सीधीसी बात न मिर्चमसाला!

विवेक मराठी    03-Nov-2022
Total Views |
@डॉ. मृदुला दाढे जोशी
 
 
vivekख्यातनाम कवी गीतकार शैलेंद्र यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या शैलीचा मागोवा घेणारा लेख. शैलेंद्र शैली नेमकी होती कशी? तर, हिंदी भाषेतला गोडवा, प्रासादिकता घेऊन शैलेंद्रची शैली उमलली. त्याच्या गाण्यांत आशयाचा थेटपणा आहे. कष्टकरी गरीब वर्गाची पिळवणूक, त्यातून निर्माण होणारं अपार दु:ख याची वेदना शैलेंद्रच्या गाण्यात दिसते. मात्र हा केवळ वेदनेचा कवी नव्हता. हळवा प्रणयही त्याने तितक्याच तरलतेने हाताळला. शैलेंद्रची भाववृत्ती जाणून घेत त्याच्या गाण्यांचं काव्यात्मक आणि सांगीतिक विश्लेषण करण्याचा हा प्रयत्न.
बाद नहीं, बर्बाद सही,
 
गाता हूँ खुशी के गीत मगर!’
 
 
असं लिहिणारा शैलेंद्र कवी म्हणून मनस्वी असला, तरीही त्याला गीतकार म्हणवून घेण्यात कधीही कमीपणा वाटला नाही. त्याचं म्हणणं ‘सीधीसी बात न मिर्चमसाला’ या त्याच्या काव्यासारखंच अगदी थेट होतं. एक ना एक दिवस परमेश्वराकडे जायचंच आहे, मग भावनांशी प्रतारणा करत का जगायचं? असं म्हणत आयुष्याला सामोरं जात, येतील ते अनुभव त्याने घेतले, आणि ‘न हाथी है ना घोडा है, वहाँ पैदलही जाना है’ असं स्वत:ला बजावत या ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’ असलेल्या दुनियेतून तो अकस्मात निघून गेला, ‘हम तो जाते अपने गाँव अपनी राम राम राम।’ म्हणत! प्रांजळता आणि भाबडेपणा हे गुण आहेत यावर त्याचा विश्वास होता. अतिपांडित्यामुळे माणसाला समोरची खरी दुनिया दिसेनाशी होते, अशी त्याची धारणा होती. त्यामुळे, ‘कुछ लोग जो ज्यादा जानते हैं, इन्सान को कम पहचानते है’ असं फार परखड, बोचरं सत्य तो लिहून गेला. स्वत:मधल्या अस्सल माणसाचंच त्याने नेहमी ऐकलं. म्हणूनच या अस्सल माणसापेक्षा त्याच्यातला ‘तलम धोतर नेसलेला बिनाफ्रेमचा चश्मा घातलेला कवी’ कधीच वरचढ होऊ शकला नाही. याचं कारण त्याच्याच शब्दात सांगायचं, तर ‘त्या अस्सल ‘मी’ची दृष्टी तीक्ष्ण होती’.. त्या अस्सल माणसाने ही बिरुदं आणि येणारा ’संभावितपणा’ यापासून शैलेंद्रला लांब ठेवलं. कष्टकरी गरीब वर्गाची पिळवणूक, त्यातून निर्माण होणारं अपार दु:ख याची वेदना शैलेंद्रच्या गाण्यात दिसते. मात्र हा केवळ वेदनेचा कवी नव्हता. हळवा प्रणयही त्याने तितक्याच तरलतेने हाताळला. शैलेंद्रची भाववृत्ती जाणून घेत त्याच्या गाण्यांचं काव्यात्मक आणि सांगीतिक विश्लेषण करण्याचा हा प्रयत्न.
 
 
 
शैलेंद्रची गाणी ही ‘उत्तम दर्जाची काव्य’ म्हणून मान्यता पावू शकली, कारण मुळातला विचार अतिशय खोल होता. त्याला जे सांगायचं होतं, ते कधी व्यक्त झालं हिरामणकडून, कधी राजू गाइडकडून, कधी शंभू महातोकडून, तर कधी अगदी कैदी बंदिवान स्त्रियांकडून. त्या शब्दांना विलक्षण धार होती. ‘दिल को तुझसे बेदिली है मुझको है दिल से ही प्यार’ या एका ओळीत त्याचं अतिसंवेदनशील असणं आणि तिचा काहीसा कोरडेपणा क्षणार्धात समोर येतो. त्याचं प्रेमगीतही एका दैवी पातळीवर जातं, तेही नैसर्गिकपणे!
 
