@रागिणी चंद्रात्रे
‘द ग्रेट इंडियन किचन’ हा चित्रपट अवास्तव वाटतो, असा आक्षेप अनेक जण या चित्रपटावर घेताना दिसतात. पण अनेक घरांत आजही आमच्या बायका, सुना खूप शिकलेल्या आहेत पण कोणालाही आम्ही घराबाहेर पडू दिले नाही, असे अभिमानाने सांगितले जाते. यंत्र वापरायला आवडत नाहीत. पापड, लोणची, मसाले हे पदार्थ बाजारातून आणलेले आवडत नाहीत, असेही सांगितले जाते. भारतातल्या सर्वच जाती-धर्मांमध्ये स्त्रियांना घरकामाचा असा अतिरिक्त ताण सोसावा लागतो.
आपल्याकडे घरातील सुनेने कोणतीही नवीन गोष्ट - उदा., पुढचे शिक्षण घेणे, नोकरी करणे इ., करायचा विचार केला तर तिने घरचे ‘घरपण’ टिकवून काहीही करावे, त्याला आमची काहीही हरकत नाही असे उत्तर सर्वसाधारणपणे कुटुंबातील वडीलधार्यांकडून दिले जाते. घराचे ‘घरपण’ टिकवण्यासाठी कराव्या लागणार्या कामांची यादी न संपणारी असते. त्यामुळे सुनेने बाहेर पडून फार काही करायच्या फंदात पडू नये, असा सुप्त संकेतच या उत्तरातून दिलेला दिसतो. घरपण टिकवायचे म्हणजे नेमके काय? तर एखादे घर सुचारूपणे चालण्यासाठी घराची स्वच्छता, वयोवृद्धांची काळजी, शिशूपासून ते वृद्ध आजीआजोबा यांना पचणारा, रुचणारा स्वयंपाक बनवणे, पाहुण्यांचे आदरातिथ्य, आजारपण, सणवार, उत्सव या सर्वाचे नियोजन.
घरात राहतात सगळे, घराची उबदार सावली घेतात सगळे, पण घरपण टिकवणे म्हणजे हे सगळे करणे ही जबाबदारी स्त्रियांचीच, असे नुसते मानणारे नाही, तर असेच असते असा ठाम विश्वास ठेवणार्यांची आपल्याकडे कमतरता नाही.
हे सगळे आत्ता आठवायचे कारण म्हणजे ‘द ग्रेट इंडियन किचन’ हा Jeo Baby लिखित-दिग्दर्शित मल्याळी चित्रपट!
चित्रपटात नवीन काय आहे? तर काही नाही, शतकानुशतके स्त्रिया घरात जे करतात त्याचे दर्शन चित्रपटात घडते. पण ते चित्रण अतिशय प्रत्ययकारक पद्धतीने केलेले आहे. पुरुषांइतक्याच क्षमतावान असून, शिकलेल्या असूनही स्त्रियांच्या वाट्याला हा सारा घरकामाचा भार का? या विचाराने मन पुन्हा एकदा आक्रंदून उठते.
चित्रपटाची नायिका एक नृत्यविशारद तरुणी आहे, आखाती देशामधून आपले शिक्षण पूर्ण करून ती केरळमध्ये स्वगृही परतली आहे. समाजशास्त्राचा प्राध्यापक असलेला मुलगा तिला पाहायला आलेला आहे. दाखवण्याचा कार्यक्रम होतो, जुजबी बोलणे होते. दोन अनोळखी व्यक्ती काय बोलणार, असे प्राध्यापक मुलगा म्हणतो. घराची माणसे दोघांना बोलायला सांगतात, पण दोघांना कळेल अशा पद्धतीने पहारा ठेवतात. थोडक्यात, दोघांना बोलण्याची संधी दिली या गोष्टीवर टिकमार्क करतात.
विवाह होतो. सासरचे घर अगदी जुन्या पद्धतीचे आहे. सासू-सासरे व नवपरिणित पती-पत्नी अशी चारच माणसे घरात आहेत.
