ध्येयवाद निर्गुण, निराकार असतो. तो तेव्हाच सगुण साकार भासायला लागतो, जेव्हा जीवनात ते ध्येय साकारून माणसे जगू लागतात आणि मग अशा व्यक्तींचे दिसणे, बोलणेच हे ध्येयवाद सगुण साकार करून समोर ठेवते.
पण यापुढे आणखी एक पायरी येते. काही व्यक्ती या इतक्या त्या ध्येयाशी एकरूप होऊन जातात की त्यासुद्धा निर्गुण निराकार होऊन जातात आणि मग त्यांचे वर्णन शब्दांच्या पलीकडले होऊन बसते. त्यांचा सहवास, त्यांची अनुभूती हेच त्यांचे वर्णन बनते. बाह्य रूपात त्यांचे वर्णन फक्त शरीरयष्टी, वेशभूषा याने होते, पण त्या व्यक्तीची ती बाह्यांगे असतात. अंतरंगातील धेयवादाच्या ज्योतीने त्याला केव्हाच निर्गुण निराकार केलेले असते. विठ्ठल कारभारी शिंदे हे त्यापैकी होते.
संघाची सायम् शाखा व्यक्तिनिर्माणाचे केंद्र मानले जाते. बाल असताना शाखेत आलेला स्वयंसेवक पुढे त्याला मिळालेल्या संस्कारातून आपोआप कार्यकर्ता बनतो. घरातील परंपरेने काही जण स्वयंसेवक बनतात, कार्यकर्ते बनतात. पण यापलीकडे कार्यकर्त्यांचा तिसरा प्रकार असतो, तो म्हणजे जे जन्मत:च स्वयंसेवक असतात. सुरुवातीला अनेक वर्षे त्यांचा संघाशी सुतराम संबंध नसतो, पण ज्या दिवशी तो सुरू होतो, तेव्हा जणू या ध्येयासाठीच या व्यक्तीचा जन्म झाला आहे असे वाटायला लागते आणि मग पुन्हा ती व्यक्ती मागे वळून बघत नाही. आपले संपूर्ण आयुष्य तन-मन-धनाने संघाला समर्पित करते. ज्यांना अगदी लहानपणापासून संस्काराचे अमृतसिंचन झाले आहे तेही थकतात, भरकटत जातात, पश्चात्ताप झाल्यासारखे बोलू लागतात; पण हा जन्मजात स्वयंसेवक मात्र आयुष्याच्या शेवटपर्यंत संघमंत्र जपतो, जगतो. विठ्ठल कारभारी शिंदे हे असे जन्मजात स्वयंसेवक होते.
संघाचे काम व्यक्तिनिरपेक्ष आहे असे म्हटले जाते, पण भल्याभल्यांना हे अंगी बाणवणे कठीण जाते. कारण मुळात व्यक्तीच्या प्रभावाने, मैत्रीमुळे, प्रेमाखातर माणसाचा संघात प्रवेश होतो आणि मग कालांतराने त्याची धेयवादाशी ओळख होते. व्यक्तिनिरपेक्ष कामात दुहेरी जबाबदारी असते. ज्याने आपल्याला संघात आणले, त्याने जरी एखादी चूक केली, तरी ती चूक आहे असे म्हणण्याचे धाडस लागते आणि दुसरे आपण ज्यांना जोडले, ते अधिक चांगले काम करायला लागले, अधिक जबाबदारी घेऊन काम करायला लागले, तर त्यात वैषम्य न वाटता ते स्वीकारण्याइतपत मोठे मन लागते. यासाठी उच्च कोटीची साधना लागते. सामान्य मानवापेक्षा निग्रही मन लागते. हे अंगी असणारे कार्यकर्ते तसे कमी आढळतात. विठ्ठल कारभारी शिंदे अशा दुर्मीळ कार्यकर्त्यांपैकी एक होते.
संघानुकूल जीवनरचना असावी असे व्यावसायिक कार्यकर्त्यांकडून अनेकदा अपेक्षित केले जाते. व्यवसाय, कुटुंब यांच्या जबाबदार्या संघकार्य करताना अडचण ठरू नये, हा त्यामागचा हेतू असतो. हे शब्दश: घडणे खूप अवघड, पण काही जण निक्षून तसे करतात आणि त्यामुळे ‘अपेक्षित तिथे उपस्थित’ हे वाक्य राहत नाही, तर तो व्यवहार बनतो. विठ्ठल कारभारी शिंदे हे अशा दुर्मीळ कार्यकर्त्यांपैकी एक होते. ते अल्पबचत दैनंदिन पिग्मी संकलन करायचे. ते मर्यादित वेळेत पूर्ण होत असे, पण या निमित्ताने शिर्डी गावात होणारी त्यांची रोजची 4 तासाची भ्रमंती त्यांच्यातील सजग स्वयंसेवकाला अनेक गोष्टी समजण्याची संधी असायची.