 
 
शैलेंद्रचं मूळ गाव बिहारच्या आँरा जिल्ह्यातील. वडील केसरीलाल सैन्यात ठेकेदाराच्या नोकरीत असल्याने रावळपिंडीत स्थायिक झालेले. इथेच 30 ऑगस्ट 1923 या दिवशी शैलेंद्रचा जन्म झाला. त्याचं पाळण्यातलं नाव शंकरदास. आई गृहिणी. ती घरात पारंपरिक गीतं गुणगुणे. त्यातून स्वरतालाची उपजत समज शैलेंद्रमध्ये रुजली. भारताची फाळणी होण्याआधी शैलेंद्रचं कुटुंब मथुरेत आलं, तरी त्याच्या मनात जन्मगावाविषयी - रावळपिंडीविषयी अपार प्रेम होतं, म्हणूनच फाळणीचा घाव त्याच्या जिव्हारी खोल लागला. त्यातूनच ‘जलता है पंजाब’ हे काव्य जन्माला आलं. शिक्षणासाठी, कुटुंबाची गरज म्हणून रेल्वे वर्कशॉपमधल्या नोकरीसाठी त्याला मुंबई गाठावी लागली. इथे सामाजिक विषमतेचं अस्वस्थ करणारं दर्शन घडलं. जातिवंत कवी हा! रॉयल ऑपेरा हाउस इथे झालेल्या जलशात ‘जलता है पंजाब’ ही कविता सादर करताना राज कपूरने ऐकली. हे काव्य अनेकांना अस्वस्थ करून गेलं. अशा अनेकांमध्ये होता सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता राज कपूर. त्याने शैलेंद्रला भेटून चित्रपटासाठी गीत लिहिण्याची ऑफर दिली. आपल्या कवितेला, शब्दांना पैशात तोलण्याची कल्पनाच त्याला सहन झाली नाही. त्याने अतिशय सहजपणे राज कपूरला नकार दिला. आणि काही दिवसांनी जेव्हा पैशाची चणचण निर्माण झाली, तेव्हा राजला भेटून गाणी लिहिण्याची तयारीही दाखवली. असा अंतर्बाह्य पारदर्शक स्वभाव.
 
 
vivek
 
‘आग’साठी लिहायला नकार देणार्‍या शैलेंद्रने ‘बरसात’साठी गाणी लिहिली, बरसात शब्दश: धो धो चालला, गाणी तुफान गाजली आणि तिथून राज, शंकर-जयकिशन आणि शैलेंद्र-हसरत जयपुरी यांची मनं जुळली आणि नियतीने त्यांच्याकडून प्रचंड काम करून घेतलं. राज कपूर जिवलग दोस्त झाला. इतका की, त्याने पुढे प्रत्येक चित्रपटाचं थीम साँग शैलेंद्रकडूनच लिहून घेतलं. शैलेंद्रने अनेक संगीतकारांबरोबर काम केलं. मात्र त्याची सर्वाधिक गाणी शंकर-जयकिशनबरोबरची आहेत.
 
 
 
शैलेंद्र शैली नेमकी होती कशी? तर, हिंदी भाषेतला गोडवा, प्रासादिकता घेऊन शैलेंद्रची शैली उमलली. त्याच्या गाण्यांत आशयाचा थेटपणा आहे. ‘मेरा नाम राजू’, ‘सजन रे झूठ मत बोलो’ ही गाणी किती सरळ आहेत! ‘भला कीजे भला होगा, बुरा कीजे बुरा होगा’ हा इशारा यापेक्षा सोप्या भाषेत सांगता येणार नाही. नेमक्या शब्दांचा वापर करणं शैलेंद्रला साधलं होतं. त्याच्या अनेक गाण्यांत ‘कथन’ (स्टोरी टेलिंग) आहे. उदा., ‘दिल का हाल सुने दिलवाला।’ यात एक छोटीशी गोष्ट गुंफून ते गाणं रंजक केलं जातं. म्हणजे बघा,
 
रंजोगम बचपन के साथी
आँधियों मे जली जीवन बाती
भूख ने है बड़े प्यार से पाला!
किती सहज आत्मकथा सांगून गेला शैलेंद्र!
 
 
आणि ‘भूख ने है बड़े प्यार से पाला!’ ही वक्रोक्ती अतिशय जीवघेणी.. किती सहज शैलेंद्रने त्या निष्कांचन अवस्थेलाच एक प्रेमळ स्पर्श दिला! याच गाण्यात कथा सांगता सांगता शैलेंद्र त्याला एक वेगळी कलाटणी देतो, बघा..
 
