वारकरी शिक्षण संस्थेचा वेलू गगनावेरी नेणाऱ्या स्वा.नि. सद्गुरू वै. श्री. जोग महाराजांचे हे पुण्यतिथी शताब्दी वर्ष. त्यानिमित्ताने जोग महाराजांच्या जीवनकार्याची महती आणि माहिती सर्वदूर पोहोचावी या उद्देशाने सा. विवेकच्या माध्यमातून स्वा.नि. सद्गुरू जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सव विशेषांक प्रकाशित करण्यात आला. त्यातील काही लेखांचा सारांश येथे देत आहोत.
बालपण आणि शिक्षण : फडतरे चौकात स्वत:च्या मालकीचा वाडा, पिंपरी पुणे येथे शेती आणि घर. शिवाय सावकारी. महाराजांचे वडील नरसोपंत सावंतवाडीच्या राजाचे शिक्षक, हाही एक मिळकतीचा उत्तम मार्ग. असं सर्वसंपन्न घराणं. जोग महाराज हे चारही भावंडांमध्ये शेंडेफळ. शरीर तर मुळातच सुदृढ. त्यात दोन थोरले भाऊ नगरकर तालिमीचे वस्ताद. तेव्हा तालिम करणे, मनसोक्त दही, दूध, तूप खाणे, पोहोयला जाणे याप्रमाणे लहानपणीचा नित्यक्रम असे.
जोग महाराजांचं शिक्षण तसं जेमतेम चौथीपर्यंत झालं. सगळे म्हणायचे हेच खूप झालं. महाराजांना स्वत:ची सही करायला दोन मिनिटं लागायची. शिक्षणाची साधने नव्हती. हल्लीसारखी दगडी पाटया अथवा पाटयाच्या जागी लाकडी फळकुटे आणि त्यावर विटेचा चुरा करून तो पसरवायचा आणि अक्षर गिरवायचे या प्रकाराला धुळपाटी असं समर्पक नाव होतं.
मुख्यत: विदर्भ आणि खान्देश इकडेही चांगल्या घरातील मुलं न शिकता व्यवसायाकडे वळतात. पिंप्रीत शेती असल्यामुळे महाराज शेतात हुरडा खाण्यात आनंद मानायचे. मुख्य म्हणजे भरपूर खाणे, व्यायाम करणे. पांडोबा महाराजांमुळे महाराज पोहायला पण जायचे. विहिरीवरून पाण्यात उडी मारायचे, विहिरीला शे-दोनशे चक्करही मारायचे. लहानपणी त्यांना एकदा देवी आल्या होत्या, डोळे जातात की काय असं सगळयांना वाटलं, पण सगळं व्यवस्थित निभावलं. जेमतेम शिक्षण चौथीपर्यंतचे तेही मोडी लिपितच. बाकी दिनक्रम मात्र पहेलवानाला शोभेल असाच. अशा स्थितीत महाराजांनी प्रगल्भ ग्रंथरचना केली हेच मोठं आश्चर्य. याचा अर्थ संतांचा निरोप महाराजांनीच आपल्यापर्यंत आणला यात शंका नाही.
आमच्या फेसबुक पेजला like करा : सा. विवेक : https://www.facebook.com/VivekSaptahik/
तालिमीचं वस्तादपण : जोग महाराज पहेलवान म्हणूनही प्रसिध्द. पिळदार दांडगे शरीर, खणखणीत प्रकृती, भरपूर मेहनत, नरसिंहाचे हे पुत्र नरसिंहासारखेच दिसत. इतके घट्ट शरीर की चिमटा काढायला शीरच हातात येत नसायची. वज्रदेही, लवकरच परमार्थीचा छंद लागला. पहेलवानकीचं वळण काही सुटलं नाही. थोरले बंधू लवकर वारले. सहजच नगरकर तालिमीचं वस्तादपण महाराजांकडे आलं. शनिवारी मारुतीच्या पुजेचा नियम ते कधीच चुकले नाही. देशी खेळांवर महाराजांचं खूप प्रेम. विदेशी खेळांचा महाराज तिरस्कार करीत, परंतु व्यायामावर खूप प्रेम करायचे.
