Enter your Email Address to subscribe to our newsletters
***डॉ. सुपर्णा निरगुडकर****
राष्ट्रीय एकात्मता हा विविधतेने संपन्न असलेल्या आपल्या देशाचा प्राण आहे. मात्र ईशान्य भारतातील नागालँडसारखा दुर्गम भाग आजही मुख्य प्रवाहापासून अलिप्त आहे. निसर्गाचे वरदान असूनही हा प्रदेश आरोग्य, शिक्षण आणि अन्य पायाभूत सुविधांपासून वंचित आहे. नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांच्या आवाहनावरून ठाण्याच्या डॉ. सुपर्णा निरगुडकर आणि त्यांचे अन्य डॉक्टर सहकारी यांनी तेथे वैद्यकीय कॅम्प घेण्यास सुरुवात केली. या उपक्रमात त्यांना येथील संस्कृती, जीवनशैली आणि एकूणच सामाजिक परिस्थिती जवळून अनुभवता आली. हे अनुभव त्यांच्याच शब्दात.
नागालँडचे राज्यपाल पद्मनाभ आचार्यजी यांच्याशी माझे पती डॉ. उदय निरगुडकर यांची झालेली एक साधी चर्चा माझं आयुष्य अधिक अनुभवसमृध्द करण्यास हातभार लावेल याची कल्पनाही मी केली नव्हती. डॉ. उदय निरगुडकर यांनी आचार्यजींशी माझी ओळख करून दिली. वयाची पंचाएेंशी ओलांडलेली ही व्यक्ती अतिशय उत्साही आणि प्रेरणादायी आहे. नागालँडला मुख्य भारताशी जोडण्याच्या त्यांच्या विचारांमुळेच मी प्रेरित झाले. त्यापूर्वी या जागेविषयी मी क्वचितच ऐकले अथवा वाचले असेल आणि मी जे काही वाचले ते नक्कीच चांगले नव्हते. उलट तेथील भीतिदायक गोष्टींविषयीच अधिक वाचले होते. आचार्यजी म्हणाले, ''याच कारणासाठी आपल्याला तेथील जनजातींची सेवा करायची आहे. त्यांना परग्रहवासींसारखं वागवायचं नाही.'' ते पुढे म्हणाले, ''तुम्ही तुमच्या डॉक्टर सहकाऱ्यांसह नागालँडमध्ये या आणि मेडिकल कॅम्प घ्या.'' बस्स!! ऑक्टोबर 2014मध्ये आमच्यात हा संवाद झाला. हा प्रसंग माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. मी माझ्या काही डॉक्टर मित्रांसमोर ही कल्पना मांडली. एकाने लगेच प्रतिक्रिया दिली, ''अरे बापरे, नागालँड! मला माझा पासपोर्ट रिन्यू करावा लागेल.'' म्यानमारला लागून असलेल्या आणि देशाचे ईशान्येकडील टोक असलेल्या या दुर्गम भागाबाबत उच्चशिक्षित लोकांचेही अज्ञान अशा प्रकारे दिसून येते, तिथे देशातील सर्वसामान्य जनतेची काय स्थिती!
पद्मनाभ आचार्य यांनीच स्थापन केलेल्या इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटरबरोबर आम्ही संयुक्तपणे काम करण्यास सुरुवात केली. ही संस्था नागालँडला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करते. 'फ्रेंड्स ऑफ नागालँड' या नावाने आमचा ग्रूप तयार झाला. हे एक सामाजिक कार्य म्हणून आम्ही करणार होतो आणि त्यासाठीचा खर्चही आम्हालाच करायचा होता. तिथे गेल्यावर मात्र तेथील प्रशासनाकडून आमची राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय करण्यात आली होती. 2015पासून आतापर्यंत तेथे 4 कॅम्प झाले आणि त्या सर्वच कॅम्पचे अनुभव अविस्मरणीय आहेत.