त्यांना आपण जेथे राहतो, तेथील जगाची, स्वयंसेवकाच्या कौटुंबिक सुखदु:खापासून सामाजिक प्रश्नांची जाण होती. यातून मिळणार्या अल्प उत्पन्नात समाधानी राहण्यासाठी आवश्यक विरक्ती, मर्यादित गरजा हे सगळे त्यांनी अंगीकारले होते. येथे विठ्ठलराव शिंदे यांच्या परिवाराची ओळख अनिवार्य ठरते.
विठ्ठलराव हे त्यांच्या आईवडिलांचे ज्येष्ठ चिरंजीव. दोन छोटे, भाऊ, बहीण असा त्यांचा परिवार. आई, वडील आणि विठ्ठलराव तिघे साईभक्तांना हार देण्यासाठी ते ओवण्याचे, माळण्याचे काम करायचे. जेमतेम गरजा भागायच्या, अशी अवस्था. एवढ्या सगळ्या परिवाराला जागा पुरायची नाही, तेव्हा विठ्ठलरावांना आसरा असायचा साईबाबांच्या चावडीचा. सार्वजनिक नळावर अंघोळ करावी आणि साईबाबांचे दर्शन घेऊन दिनक्रम सुरू करावा, असे बर्याच वेळा घडायचे. पण याही परिस्थिती त्यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले. वडील लवकर गेले. विठ्ठलरावांची जबाबदारी वाढली. लग्न झाले आणि विठ्ठलरावांच्या आयुष्यात एक समजूतदार व्यक्ती भक्कम आधार म्हणून वहिनींच्या रूपाने उभी राहिली. त्या दोघांचा किती संवाद होत होता? माहीत नाही. कारण सकाळी बाहेर पडलेले विठ्ठलराव रात्री साडेबारा-एकला घरी यायचे. त्यादरम्यान सगळे बचत संकलन, शेजारील गावात एखादा प्रवास किंवा बैठक आणि रात्रशाखा असे सगळे पूर्ण केलेले असायचे. पण शब्दांच्या संवादापेक्षा समजुतीची भाषा प्रभावी होती. आपल्या पतीने स्वीकारलेले असिधाराव्रत आपल्यालाच आयुष्यभर सांभाळायचे आहे, हा त्या माउलीने निश्चय केला होता.
बर्याच वेळा रात्री परतताना कुणीतरी कार्यकर्ता, प्रचारक बरोबर मुक्कामी असायचा. इतक्या रात्री वाढणे आणि सकाळी परत न्याहारी करून त्या कार्यकर्त्याला पाठवणे हे सगळे हसतमुखाने करणार्या वहिनी म्हणजे विठ्ठलराव शिंदे यांची खूप मोठी शक्ती होती. विठ्ठलरावांच्या धाकट्या बहिणीचे लग्न, भावांचे संसार या सगळ्या कौटुंबिक जबाबदार्या पार पाडताना कुठेही संघकार्यात कुठलाही अडथळा निर्माण झाला नाही, यात विठ्ठलरावांच्या सर्व परिवाराचा - अगदी आज स्वत:च्या पायावर उभे असलेल्या सचिन, वैभव या दोन्ही मुलांचा आणि सुनांचासुद्धा खूप मोठा वाटा आहे. शेवटी कोरोना लाटेत त्यांचे जावई गेले, हा आघात मात्र त्यांच्यावर खूप परिणाम करून गेला. तरीही त्यांचे प्रवास चालू होते. विपरीत स्थितीत घरची अनुकूलता त्यांना प्राप्त होती.
अर्थात येथे पुन्हा विठ्ठलरावांचे मोठेपण अधोरेखित होते, कारण आपण जगत असलेले जीवन कुठल्या ध्येयासाठी आहे, हे परिवारात संक्रमित करण्यात ते यशस्वी झाले. अनेक कार्यकर्त्यांना ही गोष्ट खूप अवघड वाटते, पण विठ्ठलराव यात यशस्वी ठरले. भौतिक साधने, जमीनजुमला याच्यापलीकडे माणसे हे एक जग आहे आणि अशी जोडलेली माणसे ही खूप मोठी संपत्ती आहे, हे परिवाराला सांगण्यात विठ्ठलराव यशस्वी झाले.
