सेवाभावी कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन

विवेक मराठी    18-Oct-2023
Total Views |
सुहास वैद्य -  9922915254
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्‍या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.

rss
 
रवी गोळे यांना भेटायला गेलो की प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन, छान ऐकायला, वाचायला मिळते. एखाद्या व्यक्तीचा इतका दांडगा व्यासंग असू शकतो, हे पाहून माझे मलाच आश्चर्य वाटते.
 
मागच्या भेटीत सहज त्याच्याकडे चहा प्यायला आणि त्या निमित्ताने गप्पा मारायला गेलो, तर त्यांनी त्यांचे नवे कोरे पुस्तक माझ्या हाती सोपवले आणि म्हणाले, “वाचा आणि कसे वाटले ते सांगा.”
 
डॉ. केशव हेडगेवार नावाने महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रकल्पांचा सुंदर शब्दात घेतलेला मागोवा म्हणजे रवी गोळे लिखित ‘केशवार्पण’ हे पुस्तक.

संघमंत्र आणि केशवार्पण पुस्तक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता शताब्दीकडे वाटचाल करीत असून मानवी जीवनाच्या सर्व पैलूंना संघविचाराने स्पर्श केला आहे. भारतमातेच्या परमवैभावाच्या कालखंड दृष्टीपथात येत असताना डॉ. हेडगेवारांनी सांगितलेल्या संघमंत्रची आठवण पुन्हा करण्याची आवश्यकता आहे

संघमंत्र – २०० /- रु.
केशवार्पण – १५० /- रु.

३५०/- रुपयांचा संच मिळवा केवळ ३१५/- रुपयांत
आपला संच आजच नोंदवा…

https://www.vivekprakashan.in/books/sanghmantra/

  
एका वाक्यात या पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगायचे, तर हा ‘रिपोर्ट’ नाही. प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. आपल्या आसपास दिसणार्‍या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.

खरे तर संघप्रणीत हजारो प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत. पण रवीजींनी लिखाणाच्या आटोपशीरतेचा विचार करून त्याला थोडी चाळण लावून फक्त डॉ. केशव हेडगेवार याच नावाने चालणार्‍या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले आहे. अर्थात त्यातून त्या कामांचा आवाका, महत्त्व आणि उपयुक्तता अधिक अधोरेखित होते. रवीजींच्या शब्दवैभवाने ते तितक्याच प्रभावी पद्धतीने आपल्या मनाला स्पर्शून जातात. यात उल्लेख केलेले जे प्रकल्प आपण पाहिलेले नाहीत, त्याची जिवंत अनुभूती येते. ते प्रकल्प पाहण्याची नुसती उत्सुकताच नाही, तर ओढ लागते.
 
गोवा येथील केशव सेवा साधना प्रकल्प, विशेष मुलांकडे द्यावे लागणारे विशेष लक्ष. त्यांच्या बुद्ध्यंकानुसार त्यांना शिकवली पाहिजे अशी कौशल्य आणि त्यातून त्यांच्यासाठी अर्थार्जनाची काही सोय अशा त्रिसूत्रीवर हा प्रकल्प चालवला जातो. नाना बेहरे अत्यंत आत्मीयतेने या प्रकल्पाकडे पाहत आहेत. गोव्याच्या इतर भागाच्या तुलनेत विकासापासून वंचित असलेल्या काणकोण, सांगे, सत्तरी, पेडणे या तालुक्यात 1991पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. तेंबेवाडा, काणकोण येथील माताजी मंदिराच्या वसतिगृहात 25 विद्यार्थ्यांपासून सुरुवात झाली. आज तीस-बत्तीस वर्षांनंतर पैंगीण, नेत्रावळी या ठिकाणी ह्या सेवा कार्याचा विस्तार झाला आहे. चांगल्या, सात्त्विक कार्याला समाजही काही कमी पडू देत नाही, याचा अनुभव केशव सेवा साधनाच्या माध्यमातून सेवा कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना आला. कुणी आपले राहते घर दिले, कुणी धान्य दिले, कुणी समयदान केले आणि आजही त्याचा ओघ वाढता आहे.
 
 
विशेष मुलांच्या आरोग्याचा विषय सांभाळत त्यांना रंगीबेरंगी आकाशकंदील, पणत्या, रंगीबेरंगी कागदाची फुले, पुष्पगुच्छ वगैरे बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यातून त्यांना मिळणारे समाधान काही वेगळेच असते. आज प्रकल्पाचा विस्तार निम्मे-अधिक गोवा व्यापून आहे. रवीजींच्या शब्दात सांगायचे, तर या विशेष मुलांचे आयुष्य फुलासारखे टवटवीत राहावे आणि त्याचा कीर्तिसुगंध सर्वत्र पसरावा, यासाठी केशव सेवा साधनाचे कार्यकर्ते खर्‍या अर्थाने अहोरात्र साधना करत आहेत.
 
