अलौकिक योजक संघमहर्षींचे उद्बोधक चरित्र

विवेक मराठी    09-Jan-2024
Total Views |
डॉ. अशोक मोडक 

book
रवींद्र गोळे यांनी ‘योजक संघमहर्षी’ शीर्षकाचे मोरोपंत पिंगळे यांचे देखणे चरित्र नुकतेच लिहून प्रसिद्ध केले आहे. मला एक तर या लेखकाविषयी जिव्हाळा वाटतो, कारण गेली काही वर्षे या कर्तृत्वसंपन्न तरुणाने वेगवेगळ्या विषयांवर सकस लिखाण सातत्याने केले आहे आणि दुसरे कारण म्हणजे माननीय मोरोपंतांविषयी तर माझ्या मनात भक्तीची भावना आहे. सन 1946पासून मोरोपंतांकडे महाराष्ट्रात सहप्रांतप्रचारक हे दायित्व होते आणि ज्या जिद्दीने सर्व संघविरोधकांचे आव्हान उद्ध्वस्त करून मोरोपंतांच्या नेतृत्वाखाली अगणित स्वयंसेवकांनी हिंदुत्व विचारांचा वृक्ष महाराष्ट्रात फुलवला, रुजवला, त्या जिद्दीसमोर कुणीही नतमस्तक होईल!
स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणार्‍या महाराष्ट्रातल्या विचारवंतांनी संघावर सतत आगपाखड केली, पण त्यांना कळलेच नाही की कैक संघस्वयंसेवकांनी प्रसिद्धीपासून दूर राहून आदिवासी आणि दलित विकासाचे प्रकल्प उभे केले आहेत. मोरोपंतांनी अशा प्रकल्प उभारणीसाठी भरघोस साहाय्य केले आहे. नानाराव ढोबळे यांनी 1950 ते 1960 या दशकात धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासी शेतकर्‍यांना अर्थसाहाय्य उपलब्ध व्हावे, म्हणून प्रयासांची शर्थ केली. तेव्हा ‘शहरवासी मंडळींनी वनवासी बंधुभगिनींची पाठराखण केलीच पाहिजे’ अशी भूमिका मोरोपंतांनी शिरोधार्य मानून नानांचा पुढाकार स्वागतार्ह ठरवला. पुण्यात सहकारी बँकेची मुहूर्तमेढ रोवणारे, ‘संघविचारांचा प्रसार करण्यासाठी नियतकालिके सुरू होऊन यशस्वी झाली पाहिजेत’ असा सक्रिय धोशा लावणारे, रायगडावर शिवप्रभूंचे पुण्यस्मरण नित्यनियमाने व जल्लोशात व्हावे म्हणून रक्ताचे पाणी करणारे मोरोपंत स्वत: पडद्यामागे राहण्यातच धन्यता मानत असत.. किंबहुना स्वयंसेवकांनी प्रतिष्ठेच्या, कीर्तीच्या मागे न धावता देशकार्य करण्यातच रमावे हा आदर्श रुजावा म्हणून दैनंदिन संघशाखा वार्षिक हेमंत शिबिर, उन्हाळ्यातला संघशिक्षा वर्ग यात खंड पडू नये यासाठी जिवाचे रान करणारे मोरोपंत सर्वांकरिता आदर्श ठरले, तर त्यात आश्चर्य कसले? रवींद्र गोळे यांनी प्रभावी शब्दशैलीत या अशा प्रयासांची दखल घेतली आहे.
 
पुस्तक
पुस्तक - योजक संघमहर्षी
• लेखक - रवींद्र गोळे
• प्रकाशक - विवेक प्रकाशन
• मूल्य - 350/- रु. • पृष्ठसंख्या - 260
 
 
ज्या समाजबांधवांनी संघवाले म्हणजे ‘मानेखालीच तयार असलेले दांडेकर साच्यातले गणपती’ अशा शब्दांत हेटाळणी केली, तेच आणीबाणीच्या विरोधात संघकार्यकर्त्यांबरोबर कारावासात राहिले, तेव्हा ‘तुरुंगात गेलेल्या समाजवादी मंडळींच्या घरातूनही मदत पोहोचवणे हे आपले काम आहे’ अशी विधायक मांडणी मोरोपंतांनी केली. ‘हिंदुत्वविचार संपर्कातून, मैत्रीतून वाढणार आहे. संघावर टीका करणार्‍यांची भविष्यात काय स्थिती होईल, हे दिसणारच आहे.’ इति मोरोपंत पिंगळे (पाहा - चरित्रग्रंथ, पान क्र. 124.)
 
