Enter your Email Address to subscribe to our newsletters
***जयंत विद्वांस***
डॉक्टरांचं व्यक्तिमत्त्व एकूणच गंभीर होतं. चेहऱ्याने भूमिका मिळतात की भूमिकांमुळे चेहरा तसा वाटतो, हे मला कोडं आहे. सामान्य चेहऱ्याचा माणूस चांगला अभिनेता असेल, तर त्याला विविध प्रकारची पात्रं साकारणं जास्त सोपं जात असावं. त्याला भूमिकाही तशा मिळत असाव्यात. उत्पल दत्त, परेश रावल, अशोक सराफ ही उत्तम उदाहरणं आहेत. खलनायक, विनोदी, प्रेमळ, गरीब, श्रीमंत वगैरे प्रकार या चेहऱ्यांना विनासायास जमत असावेत साकारायला. विक्रम गोखले (त्यांच्या तरुण काळातला) भिकारी, गरीब, परिस्थितीने हडकुळा राहिलेला दाखवला असता तर किती हास्यास्पद दिसलं असतं ते. त्यामुळे डॉक्टरांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशा गंभीर भूमिकाच जास्त मिळाल्या. कलेची सेवा कितीही मनात असली, तरी शेवटी पोट प्रत्येकाला आहे. कौतुकाने, बक्षिसाने पोट भरत नाही, जगण्यासाठी पैसे गरजेचे असतात. 'गांधी' केलेल्या हट्टंगडी आठ-दहा वर्षं चालणारी भुक्कड सीरिअल करतात, तेव्हा आपण त्यावर मत व्यक्त करायचं काही कारण नाही ते यामुळेच. डॉक्टरांना हिंदीत सिनेमे भरपूर मिळाले, पण त्यातही हिरोचा किंवा हिरॉइनचा बाप, वकील, श्रीमंत माणूस अशाच भूमिका जास्त होत्या.
नझीर हुसेन, मनमोहन कृष्ण यांचे बाप पिचलेले, रडकुंडे असायचे कायम.. लागूंचे बाप श्रीमंत, करारी असायचे, एवढाच काय तो फरक. 'लावारिस' आणि 'मुकद्दर का सिकंदर' दोन्हीत ते अमिताभबरोबर होते, पण अभिनयाची जुगलबंदी घडेल असे मोठे रोल नव्हते त्यांचे. 'किंग्ज रॅन्सम'वरून घेतलेल्या 'इन्कार'मध्ये त्यांना मोठा रोल होता. त्यांच्या मुलाचं अपहरण होणार असतं, त्याऐवजी चुकून नोकर साधू मेहरचा मुलगा उचलला जातो. नोकराच्या मुलाकरता एवढे पैसे द्यायचे का? या विचारांनी त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर जी द्विधा मनःस्थिती दिसते, ती बघाल कधी. त्यांच्याच कंपनीत त्यांचे भागीदार त्यांच्यावर उलटतात, तेव्हा त्यांचा चेहरा बघाल. असाहाय्यता, चीड, घृणा, कीव असं सगळं दिसतं. अभिनय म्हणजे खर्जातला आवाज, पिळदार शरीरयष्टी, सुंदर चेहरा यापलीकडे त्या पात्राच्या परिस्थितीत जाऊन त्याच्याप्रमाणे वागणं हा असतो. डॉक्टरांचा खलनायक फार छान झाला असता, असं मला कायम वाटतं. घारे डोळे, शांत बोलणं, आब राखून असलेला वावर याने आणखी भर पडली असती भेदकपणात.
आपण जे शिकतो, त्यापेक्षा वेगळया क्षेत्रात काम करणं सोपं नसतं. ते पेशाने कान-नाक-घशाचे डॉक्टर होते. घाणेकर डेंटिस्ट होते. एकदा तोंडाला तो रंग फासला की ती नशा उतरणं मोठं जिकिरीचं काम आहे. तुम्ही मग त्यात यशस्वी असाल, नसाल, पण तुम्ही तिथेच रमता हे खरं. डॉक्टरांनी ते मान्य केलं होतं. व्यसनच ते. घाणेकर त्या यशात वाहावत गेले, लागू टिकून राहिले. स्वतःच्या मर्यादा ओळखणं हा गुण फार गरजेचा असतो, त्यामुळे माणसाला आपण काय करू शकतो याचं नेमकं भान असतं. ''आम्ही नाटककाराचे शब्द, त्याचे अर्थ वाहून नेणारे लमाण'' हे त्याच विनम्रतेतून येतं. मोठया मोठया गप्पा मारायच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर आणि मोक्याच्या वेळेस गप्प राहायचं, असा दुटप्पीपणा त्यांनी केला नाही. 'घाशीराम'च्या आणि 'बाइंडर'च्या वादात ते पाठीशी उभे राहिले. कुठल्याही पुरस्कारासाठी लाचारी नाही किंवा मिळवण्याची धडपड नाही. जे मिळालं नाही, त्यात अन्याय झाला, मी एवढं केलं आजवर वगैरे फालतूपणाही त्यांनी कधी केला नाही.