 
केशवसृष्टी ग्रामविकास योजना हा सेवा प्रकल्प याच पद्धतीने, पण जरा वेगळा दृष्टीकोन ठेवून सुरू झाला. ठाण्यासारख्या शहराजवळ असूनही स्वातंत्र्यानंतरच्या 50-75 वर्षांत ज्या जनजाती भागात विकासाचा वाराही पोहोचला नाही, त्या ठिकाणी शाश्वत ग्रामविकासाचे काम करता येईल का? असा विचार करून विमलजी केडियांनी काही स्थानिक तरुणांना आणि विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून काम करू इच्छिणार्‍या स्वयंसेवकांना हाताशी धरून प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.
 
 
भाइंदरजवळील उत्तन येथील ‘केशवसृष्टी’च्या माध्यमातून या प्रकल्पाला बळ मिळत गेले. वाडा, जव्हार, विक्रमगड, मोखाडा या चार तालुक्यांत कामाचा श्रीगणेशा झाला. प्रकल्प पाहायला गेलेल्या रवीजींनी संदेश बोरसेला त्याच्या मोटरसायकलवर बसता बसता प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा तो म्हणाला, “आधी प्रकल्प पाहा, मग काय विचारायचे ते विचारा.” त्याच्या बोलण्यात जो आत्मविश्वास रवीजींना जाणवला, तोच या प्रकल्पाचा मजबूत पाया आहे.
 
तेथील डोंगरीपाड्यात परिवर्तनाच्या काही पाऊलखुणा रवीजींना दिसल्या. सुंदरशी इमारत, त्यात चालणारे संस्कार केंद्र, व्यायामाची साधने, शिलाई प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, आरोग्य, कृषी, पर्यावरण, महिला सक्षमीकरण हे तेथील ऊर्जा केंद्र आहे. वानगीदाखल एक उदाहरण सांगायचे, तर पुढे दत्तू पागी या शेतकर्‍याच्या शेतात गेल्यावर तेथील कृषी उत्पन्नाचे प्रयोग आपल्याला पाहायला मिळातात. सौर पंप, शेतात फिरवलेली पाईपलाईन, त्यातून नदीच्या पाण्याचा यथायोग्य वापर आणि आलेले उत्पन्न सुरत किंवा मुंबई जिथे अधिक भाव मिळेल तिथे हंगामाप्रमाणे विक्री असे त्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य सांगता येईल. ज्या ठिकाणी पोहोचायला आजही नीट रस्ता नाही, तिथे केशवसृष्टीच्या सहकार्याने ग्रामीण विकासाचा मार्ग प्रशस्त होताना आपल्याला दिसतो. रवीजींच्या थेट बांधावरील लिखाणामुळे तो आपल्याला अनुभवता येतो.

 
शेतीचे काही विज्ञान असते, हे आत्ता आत्ता आपल्या लक्षात येऊ लागले आहे. निसर्गलहर हीच आपल्या शेतीची तारणहार या अंधश्रद्धेतून बाहेर पडून हळूहळू जगाचा पोषणकर्ता विज्ञानाचा आधार घेऊ लागला आहे. याला सर्वांगीण सहकार्य करण्यास तत्पर आहे ती नंदुरबार जिल्ह्यातील डॉ. हेडगेवार सेवा समिती.

 
संपूर्णपणे जनजाती जिल्हा असलेल्या या कार्यक्षेत्रात नंदुरबारमध्ये पन्नास एकरात प्रायोगिक तत्त्वावर शेती केली जाते. या ठिकाणी माती परीक्षण, आर्द्रता मोजणी, पर्जन्यमापन अशा अनेक अत्याधुनिक सुविधा सर्वसामान्य शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. समितीचे प्रशासकीय अधिकारी उमेश शिंदे अत्यंत उत्साहाने हा सगळा प्रवास उलगडून दाखवतात. शेतकर्‍यांसाठी कमी श्रमात जास्तीत जास्त काम आणि उत्पन्न मिळावे यासाठी अनेक प्रयोग, संशोधने सुरू असतात. मोगी, एकचाकी कोळपे, एकहाती खुरपे अशी नावीन्यपूर्ण अवजारे इथे विकसित केली आहेत. स्थानिक जमिनीत कोणते पीक घेतले पाहिजे, त्याचा भांडवली खर्च, विक्री, त्यातून मिळणारे उत्पन्न आणि नफा याचे सूत्रबद्ध गणित त्यांना समजेल अशा भाषेत समजावून सांगितले जाते.
 