विठ्ठलरावांनी संघात प्रवेश केल्यावर जेमतेम दोन वर्षे झाली नाहीत, तर त्यांना तालुका सहकार्यवाह दायित्व मिळाले. कोपरगाव हा अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ अनुभवी कार्यकर्त्यांचा तालुका. संघाचे जिल्हा संघचालक काकासाहेब भांगरे आणि जिल्हा कार्यवाह राहिलेले आण्णा बागुल या तालुक्यातले. त्या वेळी जिल्हा कार्यवाह असलेले राजाभाऊ जोगळेकर कोपरगावचे. 80व्या वर्षी रोज शाखेत जाणारे मोटाभाई डोडिया या तालुक्यातील एक संघचालक. एकेकाळी तालुका कार्यवाह राहिलेले आणि पुढे जनसंघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहिलेले आणि त्या वेळी विधान परिषद सभापती असलेले सूर्यभानजी कोपरगावचे. तालुका कार्यवाह होते चंपालालजी. फरांदे सर नुकतेच आमदार झालेले. पतितपावन संघटनेचे संस्थापक भीमराव बडधे आणि बंधू वसंतराव वहाडणे.. हेमंतराव पाठक.. किती नावे सांगावी? या सगळ्यांसमोर तसा पोरसवदा हा विठ्ठल नावाचा ध्येयवेडा तरुण कधी विठ्ठलराव झाला, हे कळलेच नाही. संपूर्ण महाराष्ट्रात एका तालुक्यात नियमित चालणार्या सुमारे 25 शाखा आणि तितक्याच गावांत वेगवेगळ्या कारणाने नियमित संपर्क! ही संघकार्याची स्थिती हा अपघात नव्हता, तर वर उल्लेख केलेल्या विठ्ठलरावांच्या जीवनचक्राने अनेक जीवनचक्रांना दिलेल्या गतीचा तो परिणाम होता.
सुमारे 40 वर्षांपूर्वीचा तो काळ सोपा नव्हता. कोपरगाव तालुका म्हणजे 6 साखर कारखाने असलेला हा तालुका. त्यातील खासगी साखर कारखाने बंद पाडण्यासाठी समाजवादी विचारप्रणीत कामगार संघटनेची मंडळी प्रयत्नशील होती, सगळीकडे नोकरीवर टांगती तलवार होती. यात नोकरदार बहुतांश आपले स्वयंसेवक होते. एकीकडून काँग्रेसी विचारधारा जपणार्या मंडळींची दहशत आणि दुसरीकडून समाजवादी बुरखा पांघरलेला पवार बंधूंची दहशत यात संघशाखा चालू ठेवणे, कार्यकर्त्यांना धीर देणे, त्यांचे मनोधैर्य टिकवणे, त्यांचा ध्येयवाद टिकवणे सोपी गोष्ट नव्हती. पण ग्रामीण भागात आपल्या संवादकौशल्याच्या आधारावर आणि आत्मविश्वासाच्या बळावर विठ्ठलरावांनी ते सहज निभावून नेले. शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, विखे पा., रामसिंग पवार, किशोर पवार, शेतकरी संघटनेचे भास्करराव बोरावके अशी दिग्गज मंडळी त्या वेळी कोपरगाव तालुक्यात सामाजिक, राजकीय, सहकार क्षेत्रात आघाडीवर होती. आज विरोधातील, दहशत निर्माण करणार्यांतील अनेक मंडळी राजकीयदृष्ट्या जरी आपल्याबरोबर आली असली, तरी त्या कठीण काळात आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांची, सुखाची, आहुती देत विठ्ठलरावांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी धेयवादाची जी ज्योत पेटती ठेवली, त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, हे विसरता येणार नाही.
