@प्रणव देशपांडे
आपण एक आहोत, आपला धर्म एक आहे. आपला राम एकच आहे. अशा भाषा, असे लोक, अशी मंदिरं जेव्हा मी पाहतो, तेव्हा मला इतर राज्यांतील लोक परके वाटत नाहीत. आपलेच वाटतात. एकटेपणा जाणवत नाही. कारण ‘हिंदू’ हाच आमचा परिचय आहे. अटलजींच्या खालील ओळी याला दुजोरा देतात -
मै एक बिन्दु, परिपूर्ण सिन्धु है यह मेरा हिन्दु समाज।
काही विषय आहेत, ज्यावर लिहायचं म्हणतोय खरं बरेच दिवस. वेळ मिळत नाही. पण आज एक गाणं कानावर पडलं, मग म्हटलं - आज लिहिताना जी उत्स्फूर्तता येईल, ती परत कधी येईल काय, याची खात्री नाही.
कोईम्बतूरच्या सर्वनमपट्टीत (पुण्यात कसं हिंजवडी आहे, तसं) असलेल्या ‘पेरुमल कोविल’समोरून जाताना लाउडस्पीकरवर एक गाणं ऐकू आलं. गाण्याचे बोल ‘विठुरायाचे नगरी पंढरी पंढरी!’ जरा दचकलोच! जिथं हिंदीला कुत्रंही विचारत नाही, बरेच लोक इंग्लिशही बोलत नाहीत, तिथं ‘माझिया मराठीचिये इतकी कौतुके?’
आमच्या राजधानीत - म्हणजे मुंबईत आणि पुण्यात ‘भैय्या कितनेको दिया’ असं म्हणण्यात धन्यता मानणाऱ्या कर्मदरिद्री लोकांची भाषा एका कट्टर तामिळभाषिक राज्यात ऐकू यावी, हे खरंच धक्कादायक आहे. पण हा धक्का सुखद की दुःखद हे सांगता येणं अवघड आहे. कारण तामिळनाडूमध्ये मराठी भजन ऐकू येणं हे जितकं आनंददायक आहे, तितकंच आमच्याच शहरात आम्हाला हिंदी बोलावी लागते हेही क्लेशकारक आहे.
असो, तर कोविल म्हणजे तामिळमध्ये मंदिर. पेरुमल हे विष्णूचं किंवा व्यंकटेशाचं तामिळ नाव आहे. बघा, त्यांनी नावंही आपल्या भाषेतली ठेवलीत. ‘अम्मन कोविल’ म्हणजे देवीचं किंवा आईचं मंदिर.
गेली अकरा वर्षं मी शिक्षणाच्या किंवा नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर आहे. भटक्या विमुक्त जातींमध्ये लवकरच माझी नोंद होणार आहे. याआधी कुठं कुठं राहिलो नाही! आंध्र प्रदेश, ओडिशा, ते आपलं कोकण आणि पुणे. एका गावठी, घाटी माणसासाठी कोकण आणि पुणे हे वेगळेच आहेत राव!
तरीही आजकाल जेव्हा मी झोपेतून उठतो, तेव्हा मला कळतं की मी कोईम्बतूरमध्ये आहे. क्षणभर वाटतं की हे एक स्वप्न आहे. मग मी विचार करतो की का आलो इथं? इथं लोक आपली भाषा बोलत नाहीत. हे आपलं राज्य नाही. थोड्या वेळाने भानावर येतो. अंघोळ करून ऑफिसला जायला निघतो. आठवड्याचे पाच दिवस हेच चक्र सुरू असतं.