नागालँडचे जीवनमान
मेडिकल कॅम्पसाठी रुग्णांची प्रचंड गर्दी होत असल्याने कॅम्पचा प्रत्येक दिवस आम्हाला तणावाचा वाटायचा. दिवसभर काम केल्यानंतर आम्ही जवळपास फेरफटका मारण्यास जात होतो. त्या वेळी तेथील स्थानिकांचे जीवनमान जवळून पाहता आले. नागालँड खूप सुंदर आहे आणि तेथील निसर्गाने आम्हा शहरी भागातील डॉक्टरांना भरभरून समाधान दिले. नागांचे साधे-सरळ जीवन आम्ही जवळून पाहिले. 16 जनजातींमध्ये नागालँडची जनता विभागलेली आहे. त्या प्रत्येक जनजातीची वेगळी संस्कृती, वेगळी वेषभूषा, भाषा आणि परंपरा आहेत. ख्रिस्ती धर्मांतरितांची संख्याही बरीच आहे. या सगळयाबरोबरच बंडखोर संघटनांची दहशतही आहे.
तेथील एखाद्या साध्या खेडयाला भेट देणे हा जिवंतपणा जागवणारा अनुभव असतो. शाकारलेल्या छपरांची बांबूची घरे आणि छोटया गल्ल्या अशी तेथील रचना असते. ही भूमी विविध रंगांनी सजलेली आहे आणि धनेश महोत्सवासारख्या उत्सवांमध्ये ते रंग अधिकच खुलतात. तेथील लोक खूपच प्रेमळ आणि मदतीसाठी तत्पर असतात. त्यांच्या संस्कृतीत ते सर्वांना सामावून घेतात आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. नागा लोक खूपच अगत्यशील असतात. प्राण्यांच्या कातडयांपासून बनवलेल्या शालींनी ते पाहुण्यांचे स्वागत करतात. तेथील स्थानिक विविध हस्तकलांमध्ये पारंगत आहेत आणि आपण एरव्ही पाहतो त्यापेक्षा त्यात खूपच वेगळेपण दिसते.
विशेषत: तेथील खाद्यसंस्कृती खूपच वेगळी असल्याचे आढळते. मार्केटमध्ये सगळीकडे विविध प्रकारचे प्राणी (अगदी सरपटणाऱ्या प्राण्यापासून ते चार पायांच्या प्राण्यापर्यंत) विकायला ठेवलेले दिसायचे आणि तेच त्यांचे मुख्य अन्न होते. शाकाहारी जेवण मुश्किलीने मिळते आणि त्यातही भात, कडधान्ये आणि काही पालेभाज्या यांचा समावेश असतो. ते तांदळाची कांजी आंबवून बनवलेले चिकट पेय पितात आणि पाहुण्यांनाही देतात.
देशाचे अतिशय पूर्वेकडचे टोक असल्याने येथे सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही लवकर होतात. त्यामुळे तेथील दिनक्रमही भल्या पहाटे सुरू होतो. सर्व दुकाने पहाटे 6ला उघडतात आणि दुपारी 3ला बंद होतात. तेथील दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे संध्याकाळी 5नंतर घराच्या बाहेर पडणेही मुश्कील होते. इंग्लिश ही तेथील कार्यालयीन भाषा आहे. मात्र स्थानिक भाषा समजायला अवघड असल्याने आमच्या मदतीला दुभाषे होते.
पहिला कॅम्प राजधानी कोहिमात
मार्च 2015मध्ये नागालँडची राजधानी कोहिमा येथील जिल्हा रुग्णालयात आमचा पहिला कॅम्प झाला. आमची पहिली टीम केवळ सहा डॉक्टरांची होती. दिवसाच्या अगदी सुरुवातीलाच कॅम्पमध्ये तपासणीसाठी आलेले शेकडो रुग्ण रांगेत उभे राहत. त्यातील बहुतेक जण लांबच्या भागातून आलेले असत. पहिल्याच दिवशी हे चित्र पाहून आम्हाला धक्का बसला. कारण येथील पायाभूत सुविधांची आणि दळणवळणाच्या साधनांची इतकी दुर्दशा आहे की लोकांना पहाटे उठून डोंगर-दऱ्यांतून अनवाणी चालत यावे लागते. केवळ आपल्या प्रदीर्घ आजारावर येथे चांगले वैद्यकीय उपचार होतील या आशेने ही वणवण करून लोक आले होते.