घरात आल्यापासून सासू व नायिका सतत भाज्या चिरतात, नारळ खोवतात, पाट्यावर वाटतात, ढणढण पेटलेल्या चुलीवर भात शिजवतात, डोसा, सांबार, चटण्या बनवतात, मागचे आवरतात. घरात कामाला कोणी मदतनीस नाही.
तरुण मुलीच्या मनाला सुखावणारा कोणताही चेंज जीवनात नाही. जेवताना होणार्या गप्पा, हास्यविनोद नाहीत. एखादा पदार्थ मस्त जमल्याचे कौतुकोद्गार नाही, सगळा यांत्रिक कारभार. घरच्या कामात मदत दूर, निदान आपल्या ताटातील उष्टे खरकटे दुसर्याला किळसवाणे वाटू नये याची काळजी नाही. निष्काळजीपणे ते ताटाबाहेर टाकून सतत या दोन स्त्रियांनी ते हाताने उचलणे, आवरणे, उष्टी भांडी घासणे हे पाहून अक्षरशः वीट येतो. घरातील सासू द्विपदवीधर आहे, पण ती नवर्याला पेस्ट लावून ब्रश हातात देते, बाहेर जाताना जोडे त्यांच्यापुढे आणून ठेवते. जो ही सर्व सेवा घेतो, त्या सासर्याला काहीच काम नाही. तो निवांत आहे. नवपरिणित वधूचा नवराही निवांत आहे. सकाळी आरामात उठून योगासने करतो व जेवून कॉलेजला जातो.
मुलीच्या बाळंतपणासाठी सासू परगावी जाते व या नव्या नवरीवर सर्व कामाचा भार पडतो. सासरा मिक्सरवरची चटणी, कुकरचा भात, वॉशिंग मशीनमध्ये धुतले जाणारे कपडे काहीच चालवून घ्यायला तयार नाही. त्यातच नव्या सुनेला नृत्यशिक्षिकेच्या पदाची offer येते, त्या वेळी सासरा मोठ्या अभिमानाने हे सांगतो की “आपल्या घरात स्त्रिया बाहेर पडत नाहीत. माझी बायको बघा double graduate आहे, पण मी तिला नोकरी करू दिली नाही, माझ्या वडिलांचेच मी ऐकले. घरात राहणार्या स्त्रियाच ‘पवित्र’ असतात.”
नवराही सासर्यांची री ओढतो आणि सध्या application करू नकोस असे सांगतो. नायिका परगावी असलेल्या सासूला फोन करते, त्यावर सासू “कोणाला काही न सांगता application करून ठेव” असे सांगते.
नायिका टेबल मॅनर्सवरून नवर्याला काही सांगू पाहते, तर तो तिच्यावर रागावतो. तिलाच माफी मागायला लावून सारखे त्यावरून टोमणे मारत राहतो.
नवपरिणित जीवनात कामक्रीडेबद्दल सुचवणार्या पत्नीला तो तुसडेपणे उत्तर देतो व तुला या क्षेत्रातील बरीच माहिती आहे असे सुनवतो. नायिकेची पाळी असताना मोलकरिणीला बोलावून सारी कामे करून घेतली जातात, पण इतर वेळी मोलकरिणीचे साहाय्य घरात घेतले जात नाही.
त्यानंतर शबरीमलाला जाण्यासाठी अय्यप्पाची आराधना घरात सुरू होते व नायिकेची सावली, तिचा स्पर्श नवर्याला नकोसा होतो. शबरीमला मंदिरात स्त्रियांना प्रवेश मिळावा असे मत मांडणारी पोस्ट नायिका share करते, यावरून घरात वादंग उभा राहतो व या घरात राहायचे असेल तर ही पोस्ट काढून टाक, असे नवरा बजावतो.
यातून नायिका घराला अधिकच दुरावत जाते.
पत्नीचा स्पर्श व तिची सावली नाकारणारा नवरा तिच्या हातचे जेवतो, येणार्या-जाणार्यांसाठी सारखी चहाची ऑर्डर सोडत राहतो, तेव्हा नायिकेचा संयम संपतो व घरातले साठलेले सांडपाणी सासर्याच्या व नवर्याच्या अंगावर फेकून ती घर सोडते व आपल्या आवडीच्या नृत्य शिकवण्याच्या कामाला सुरुवात करते.
