Enter your Email Address to subscribe to our newsletters
मोदींनी राष्ट्रीय सुरक्षेला निवडणुकांपेक्षा प्रथम प्राधान्य दिले
मुंबई : भारताच्या सीमा सुरक्षेवर इतका भर देणारे सरकार यापूर्वी कधीच झाले नव्हते. आज भारताच्या सीमा सर्वाधिक सुरक्षित झाल्या आहेत, त्या सक्षम लोकांच्या हाती आहेत. त्यामुळेच नरेंद्र मोदी हे लोकनेता ते विश्वनेता बनले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा अभ्यासक, लेखक नितीन गोखले यांनी मंगळवारी केले. साप्ताहिक विवेकच्या राष्ट्रजागरण व्याख्यानमालेत ते बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेशनीतीवर आधारित लोकनेता ते विश्वनेता हा ग्रंथ साप्ताहिक विवेकद्वारा प्रकाशित होत असून या ग्रंथाच्या प्रकाशनपूर्व नोंदणीस वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यानिमित्त आयोजित राष्ट्रजागरण व्याख्यानमाला (भाग २) या ऑनलाईन कार्यक्रमातील दुसऱ्या सत्रात नितीन गोखले 'संरक्षण क्षेत्रात मोदी सरकारची कामगिरी' या विषयावर आपले विचार मांडले. ते म्हणाले की, यापूर्वीच्या सरकारच्या काळात मुंबईवर २६/११ चा एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाला तरी भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले नव्हते. त्यावेळी भारतीय वायुसेनेने दहशतवादी तळांवर एअरस्ट्राईक करण्याची परवानगी मागितली असूनही आपण ती दिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली. सर्जिकल स्ट्राईक हा खूप धाडसी निर्णय होता. आपले सैनिक पकडले गेले असते अथवा धारातीर्थी पडले असते तर भारतात त्याचे राजकीय पडसाददेखील उमटले असते. निवडणुकांमध्येही मोदींना त्याचा फटका बसला असता. मात्र मोदींनी राष्ट्रीय सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिल्याचे गोखले म्हणाले. १९७१ चे युद्ध वगळता गेल्या सत्तर वर्षांत एवढा सडेतोड जवाब पाकिस्तानला भारताकडून कधीच मिळाला नव्हता, असेही त्यांनी नमूद केले.
पारदर्शकता, भारतीय कंपन्यांना प्राधान्य
भारताच्या संरक्षण धोरणातही मोदींनी महत्वपूर्ण बदल घडवून आणल्याचे गोखले यांनी नमूद केले. ‘वन रँक, वन पेन्शन’चा गेले ४५ वर्षे लटकत असलेला, राजकीयदृष्ट्या संवेदनशील निर्णय असूनही मोदींनी तो घेतला. तसेच, शस्त्रास्त्र खरेदी धोरणातही त्यांनी मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणले. यामुळे आज या धोरणात पारदर्शकता आली आहे. याशिवाय शस्त्रास्त्र खरेदीच्या बजेटपैकी ५० टक्के निधी हा भारतीय कंपन्यांसाठी राखून ठेवत शस्त्रास्त्र खरेदीतील प्रथम प्राधान्य हे भारतीय कंपन्यांना देण्यात येत आहे. यातून भारतातील लहानमोठ्या कंपन्यांना आत्मविश्वास मिळाला असून जागतिक स्पर्धेत त्या आत्मविश्वासाने उतरू शकत असल्याचे ते म्हणाले.