 
तळोदा येथे कृषी विज्ञान केंद्र हे भारतीय कृषी अनुसंधान केंद्र, दिल्ली यांनी पुरस्कृत केले आहे. त्या माध्यमातून दर दोन महिन्यांनी कृषक मंडळ आयोजित केले जाते. विचारांची, अनुभवांची देवाणघेवाण होते. नवनवीन कृषी तंत्रज्ञान, बियाणे निर्मिती, नवे वाण, जैविक कीड- व रोगनियंत्रण अशा अनेक पैलूंवर इथे काम सुरू आहे. शाश्वत विकासाचा उत्तम मानबिंदू असे याचे वर्णन करावे लागेल. डॉ. गजानन डांगे याचे अध्वर्यू आहेत. त्यांच्या दूरदृष्टीतून आकाराला आलेली ही सेवा समिती नंदुरबार जिल्ह्यातील जनजाती बांधवांच्या मनात घर करून राहिली आहे. रवीजींनी त्याचा सुयोग्य शब्दात परिचय करून दिला आहे.
 
डॉ. हेडगेवार रुग्णालय हे शब्द कानावर पडले की पुढे छ. संभाजीनगर जोडून येतेच; पण असेच रुग्णालय इचलकरंजी येथेही आहे, हे फार थोड्या लोकांना माहीत असेल.
 
दोन मजली आणि फक्त 32 खाटांचे हे रुग्णालय आसपासच्या अनेक खेड्यांमध्ये आरोग्यसुविधा पुरवीत आहे. डॉ. हेडगेवार रुग्णालयाची एक पत निर्माण झाली आहे. या त्यांच्या गौरवांकित कार्यामुळे येत्या काही दिवसांत डॉ. हेडगेवार रुग्णालय साडेतीन एकरातील भव्य वास्तूत स्थलांतरित होणार आहे. तेथील प्रशासकीय अधिकारी डॉ. पवार अत्यंत आत्मीयतेने हा प्रकल्प समजावून सांगत होते. आरोग्यसुविधा महत्त्वाची असतेच, पण त्यामागची आपलेपणाची भावना त्या प्रकल्पाची उंची आणि खोली ठरवत असते. इचलकरंजी येथील डॉ. हेडगेवार रुग्णालय आज कारवार, निपाणी या सर्व टापूतील लोकांमध्ये हृदयस्थ झालेले पाहायला मिळते. रवीजींच्या लिखाणातून ते वाचायला मिळते.

 
डॉ. हेडगेवार रुग्णालय, छ. संभाजीनगर हा असाच एक प्रकल्प. 7 डॉक्टर, 2 कर्मचारी आणि 15 खाटांपासून सुरुवात झालेले हे रुग्णालय आज अनेकविध समाजोपयोगी प्रकल्प, उपक्रम चालवत आहे. 50 तज्ज्ञ डॉक्टर चमू, 1000पेक्षा जास्त कर्मचारी हाताशी धरून 500 खाटांचा टप्पा पार करतेय आणि 35 एकरात भव्य वैद्यकीय महाविद्यालय उभे करण्याचा संकल्प करून कार्यरत आहे. महाराष्ट्रात आणि देशभरात त्याची वेगळी ओळख आहे. त्याच्या प्रगतीचा आलेख रवीजींच्या शब्दात वाचणे हा वेगळा अनुभव आहे.
 
