नजरेतून कसं सुटलं?”
 
त्याला यावर काय बोलावे ते सुचेना. ’आपण त्या पोर्‍याला मिळालेली वागणूक आणि त्याचं पुढं काय झालं असेल या विचाराने अस्वस्थ आहोत आणि तुमचं घोडं मात्र अजून त्या फुटकळ एकांकिकेमध्येच अडकलं आहे! काय स्वार्थी माणूस आहेस तू!’ त्याला वाटलं, सरांना असं ओरडून सांगावं. मात्र या वेळीही तो गप्प बसला.
 
 
सरांनी मात्र त्याच्या मनात काय चाललं आहे, हे ओळखलं. ते म्हणाला, “हे बघ, कलाकाराच्या हातात फक्त आपली कला असते. बाकी काही नाही. आपण बर्‍याचदा हतबल असतो समाजात. जास्त विचार करू नका. तुम्हाला तिथं काही बोलता आलं नाही; लिखाणातून मोकळे व्हा. तुम्हाला खरंच बरं वाटेल.”
 
तो आपलं बोलणं लक्षपूर्वक ऐकत आहे हे बघून सरांनी आणि चार वाक्यं पुढे जोडली, “तुम्हाला जो अनुभव आला, तसं नेहमीच घडत असतं. प्रत्येक गोष्टीवर विचार करत राहिलो तर वेडे होऊ आपण. मला वाटतं, तो पोर्‍या आणि टपरीवाला नेहमीसारखे त्यांच्या धंद्याला लागले असतील. तुम्हाला अगदीच मनाची शांती करायची असेल तर एकदा बघून या ना.“
 
त्याला सरांचं शेवटचं वाक्य अगदीच योग्य वाटलं. त्याने ठरवलं, उद्याच त्या टपरीवर ठरवल्याप्रमाणे तो दुसर्‍या दिवशी साधारण नऊ-साडेनऊच्या सुमारास त्या टपरीवर गेला. चहा-भजी-वडापाव वगैरेच्या टपर्‍या, हातगाड्या यावेळेपर्यंत हमखास उघडतात. त्यांच्या धंद्याचा हा परफेक्ट टाइम! पण ती टपरी उघडी नव्हती. म्हणजे ती झोपडीवजा टपरी तशी उघडीवाघडीच असायची.त्या टपरीवाल्याने धंदा सुरू केला नव्हता. तो त्या शेडखाली वाट पाहत बसला. मात्र बराच वेळ झाला तरी कोणी आलं नाही. ना तो पोर्‍या, ना टपरीवाला!
 
 
मग त्याने बाजूच्या एका दुकानदाराकडे त्यांच्याविषयी चौकशी केली, तेव्हा त्याला कळलं, की त्या दिवशी रागाच्या भरात टपरीवाल्याने त्या पोर्‍याला खूप मारलं. तसा तो नेहमीच मारत असतो. मात्र त्या दिवशी टपरीवाल्याचा घाव पोर्‍याच्या जरा वर्मीच लागला आणि त्यातच तो पोर्‍या गेला. पोलीस टपरीवाल्याला घेऊन गेले. त्या दिवसापासून ती टपरी रिकामीच असते. भटकी कुत्री बर्‍याचदा तिथे आडोशाला बसतात.
 
 
‘आपण त्या दिवशी काही बोललो असतो तर बरं झालं असतं; पण आपण बोललो असतो, तर हे टळलं असतं? टपरीवाला रोजच त्या पोर्‍याला मारत असे, मग त्या दिवशी आपण बोलल्याने काय फरक पडला असता?... कदाचित फार फरक नसता पडला; पण एवढं भयानक जे झालं, ते टाळता आलं असतं... खरंच टळलं असतं हे सगळं?’ असे अनेक उलटसुलट विचार त्याच्या डोक्यात फिरत असतानाच अचानक एक जुनी आठवण जागी झाली.
 
 
तो कॉलेजमध्ये असताना लोकलने प्रवास करायचा. कॉलेज चार-पाच स्टेशन पुढेच होतं. रोज लोकलच्या दारात उभं राहून तो आणि त्याचे चार-दोन मित्र जायचे. त्याच्या मित्रांपैकी एक जण जरा अवलीच होता. तो दारात लटकत असायचा. स्टंटबाजी करायचा. गरम रक्त डोकं शांत ठेवून विचार करायचे नाही. इतर प्रवाशांपैकी कोणाचीही त्याला काही बोलायची हिंमत व्हायची नाही. उगाच चार माणसांत कोण शोभा करून घेणार! हल्लीच्या मुलांचा काय भरवसा! उलट उत्तर दिलं तर!
 
 
एकदा असाच तो दारात लटकत होता. बाकीचे मित्र हसत-खिदळत होते. अचानक एक आवाज आला, “ए, पकडलं की नाही तुम्हाला!”
 
 
तो एका पन्नाशीच्या गृहस्थाचा आवाज होता. आतल्या सीटवर ते त्यांच्या बायकोबरोबर उभे होते. तिथून त्यांनी त्या लटकणार्‍या मुलाला पाहिलं होतं. बाकीच्या मुलांना वाटलं, ते गृहस्थ म्हणजे त्या लटकणार्‍या मित्राचे कोणी नातेवाईक असतील; पण ते त्याचे कोणीच नव्हते.
 
 
“अरे, असं लटकू नको. खांबाचा किंवा एखाद्या जाणार्‍या गाडीचा फटका लागेल. जखमी होऊ शकतोस, जीव जाऊ शकतो. आईबाबांना किती दुःख होईल. बरं नाही ना हे! या, आत या सगळे.” अतिशय प्रेमाने ते बोलत होते.
 
 
तो मित्र त्या गृहस्थाच्या अशा बोलण्याने अगदीच खजील झाला. आत येऊन गप्प उभा राहिला.
 
 
त्याला आत आलेला पाहून त्या गृहस्थांनी त्या मित्रांच्या दिशेने अंगठा उंचावून छान स्माइल केलं.
 
 
‘आपण त्या दिवशी त्या गृहस्थासारखा मार्ग निवडला असता तर कदाचित असं घडलं नसतं आणि जरी घडलं असतं तरी आज जे अस्वस्थपण आणि अपराधीपण जाणवतंय ते जाणवलं नसतं’, या विचाराने तो त्या चौकात बराच वेळ उभा राहिला. चार रस्ते, पण आपल्या मार्गाची निवडच त्याला करता येईना!