तपासणीत लक्षात आले की आपण महाराष्ट्रात किंवा देशाच्या अन्य भागांत जे काही आजार पाहतो, तसेच आजार तेथेही आढळतात. आश्चर्य म्हणजे शहरी भागातील जीवनशैलीचा भाग असलेले अतितणाव (हायपरटेन्शन) आणि मधुमेह यांसारखे विकार नागालँडसारख्या निसर्गसंपन्न भागातही मोठया प्रमाणात आढळतात. बुरशीजन्य रोगांचे आणि हायपर ऍसिडिटीचे प्रमाणही जास्त आहे. पित्ताशयाचे विकार असलेले आणि मूतखडयांचे अनेक रुग्ण आम्हाला प्रत्येक कॅम्पमध्ये पाहायला मिळाले. तेथील असुरक्षित जीवनमानाचा आणि पुरेसे पोषण नसलेल्या आहारपध्दतीचा हा परिणाम असावा. तसेच तेथे व्यसनाधीनताही मोठया प्रमाणात आहे. अनेक रुग्ण स्वत:हूनच सांगायचे, ''आय ऍम अ ड्रग्ज ऍडिक्ट.''
तेथील आरोग्य सुविधांची स्थिती पाहता पहिल्याच कॅम्पमध्ये अशा प्रकारचे वैद्यकीय कॅम्प तेथे वारंवार घेण्याची गरज जाणवली. त्यानंतर हा आमचा दर वर्षीचा उपक्रम बनला. मी स्वत: इन्टेन्सिव्हिस्ट आणि जनरल फिजिशियन, डॉ. उमेश बोरवणकर - लॅप्रोस्कोपिक आणि जनरल सर्जन, डॉ. राजन रेळेकर एन्डोस्कोपिस्ट आणि जनरल सर्जन, डॉ. सुवर्णा रेळेकर - जनरल सर्जन, डॉ. नितीन नरवणे - गॅस्ट्रोएन्टरॉलॉजिस्ट, माझी साहाय्यक डॉ. मंजिरी रानडे - ऍनेस्थेस्टिस्ट आणि पेन स्पेशालिस्ट, डॉ. निनू शाह - नेत्रचिकित्सक, डॉ. अमोल सामंत - रेडिऑलॉजिस्ट, डॉ. लीना सामंत - ऍनेस्थेटिस्ट, डॉ. नीलिमा डुंबरे, डॉ. सचिन मांजरेकर,
डॉ. विद्या भानुशाली, डॉ. गायत्री भोईर, डॉ. अक्षय गोसावी अशी आमची टीम तयार झाली. त्यात दर वर्षी स्वेच्छेने येणाऱ्या डॉक्टरांची संख्या वाढत राहिली.
तेथील खासगी आणि शासकीय रुग्णालयात औषधांची कमतरता असणे आणि तेथील लोकांना व औषधे खरेदी करणेच न परवडणे हेदेखील तेथील आरोग्याविषयीच्या समस्यांचे महत्त्वाचे कारण आहे. पहिल्या कॅम्पमध्ये याची कल्पना नसल्याने आम्ही जास्त प्रमाणात औषधे नेली नव्हती. मात्र नंतरच्या प्रत्येक कॅम्पममध्ये आम्ही विनामूल्य वाटण्यासाठी जास्तीचा औषध साठा नेला.