 
गम से अभी आजाद नहीं मै,
’खुश‘ हूँ मगर ‘आबाद’ नहीं मै
 
 
खुश आणि आबाद.. फार विचार करायला लावणारे शब्द.. इथे हे गाणं व्यापक बनतं. सगळं मिळूनही आपण उदास असू शकतो.. ‘आनंद’ आणि ‘साफल्य’ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. याला स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्यानंतर फाळणीमुळे आलेलं नैराश्य यांचाही संदर्भ असावा, असं मला वाटलं.
 
 
 
शैलेंद्रच्या काव्यात काही शब्द, उपमा नेहमी येतात. ‘रिमझिम’ हा असाच त्याचा आवडता शब्द. बरसात मे.. (सपनो की रिमझिम मे नाच उठा मन), आहा ‘रिमझिम’ के ये प्यारे प्यारे, ‘रिमझिम’ के तराने ले के, संगीत मन को पंख लगाये गीतोसे ‘रिमझिम’ रस बरसाये। (सुर ना सजे) इतकंच काय, शैलेंद्रच्या बंगल्याचं नावसुद्धा ‘रिमझिम’ होतं!
 
 
 
शैलेंद्रला ‘हे’ जग आणि ‘ते’ जग.. लौकिक आणि पारलौकिक.. ’इस पार’ आणि ‘उस पार’ या संकल्पनांनी मोहिनी घातलेली होती. मृत्यूबद्दल गूढ आकर्षण होतं. म्हणूनच ‘तिकडच्या’ जगाच्या कल्पना त्याच्या काव्यात नेहमी डोकावतात.
- ना कोई ‘इस पार’ हमारा ना कोई ‘उस पार‘
 
 
सजनवा बैरी हो गए हमार!
 
- मेरे साजन है ‘उस पार’, मैं मन मार, हूँ ‘इस पार‘
- अंधे जहाँ के - ‘इस पार ‘आहें ‘उस पार’ आंसू
- आजा रे मै तो कब से खडी ‘इस पार’
- गंगा और जमुना की गहरी है धार,
आगे या पीछे सबको जाना है ‘सागर पार’
बीच हमारे सात रे सागर कैसे चलूँ ‘उस पार’?
- ‘तू प्यार का सागर है’मध्ये,
इधर झूमके गाये जिंदगी ‘उधर’ है मौत खड़ी
कोई क्या जाने कहाँ हैं ‘सीमा’ उलझन आन पड़ी।
 
असा त्या सीमारेषेचा उल्लेख आहे. नेमका कधी मृत्यूचा क्षण येणार? या जगाची ‘सीमा ‘कुठे संपते आणि ‘त्या’ जगाची हद्द कुठे सुरू होते? कुठला तो नेमका क्षण? ही ‘उलझन’, हे गूढ कायम राहणार! हाच ‘सीमा’ हा शब्द, ‘रुक जा रात’ या गाण्यातही आलाय.
 
 
जीवन ‘सीमा’ के आगे भी आउँगी मैं संग तुम्हारे!
किती सुंदर हा दिलासा! ‘सजन रे झूठ मत बोलो’मध्येसुद्धा ‘तुम्हारे महल चौबारे ‘यही’ रह जाएंगे सारे’ असं बजावलंय.
प्रासयुक्त, छंदयुक्त भाषेचं सौंदर्य शैलेंद्रच्या काव्यात ठायी ठायी दिसतं.
‘भूली बिसरी’ यादें मेरे ‘हँसते गाते’ बचपन की,
‘रात बिरात’ चली आती है नींद चुराने नैननकी!
‘भूली बिसरी’, ‘रात बिरात’, ‘हँसते गाते’ हे सगळे शब्द बोली भाषेतले, नादमधुर! ‘हरियाला सावन ढोल बजाता आया’मध्येही अनुप्रासाची लयलूट आहे आणि त्याही पलीकडे जाणारा शब्दार्थांचा खेळ आहे.
हरियाला सावन ढोल बजाता आया
धूम तक तक मनके मोर नचाता आया
मिट्टी में जान जगाता आया!
 
 
सगळीकडे एक उत्साहाचा विलक्षण झोत आहे. आनंदविभोर चेहरे.. ’चला, उठा, कामाला लागा’ असं एकमेकांना बजावणारे! आता काळजीपूर्वक ऐका -
 
 
एक अगन बुझी
एक अगन लगी..
मन मगन हुआ
एक लगन लगी...
 