वर्तमानात संघावरचे टीकाकार किती कार्यरत आहेत, त्यांच्या प्रयत्नांना कोणते फळ मिळाले आहे, याविषयी कुठलीही मल्लिनाथी करण्याची गरज नाही. संघ शताब्दी साजरी करणार आहे अन् संघाचे टीकाकार अशुभाचे प्रेषित ठरणार आहेत. मोरोपंतांचे व त्यांच्यासारख्या पहिल्या पिढीमधल्या सर्व प्रचारकांचे, कार्यकर्त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्वांना बाल्यकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टीकोन किती मूलगामी आहे याचे आकलन झाले व मग यापैकी एकेकाने स्वत:चे जीवनपुष्प निर्भेळ-निरपेक्षतेतून संघचरणी अर्पण केले.
 
रवींद्र गोळे यांनी चरित्रनायकाच्या बाल्य व तारुण्यकाळातल्या काही आठवणी चपखल शैलीत गुंफल्या आहेत. उदाहरणार्थ, नागपूरला काँग्रेसनगरमध्ये ओसाड मैदानात संघाची शाखा लावायची आहे असे तत्कालीन कार्यकर्त्यांनी ठरवले अन् मोरोपंतांनी बालचमूला संघटित करून या ओसाड मैदानात नंदनवन फुलवले. (पान क्र. 15.) मोरोपंतांनी त्यानंतर केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अवघ्या भारतवर्षात ‘काँग्रेसनगर’चा विरोध पचवून हिंदुत्व विचार जनमनात रूढ करण्याची किमया साधली. ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ ही म्हण या संदर्भात आठवते की नाही? चरित्रलेखक वाचकांना सांगतात की, मोरोपंतांना लहानपणापासूनच इतिहास या विषयात रुची होती. भारताचा खरा इतिहास अक्षरबद्ध करावा या ध्यासाने झपाटलेली ‘इतिहास संकलन समिती’ मोरोपंतांनी त्यांच्या उत्तरायुष्यात देशभर उभी केली. या विक्रमाची बीजे त्यांनी लहानपणीच पेरली होती. (पान क्र. 21.) पिंगळे परिवारातल्या लहानग्या मोरेश्वराने मुख्य शिक्षक म्हणून दायित्व स्वीकारले आणि ‘आम्ही कोणी तरी निराळे व इतरांपेक्षा वेगळे’ हा भाव बाळगणार्‍या कुणा साठे नामक स्वयंसेवकाला सर्वांच्या सुरात सूर मिळवण्याची संथा कौशल्याने दिली, (पान क्र. 25) हा उल्लेखही नक्कीच उद्बोधक आहे. हिंदू समाज असंघटित आहे, जो तो बुद्धीच सांगतो या सवयीच्या आहारी गेला आहे, तेव्हा त्याला समूहधर्म शिकवायचा हा वसा मोरोपंतांनी बालपणीच उचलला व पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर आईवडिलांना सांगून टाकले की ‘मी आता संघप्रचारक म्हणून घराबाहेर पडतोय.’ (पान क्र. 28.)
 
रवींद्र गोळे यांनी अशा आठवणींमधून तुम्हा-आम्हाला सांगितले आहे की, संघाला आपल्या मायभूचे पुननिर्माण करायचे आहे, अन् म्हणूनच दैनंदिन शाखा, हेमंत शिबिर, संघशिक्षा वर्ग या व अशा उपक्रमातून मानवी भांडवलात गुंतवणूक करणे किती अनमोल आहे, हे चरित्रनायकास बालवयातच कळले होते.
 