मग शनिवारी पेरुमलच्या कोविलमध्ये जातो. तसा मी शिवभक्त आहे, त्यामुळे विष्णू, राम इत्यादीमध्ये रस नाही, पण त्याच देवळात बाजूला हनुमंत उभा आहे. त्याच्या आधी जबरदस्तीने पेरुमलाचं दर्शन होऊन जातं. मारुतीचं दर्शन घेऊन, कपाळी चंदन लावून प्रसाद म्हणून दिलेली तुळशीची पानं खात थोडा वेळ बसतो तिथं. त्या वेळी मी इथं का आलो असा विचार येत नाही. कारण तो विष्णू आणि तो मारुती माझ्या ओळखीचे वाटतात. हनुमान चालिसा आणि मारुती स्तोत्र म्हणतो. देवळातून बाहेर निघावंसं वाटत नाही. कारण इथं माझे म्हणून हे दोनच लोक मला माहीत आहेत. बाहेर निघतो, तेव्हा बाकीच्या भक्तांकडे लक्ष जातं आणि मग समजतं की हेसुद्धा लोक माझेच आहेत. त्यांची भाषा मला समजत नाही, एवढंच फक्त.
जर माझे आहेत, तर कोण आहेत हे लोक? यांचा माझा संबंध काय? यावर एकच शब्द सुचतो – ‘हिंदू!’
होय, हिंदूच! म्हणजेच भारतीय. तुम्ही देशाच्या कुठल्याही भागात जा. तुम्हाला मंदिरं दिसतील. कपाळावर गंध लावून भजन करणारे लोक दिसतील.
आध्यात्मिकता भारताच्या कणाकणात आहे. म्हणूनच हिमालयापासून ते इंदुसागरापर्यंत भाषा, जात, रंग, सामाजिक स्थानं वेगवेगळी असली, तरीही भारतीय एक आहेत.
तुम्ही पंढरीला, तिरुपतीला जा किंवा सबरीमलाला किंवा अमरनाथला जा, तुमचे सहयात्रेकरू तुम्हाला तुमचेच कुणीतरी वाटतील. तुम्हाला तुमचं राष्ट्रीयत्व अधिक चांगलं समजेल. भारत अधिक चांगला कळेल.
सावरकर, प्रबोधनकार ठाकरे इत्यादी महापुरुषांचे विचार थोडे वेगळे आहेत. पण मी त्यांच्याशी असहमत आहे. कारण भारतात आध्यात्मिकता नसती, तर भारत आज एकसंध नसता.
इथं जेव्हा जेव्हा आक्रमकांनी धर्मावर आघात केले, तेव्हाच स्थानिकांनी तलवारी हाती घेतल्या आणि प्रतिकार केला. छत्रपतींपासून मंगल पांडेंपर्यंत याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणूनच मुघलांनी केलेल्या चुका करायला इंग्रज धजत नव्हते, त्यामुळेच ते दीडशे वर्षं राज्य करू शकले.
आध्यात्मिकता ही ओसंडून वाहणाऱ्या एका नदीप्रमाणं आहे. ती अखंड आहे. श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या आधीपासून ती आहे. ती कुठंतरी संपते असं वाटत होतं, तोवर ऐश्वर्य त्यागून महावीर आणि बुद्ध आले. अख्खा भारत कैक वेळा 'पादाक्रांत' करून, केरळ ते हिमालय सनातन धर्माची पुन:स्थापना करणारे आदिशंकराचार्य आले. तुलसीदास, कबीर, त्यागराज, ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम, रोहिदास ते विवेकानंद आणि किती नावं घ्यावी तितकी कमी. हे सगळे लोकच काय ते गीतेत सांगितलेल्या वचनाचं प्रमाण आहे -
‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥‘
त्यागराज महाराजांचं एक तेलगू भजन आहे. त्याची लिंक इथं देत आहे. ऐका एकदा. भाषा समजणार नाही,
पण भाव समजला तर डोळ्यातून आपोआप पाणी येईल. चालही त्यांचीच आहे. https://youtu.be/FZbNu0t0HSs
कितीही आक्रमणांची आणि धर्मांतरांची वादळं झाली, तरीही भारतीय मनातील आध्यात्मिकता एका दिव्यातील वातीप्रमाणे अखंड तेवत आहे. तिचा कधीही वणवा झाला नाही किंवा ती कधी विझलीही नाही. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणत ती अग्निस्वरूप असूनही चिरंतन शांतिदायक आहे.