 
हा फक्त यमक-प्रासाचा खेळ नाही, यात खूप खोल अर्थ आहे. हा पाऊस मातीत चैतन्य घेऊन आलेला. धरतीच्या काळजात पेटली होती ती आग विझवणारा, पण त्याचबरोबर ज्याच्यावर राख जमू बघत होती, तो आतला निखारा फुलवणारासुद्धा! म्हणून, ‘एक अगन‘ ‘बुझी’, ’एक अगन‘ ’लगी’!.. कष्टकरी बाईच्या पायातल्या, तिच्या कष्टाचे साक्षीदार असलेल्या, उन्हातान्हातली वणवण तिच्या जोडीने सहन केलेल्या ठसठशीत पैजणांचा नाद आहे या शब्दांना.पुढच्या कष्टांची, सुगीची अनोखी धून लागलीय, त्या डोळ्यात आता अपार स्वप्नं आहेत. ‘ऐसे बीज बिछा रे, सुख चैन उगे दुख दर्द मिटे।’ - या ओल्या मातीत सुखाचं बी पेरू या, सगळ्या चिंता कटकटी गाडून नवीन हिरवंगार शेत फुलवू या. प्रत्येकाच्या डोळ्यात ते हिरवंगार तृणपातं डोलतंय. ‘नैनोंमे नाचे रे सपनोंका धान हरा।’ त्यांच्या उपमासुद्धा शेतातल्या, त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या! त्या डोळ्यांनी नेहमी हिरवाईचीच स्वप्नं पाहिलीयत, मग डोळ्यात तो लसलसता हिरवा कोंबच स्वप्न बनून येणार!
 
 
vivek
 
 
या एका गाण्यात आपण त्या शंभू महातोच्या आयुष्यात गुंतून जातो. गाण्याचा वेग, तो पहिल्या पावसाचा थरार घेऊन येतो. मरगळ झटकून झडझडून कामाला लागावं हा फील हे गाणं इतक्या सहजतेने देतं.
 
 
काही छंद शैलेंद्रच्या शैलीला फार साजून दिसले. उदा., हा केरवा तालाचा छंद -
 
 
‘टूटे हुए ख्वाबों ने’, ‘ये शाम की तन्हाइयाँ’ अशा अनेक गाण्यांत हा छंद वापरलाय. रूपक तालही उत्तम हाताळला शैलेंद्रने. ‘ओ बसंती’, ‘अपनी तो हर आह’ अशी अनेक गाणी रूपकमध्ये सजली. ‘दिल की गिरह खोल दो’, ‘दोस्त दोस्त ना रहा’ ही सगळी दादर्‍याच्या ठेक्यात बहरली आणि एका वेगळ्या वजनात लिहिलेली ‘आवारा ए मेरे दिल’, ‘आ अब लौट चले’ हीसुद्धा गाणी गाजली. विविध ठेके, छंद, एक दिशा दाखवतात आणि मग स्फुरलेले विचार त्या वजनात बसवणं कठीण जात नाही, असं शैलेंद्र म्हणत असे, म्हणूनच चालीवर लिहायला त्याची ना नसे.
 
 
शैलेंद्रच्या काव्यात एक वेगळाच तोल सांभाळलेला दिसतो. ‘ए मेरे दिल कही और चल’, ‘अंधे जहान के’, ‘दोस्त दोस्त ना रहा’ अशा काही रचनांमध्ये विरक्त भाव आढळतो, पण त्याच वेळी ‘जिंदगी ख्वाब है था हमे भी पता, पर हमे जिंदगी से बहोत प्यार था, जब ग़म का अंधेरा घिर आए समझो के सवेरा दूर नहीं’ अशा काव्यातून जगण्याची असोशीही दिसते. हा एक रसरशीत जाणिवांचा कवी होता. ‘स्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा’ म्हणणार्‍या बोरकरांशी हे विचार जुळत होते.
 
 
 
शैलेंद्रच्या काव्यात पौराणिक संदर्भ/परंपरा यांचे उल्लेखही अतिशय सहजपणे येतात. ‘ओ बसंती पवन पागल’मध्ये ‘बन के पत्थर हम पड़े’ ते ‘सूनी सूनी राह मे, जी उठे हम जब से तेरी बाह आयी बाह मे’ असं लिहिताना अहल्येचा किती सूचक संदर्भ आला! ‘आवारा’मध्ये ‘पतिव्रता सीतामाई को तूने दिया वनवास’ असा रामायणाचा संदर्भ, ‘मेहमान जो हमारा होता है। वो जान से प्यारा होता है’ असा आपल्या संस्कृतीचा भाग असलेली, अतिथी देवो भव ही परंपरा दाखवणं, ‘होंटों पे सच्चाई रहती है’ असा उल्लेख करणं! शैलेंद्रची भारतीय संस्कृतीच्या अभ्यासावरची पकडही घट्ट होती. आपण आपले श्वास मोजून घेऊन आलो आहोत, हीसुद्धा भारतीय दर्शनशास्त्रातली कल्पना. ती ‘करूँगी मैं क्या चंद साँसे बचाकर, दुआ कर गमे दिल!’ या गाण्यात डोकावते. ‘आगाज के दिन तेरा अंजाम तय हो चुका’ - (अंधे जहाँ के अंधे रास्ते) हा तर फार मोठ्या पातळीवरचा विचार आहे. ‘आगाज’ म्हणजे सुरुवात. सुरुवातीच्या क्षणीच शेवटचा क्षण ठरलाय! आपल्याला जी सुरुवात वाटत असते, ते शेवटाकडे नेणारं पहिलं पाऊल असतं. एक एक क्षणी आपलं आयुष्य कमी होत असतं. ‘ए गम के मारों मंजिल वही है दम ये टूटे जहाँ।’ - जिथे शेवटचा श्वास घेतला, तिलाच ‘मंजिल’म्हणावं लागतं शेवटी.. आपल्या स्वप्नातलं ते अंतिम ठिकाण नसलं, तरी!
 