86 साली कोल्हार येथे शिबिर झाले. शिबिर कार्यवाह म्हणून विठ्ठलरावांची नियुक्ती झाली. त्यांनी उभारणी आणि व्यवस्थेसाठी कोल्हारच्या तरुण कार्यकर्त्यांना दिवसरात्र मदत केली. व्यासपीठावर बसण्याची त्यांना प्रथमच संधी मिळाली आणि अशा गोष्टींची सवय नसलेले विठ्ठलराव संकोचून गेले. पण या निमित्ताने नगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्यास एक अस्सल ग्रामीण चेहरा पुढे येतो आहे, हे नगर जिल्ह्याला समजले. पुढे नाना जाधव, सहाणे सर, बळासाहेब वाघ, अरुणराव धर्माधिकारी, डॉ. खंडेलवाल या अनुभवी कार्यकर्त्यांबरोबर त्यांनी काम केले. यादरम्यान त्यांना माणिकराव पाटील, वार्ष्णेय सर यांचा खूप स्नेह प्राप्त झाला.
हो, विठ्ठलरावांनी पुढील काळात जवळजवळ 30 वर्षे जिल्ह्याचे संघाचे नेतृत्व केले. अर्थात प्रचलित नेतृत्वाची परिभाषा आणि विठ्ठलरावांची कार्यशैली यात मूलभूत अंतर होते. आवश्यकता पडल्यावर त्यांनी सर्वत्र बौद्धिक वर्ग दिले. अतिशय प्रभावी पद्धतीने ते मांडणी करायचे. पण त्यांचे खरे कौशल्य दिसायचे बैठकांमधून, कार्यकर्त्यांशी असलेल्या संवादातून! चाकोरीबाहेरची उदाहरणे आणि ग्रामीण जीवनाशी संघकामाची जुळणी करण्याची त्यांची पद्धत यातून संघाचे काम वाढवण्यात त्यांनी प्रमुख भूमिका पार पाडली. जिल्हा सहकार्यवाह, कार्यवाह, विभाग सहकार्यवाह असे सलग 44 वर्षे काम करूनही जमिनीवर राहणे सोपे नाही आणि नंतर त्यातून अलिप्त होणे हेही सोपे नाही. पण विठ्ठलरावांच्या जीवनाकडे बघितले की हे सोपे वाटते, कारण त्यांनी कधी कशाचेही प्रदर्शन केले नाही. विठ्ठलरावांचे नेतृत्व व्यासपीठ, प्रसिद्धीचा झगमगाट यापासून दूर असलेले, पण स्वयंसेवकांच्या हृदयात विसावलेले नेतृत्व होते आणि म्हणूनच आबा बच्छाव, घांगुर्डे गुरुजींपासून ते बाळासाहेब सुराणा यांच्यापर्यंत अनेक लोकांची अंत:करणे विठ्ठलराव जाण्याने व्यथित झाली आहेत.
विठ्ठलराव संस्थाजीवनातील प्रश्न सोडवू शकत नव्हते का? तर त्यांनी अनेक प्रश्न सोडवले. अगदी अलीकडील काळात नगरचा एक जटिल प्रश्न त्यांनी सहज सोडवला, पण त्यांनी कुणाला कुठेही फार जखम, इजा होऊ दिली नाही. हे कौशल्य असूनही संस्थाजीवनात ते गुंतले नाहीत, हा त्यांचा सर्वात मोठा गुण म्हणावा लागेल. अधिकाराने काही सांगणे यापेक्षा संघविचार आणि कार्यपद्धती याचे दाखले देऊन समजावून सांगणे यावर त्यांचा भर होता आणि त्यामुळे समोरचा त्यांचे ऐकण्यास तयार व्हायचा. पण खर्या अर्थाने विठ्ठलरावांचे मन रमायचे ते शाखा, वर्ग आणि बैठका यातच!
त्यांना अनुकूल काळ असेल तर काय घडू शकते? याचे संकेत शिर्डी येथे ग्रामपंचायतीत सत्ता आल्यावर मिळाले होते आणि एका अर्थाने अशा स्थितीत विठ्ठलरावांचे व्यवहार सर्व स्वयंसेवकांना आदर्श वाटावे असेच होते. त्या वेळच्या प्रचलित परिस्थितीमध्येसुद्धा त्यांनी कधी स्वत:चा समतोल ढळू दिला नाही. स्वत:चा आणि कार्यकर्त्यांचा दैनंदिन शाखेच्या संदर्भातील भर कुठेही कमी होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आणि म्हणूनच शिर्डी हे कार्यकर्ता निर्मितीचा अखंड स्रोत ठरला आहे. आपण किंवा कुटुंब कुठेही कशाचे लाभार्थी बनणार नाही, याची ते दक्षता घेत.