येशूदासांच्या,
रफीसाहेबांच्या आवाजातील भजन ऐकलं आणि ओडिशामधल्या एका मुसलमान कवीने जगन्नाथाला ‘
आहे निळा सईळ’
या भजनातून मारलेली हाक ऐकली की कळतं की हेही हिंदूच. या भजनाचं ओडिसी नृत्यप्रदर्शन बघा - https://youtu.be/fH7YbS3_s94
कुणी दांभिक पुरोगामित्वाचे कितीही ढोल बडवो आणि सत्य नाकारो, पण आध्यात्मिकता नसती तर भारत आज जसा आहे तसा नसता. सद्गुरू जग्गी वासुदेव एके ठिकाणी म्हणतात की “भारतात बहुसंख्य लोक गरीब असूनही श्रीमंत लोक सुरक्षित आहेत, याचं कारण इथली आध्यात्मिकता आहे.” मार्क्सवाद, ‘च्यावमाओ’ वगैरे हे सगळं लहान मुलांसाठी ठीक आहे, हजारो वर्षांचा इतिहास असणाऱ्या भारतासाठी नक्कीच योग्य नाही.
राहता राहिला प्रश्न हिंदू धर्मातील सुधारणांचा, तर त्याच्याबद्दल संवाद आणि चर्चा झाल्या पाहिजेत. न्यायालयातल्या आणि टीव्हीवरच्या चर्चेत त्याचे निर्णय होऊ शकत नाहीत. हे प्रकरण नंतर कधीतरी घेईन लिहायला.
मी तुम्हा इतरांपेक्षा थोडा अधिकच भाग्यवान आहे. कारण भारतमातेच्या अंगावर मी इकडून तिकडं लहान मुलासारखा बागडतोय, तीच मला कधी कडेवर घेते, कधी पोटाशी घेते आणि सध्या तिच्या चरणांपाशी आहे मी.
‘तामिळनाडू म्हणजे पेरियार’ असा आपला समज करून देण्यात आलेला आहे. आपल्याकडे क्षणाक्षणाला काही लोक म्हणतात की 'शाफुआंचा महाराष्ट्र'. अगदी तसंच आहे. म्हणजे या महापुरुषांचा आदर महाराष्ट्रात आहे, पण स्तोम माजवणारे काही मोजकेच आहेत. अगदी तसंच आहे. काही लोक सोडले, तर बाकी तामिळ समाज आपल्यापेक्षा सुशिक्षित, संपन्न असला तरीही आध्यात्मिक आहे. ऑफिसातसुद्धा त्यांच्या कपाळावर उभी किंवा आडवी रेघोटी दिसेल. इथं कोईम्बतूरमध्ये तोकड्या कपड्यातल्या मुली मोजक्याच दिसतील, जे पुरोगामी महाराष्ट्रातील शहरात फार कमी दिसतं.
इथली भाषा मला येत नाही. दोन-तीन तामिळ शब्द वापरून, हातवारे करून आपलं काम साधतो आहे. तामिळ लोक भाषेसाठी कितीही कट्टर असले, तरीही नेहमी मदतीसाठी ते धावून येतात. कधीकधी बोलताना समोरच्याला समजत नसेल तर मी निराश होतो, पण हे लोक कधीही होत नाहीत. ते समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतात.
ज्यांना इतर राज्यातील लोक स्वतःपेक्षा वेगळे वाटतात, त्यांच्यासाठी आणखी एक समानता सांगतो. ते म्हणजे आपले शब्द. उडियामध्ये माकडाला ‘माकोडो’ असं काहीतरी म्हणतात. त्यांना बंगाली लोकांप्रमाणे गोल गोल शब्द बोलायची सवय आहे. हेच लोक फणसाला ‘पणोस’ म्हणतात. आता सांगा, हे वेगळे कसे? तामिळमध्ये ‘अधिक’साठी एक शब्द आहे, तो म्हणजे ‘जास्ती’.