 
vivek
 
शैलेंद्रच्या काव्यात हळवेपणा, प्रणयरंग जागोजागी उत्कटतेने उमटताना दिसतात. ‘क्या करूं.. सामाजिक विषमता से घायल हूँ, लेकिन हूँ तो मूलत: प्रेम प्रकृती और संगीत का कवि!’ असं शैलेंद्र म्हणत असे. त्याचं प्रेमगीतसुद्धा एका दैवी पातळीवर नेण्यात त्याला रस आहे. ‘रातें दसों दिशाओं से कहेगी अपनी कहानियाँ’, ‘मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का..’ यात ही वृत्ती दिसते.
 
 
 
काही गाण्यांत मात्र थोडी धिटाईची प्रणय अभिव्यक्तीही दिसते. ‘तडप ये दिन रात की। कसक ये बिन बात की’ आणि ‘तुम्हें याद करते करते’ यामधला प्रणय थोडा शारीर आहे. ‘प्रेम’ हे शैलेंद्रसाठी फार उच्च दर्जाचं स्त्री-पुरुष नातं घेऊन येतं. दिल अपना और प्रीत पराईमधली गाणी याचं उत्तम उदाहरण आहेत. ‘अजीब दास्तान है ये’मध्ये रोशनी, चिराग आणि धुंवा ही परस्परविरोधी प्रतीकं वापरताना प्रत्येक सुखाला एक काजळी बाजू असते, हे शैलेंद्र सांगून जातो. या गाण्यातच एकूण विरोधी उपमांचं सौंदर्य आहे, ‘किसीके इतने पास हो के सबसे दूर हो गये।’ इथे ‘पास’ आणि ‘दूर‘ असा विरोधाभास काळजाला भिडतो.
 
 
 
या गाण्यातलं ‘अजीब दास्तान’ हे एक प्रतीक पुढेही चालवलं आहे. ‘अंदाज मेरा मस्ताना’मध्ये एका क्षणी नजरानजर होते..त्या वेळी ‘मेरे तेरे प्यार की ये क्या अजीब दास्ता है?’ ही ओळ पार्श्वभूमीवर ऐकू येते. असंच, अनाडीमध्ये, ‘चंद्र’ हे प्रतीक सगळ्या गाण्यांत विकसित केलंय. ‘वो ‘चाँद’ खिला’, - ‘हम खो चले ‘चाँद’ है या कोई जादूगर है’ - ‘जब जब ‘चंदा’ आएगा..’ जणू त्या कथेचा अविभाज्य भाग आहे ‘चंद्र’!
 
 
 
चालीवर लिहिताना काही वेळा शब्द तुटले, विशेषत: सलीलदांच्या गाण्यात असं झालं, पण रसहानी झाली नाही. याचं कारण, आशय मजबूत होता. स्वत:च्या प्रतिभेवर शैलेंद्रचा विश्वास होता. लोकांच्या अभिरुचीवर खापर फोडण्यापेक्षा आपण त्यांना उत्तम काव्यमूल्य असलेली गाणी देऊ या, ती देण्याची क्षमता नसलेले लोकच असे आरोप करतात असं त्याचं म्हणणं होतं. हा दृष्टीकोन अनेक गाण्यांत दिसून येतो, मग प्रेमगीत असो की क्रांतिगीत असो.
 
 
कविराज कहे न ये ताज रहे, ना ये राज रहे
न ये राजघराना
प्रीत और प्रीत का गीत रहे,
कभी लूट ना सका कोई ये खजाना!
 