आपल्या आसपासची समस्या समजून-उमजून त्यावर उत्तर शोधल्यावर तिथपर्यंत न थांबता अन्य काही अडचणी आणि भविष्यातील संकटांची तजवीज हेसुद्धा दीर्घकालीन काम स्वयंसेवक करत असतात. कोकणातील माणगाव प्रकल्प याचे उत्तम उदाहरण आहे. माणगावातील दूध संकलन केंद्र अशाच निकडीतून सुरू झाले. त्या ठिकाणी असलेला तथाकथित दूध संघ म्हणजे राजकारणाचा अड्डा झालेला असल्यामुळे शेतीपूरक व्यवसाय म्हणून सुरू झालेले दूध संकलन केंद्र हे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असे झाले होते. त्यातून उत्पन्न मिळण्याऐवजी मिळणारा मनस्ताप पाहून लोकांनी त्याकडे पाठ फिरवलेली. लोकांची मानसिकता सकारात्मक दिशेने वळवून पुन्हा एकदा नव्या दमाने दूध संकलन केंद्र सुरू करणे आणि त्याला योग्य भाव मिळवून देणे असे दुहेरी आव्हान तेथील स्वयंसेवकांनी स्वीकारले. डॉ. हेडगेवार स्मृती सेवा समितीने ‘कल्पवृक्ष शेतकरी गट’ स्थापन केला आणि हळूहळू दूध संकलन केंद्राचे स्वप्न साकार होऊ लागले. दूध संकलन, दुधाची गुणवत्ता, त्याला मिळणारा भाव याचे गणित जुळत गेले आणि शेतकरी पुन्हा एकदा या पूरक व्यवसायाकडे वळू लागला. त्याला जोडून ‘बेबीकॉर्न’ शेती सुरू करण्यात आली. त्याचेही शास्त्रोक्त प्रशिक्षण आणि शेती मालाच्या भावाची हमी मिळाली. लोकांचा उत्साह वाढला. मुंबई-पुण्यातून येणार्‍या मनीऑर्डरी हेच ज्यांच्या मिळकतीचे साधन होते, त्यांना कोकणातील निसर्गाचा वेगळ्या दृष्टीकोनातून परीचय होत गेला. विकासगंगा आपल्याच भगीरथ प्रयत्नाने आपल्याच दारासमोरून वाहती होते, याची अनुभूती याची देही याची डोळा अनुभवता आली.
 
 
भर पावसात अत्यंत आनंदाने प्रकल्पभेट करवून आणणारा एकनाथ एवढ्यावर थांबत नाही. त्याला आणखीही अनेक क्षितिजे साद घालताहेत. काजू प्रक्रिया, आंबा प्रक्रिया किंवा घरगुती मोदक अधिक जास्त दिवस कसे टिकतील याविषयी संशोधन सुरू आहे. शाळा, वसतिगृह, शेती आधारित प्रशिक्षण केंद्र हे समिती सदस्यांचे पुढील लक्ष्य आहे.
 
 
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुनील उकिडवे यांना कोकणाच्या निसर्गाला धक्का न लावता अत्याधुनिक तंत्रज्ञाचा नवा पायंडा घालून द्यायचा आहे. त्या सर्वांची धडपड निश्चित कारणी लागेल असा विश्वास रवी यांना वाटतो, कारण ते प्रत्यक्ष पाहून आले आहेत. त्यांच्या लिखाणाला वास्तवाचे भान लाभले आहे.

 
अनेक सेवा प्रकल्पांचा समूह म्हणजे केशवस्मृती सेवा संस्था, जळगाव. अनेक पैलूंना आणि आयामांना कवेत घेत सुरू झालेला हा सेवायज्ञ अनेकांच्या समिधांमुळे नावारूपाला आलेला आहे. क्षुधाशांती केंद्रापासून ते अद्ययावत जळगाव जनता बँकेपर्यंत असा सार्वत्रिक विस्तार असलेला हा सेवासमूह जळगावच्या विकास परिघाचा देदीप्यमान केंद्रबिंदू आहे.
 
 
डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी, पुणे म्हणजे महाराष्ट्रात सुरू असलेल्या अनेक सेवा प्रकल्पांचा प्रमुख आधारस्तंभ आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. संघ म्हणजे शाखा आणि शाखा म्हणजे सेवा कार्य असा मंत्र देणारे तृतीय सरसंघचालक प.पू. बाळासाहेब देवरस यांच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी आकाराला आलेली ही संस्था खर्‍या अर्थाने सेवादीप उजळत ज्या ठिकाणी अंधार आहे तेथे प्रकाश पोहोचवण्याचे कार्य अत्यंत निरलसपणे करत आहे.
 
 
वरील सर्व संस्थांचे कार्य 108 पानांच्या छोट्या पुस्तकात सामावणारे नाही. पण त्याची प्रभावी ओळख करून द्यायचे शिवधनुष्य रवी गोळे यांनी लीलया पेलले आहे.
 
 
रा.स्व. संघाचे माजी सरकार्यवाह यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हटले आहे, ते अगदी यथायोग्य आहे - ‘कुठल्याही प्रकल्पाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहेच, पण त्याची मूळ प्रेरणा आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांचा मनोभाव सर्वांसमोर येणे अत्यावश्यक आहे.’
 
 
रवी गोळे यांनी या सर्व प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देऊन ‘केशवार्पण’ या पुस्तकातून तो मनोभाव वाचकांच्या समोर जसाच्या तसा ठेवला आहे. मला खात्री आहे, यातून नवीन प्रकल्प आकारास येतीलच, तसेच मंद होऊ पाहणारे सेवादीप पुन्हा एकदा नव्या तेजाने उजळून निघतील.