वसतिगृहातील मुलांशी सलगी देत वागले पाहिजे, म्हणून त्यांच्या काळात अनेक प्रयोग झाले. शिर्डी येथील साईबाबा वसतिगृह, कोपरगावचे माळी/मराठा बोर्डिंग यातून अनेक कार्यकर्ते मिळाले. काही तर प्रचारक गेले. जगन्नाथ देवीकर हे त्यातील एक उदाहरण आहे. ते विद्यार्थी जेथे राहतात त्या गावी, त्यांच्या घरी विठ्ठलराव जाऊन यायचे. बहुतांश प्रवास बसने असायचे. ठरलेला प्रवास चुकला असे त्यांच्या बाबतीत 40 वर्षांत कधीतरी घडले असेल. खासगी कार्यक्रम, लग्न या कार्यक्रमांतसुद्धा ते स्थानिक कार्यकर्त्यांना बोलावून घेत आणि कामासंदर्भात चर्चा करायचे.
माणूस असताना त्याचा प्रभाव असतोच, पण तो गेल्यावर? विठ्ठलरावांच्या निधनाची बातमी पुणे येथील प्रांताच्या एका बैठकीत पोहोचली आणि तेथे उपस्थित असलेल्या शिर्डीच्या कार्यकर्त्यांची चलबिचल सुरू झाली! ज्यांनी इतके दिवस घडवले, ज्यांना पाहून आम्ही संघ शिकलो, त्यांचे अंतिम दर्शन महत्त्वाचे की बैठक महत्त्वाची? द्विधा मन:स्थिती झाली. बैठकीतून ते निघाले असते तर कुणी अडवले नसते. पण त्यांनी विचार केला, अण्णांना (विठ्ठलरावांना) काय आवडले असते? आणि चटकन त्यांनी बैठकीतच थांबायचा निर्णय घेतला. जाता जातासुद्धा विठ्ठलराव खूप काही सांगून गेले.
प्रचारक हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यांची व्यवस्था आणि काळजी घेणे हे ते प्राधान्याने करायचे. त्यामुळेच सुनीलराव देशपांडे, विजयराव पुराणिक, चंदूभाऊ कुलकर्णी, प्रसादराव जाफ्राबादकर, विशाल मेस्त्री अशा अनेक प्रचारकांशी त्यांचे जिवाभावाचे नाते निर्माण झाले होते. शेवटच्या घटका मोजत असताना अतिदक्षता विभागात प्रांत प्रचारक अण्णा वाळिंबे त्यांना भेटायला गेले होते. त्यांना पाहिल्यावर विठ्ठलराव वैभवबरोबर काही बोलायला लागले. बोलता येत नव्हते, गात्रे शिथिल झाली होती, तरीही ते मुलाला सांगत होते - ‘त्यांना विचार, जेवण झाले का?’ प्रचारक दिसल्यावर त्याला प्रथम हे विचारायचे, हा संस्कार इतका भिनला होता की शेवटच्या क्षणीही शाबूत होता! याला काय म्हणायचे?
कधीकधी असे वाटते की संघावर बेलगाम आरोप, टीका करणार्या मंडळींना सांगावे - अरे या, टीका कसली करता? विठ्ठलराव यांच्यासारखे व्यक्तित्व जवळून बघा. जातीपातीमध्ये स्वत:ची दृष्टी अधू करून घेतलेल्या मंडळींनो, या आणि बघा! नागपूरमध्ये त्या एका महापुरुषाने लावलेल्या संघरूपी वृक्षास लागलेली विठ्ठलरावरूपी फळांचा आस्वाद घ्या आणि मग ठरवा संघ कसा आहे!
विठ्ठलराव शिंदे यांचे जीवन म्हणजे संघावर होणार्या आरोपांना दिले जाणारे जितेजागते उत्तर आहे. त्यांचे जीवन म्हणजे न संपणारी ऊर्जा आहे. न संपणारा सात्त्विक आणि शुद्ध, निरपेक्ष प्रेमाचा झरा आहे. कितीही लिहिले तरी न संपणारे आख्यान आहे. शब्दात व्यक्त करण्याचा मर्यादा अधोरेखित करणारे आहे. त्यामुळे थांबतो. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर चालत राहणे ही त्यांना एकमेव सार्थ श्रद्धांजली होऊ शकते. तोच संकल्प करू या आणि पुढे जाऊ या!
विनम्र श्रद्धांजली!