 
 
असं लिहिताना त्याच्यासमोर आदर्शवाद होताच. भाबडेपणा, सच्चाई या मूल्यांबद्दल, त्याच्या प्रतिमांबद्दल त्याला विलक्षण प्रेम वाटतं. शैलेंद्र आणि राज कपूर यांनी एक प्रतिमा घडवली, अशा माणसाची, जो खरा होता, त्याचं देशावर प्रेम होतं, तो नीतिमूल्यं सांभाळणारा होता. क्वचित त्याच्या रस्त्यावरून तो भरकटला, तरी पुन्हा त्याची प्रेयसी त्याला सन्मार्गावर आणू शकत होती. स्वातंत्र्यानंतर जे अनेक भ्रमनिरास झाले, त्यातून सामान्य माणसाला दिलासा देणारा हा नायक होता, हे निश्चित.
 
 
शैलेंद्रच्या कारकिर्दीची सुरुवात शंकर-जयकिशनपासून झाली. ‘पतली कमर है तिरछी नजर है’ हे पहिलंच गाणं वेगळ्या प्रकारचं होतं. अनाडीमधली गाणीही गाजली. त्यात सर्वात अर्थपूर्ण गाणं होतं ते ‘किसीकी मुस्कुराहटों पे हो निसार’!
 
 
शैलेंद्र किती सहज लिहून गेला, ‘मिटे जो प्यार के लिये वो जिंदगी!..’ आपल्या मृत्यूनंतर आपली कुणाला तरी हळवी सय येईल.. काळीज दुखेल.. डोळ्यापुढे धुकं धुकं होईल.. मग त्याच्या आसवांमध्ये आपण हसरा आनंद घेऊन येऊ.. यालाच ‘जगणं’ म्हणावं! नाहीतर जन्माला आल्यापासून श्वास घेत राहिलेले, मेले नाहीत म्हणून जिवंत असलेलेच कितीतरी महाभाग असतातच की!
 
 

vivek
 
 
अनाडीमध्येच, ‘सब कुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी, सच है दुनियावालो के हम है अनाडी’ हे गाणं राज कपूरची प्रतिमा ठळक करणारं ठरलं. सगळं शिकलो जगात, पण वागण्यातले डावपेच समजले नाहीतच की! ज्या एका तार्‍याकडे प्राणांची दिठी लावली, तोच निखळला. शैलेंद्रला या व्यथेची नेमकी ठसठसणारी जखम अंतर्बाह्य जाणवलीय.. त्याशिवाय हे लिहिणं शक्य नाही. काय प्रवाह आहे भाषेला! किती सहज व्यक्त होणं. ना कसली अवघड रूपकं, न सूचकता. चित्रपटातल्या त्या राजकुमारच्या स्वभावासारखं सरळ कैफियत मांडणं!
 
 
कमी शब्दांतही दाहकता आणता येते, हे शैलेंद्रला उमगलं होतं. ‘ते...रा...जा...ना’ हा चार अक्षरी मुखडा. त्या चार अक्षरात दु:ख सामावलेलं आहे. एसजे आणि शैलेंद्र यांना खात्री होती की चार अक्षरात ती वेदना मांडता येईल.
 
 
मै रो कर रह जाऊंगी,
दिल जब जिद पर आयेगा,
दिल को कौन मनायेगा?
 
 
शैलेंद्र इथे एक अद्भुत किमया करून जातो. ‘स्व’ आणि ‘मन’ यांची इथे फारकत झालेली दिसते. मी आता परिस्थितीपुढे शरणागती पत्करली असं क्षणभर मानू, पण माझं मन? त्याला नाही समजत या व्यावहारिक गोष्टी!
 
 
‘तू प्यार का सागर है’ या सीमामधल्या गाण्यात तर नूतनच्या मनातला भावनिक कल्लोळ अक्षरश: जिवंत झालाय शैलेंद्रच्या शब्दांतून!
 
 
घायल मन का पागल पंछी उड़ने को बेकरार
पंख है कोमल आँख है धुंधली जाना है सागर पार!
 
 
डोळ्यापुढे धुकं धुकं आणि आव्हानं मात्र कठोर. आयुष्याचं गणित नेमकं केव्हा कुठे चुकलं? नेमक्या कुठल्या क्षणी रस्ता हरवला? दिशा सापडेनाशी झाली? मनातल्या संघर्षाशी झगडणारी नूतन या शब्दांनी साकारली. एकाच चित्रपटातल्या दोन गाण्यांत एक अत्यंत वेगळ्या प्रकारचा संवाद श्री 420मध्ये शैलेंद्रने साधलाय. ‘मुडमुडके ना देख’ या मायाच्या गाण्याला, विद्याने कळवळून मारलेल्या हाकेने उत्तर दिले ते ‘ओ जाने वाले मुडके जरा देखते जाना’ या गाण्यात. संगीतकारांनीही खास स्वरयोजना करून शैलेंद्रच्या शब्दांना झळाळी दिली. ‘अंधे जहाँ के अंधे रास्ते’मध्ये ‘रास्ते’च्या शेवटच्या अक्षराला अचानक तोडणं ही एसजेची कमाल.
 