साधक अवस्था : सामान्यपणे माणूस त्रिविध तापांनी ओढला की मग परमार्थाकडे पळतो. परंतु महाराजांना त्रिविध तापांशी झुंजावे लागले नाही. कोणत्याही दु:खाशी त्यांना फार झुंजावं लागलं नाही. मंडूकश्रृतीप्रमाणे ते कष्टाचा प्रवास टाळून एकदम साधक दशेच्या महाद्वाराशी येऊन उभे राहिले. एकदा नाशिकला स्नानाकरिता गोदावरीत उभे राहिले. तिर्थोपाध्याय संकल्प सांगू लागला. पापोहम् पाहकर्माहम् पापात्मा पापसंभव महाराज म्हणाले, 'मी पापीही नाही पापकर्माही नाही. दुसरं काहीही म्हणा हा संकल्प उच्चारला तर खबरदार, ते म्हणायचे गत जन्मी मी माऊलींच्या पालखीचा भोई होतो. जन्मभर त्यांची पालखी वाहिली. त्यामुळे या जन्मात साधन फार करावं लागलं नाही. ''साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य''
अलंकपुरीचा प्रवास : पुण्याहून आळंदीजवळ आपल्या तालिमेतील कुणाची कुस्ती ठरली की पांडोबा महाराज त्याला माऊलीच्या पायावर घालण्याकरिता आळंदीस आणत. महाराजही येत. असा आळंदीला येण्याचा छंद लागला. दुसरा कुठला गुरू नाही केला. गळयात माळ घातली तीही माऊलींच्या समाधीवर ठेवूनच. मग भजन, कीर्तन, वारी करीत भंडारा डोंगरावर राहिले. अजाण वृक्षाखाली पारायणे केली. चिंतन, मनन, जप, साधना, नामजप, योगसाधनेचाही अभ्यास उत्तम. माऊलींचा दृष्टांत झाला. आळंदीस अजाण वृक्षाखाली बसले होते. मस्तकावर हात ठेवून माऊली म्हणाले, 'तू कीर्तन, प्रवचन करीत जा,' अशा रितीने पूर्व जन्मीच्या तपश्चर्येने परिपक्व झालेले हे आम्रफळ, त्याला माऊलीच्या शरणतेचा वर्ण आणि गंध मिळाला.
विश्व माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज अशा अनेक संतांनी अर्थपूर्ण जीवन जगण्याचा मंत्र या मातीतल्या भोळयाभाबडया लोकांना दिला. अध्यात्माचं ज्ञान साध्या सोप्या भाषेत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविलं. भागवतधर्माच्या भक्ती परंपरेची ही मशाल अखंड तेवती ठेवण्यासाठी इ.स. 1917 मध्ये सद्गुरू जोग महाराजांनी आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली.
वै. गु. विष्णुबोवा जोग महाराज (संस्थापक), वै. ह.भ.प. बंकटस्वामी, वै. प्रा. सोनोपंत दांडेकर, एम. ए., वै. ह.भ.प. मारूतीबुवा गुरव, वै. ह.भ.प.लक्ष्मणबुवा इगतपुरीकर यांनी संस्थेची बहुमोल नि:स्वार्थ सेवा करून संस्थेचे भवितव्य उज्ज्वल केले.
संतवाङ्मयातील तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करून समाजोन्नतीचे कार्य करणे. संतवाङ्मयातील नीति-धर्म, स्वकर्तव्य या विषयी समाजात ज्ञानज्योत तेवत ठेवणे. समाजात देव, धर्म, देश यांची निष्काम सेवा करणारे निकोप व निरलस बुध्दीचा निष्काम कर्मयोगी विद्यार्थीवर्ग निर्माण करणे. हे या शिक्षणसंस्थेचे मुख्य उद्देश आहेत.
संस्थेतून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी आपापल्या भागात जाऊन कीर्तन-प्रवचनाद्वारे समाजसुधारणेचे कार्य करीत आहेत. स्वकर्तव्यविन्मुख समाजास कर्तव्यसन्मुख करण्यासाठी सतत सत्कर्मरत असून अखंड ज्ञानदानाच्या कार्याद्वारे समाजसुधरणा करीत आहेत.
एका महत्त्वाच्या मुद्यावरून संस्थेत संतवाङ्मयाचेच (वारकरी पंथीय तत्त्वज्ञानाचे) शिक्षण दिले जाते.
वारकरीपंथ म्हणजेच भागवत धर्म हा एकच धर्म असा आहे की ज्यात वैदिक धर्माची नीतितत्त्वे प्रतिपादली असून प्रवृत्तीची निवृत्तीशी सांगड घालणारा, व्यक्ती व समाज यांची ताटातूट न करता इहपरलोकी जेणे करून कल्याण होईल असे बघणारा, व्यक्तीच्या नव्हे तर विश्वाच्या कल्याणाची काळजी घेणारा असून तो एका व्यक्तीकरिता, जातीकरिता, पंथाकरिता मर्यादित नसून ज्यात नीतीचा, अभ्युदयाचा, अंतर्भाव होतो. कारण समाजधारणेकरिता लोकांची नैतिक पातळी उंचावणे आवश्यक आहे. त्याकरिता त्यांना धर्मशिक्षण देणे गरजेचे आहे.
'धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठाः' तो असा एकच विश्वधर्म 'किं यतोऽभ्युदयनिःश्रेयससिध्दीः स धर्मः' अशा या धर्माची तत्त्वे संतवाङ्मयात प्रतिपादली आहेत. शिवाय या धर्माच्या शिक्षणाने इतर धर्मबांधवांना संकोच वाटणार नाही म्हणून अशा मानवधर्माचे शिक्षण वारकरी संतवाङ्मयात देण्याचा हेतू आहे.