दुसरा कॅम्प आणि प्रतिसाद
आमचा दुसरा कॅम्प एप्रिल 2016मध्ये कोहिमालाच होता. त्या वेळी आमच्या पथकात आणखी 2-3 डॉक्टर सहभागी झाले. त्या कॅम्पला आम्ही मोफत वाटण्यासाठी औषधेही घेऊन गेलो होतो. पहिल्या कॅम्पला 100-150 लोकांची उपस्थिती होती. दुसऱ्या कॅम्पला त्याहीपेक्षा अधिक गर्दी होती. आम्ही जाण्याआधीच कॅम्पबाबत प्रसिध्दी केलेली असल्याने अनेक जण शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी आले होते.
कॅम्पला तेथील लोकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाचे एक उदाहरण म्हणजे पहिल्या कॅम्पला एक आजोबा आले होते, ज्यांना दम्याचा त्रास होता आणि न्युमोनियाची लक्षणेही होती. त्यांना तपासून योग्य ती औषधे आम्ही दिली. त्यानंतरही आमचा कॅम्प पुन्हा कधी होतोय याची ते वाट पाहत असत. तेथील स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आमच्या कॅम्पविषयीचे वृत्त शोधत. त्यामुळे कोहिमाला झालेल्या आमच्या दुसऱ्या कॅम्पच्या वेळीही ते हजर होते. आमच्या कॅम्पची वाट पाहणारे असे अनेक रुग्ण आढळले.
ग्रामीण भागातील तिसरा कॅम्प
नोव्हेंबर 2016मध्ये आम्ही तिसरा कॅम्प घेतला. तो मात्र आम्ही ग्रामीण, दुर्गम भागात जाऊन घेण्याचे ठरवले. नागालँडमधील 11 जिल्ह्यांपैकी 7 जिल्ह्यांमध्ये आम्ही तीन दिवस कॅम्प घेतले. त्या वेळी आमच्या टीममध्ये 40-45 डॉक्टर होते. त्यामुळेच ते शक्य झाले. रोटरीचे काही डॉक्टर आमच्या या उपक्रमात सहभागी झाले. इंडियन सोसायटी ऑफ इकोकार्डिऑलॉजीचे चार कार्डिऑलॉजिस्ट्स त्यात सहभागी होते. या वेळी रुग्णांना मोफत औषधांचे वाटपही केले.
लाँगलेंग - मोनचे अनुभव
2017मध्ये कॅम्प घेणे शक्य झाले नाही. मात्र 22 ते 26 एप्रिल 2018मध्ये झालेला आमचा कॅम्प हा अतिशय समाधानकारक असा होता. म्यानमार सीमेला लागून असलेल्या लाँगलेंग आणि मोन या जिल्ह्यांमध्ये हे कॅम्प घेतले होते. हे भाग इतके दुर्गम आहेत की तेथपर्यंत पोहोचणे हेच मोठे आव्हान होते. आसाममध्ये झोरहाटपर्यंत विमानप्रवास, तेथून आसामची सीमा ओलांडायला तीन तास आणि एकदा नागालँडमध्ये प्रवेश केला की पुढचा प्रवास अक्षरश: दुर्गम आणि डोंगराळ भागातूनच होता. रस्ताही कच्चा होता. तेथे पोहोचेपर्यंत आमच्याही जिवात जीव नव्हता.
हे दोन्ही भाग इतके दुर्गम आहेत की तेथे आरोग्य सुविधांची खूपच गरज आहे. जिल्हा रुग्णालयांची स्थिती फारशी चांगली नाही. स्थानिक डॉक्टरांची आणि उपचार यंत्रणांची कमतरता आहे. मोन या जिल्ह्याची लोकसंख्याच पावणेदोन लाख आहे. इतके लोक उपचारासाठी जाणार कुठे? या कॅम्पमध्ये आम्ही सुमारे 1200 रुग्णांची तपासणी केली. महिला रुग्णांची संख्याही मोठी होती.