हे सगळं आपल्याला जोडणारं आहे. आपण एक आहोत, आपला धर्म एक आहे. आपला राम एकच आहे. अशा भाषा, असे लोक, अशी मंदिरं जेव्हा मी पाहतो, तेव्हा मला इतर राज्यांतील लोक परके वाटत नाहीत. आपलेच वाटतात. एकटेपणा जाणवत नाही. कारण ‘हिंदू’ हाच आमचा परिचय आहे. अटलजींच्या खालील ओळी याला दुजोरा देतात -
मै एक बिन्दु, परिपूर्ण सिन्धु है यह मेरा हिन्दु समाज।
मेरा इसका संबन्ध अमर, मैं व्यक्ति और यह है समाज।
इससे मैने पाया तन–मन, इससे मैने पाया जीवन।
मेरा तो बस कर्तव्य यही, कर दू सब कुछ इसको अर्पण।
मै तो समाज की थाति हूँ, मै तो समाज का हूं सेवक।
मै तो समष्टि के लिए व्यष्टि का कर सकता बलिदान अभय।
हिन्दू तन–मन, हिन्दू जीवन, रग–रग हिन्दू मेरा परिचय!
पूर्ण कविता वाचू नका. अटलजींच्याच आवाजात ऐका - https://youtu.be/5cVhGcvBj3Q
आता मी हिंदीविरोध करून हिंदी कविता का ऐकायला सांगतोय, असं वाटेल. त्याचं कारण असं की माझा हिंदीला विरोध नाही. कुठल्याच भाषेला नाही. पण हिंदीची सक्ती मला मान्य नाही. महाराष्ट्रात बॉलीवूड नावाची घाण नसती, तर इतकं हिंदीकरण झालं नसतं. अटलजी मराठीला ‘मावशी’ म्हणायचे. प्रत्येक मराठीतर लोकांची हीच विचारसरणी असली पाहिजे. हे तेव्हाच होईल, जेव्हा आमच्या प्रमुख शहरातील सुशिक्षित मराठीजन मराठीच बोलतील. याचा अर्थ नुकत्याच बाहेरून आलेल्या माणसाला एक दिवसात मराठी बोलण्यास भाग पाडणं असा नाही, तर आपण मराठीसाठी असं चांगलं वातावरण निर्माण करू या की बाहेरच्या लोकांनाही ती बोलावीशी वाटेल. आपणच ‘क्या भैय्या’ केल्यावर त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची?
इथं तामिळ लोक कुणाचंही डोकं न फोडता तामिळ बोलायला भाग पडतात, अगदी तसंच. तुम्हाला एक आतली बातमी सांगतो. दुर्दैवाने मराठीप्रमाणे तामिळ माध्यमाच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. हिंदीला जे जमलं नाही, ते इंग्लिशने तामिळविजय ‘करून दाखवलं’. हे खेदजनक आहे.
आता खरंच ते मराठी भजन आहे की मी भांग घेऊन आहे, ते तुम्हीच ठरवा. देवळात आत गेलो नाही, त्यामुळे बाहेरचा गोंगाट जास्त आहे. आत गेलो नाही, कारण ३/४ पॅंट होती. इथं देवळात जाताना काही नियम आहेत. पण कृपया हे तृप्तीताईंना सांगू नका. नाहीतर येतील इथं बिकिनी घालून. बाकी काही नाही, त्यांना असं पाहणं ही कल्पनाच भयानक आहे. प्रत्यक्षात पाहिलं तर....
असो. हे सगळं आज लिहून टाकलं, कारण लवकरच इथला मुक्काम संपायच्या दिशेने वारे वाहत आहेत. पुढचं ठिकाण माहीत नाही, पण घराच्या जवळपास असावं अशी इच्छा आहे. तसं कोईम्बतूरमध्ये शब्दशः पुण्याहून अधिक 'हिरवळ' आहे. म्हणजेच निसर्गरम्य आहे ही जागा. तरीही आता बंगळुरास किंवा ‘पुन्यात’ किंवा ‘म्हम्बई’.
|| पेरुमल सदा विजयते ||
७२७६४०५६९९
dpranav88m@gmail.com