शिक्षणाचा काळ चार वर्षांचा असून त्यात प्रतिवर्षाच्या लेखी परीक्षेनंतर विद्यार्थी वरील वर्गात प्रवेश घेऊ शकतो. चार वर्षांच्या काळात पुढील ग्रांथांचे अध्ययन होते.
ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, तुकोबांची गाथा, सकल संतगाथा, एकनाथी भागवत, चांगदेव पासष्टी, पंचदशी, संस्कृत व्याकरण, भगवद्गीता, विचारसागर इत्यादी संतवाङ्मयातील व याला अनुषंगून इतर धार्मिक ग्रंथ शिकविले जातात. वारकरी पध्दतीनुसार निरूपण व प्रवचनाचे शिक्षण दिले जाते.
संस्थेत जात, धर्म, पंथ यांचा विचार न करता विद्यालयात प्रवेश घेतल्यावर त्याने वारकरी पंथाचे नियम पाळले पाहिजेत. ते नियम असे,
* श्रीक्षेत्र पंढरपूरला आषाढी-कार्तिकीला पांडुरंगाच्या दर्शनाकरिता व कार्तिक वद्य एकादशीला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळयाकरिता आळंदीला आले पाहिजे. * तुळशीमाळा अखंड धारण करून एकादशी करणे. * सांप्रदायाचे नित्यकर्म, भजन-पूजन इ. करणे. * मद्य, मांस, परस्त्री, परधनापहार वर्ण्य करणे. * सत्य, अहिंसा, दया, अपरिग्राह इ. दैवी गुण संपादणे.
संस्थेत प्रवेशानंतर शिक्षणक्रम पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्याने ब्रह्मचर्य व्रत पाळले पाहिजे. तद्नंतर गृहस्थाश्रम स्वीकारणे की नाही हे त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते.
महाराष्ट्रात ही एकच संस्था, की जी गेली शंभर वर्षे संतवाङ्मयाद्वारे कीर्तन-प्रवचनाचे शिक्षण देऊन धर्मप्रचारक निर्माण करते. त्याच प्रमाणे वारकरी संतवाङ्मयाची लेखी, तोंडी परीक्षा घेऊन पारितोषिके देणारी ही संस्था आहे. संस्थेला सरकारी अनुदान नाही. केवळ संस्थेच्या कार्याकडे पाहून स्वयंस्फूर्तीने लोकाश्रयावर चालणारी ही संस्था आहे. संस्थेचे विशेष म्हणजे शिक्षकांना पगार नाही व विद्यार्थ्यांना फी नाही. केवळ सेवा ज्ञानदान या हेतूने शिक्षण दिले जाते.
संस्थेचे संस्थापक वै. गुरूवर्य विष्णुबुबा जोग महाराज पुण्यतिथी उत्सव माघ शुध्द नवमीपासून आरंभ होऊन पुण्यतिथी दिन माघ वद्य प्रतिपदेपर्यंत आळंदीला साजरा होतो. शिवाय संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ वै. गु.प्राचार्य मामासाहेब दांडेकर यांची पुण्यतिथी पंढरपूर येथे आषाढ शुध्द चतुर्दशीला साजरी होते. त्याच्या अगोदर सात दिवस भजन, कीर्तन चालू असते.
तसेच ज्यांनी ज्यांनी आपले आयुष्य संस्थेकरिता वेचले अशा भूतपूर्व व्यक्तींच्या पुण्यतिथीदिनी भजन, कीर्तन होऊन विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचे भोजन दिले जाते.
संतवाङ्मयातील स्वधर्म, स्वकर्तव्य, नीती, कर्म, उपासना, भक्ती इ. दैवी गुण समाजात पसरविणे हा संस्थेचा मूळ हेतू आहे. संतांच्या शिकवणीची ज्ञानज्योत समाजात तेवत रहावी, ज्ञानाचा-भक्तीचा दिवा घरोघरी लावावा, समाजात नवचैतन्य निर्माण व्हावे व स्वकर्तव्यविन्मुख समाज कर्तव्यसन्मुख होऊन सुखी व्हावा आणि समाजात सुख-शांती नांदत रहावी यासाठी संस्थेतर्फे विशेष मेहनत घेतली जाते.
वारकरी शिक्षणसंस्था म्हणजे प्राचीन गुरूकुल पध्दतीचा नव्याने घडविलेला आविष्कार आहे. 2017 साली या संस्थेने आपला शताब्दी महोत्सव मोठया उत्साहात साजरा केला. आळंदी येथे वारकरी संप्रदायासाठी स्थापन केलेली वारकरी शिक्षण संस्था हे जोग महाराजांच्या हातून घडलेलं उत्तुंग कार्य म्हणता येईल.
- प्रतिनिधी