मोनमधील कॅम्पमध्ये आमच्या पथकातील सर्जन्सनी 15 मोठया शस्त्रक्रिया केल्या. आमच्याबरोबर एन्डोस्कोपिस्ट डॉ. राजन रेळेकर होते. ऑलिम्पस नावाची एन्डोस्कोपीची कंपनी आहे. त्यांनी आम्हाला दोन एन्डोस्कोप्स पुरवले. त्या कंपनीचा माणूसही आमच्याबरोबर होता. एन्डोस्कोपी करून घेण्यासाठी लोक भल्या पहाटेपासूनच काही न खाता रांग लावायचे. तीन दिवसात 40 गॅस्ट्रोस्कोप प्रकारच्या एन्डोस्कोपी, तर 3 कोलोनोस्कोपी केल्या. काही रुग्णांना आम्ही जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेतले. मात्र तिथे त्या प्रमाणात, डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचारी उपलब्धच नव्हते.
या भागात व्यसनाधीनता अधिक असल्याने तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाणही लक्षणीय आहे. तेथील कॅम्पमध्ये दंततज्ज्ञांचाही सहभाग होता. त्यांनी कर्करोगाकडे जाऊ शकणाऱ्या काही केसेसचे निदान केले. तसेच आमच्याकडच्या एका डॉक्टरांनी लाँगलेनमधील 4-5 शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना तंबाखू सोडण्याविषयीचे समुपदेशन केले.
आमच्या पथकातील शल्यविशारदांनी नागालँडमधील प्रत्येक भेटीत अनेक शस्त्रक्रिया केल्या. त्यामुळे दर कॅम्पला रुग्णांची गर्दी वाढतच होती. आमच्या या उपक्रमात तेथील शासन आणि विशेषतः राज्यपाल आचार्यजी यांनी खूप सहकार्य केले. मोन जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी बेलफ्रिड यांनीदेखील आम्हाला तेथील कॅम्पमध्ये सर्व प्रकारची मदत केली. शिवाय तेथील जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांचा प्रतिसादही चांगला होता. कोहिमाचे जिल्हा रुग्णालय अन्य भागांच्या तुलनेत बरेच चांगले होते. तरीही तेथील डॉक्टरांनीही आमचे स्वागतच केले.
मिशन राष्ट्रीय एकीकरणाचे
राष्ट्रीय एकीकरणाच्या प्रक्रियेत ईशान्य भारतातील राज्ये तेथील भौगोलिक आणि सांस्कृतिक वेगळेपणामुळे नेहमीच अलिप्त राहतात. नागालँडला अन्य भारताशी जोडण्याचे आणि मुख्य प्रवाहात आणण्याचे राज्यपाल आचार्यजी यांचे मिशन आहे. त्यासाठी येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे. विशेषत: शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांत सुधारणा कराव्या लागतील. त्यापैकी नागालँडच्या आरोग्य क्षेत्रासाठी आम्ही काही डॉक्टर आमचे योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत. या भागात वर्षातून दोन कॅम्प तरी घ्यावेत आणि आमची ही टीम अधिकाधिक वाढावी, हेच आमचे सध्याचे लक्ष्य आहे. कोणत्याही डॉक्टरांना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर त्यांचे स्वागतच असेल. तसेच अन्य भागातील डॉक्टरांनीही एकत्र येऊन त्यांचे वेगळे पथक बनवून तेथे जायला हवे. त्यामुळे तेथे सातत्याने वैद्यकीय सुविधा पुरविणे शक्य होईल. नागालँडप्रमाणेच मिझोराममध्येही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे त्या भागातही अशा प्रकारचा उपक्रम राबवावा, अशी सूचना आचार्यजी यांनी आम्हाला केली आहे. त्यासाठीही आम्ही नक्की प्रयत्न करू.
9820184300
सा. विवेकच्या फेसबुक पेजवर लेख पोस्ट करण्यास सुरवात करत आहोत. सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील पेज क्लिक करून
https://www.facebook.com/VivekSaptahik/
मग like करावे म्हणजे त्यांना विविध लेख वाचण्यास मिळतील.
https://www.facebook.com/VivekSaptahik/