तीन मराठी चित्रपट आणि एक नाटक (मी पाहिलेलं 'हिमालयाची सावली'. 'काचेचा चंद्र' पाहण्याचं माझं भाग्य नव्हतं, त्यामुळे जे पाहिलंय त्यावर बोलणं चांगलं.) याशिवाय डॉक्टरांचा उल्लेख करणं अवघड आहे. 'पिंजरा' - बापूंचा जेवढा वाटा त्यात आहे, तेवढाच डॉक्टरांचाही आहे. या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. रंगभूमीवरचे लोक पडद्यावर जातात, तेव्हा एकतर नवखेपण जाणवतं, अभिनय थोडा लाउड असतो. पण डॉक्टरांचा हा पहिला चित्रपट आहे असं कुठंही वाटत नाही. संध्याच्या जागी अभिनय करणारी आणखी कुणी असती, तर ती शोकांतिका आणखी चांगली झाली असती असं माझं मत आहे. अभिनय म्हणजे फक्त संवादफेक नव्हे, बोलका चेहरा हवा. बोलून जे पोहोचत नाही, ते चेहरा पोहोचवतो. संस्कार, आदर्श आणि मनाविरुध्द होणारी शरीरओढ डॉक्टरांनी चेहऱ्यावर काय सुरेख दाखवलीये यात. वर्गातल्या कमी उपस्थितीवर वाटलेली नाराजी, अभ्यास घेता घेता लेप वाटण्यातली घाई, ते नजर चोरणं, आधी तमाशाच्या फडावर घेतलेला रुद्रावतार, गोरी मांडी बघून डोळयात क्षणभर तरळलेली लालसा, नंतर ते चोरून छपून जाताना सतत कुणीतरी बघेल का ही भीती. 'नशिबानं थट्टा मांडली' म्हणताना आपलं झालेलं अधःपतन आणि जाळणारा पश्चात्ताप कसा लख्ख दाखवलाय त्यांनी. दुष्ट माणूस जसा वाईटच वागणार हे पक्कं असतं, त्याचं आश्चर्य नाही वाटत, तो चुकून चांगला वागला तर लोक चकित होतात. हेच सज्जन, आदर्श माणसाच्या विरोधात जातं. त्यांची चूक मान्य होत नाही लोकांना. देवपण मिळणं सोपं, ते टिकवणं फार अवघड. हे पटवण्यासाठी मास्तर जसे उभे राहिला हवे होते तसे त्यांनी ते उभे केले.
दुसरा 'सिंहासन'. त्यातला त्यांचा विश्वासराव दाभाडे कसा बेरकी आहे अगदी. पुस्तकापेक्षाही चित्रपट सरस असण्याचा तो दुर्मीळ योग होता. एकपेक्षा एक दिग्गज लोक त्यात होते. दुभाषी, दत्ता भट, तोरडमल, अरुण सरनाईक, डॉ. मोहन आगाशे, निळू फुले. प्रत्येक जण लक्षात राहतो, कारण बांधीव पटकथा आणि प्रत्येकाला दिलेली मर्यादित मोकळीक. लेखक किंवा दिग्दर्शक पात्राच्या प्रेमात पडला की चित्रपटाची माती होते. यात त्यांची सून झालेली रिमा लागू, तिच्याशी त्या चित्रपटातलं नातं कसं आहे ते अगदी संयत दाखवलंय त्यांनी. खूप बोललं, हावभाव केले म्हणजे पोहोचतं असं नाही. सूचक, मुद्राभिनय याद्वारे काही गोष्टी जास्त पोहोचतात. निळूभाऊ आणि लागू फार समोरासमोर आले नाहीत. जब्बार पटेलांनी दोन चित्रपटांत त्यांना एकत्र घेतलं, पण यात ते फार सामोरे आलेच नाहीत.