 
मोरोपंतांनी सहप्रांतप्रचारक म्हणून महाराष्ट्रात कार्य सुरू केले अन् काँग्रेससकट सर्व बेगडी सेक्युलॅरिस्ट पक्षांचा संघविरोध निमित्तानिमित्ताने ओसंडून उफाळत राहिला. उदाहरण सन 1947मधल्या एका घटनेचे आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले 15 ऑगस्ट 1947 या दिवशी व 1,2 नोव्हेंबर 1947 या दिनांकांना संघस्वयंसेवकांचे एक लाख संख्येचे प्रांतिक शिबिर चिंचवडला करायचे, असा निर्णय झाला. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल या शिबिरात मुख्य अतिथी म्हणून येणार, हे नक्की झाले. पण संघासारख्या हिंदुत्वनिष्ठ संस्थेची वाढती ताकद काँग्रेसमधल्याच बेगडी सेक्युलॅरिस्टांना अशुभाची निशाणी वाटली. परिणाम चिंचवड शिबिराला प्रतिबंध करण्यात आला. नव्यानेच मुक्त झालेल्या भारतीय संघराज्याच्या विरोधात विद्रोह करण्याऐवजी संघनेतृत्वाने प्रतिबंधाला मान्यता दिली व जिल्ह्याजिल्ह्यातून भव्य एकत्रीकरण योजून तिथे श्रीगुरुजींची जाहीर भाषणे श्रोतृवृंदास ऐकवायची, असा निर्णय घेण्यात आला. मग मोरोपंतांच्या संघटनकौशल्याचा कस लागला. त्यांनी त्यांच्या स्थायीभावाला अनुसरून सर्व ठिकाणी प्रवास केले. स्वत:च्या धाकट्या भावाच्या निधनाचे दु:ख कठोर मनाने पचवून प्रयासांची शर्थ केली. परिणाम सुखद झाला. सर्व ठिकाणी जमलेल्या स्वयंसेवकांची एकूण संख्या चार लाखाहून अधिक, तर श्रीगुरुजींचे विचार ऐकण्यासाठी जमलेल्या नागरिकांची संख्या त्याहूनही जास्त.
 
पाठोपाठ गांधीजींची दुर्दैवी हत्या, संघावर खोटे आरोप लादून संघकार्यावर लादण्यात आलेली बंदी, ही बंदी उठविण्यासाठी संघाने केलेला अभूतपूर्व सत्याग्रह. त्यानंतर बंदी तर उठली, पण तथाकथित पुरोगामी मंडळींनी केलेला संघविरोधी थयथयाट.. संघशिक्षा वर्गातून घटत चाललेली स्वयंसेवकांची संख्या अशा कैक प्रतिकूलतांवर मात करण्यासाठी कर्मयोगी कार्यकर्त्यांची फळी उभी करावी लागते. मोरोपंतांनी स्वत:च्या उदाहरणातून अशी फळी उभी केली. रवींद्र गोळे यांनी या संदर्भात प्रचारकाचे केलेले वर्णन उल्लेखनीय आहे. ‘संघप्रचारक म्हणजे आत्मविलोपी ‘मी’, ‘माझे’ हे शब्द प्रचारकाच्या शब्दकोशात नसतात’ (पान क्र. 100). योजक संघमहर्षी या पुस्तकाला रमेश पतंगे यांनी उद्बोधक प्रस्तावना लिहिली आहे. ‘प्रचारक व्यक्तिगत सर्वोच्च सुखाविषयी उदासीन असतो.. राष्ट्र प्रथम, अन्य सर्व गोष्टी दुय्यम हाच त्याचा जीवनमार्ग असतो’ हे पतंगे यांचे विश्लेषण (पान क्र. 8) खरेच आहे. मोरोपंतांनी महाराष्ट्रात संघकार्याची धुरा खांद्यावर घेतली आणि प्रचारकाने हे वर्णन विश्लेषण वर्तनातून लीलया आविष्कृत केले. त्यामुळे संघस्वयंसेवकाने कसे वागावे व कसे वागू नये याचे वस्तुपाठच लोकांना कळले. खेड्यापाड्यालाही सामान्य गृहस्थाश्रमी स्वयंसेवक स्थानिक ढुढ्ढाचार्यांच्या मर्जी-गैरमर्जीची पर्वा न करता अचाट कामे करू शकला व त्याचाही गाजावाजा करायचा नाही, हे व्रत पाळू शकला.. कारण मोरोपंतांनी स्वत:च्या वर्तनातून उच्च आदर्श प्रस्तुत केले होते. संघशाखा वाढवायच्या, त्याचबरोबर संघप्रेरित संस्थांचीही जाळी विणली जातील इथे लक्ष पुरवायचे, देशाच्या पुनर्निर्माणाचे उपक्रम शंभर टक्के यशस्वी व्हावेत म्हणून परिश्रम करायचे, हे मोरोपंतांचे उद्योग माणसामाणसाला घडवत होते. पुन: हे सर्व प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहून करायचे. ‘मै रहूं या ना रहूँ। भारत ये रहना चाहिये॥’ हे गीत वर्तमानात संघशाखांवर गायिले जाते, पण गेली 99 वर्षे या गीताचे बोल स्वत:च्या जीवनात प्रतिबिंबित करणारे प्रचारक केवढा स्थायी संस्कार करून कृतार्थ झाले आहेत, हे विसरून चालणार नाही. मोरोपंत पिंगळे अशा शिल्पकारांमध्ये अग्रभागी होते.
 
मोरोपंतांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ज्या सहजतेने देशाच्या पुनर्निर्माणाची कामे पार पाडली, ती थक्क करणारी आहे. आता रामजन्मभूमीवर प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहणार आहे, पण मोरोपंतांनी तिथे उभा असलेला बाबरी ढाचा संपुष्टात यावा, म्हणून अवघ्या भारतातल्या जनशक्तीला साकडे घातले व जनताजनार्दनानेही मोरेश्वराची इच्छा पूर्ण केली, याचे इत्थंभूत वर्णन/विश्लेषण रवींद्र गोळे यांनी केले आहे. मोरोपंत योजक म्हणून असामान्यच होते, पण ही योजकता ना त्यांनी स्वत:च्या बडेजावासाठी उपयोजिली, ना अशा कौशल्यांतून संघाची घडी विसकळीत केली. ‘योजक संघमहर्षी’ हे या चरित्रग्रंथाचे शीर्षक म्हणूनच अत्यंत समर्पक आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे साध्य व साधन यावर निर्भेळ निष्ठा आणि या निष्ठेतूनच मोरोपंतांनी उभे केलेले कार्यकर्ते व राबवलेले उपक्रम याबद्दल कितीही विवेचन केले, तरी ते अपुरे ठरेल. आपले राष्ट्र मुळात प्राचीन काळापासून एकात्म आहे व म्हणूनच या एकात्मतेला आव्हान देणार्‍या सर्व शक्तींच्या विरोधात मोरोपंत सदैव ठाम उभे राहिले. रामजन्मभूमीचा यशस्वी लढा हा मोरोपंतांच्या आयुष्याचा कलशाध्याय होता. लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे मोरोपंतांनी पडद्याआडून सूत्रे हलवली.
 
पिंगळे यांनी भाषणातून, साध्या चर्चेतून केलेले निर्विष विनोद हा एका स्वतंत्र प्रकरणाचा विषय आहे. रवींद्र गोळे यांनी मोरोपंती विनोदाचे केलेले काही विवेचन चरित्रात वाचण्यास मिळते. उदा., एका कार्यक्रमात नानाराव पालकरांनी मोरोपंतांचा श्रोत्यांना परिचय करून देताना सांगितले, “हे आपणा सर्वांसाठी दीपस्तंभ आहेत.” नंतर मोरोपंतांनी स्वत:च्या बौद्धिकाची सुरुवात करताना सहज सांगून टाकले, “मी स्तंभ आहे एवढेच खरे. दीप आहे की नाही, कुणास ठाऊक..” (पान क्र. 83). दुसर्‍या एका पानावर वाचकांना वाचण्यास मिळते की, एका घरात गेल्यावर तिथल्या गृहिणीने चहा केला, तो सगळ्यांना कपातून दिला अन् उद्गार काढले, “अजून थोडा चहा उरलाय.” मोरोपंतांनी मग प्रतिक्रिया व्यक्तवली - “तो चहा इकडे द्या. तो मोरीत ओतला काय वा मोर्‍यात ओतला काय, सर्व सारखेच.” (पान क्र. 109.)
 
एका बौद्धिक वर्गात मोरोपंतांनी एक काल्पनिक किस्सा सांगितला, “एकदा प्रवासात एक ज्योतिषी भेटले, ते सर्वांचे तळहात पाहून ज्याचे त्याचे भविष्य सांगत होते. म्हणून मीही माझा तळहात त्यांच्यासमोर ठेवला. तेव्हा ते म्हणाले, ‘तुमचे आतापर्यंतचे आयुष्य खूप खडतर गेले आहे.’ मग मीच विचारले, ‘यापुढे काय वाढून ठेवले आहे माझ्या आयुष्यात?’ ज्योतिषीबुवा म्हणाले, ‘पुढची चार वर्षे अशीच खडतर आहेत.’ साहजिकच मी पृच्छा केली. ‘चार वर्षे संपली की काय होईल?’ ज्योतिषीबुवांनी शांतपणे उत्तर दिले. ‘तुम्हाला खडतर जीवनाची चांगली सवय होईल, असे जीवन तुमच्या अंगवळणी पडेल.”
 
 
अशा अलौकिक योजक संघमहर्षीचे वाचनीय व उद्बोधक चरित्र लिहून प्रकाशित केल्याबद्दल रवींद्र गोळे यांचे हार्दिक अभिनंदन. त्यांच्याकडून यापुढेदेखील असेच दर्जेदार लेखन व्हावे, ही शुभेच्छा.
लेख