@राहुल चेंबूरकर
गोमांतकांचे राजदैवत असलेल्या श्री सप्तकोटेश्वराचे मंदिराचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. श्री सप्तकोटेश्वर मंदिर हा गोवा सरकारच्या पुरातत्त्व विभागाचा ऐतिहासिक वारसा संवर्धन प्रकल्प आहे. या मंदिराचा छत्रपती शिवाजी महाराजांनी जीर्णोद्धार करून 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा या मंदिराचा इतिहास व जतन-संवर्धनाविषयी या लेखात जाणून घेणार आहोत.

राजराजेश्वर श्री छत्रपती शिवरायांनी 19 नोव्हेंबर 1667 रोजी पोर्तुगीजांविरुद्ध धार्मिक व राजकीय विजयाची मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज्याच्या हद्दीतील डिचोली या भागात 22 नोव्हेंबर 1667 रोजी दाखल झाले. डिचोली येथील एक महिन्याच्या मुक्कामात छत्रपती शिवाजी महाराजांना पोर्तुगीजांनी येथे केलेल्या धार्मिक अत्याचाराची कल्पना आली. पोर्तुगीजांना कायमची जरब बसवावी, हे महाराजांनी ओळखले व याच मनसुब्याने पुढे मोहीम यशस्वी करावयाची, हे ध्यानात घेतले. सुरुवातीला आपल्या गुप्तहेरांकडून मोहीम सुरू करून महाराज स्वराज्यात परतले. मोहिमेची सर्व तयारी झाल्यावर परत पुढील वर्षी नोव्हेंबर 1668मध्ये शिवाजी महाराज गोव्यात डिचोली येथे आले. इथे आल्यानंतर महाराजांनी शके 1590 कार्तिक कृष्ण पंचमी म्हणजे 13 नोव्हेंबर 1668 रोजी श्री सप्तकोटेश्वराचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प केला आणि श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा पहिला चिरा बसविला गेला. त्या प्रसंगाचा शिलालेखही मंदिराच्या दारावर बसविला, तो असा -
‘श्री सप्तकोटेश शके 1590 किलकाब्दे कार्तिक कृष्ण पंचम्या सोमे श्री शिवराजाज्ञा देवालयस्य प्रारंभा’
या ऐतिहासिक घटनेला फार मोठी पार्श्वभूमी होती आणि महाराज ती जाणून होते. पोर्तुगीज काळात बार्देश, तिसवाडी या पोर्तुगीजांच्या भागांतून पोर्तुगीजांच्या धार्मिक उच्छादामुळे डिचोलीच्या पंचक्रोशीत गावोगावी अनेक देव-देवता निर्वासित व उपेक्षितपणे आल्या होत्या; परंतु महाराजांनी श्री सप्तकोटेश्वराच्या मंदिराचाच जीर्णोद्धार का केला? असे अनेक प्रश्न येतात. तेव्हा सप्तकोटेश्वराचा पूर्वेतिहास पाहिला की याचा सहज उलगडा होतो.
गोव्यातील सर्वात प्रसिद्ध आणि संपन्न अशी कोणती राजवट म्हटली की ‘कदंब राजांची राजवट’ असे इतिहासाच्या साक्षीवरून सहज दिसते. या कदंब राजघराण्याचे कुलदैैवत होते श्री सप्तकोटेश्वर. कदंब राजे आपल्या बिरुदावलीमध्ये ‘श्री सप्तकोटेश्वर लब्धवर प्रसाद’ असा या सप्तकोटेश्वराचा उल्लेख करत. या बिरुदावलीचा अर्थ असा की ‘श्री सप्तकोटेश्वराचा कायमचा आशीर्वाद असणारे कदंब राजे’. प्राचीन काळी सप्तकोटेश्वर मंदिर दिवाडी उर्फ दीपवती या म्हादई उर्फ मांडवी नदीतील बेटावर वैैभवशाली आणि दिमाखदारपणे नार्वे-दिवाडी येथे विराजमान होते. ‘कोकण आख्यान’ या 18व्या शतकातल्या लिहिलेल्या ग्रंथात या नार्वे-दिवाडीतील सप्तकोटेश्वराचे स्थानमहात्म्य पुढीलप्रमाणे आहे -
दीपवाड क्षेत्र महाथोर॥ जेथे देव सप्तकोटेश्वर॥
नार्वे रहिवास मंदिर॥ स्थान सप्तऋषींचे॥
सप्तधातूंचे लिंग म्हणती॥ तेथे नवरत्नांची मंद ज्योती॥
ऐशी नवल प्रभास्थिती॥ चोजवेणा कवना ते॥
पंचगंगा तीर्थ जेथे॥ पाताळाहुनी जळ येते॥
जन्माष्टमी यात्रा भरते॥ उत्साह अद्भुत होत असे॥
अशा प्रकारचे वैभवशाली वर्णन असणार्या कदंब राजांच्या राजदैवताला परधर्मीय राजवट येताच ग्रहण लागले. चौदाव्या शतकात कदंब राजसत्तेचा शेवट होऊन गोवा प्रांत मुस्लीम बहामनी सत्तेखाली आला. या काळात मलबार-केरळ प्रांतातले नायटे लोकांनी गोवा बंदरांचा ताबा घेऊन लुटालूट व धार्मिक उच्छाद मांडला, याचे वर्णन कोकण आख्यानात आले आहे.