 
Our sweetest songs are those that tell about saddest thoughts हा विचार शैलेंद्रने स्वत:च्या शैलीत सुरेख मांडला तो, ‘है सबसे मधुर वो गीत जिन्हे’ या गाण्यात. ‘मेरे मन के दिए’मधल्या अस्फुट भावना, धूसर चाल, दबके उच्चार या सगळ्यांनी शैलेंद्रच्या काव्याला चार चाँद लावले.
 
 
 
सलीलदांचं ‘मौसम बीता जाए’ म्हणजे तर एक दिव्य अनुभूती.इथे या सिच्युएशनसाठी निव्वळ शेतकर्‍यांसाठीचं एखादं गाणं लिहिता आलं असतं. पण इथेही एक व्यापक दृष्टीकोन ठेवतो शैलेंद्र. ‘अपनी कहानी छोड जा’ हे प्रत्येक मानवासाठी महत्त्वाचं असू शकतं. ‘इथे’ पुन्हा कधी येशील माहीत नाही. ‘कौन कहे इस ओर तू फिर आये ना आये..’ हे आपलं खेडं सोडून जाणार्‍या शंभू महातोलाही लागू आहे आणि कधीतरी हे जग सोडावं लागणार्‍या आपल्यालाही. ‘धरती कहे पुकार के बीज बिछाले प्यार के।’ - पेरून जाऊ या प्रेमाची बीजं. कधी तरी कुठे तरी उगवतीलच.. तीच तुझी याद असेल, तुझी निशाणी असेल..! कुठल्या कुठे नेतं हे गाणं!
 
 
शैलेंद्रने अनंत वेळा चालीवर गाणी लिहिली. पण एकाही स्वरावर ठहराव नसताना मीटरप्रमाणे अर्थपूर्ण लिहिणं सोपं नाही. याचं उत्तम उदाहरण आहे ‘आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिये’!
 
 
 
‘बंदिनी’साठी गाणी लिहिताना शैलेंद्रच्या लेखणीला प्रादेशिक भाषेच्या लहेजाची आगळी धार होती. प्रत्येक शब्द त्याने पारखून घेतलाय. अनेक ‘कैदी’ स्त्रियांच्या मनातल्या वेदना व्यक्त झाल्या त्या ‘ओ पंछी प्यारे। सांझ सकारे। बोले तू कौनसी बोली?’ या गाण्यातून. ‘चुप चुप देखू’ हे तर स्त्रीच्या निरंतर मुस्कटदाबीचंच वर्णन. बाहेर वसंत फुलला काय किंवा मनात भावनांची होळी झाली काय.. सगळं मुकाटच बघायचंय! शैलेंद्रच्या लेखणीतून अक्षरं नव्हे, त्या स्त्रियांचे अश्रू झरतात.
 
 
 
याच चित्रपटातलं ‘जोगी जबसे तू आया मेरे द्वारे’ अतिशय अभ्यासनीय, कारण यातले शब्द, कल्याणी या नायिकेच्या कौटुंबिक पार्श्वभूमीला साजेसे निवडलेत.
 
 
मीठी मीठी अगन ये सह न सकूंगी
मै तो ‘छुईमुई’ अबला रे.
मेरे और ‘निकट’ मत आ रे...!
 
 
प्रणयाची किंचितशी धगही सहन होणार नाही असं सांगणारी ही अबोल नायिका! कल्याणीची पार्श्वभूमी शैलेंद्रचे शब्द किती छान दाखवतात. वैष्णव कवितेवर प्रेम करणार्‍या वडिलांच्या संस्कारात वाढलेली कल्याणी ‘निकट’ म्हणेल, ’करीब’ म्हणणार नाही.. तसंच, बिन ‘जल’ लिये चली आऊं हे किती सहज येतं. ’पानी’ न म्हणता, ‘जल’ म्हणेल. व्यक्तिरेखेचा किती बारकाईने विचार गीतकाराने करायचा असतो, त्याचं हे उत्तम उदाहरण.
 
 
‘मेरे साजन है उस पार’ लिहिताना शैलेंद्रचे लाडके दृष्टान्त त्याने वापरलेत. या काठावरून त्या काठावर जाणं. जणू दोन वेगळी विश्वं.. ऐलतीर आणि पैलतीर यासुद्धा किती सापेक्ष संकल्पना असाव्यात? ज्याला आपण ऐलतीर म्हणतो, तो त्या पलीकडच्या बाजूला असणार्‍यांसाठी पैलतीर!
 