घरातील सर्वच कामांच्या बाबतीत ती स्त्रियांची जबाबदारी असे आजही समाजातील अनेक कुटुंबांतील सदस्यांचा घट्ट समज असल्याचे दिसून येते. स्त्रिया शिकू लागल्या, कमवू लागल्या, बाहेर पडू लागल्या तरी वरील समजामध्ये फारसा बदल झालेला दिसून येत नाही. स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी कुटुंब तर हवे, घरही मांडायला हवे, घरातील सदस्यांच्या आरोग्यासाठी घरात स्वयंपाकही व्हायला हवा, पण जबाबदारी मात्र फक्त आईची, पत्नीची.. हा न्याय आता बदलायला हवा. घर सगळ्यांचे तसे घरातील कामही सर्वांचे! बाजारहाट करणे, भाजी चिरणे, घर स्वच्छ करणे, स्वच्छतागृहांची स्वच्छता करणे, कपड्यांच्या घड्या घालणे, स्वयंपाकाची तयारी व प्रत्यक्ष स्वयंपाक यातील अनेक कामांत घरातील सदस्य आपला वाटा उचलू शकतात. बाबांना, आजोबांना घरकाम करताना बघणारी मुले आपोआप या जबाबदार्या घेतील व तसा प्रयत्न घरातून व्हायला हवा.
घरातील कामांसाठी यंत्रे आलीत आणि म्हणून स्त्रियांची कामे आता फारच सोपी झालीत आणि असे म्हणताना कामे इतकी सोपी आहेत तर घरातील इतर सदस्यांनीही ती यंत्रे वापरून कामे करावीत, असे मात्र होताना दिसत नाही.
‘द ग्रेट इंडियन किचन’ हा चित्रपट अवास्तव वाटतो. आत्ताच्या काळात असे कुठे असते का? असा आक्षेप अनेक जण या चित्रपटावर घेताना दिसतात. पण अनेक घरांत आजही आमच्या बायका, सुना खूप शिकलेल्या आहेत पण कोणालाही आम्ही घराबाहेर पडू दिले नाही, असे अभिमानाने सांगितले जाते. यंत्र वापरायला आवडत नाहीत. पापड, लोणची, मसाले हे पदार्थ बाजारातून आणलेले आवडत नाहीत, असेही सांगितले जाते. भारतातल्या सर्वच जाती-धर्मांमध्ये स्त्रियांना घरकामाचा असा अतिरिक्त ताण सोसावा लागतो.
बरे, या घरकाम करणार्या स्त्रिया आजारी पडल्या किंवा चित्रपटात दाखवल्याप्रमाणे त्यांना पाळी आली, तरी त्यांना पर्याय म्हणून मोलकरिणीला किंवा नात्यातील इतर स्त्रियांनाच बोलावले जाते. घरातील पुरुष सदस्य स्वत:होऊन घरकामाचा कुठलाही वाटा उचलताना दिसत नाहीत.
स्वयंपाकघरात आधुनिक सोयी असणे, घरातील बिघडलेल्या वस्तू ताबडतोब दुरुस्त करून स्त्रियांच्या कष्टाबद्दल संवेदनशील असणे हेही करणे अतिशय आवश्यक आहे. अन्यथा आधीच एकटीला त्रासदायक असणारे स्वयंपाकघरातील काम अधिकच त्रासदायक होते.