विजयनगर राजाचा मंत्री माधवरावाने सन 1392मध्ये विजयनगर राजाच्या आदेशाने परत सप्तकोटेश्वराची स्थापना केली होती. पुढे वेगवेगळ्या पाच बादशहांनी मिळून विजयनगर राजवट नष्ट केली. गोव्याचा भाग आदिलशहाकडे आला होता. या आदिलशाही काळात गोवा प्रांतात नायटे लोकांचा उपद्रव परत वाढला. तेव्हा वेर्णेचा प्रसिद्ध जमीनदार म्हाड पै याने नायटे लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी केरळातील कोचीहून पोर्तुगीज लोकांना मदतीसाठी बोलावले. सन 1510मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी अल्बुकर्कने तेव्हा आदिलशाही गोव्यातील फौजेचा पराभव करत नायटे मुस्लिमांची कत्तल केली. पोर्तुगीज प्रथम व्यापारी म्हणून गोव्यात स्थिरस्थावर होताच सन 1540नंतर त्यांचे प्रसिद्ध धर्मांध धोरण सुरू करून त्यांनी दिवाडी बेटावरील श्री सप्तकोटेश्वरावर पहिला घाव घातला. त्यांनी मंदिर उद्ध्वस्त करून शिवलिंग उचलून जवळील विहिरीवर उपडे घालून त्यावर बाटलेल्या लोकांना पाणी भरायला लावले. गोव्याच्या राजदैवताची ही विटंबना पाहवली नाही ती भतग्रामच्या (डिचोली) सूर्याराव सरदेसायांना. सूर्यारावांनी एके रात्री हे शिवलिंग उचलून गुपचुप पैैलतिरी हिंदळे (नार्वे) गावात आणून स्थापन केले.
पोर्तुगीजांनी ज्याप्रमाणे येथील राजसत्तेचे प्रतीक असलेल्या राजदैवताची विटंबना केली, त्या राजदैैवताला त्याच निर्धाराने आपल्या राज्यात राजाश्रय देण्याचा निर्णय छत्रपतींनी घेतला.
या ऐतिहासिक घटनेला 2019मध्ये इसवीसनाप्रमाणे 13 नोव्हेंबर आणि तिथीप्रमाणे कार्तिक कृष्ण पंचमीला - म्हणजे 27 नोव्हेंबर रोजी 350 वर्षे पूर्ण झाली.
श्री सप्तकोटेश्वर मंदिर हा गोवा सरकारच्या पुरातत्त्व विभागाचा ऐतिहासिक वारसा संवर्धन प्रकल्प आहे. हे मंदिर एक महत्त्वाची ऐतिहासिक खूण आहे, जी 2019 जानेवारीमध्ये जतन-संवर्धनासाठी हाती घेण्यात आली होती. कारण त्याच वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून 350 वर्षे पूर्ण झाली होती.
नार्वेस्थित श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनाचे कार्य जानेवारी 2019मध्ये सुरू झाले. या कामात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विशेष लक्ष घातले. या कामाची सुरुवात करताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धन कार्यासाठी जुन्या-पुरातन वास्तूंच्या जतन-संवर्धनाच्या कार्यात निष्णात असलेले व वास्तुविशारद राहुल चेंबूरकर व भालचंद्र टोपले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी मुंबईस्थित वास्तुविधान प्रोजेक्ट्स (Vaastu Vidhaan Projects) ह्या संस्थेची नेमणूक करण्यात आली.