तिसरा चित्रपट 'सामना'. संयम म्हणजे काय ते संपूर्ण चित्रपटभर पाहावं. समोरच्याला चीड येईल असं वागणारे कफल्लक मास्तर आणि राग दाबून त्यांना काबूत ठेवण्याचे प्रयत्न करणारे हिंदुराव पाटील. स्मिता पाटील सोडल्यास मास्तरांचा भूतकाळ काहीही नाही त्यात. त्यांचं नेमकं वैर काय हिंदुरावशी, ते कळत नाही. चित्रपटात त्यांना नावही नाही. निळूभाऊच त्यांना मास्तर म्हणून हाक मारायला सुरुवात करतात. दारूसाठी क्षणात चेहऱ्यावर येणारी लाचारी आणि ती दिली म्हणून कृतज्ञता वगैरे न बाळगता अडचणीत आणणारे नेमके प्रश्न विचारण्याचा धूर्तपणा बघाल त्या चित्रपटात. संवाद तर चटकदार आहेतच ते, पण प्रश्न विचारताना केलेला निरागस चेहरा आणि आड दडलेला बेरकीपणा बघाल. अर्थात या सगळया टोचणीला कारणीभूत आहे ती हिंदुराव पाटलांना मास्तरबद्दल वाटणारी आत्मीयता. आधी बावळट, दारुडा वाटलेला हा निरुपद्रवी माणूस प्रसिध्द झालाय आणि त्यांच्यामुळे लोकांची कुजबुज वाढलीये, हे लक्षात आल्यावर हिंदुरावाची होणारी चडफड बघाल. लागू आणि फुले असे अनेक वेळा आमनेसामने यायला हवे होते, ही खंत आहे.
त्यांची नाटकं पहायचा योग आला नाही फार, पण जे एक पाहिलं, ते कायमचं लक्षात राहिलं. मुळात 'नटसम्राट' लिहिलं ते नानासाहेब फाटक यांना डोळयासमोर ठेवून. त्यांचं आत्मचरित्रं मी वाचलेलं आहे. पहाडी आवाज, जो ऐकून प्रेक्षकांचा थरकाप उडायचा. त्या आवाजासाठी लिहिलेली ती स्वगतं आहेत. आता ते कालबाह्य वाटेल नाटक, पण ती एक नटाच्या म्हातारपणाची शोकांतिका आहे. मी दत्ता भट, यशवंत दत्त, सुखटणकर आणि नाना यांचं 'नटसम्राट' पाहिलंय; पण पहिला छाप असेल म्हणूनही असेल, लागू या सगळयांत सरस होते. म्हातारपणाकडे झुकलेला, एकेकाळी वैभवात जगलेला, आता परिस्थिती आणि चुकीचे निर्णय यामुळे कात्रीत सापडलेला एक हताश म्हातारा आहे तो. भूतकाळातली संपन्नता, प्रसिध्दी, टाळया आणि आताची परिस्थिती यातलं द्वंद्व आहे ते. डॉक्टरांची हलणारी मान, तो कंपयुक्त आवाज, चेहऱ्यावर दिसणारी ती हताशपणामुळे आलेली चीड हे दाखवणं महत्त्वाचं आहे. उतारवय, खचलेली मानसिक अवस्था यातही स्वगतापुरता खणखणीत आवाज काढायचा आणि लगेच परकायाप्रवेश केल्यासारखं परत म्हातारं व्हायचं, हा प्रकार अनेकांनी केलाय. पण लागूंची स्वगत नाटकभर बोलतात त्या एकाच पट्टीत, आवाजात आहेत. मूळ शिरवाडकरांचं मत वेगळं असू शकेल. पाहाणारा त्याचं मत अजमावणार, तसा नट त्याचीही बुध्दी वापरणार. पण ''आम्ही नाटककाराचे शब्द वाहून नेणारे लमाण'' असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा त्यांनी जे केलंय तेच शिरवाडकरांना अभिप्रेत असावं असं मला वाटतं.
विषय कालबाह्य होतात, आदर्श, तत्त्वं कालबाह्य होतात, पण माणूस उरतोच. आधीच्या पिढीने काही चांगलं करून ठेवलं असेल तर ती पुढच्या पिढीला शिदोरी असते. आयुष्य असंच सरत राहणार, या हातातून त्या हातात बॅटन द्यायचं आणि मागच्याने देताक्षणी तिथेच थांबून आपली शर्यत संपवायची असते. माणूस आहे, जाणारच. लागू अकाली गेलेत? नाही. पण आदर्श, तत्त्व बाळगणारी माणसं हळूहळू काळाच्या पडद्याआड चालली आहेत, याचं दुःखं आहे हे.
पहिल्या नटसम्राटा, आमच्या आयुष्यात तू जे काही आनंदाचे क्षण दिलेस, त्यासाठी तुला ही आदरयुक्त श्रध्दांजली.