माझी एक मैत्रीण उच्चपदावरून निवृत्त झाली. तिची नोकरी सुरू असताना तिला घरकामात थोडीफार मदत करणार्या अविवाहित मुलाने ती निवृत्त होताच तिला मदत करणे पूर्णपणे सोडून दिले. उलट जागेवर जेवण, पाणी तो मागू लागला. का? तर आता आईला कुठे नोकरीवर जावे लागते? मग केले तिने हे तर कुठे बिघडले? म्हणजे आईला मोकळा वेळ मिळूच नये? आईचा वेळ घरकामातच गेला पाहिजे. तिचा वेळ वाचनात किंवा तिचे छंद जोपासण्यात अधिक आनंदाने जाऊ शकतो असे शिक्षित मुलालाही वाटू नये, हे दुर्दैव! घरकाम करणे, स्वयंपाक करणे हा आनंदाचा भाग होऊ शकतो हा संस्कार लहानपणापासून कुटुंबात व्हायला हवा. ‘द ग्रेट इंडियन किचन’ चित्रपटात नायिका शेवटी घर सोडते. ती हा निर्णय घेऊ शकली, पण सगळ्या मुली हे करू शकणार नाहीत. अशा वेळी पिचलेल्या मनाने संसाराचा गाडा ओढत राहणे एवढेच त्यांच्या नशिबी येते. हे व्हायला नको असेल, तर विवाहाआधी जोडीदार निवडताना त्याच्याशी सविस्तर बोलणे होणे (चित्रपटात दाखवल्याप्रमाणे जुजबी नको) आवश्यक आहे. त्याच्या व आपल्या आवडीनिवडी जुळतात का? त्याचे घर कसे आहे? घरातील माणसे कशी आहेत? त्यांच्या नवीन सुनेविषयी अपेक्षा काय आहेत, सुनेने नोकरी करणे, घराबाहेर पडणे याविषयी त्यांची काय मते आहेत? होणारा नवरा पत्नीच्या भावभावनांचा विचार करेल का? निदान तो तिचे ऐकून घेतो का? हे बघणे फार फार आवश्यक आहे. एकमेकांची मेडिकल History जाणून घेणे, माझा होणारा नवरा निर्व्यसनी असावा असा आग्रह धरणे या सर्व गोष्टी ‘विवाहपूर्व समुपदेशन’ या क्षेत्रात येतात. प्रत्येक विवाहेच्छू तरुण-तरुणी, तसेच त्यांचे पालक यांनी याचा आग्रह लग्नापूर्वी धरला पाहिजे.
कोण्या एके काळी बाहेरची कामे पुरुषांनी व स्त्रियांनी घरातली कामे करून ही श्रमविभागणी केली असेल. पण आज जीवनाच्या सर्व क्षेत्रांत स्त्री गरुडभरारी घेत असतानाही स्त्रियांच्या खांद्यांवर सर्व गृहकृत्यांचा भार टाकणे हे अन्यायकारक ठरते. वर वर्णन केलेल्या उदाहरणांना शिक्षित तरुण पिढीत अपवाद नक्कीच आहेत. त्यांच्यामध्ये घरकाम, स्वयंपाक, अपत्यसंगोपन सर्वच गोष्टींत महत्त्वपूर्ण वाटा नक्कीच उचलला जातोय, याचे स्वागतही आहे. पण याचे प्रमाण बदलत्या कालानुरूप वाढले पाहिजे. ग्रामीण भाग, उत्तर भारतातली राज्ये या भागात आजही स्त्री तिच्या पारंपरिक भूमिकेतून मुक्त झालेली नाही. उलट ग्रामीण भागात शेतीची कामे, रोजंदारी, पाळीव गुरांची व्यवस्था, दूरवरून पाणी वाहून आणणे अशा जास्त जबाबदार्या घेऊन ती अफाट कष्ट करत आहे.
जेव्हा घरात आजारी वृद्ध सासू-सासरे, मुलांची दहावी/बारावी, सण, उत्सव असे प्रसंग येतात, तेव्हा नोकरी करणार्या, तसेच उच्चपदस्थ महिलांवरचा ताण अधिकच वाढतो व मग नाइलाजाने प्रमोशन नाकारणे, बदली नाकारणे इ. गोष्टी करून त्यांच्यावर करिअरवर पाणी सोडण्याची वेळ येते.