ऐतिहासिक वास्तूंचा जीर्णोद्धार करायचा, म्हणजे त्याचे सर्व संदर्भ लक्षात घ्यावे लागतात. त्या वेळचा काळ, परंपरेने आलेले मौखिक दाखले, कागदपत्रांमधील नोंदी, मधल्या काळात घडलेल्या घटनांचा मागोवा, वास्तूचे सर्व संदर्भ न पुसता त्याची सक्षमपणे पुनर्बांधणी करावी लागते. कारण स्थळ, ऋतुचक्र व सभोवतालचे पर्यावरण यांना ती भविष्यात अधिक वर्षे सामोरी जाणार असते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशी वास्तू पाहायला आलेल्यांना तिच्या पाऊलखुणांचे दर्शन घडवायचे असते.
या सर्व बाबींचा विचार करून या ऐतिहासिक कामाची सुरुवात झाली. ह्या जतन-संवर्धनाच्या कार्यात मुख्यत: मध्यंतरी केलेले बाह्य काँक्रीटीकरण काढण्यात आले आणि बाह्य वास्तूला पारंपरिक चुन्याचा गिलावा पुन्हा देण्यात आला. तसेच ह्या जतन-संवर्धनाच्या कार्याद्वारे चिर्याच्या भक्कम व कोरीव जोत्याचे बांधकाम करण्यात आले, ज्याद्वारे भिंतींमध्ये पाण्यामुळे येणारा ओलावा थांबवण्यास मदत झाली. तसेच मुख्य शिखराचा घुमट व सभामंडपावरील आणि मुखमंडपावरील कौलारू छत खूपच दुरवस्थेत होते, त्याचेही त्याच पद्धतीच्या लाकडाने पूर्णत: जतन-संवर्धन करण्यात आले. मंदिराभोवती असलेल्या डांबरीकरण केलेल्या परिसराचे पूर्ण स्वरूप बदलून तिथे पारंपरिक चिर्याच्या दगडांनी फरसबंदी (paving) बांधण्यात आली. मंदिरासमोरील तळ्याची पूर्ण दुरवस्था झाली होती. त्याची साफसफाई आणि गाळ काढला, तसेच तुटलेल्या पायर्या आणि भोवतालची जोती ह्याचे पूर्ण संवर्धन करून त्याचे पूर्ण स्वरूप पालटले. मुख्य रस्त्यावरून मंदिराकडे जाणार्या पायवाटेचेसुद्धा चिर्याच्या बांधीव दगडांनी बांधकाम करून ती पालखी मार्गासाठी सोयीची करण्यात आली. मंदिराच्या अंतर्गत सुशोभीकरणासाठी ‘कावी’ या गोव्यातील पारंपरिक भित्तिचित्र कलेचा उपयोग केला गेला. याकरिता मूळ स्वरूपात पारंपरिक पद्धतीचे जिन्नस घेऊन यासाठी ते वापरले गेले. मंदिराच्या मुख्य इमारतीचे आणि सभोवतालच्या परिसराचे पूर्ण जतन-संवर्धन केल्यानंतर ह्या पूर्ण स्वरूपाला साजेशी रोशणाई करण्यात आलेली आहे.
मंदिरासमोरील दीपमाळेचीसुद्धा दुरवस्था झाली होती. तिचेही पूर्ण जतन-संवर्धन करण्यात आले आहे.
आलेल्या भक्तगणांना ह्या जतन-संवर्धनाच्या उपक्रमाची व्यवस्थित माहिती मिळावी, यासाठी विविध ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच दगडामध्ये कोरलेल्या मूळ गाभार्याचीही भक्तगणांना माहिती व्हावी, ह्या अनुषंगाने पूर्णपणे दगडामध्ये कोरलेली मागची भिंत साफ करून पारदर्शक काचेवर तिची पूर्ण माहिती लावण्यात आलेली आहे व त्याचेही यथोचित जतन-संवर्धन करण्यात आले आहे.
तसेच ह्या पद्धतीच्या कार्याचा दांडगा अनुभव असलेल्या आणि भारतभर अशा प्रकारची कार्ये पूर्णत्वास नेलेल्या Jeernodhar Conservators Pvt Ltd ह्या कंपनीला हे जतन-संवर्धनाच्या कार्याचे कंत्राट देण्यात आले होते.
6.5 कोटी रुपये खर्च करून हा श्री सप्तकोटेश्वर मंदिराच्या जतन-संवर्धनाचा प्रकल्प पूर्णत्वास नेलेला आहे आणि दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी त्याचे लोकार्पण केले गेले. भारतासाठी वर्तमानातील ही एक लोकविलक्षण अशी सन्माननीय घटना आहे.
(ऐतिहासिक संदर्भ - सचिन मदगे) https://www.vaastuvidhaan.in/