 
 
‘गाइड’साठी गाणी लिहिताना दुखावलेला प्रियकर, बंधनं झुगारून देऊन राजूच्या प्रेमात पडलेली, स्वत:ची कला शोधायला निघालेली रोझी या व्यामिश्र व्यक्तिरेखांच्या मनाचा उत्कट वेध शैलेंद्रने घेतला. ‘दिन ढल जाये हाये ‘रात’ न जाय’ म्हणजे मुकुटमणी आहे गाइडच्या गाण्यांचा! ‘तू तो न आये तेरी याद सताये’ म्हणजे काय? तू आहेस आत्ताही.. पण ‘ती’ नाहीस, जी ‘तेव्हा’ होती.. मला प्रतीक्षा ‘तिची’ आहे. तेरी याद, तेव्हाचे ते भारलेले क्षण, एकमेकांना सुखात ठेवण्याची ती धडपड, तुझ्यात पाहिलेली स्वप्नं.. सगळं आठवतं.
 
 
अशीच पावसाळी रात्र होती.. ‘ऐसेही रिमझिम, ऐसी फुहारे, ऐसेही थी बरसात। खुद से जुदा और जग से पराये’ असे आपण दोघे होतो. इथे एका घटनेच्या तरल छटा दाखवणारे तीन वेगळे शब्द शैलेंद्र वापरतो. ही कमाल आहे. आधी ‘रिमझिम’, मग ‘फुहारें’ आणि शेवटी ‘बरसात!‘ प्रेमाच्या, निकट येण्याच्या या पायर्‍या या शब्दांतून किती नेमक्या व्यक्त केल्या शैलेंद्रने! अन्यथा सामान्यांसाठी ‘पाऊस’ हा एकच शब्द असतो. इथे तीन वेगळ्या शब्दांत पावसाचा आणि प्रेमाचा प्रवास दिसतो.
 
पं. रविशंकर यांच्या अभिजात संगीताने नटलेल्या ‘अनुराधा’साठी शैलेंद्रनेच गाणी लिहिली होती. मनातला कल्लोळ अनुराधाने कसा सांगावा? तर
 
 
हाये रे वो दिन क्यू न आये?
 
 
‘वो दिन!’ जेव्हा तार्‍यांनी चमचमणारं आकाश आपलं दोघांचं होतं. आणि आता? कुठे गेले ते तारे? ’सूनी मेरी बीना संगीत बिना।’ काय करू ही बेसुरी गात्रवीणा घेऊन?
 
 
‘झिलमिल वो तारे, कहाँ गये सारे?’ हे आक्रंदन आहे एका कलासक्त मनाचं. ‘मन बाती जले, बुझ जाये।’ हा जो ‘जले’नंतरचा र्रिीीश आहे, तो फार फार महत्त्वाचा. तिथे गाणं थबकतं. एक प्रश्न, कैफियत मांडतं. कारण तो ठहराव प्रश्नार्थक आहे. सलीलदांसारख्या महान संगीतकारांच्या स्वरावली, वापरलेले खास राग, मुश्कील जागा-हरकती यामुळे शैलेंद्रची प्रतिभा उजळून निघाली.
 
 
 
‘तीसरी कसम’ हा चित्रपट म्हणजे शैलेंद्रचं उराशी जपलेलं एक स्वप्न होतं. जिवाची बाजी लावून हा चित्रपट त्याने पूर्ण केला. पण तो कर्जबाजारी झाला. या दुनियेतली ‘होशियारी’ त्याला जमली नाही. डावपेच, लबाडी या ‘गुणांचा’ स्पर्श न झाल्याने ‘अनाडी’च राहिला तो! 14 डिसेंबर 1966 या दिवशी शैलेंद्रने या जगाचा निरोप घेतला. ’हमे जिंदगी से बहोत प्यार था’ असं म्हणणारा शैलेंद्र हे रसरसून जगणं सोडून गेला, अर्थात त्याचं लखलखीत काव्य, उत्कट प्रणय, जहाल विद्रोह आणि खास हिंदुस्तानी परंपरेशी नातं सांगणारी काव्यमुद्रा काळाच्या पटलावर कोरूनच! आजही आपण त्या काव्याने अंतर्बाह्य थरारतो आहोत, याचाच अर्थ त्याने स्वत:चे बोल खरे केले आहेत. शैलेंद्र कायम राहणारच आपल्याला व्यापून!
 
 
जी चाहे जब हमको आवाज दो, हम है वही, हम थे जहाँ।
संदर्भ -
 
 
• गीतयात्री - माधव मोहोळकर
 
• सुहाना सफर और - विजय पाडळकर
 
• रहें ना रहें हम - डॉ. मृदुला दाढे जोशी
 
 
• लोकसत्ता सदर - अफसाना लिख रही हूँ - डॉ. मृदुला दाढे जोशी