ज्या क्षेत्रात काम करताना अनिश्चित वेळेसाठी घराबाहेर राहावे लागते, अशी क्षेत्रे महिलांना इच्छा व क्षमता असूनही नाकारावी लागतात. उदा. राजकीय क्षेत्र - राजकारणात महिला किती? गाव, शहर, राज्य, देश पातळीवरची महिलांची राजकीय क्षेत्रातली आकडेवारी पाहिली, तर देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ती फारच अल्प आहे. कारण घरगुती जबाबदार्यांमुळे महिला ह्या क्षेत्रापासून, निर्णय प्रक्रियेपासून, पॉलिसी makingपासून दूर रहातात.
“देशात आता महिलांनी सरन्यायाधीशपदी काम करण्याची वेळ आली आहे, मात्र त्यामध्ये कॉलेजियमला अनेकदा अडचणींचा सामना करावा लागला आहे. कारण अनेक महिला वकिलांनी घरगुती जबाबदार्यांमुळे किंवा आपले अपत्य बारावीला शिकत असल्याचे कारण सांगून न्यायाधीशपद नाकारले आहे” अशी माहिती भारताचे सरन्यायाधीश शरदजी बोबडे यांनी कोर्टात दिली आहे. भारतात 1950पासून सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत एकूण 247 व्यक्तींनी न्यायाधीशपदावर कार्य केले आहे. त्यापैकी महिला न्यायाधीश फक्त 08 राहिलेल्या आहेत. अॅड. स्नेहा कालिता या सुप्रीम कोर्टाच्या लेडी लॉयर्स असोसिएशनच्या प्रवक्त्या, उच्च न्यायालयातील कामकाजात फक्त 11% महिला असल्याचे सांगतात. हे आकडे फक्त एका क्षेत्रातील उदाहरणादाखल दिले आहेत. सर्वच क्षेत्रांत स्त्री-पुरुष विषमतेचे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. भारतीय महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण 65.46% आहे, तर हेच प्रमाण पुरुषांमध्ये 80% आहे. कारण घरकामासाठी, भावंडांना सांभाळण्यासाठी, पाणी भरण्यासाठी मुलींच्या होणार्या शाळेतून गळतीचे प्रमाण प्राथमिक स्तरावर 4.74% तर माध्यमिक स्तरावर 17.4% इतके जास्त आहे. शिक्षिका, बँक कर्मचारी म्हणून काम करणार्या महिलांची संख्या खूप आहे असे वाटते, पण जसजशी उच्चपदाकडे वाटचाल सुरू होते, तसतशी महिलांची संख्या कमी होत जाते. म्हणून विद्यापीठाच्या कुलगुरू, संशोधक, बँक, पोलीस यातील उच्चपदस्थ महिलांची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात खूपच कमी आहे.
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वतीने दर वर्षी ‘ग्लोबल जेन्डर गॅप रिपोर्ट’ तयार केला जातो. यंदाचा हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून यात 156 देशांचा समावेश आहे. आर्थिक सहभाग आणि संधी, शैक्षणिक संधी, आरोग्य आणि जगण्याची क्षमता आणि राजकीय सक्षमता या बाबतीत स्त्री-पुरुषांमध्ये जी असमानता आहे, त्याची आकडेवारी हा अहवाल देतो. भारत या अहवालात 140व्या स्थानावर आहे. म्हणजेच वरील विषयात भारतातील जेंडर गॅप मोठी आहे. ही गॅप का आहे? याचे उत्तर मला वाटते Jeo Babyच्या ‘द ग्रेट इंडियन किचन’मध्ये सापडते. अशा विषम श्रमविभागणीला घेऊन आपण आधुनिक काळातील आव्हानांना समाज म्हणून सामोरे जाऊ शकत नाही.
कुटुंबात, शाळेत, समाजात लहानपणापासून मुलामुलींना लिंगभाव समानतेचे प्रशिक्षण देणे, कुटुंबात तशा प्रकारचे वातावरण ठेवणे, शाळा-महाविद्यालयातील अभ्यासक्रमात गृह व्यवस्थापनाचा अंतर्भाव करणे हेच कायमस्वरूपी उपाय ठरू शकतात.
raginee60@gmail.com