उष:काल! उष:काल!!

विवेक मराठी    01-Feb-2022
Total Views |
बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपतींचा इतिहास, त्यांचे जीवन महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचविले. ‘राजा शिवछत्रपती’ या चरित्रग्रंथातून आणि ‘जाणता राजा’ या महानाट्यातून बाबासाहेबांनी छत्रपतींचा पराक्रम, त्यांचे चारित्र्य अधोरेखित केले. शिवचरित्र प्रसाराचा पुढचा टप्पा म्हणजे आंबेगाव येथील ‘शिवसृष्टी प्रकल्प’ आहे. ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथातील काही लक्षवेधी उतारे या लेखमालेत देत आहोत.
shivsrushti
 
आणि किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडाला. वाद्ये कडाडूं लागली. संबळ, झांजा झणाणूं लागल्या. गडावरच्या नगारखान्यात सनई चौघडा झडूं लागला. नौबत सहस्रश: दणाणूं लागली. नद्या, वारे, तारे, अग्नी सारे आनंदले. तो दिवस सोन्याचा! तो दिवस रत्नांचा! तो दिवस कौस्तुभाचा, अमृताचा! छे: हो, छे: छे: छे:! त्या दिवसाला उपमाच नाही! शुभ ग्रह, शुभ नक्षत्रे, शुभ तारे, शुभ घटका, शुभ पळें, शुभ निमिषे - तो शुभ क्षण गाठण्यासाठीच गेलीं तीनशे वर्षें शिवनेरीच्या भवती घिरट्या घालीत होतीं! आज त्यांना नेमकी चाहुल लागली! आज तें सर्व जण जिजाबाईसाहेबांच्या सूतिकागृहाच्या दाराशी थबकलीं, थांबलीं, खोळंबलीं, अधीरलीं आणि पकडलाच त्यांनी तो शुभ क्षण! तीनशे वर्षानंतर! तीनशे वर्षांनंतर! कोणत्या शब्दांत त्या सुवर्णक्षणाचे मोल सांगूं? अहो, ते अशक्य! केवळ शतका-शतकांनीच नव्हे, युगायुगांनीच असा शुभ क्षण निर्माण होतो. त्याचे मोल अमोल! शालिवाहन शकाच्या 1551व्या वर्षीं, शुक्लनाम संवत्सरांत, उत्तरायणांत, फाल्गुन महिन्यांत, वद्य तृतीयेला, शिशिर ॠतूंत, हस्त नक्षत्रावर, सिंह लग्नावर, शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधार पडल्यावर शुभ क्षणीं, अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे पांच ग्रह अनुकूल व उच्चीचे असताना जिजाबाईसाहेब आईसाहेबांच्या उदरी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला! (दि. 19 फेब्रुवारी, शुक्रवार 1630)
 
 
शुक्ल संवत्सराने आपले नांव सार्थ केले! उगीच त्याला ‘काळें’ म्हटलें! शुक्ल संवत्सर! शुभ संवत्सर! शिव संवत्सर!
 
 
गडाचे तोंड साखरेहून गोड झालें. आईसाहेबांच्या महालापुढे पखालीतून आणि घागरींतून धो धो धबधबलेले पाणी बारा वाटा वाहत निघालें. खळाळणारा ओघ वेशीला आला! ओघ वेशीला आला, पुण कोणाला झाला? पुत्र जिजाबाईसाहेबांना झाला! पुत्र शहाजीराजांना झाला! पुत्र सह्याद्रीला झाला! महाराष्ट्राला झाला! भारतवर्षाला झाला! प्रत्येक जलौघ वळसे घेत घेत दिल्लीच्या, विजापूरच्या, गोव्याच्या, मुरूडजंजिर्‍याच्या आणि गोवळकोंड्याच्या वेशीकडे धावत होत्या. तेथल्या मग्रूर सुलतानांना बातमी सांगायला की, आला आला! सुलतानांनो, तुमचा काळ जन्माला आला! तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तख्ताच्या चिरफाळ्या उडविण्याकरिता कृष्ण जन्माला आला!
 
 
(बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘राजा शिवछत्रपती’ या चरित्रग्रंथातून साभार)