व्हावे हिंदूनृसिंहांचे स्मारक

विवेक मराठी    20-Mar-2025   
Total Views | 264
औरंगजेबाच्या कबरीचे महीमामंडन पुसण्यासाठी कबर उखडून टाकण्याऐवजी वेगळा पर्याय दिसतो का? या परिसरातच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शूर मराठे सरदार व मावळे यांच्या पराक्रमाच्या यशोगाथा उभ्या करायला हव्यात. त्यांच्या नावे शौर्यस्तंभ उभे करायला हवेत आणि जसे ‘द होलोकॉस्ट’ या नावाने जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरने ज्यूंवर केलेल्या अनन्वित अत्याचाराचे कायमस्वरूपी संग्रहालय उभे करण्यात आले तसे औरंगजेबाची क्रूरकृत्ये सांगणारे संग्रहालय या परिसरात उभे करावे. यातून कबरीचा महीमा आणि महीमामंडन करणारेही निश्चितच संपतील.
 
Aurangzeb
 
 
शिवजयंतीच्या दिवशी नागपूर येथील सुप्रसिद्ध महाल भागात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. 1992 नंतर नागपूर शहरात घडलेली ही पहिलीच घटना. म्हणून तिचे गांभीर्य अधिक. शिवाय नागपूर ही संघगंगोत्री तसेच मुख्यमंत्रीपदासहित गृहमंत्रीपदाचाही कार्यभार सांभाळणार्‍या देवेंद्र फडणवीस यांचे गाव असल्याने या घटनेचे गांभीर्य कैकपटीने वाढते.
 
त्या दिवशी सकाळी महाल भागातील शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ शिवजयंतीचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. त्यानंतर, काही वेळाने त्याच जागी विहिंप आणि बजरंग दलाचे आंदोलनही पोलीस बंदोबस्तात झाले. महाराष्ट्रात असलेली औरंगजेबाची कबर उखडून टाकावी अशी त्यांची मागणी आहे. हे आंदोलन होणार असल्याची स्थानिक वर्तमानपत्रांमधून पूर्वप्रसिद्धी केली होती. पोलीसांना लेखी निवेदनही देण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान औरंगजेबाच्या प्रतिमेचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले आणि त्याच्या थडग्यावरील चादरीच्या प्रतिकृतीचेही प्रतिकात्मक दहन करण्यात आले. थोडक्यात, पोलिसी बंदोबस्तात सनदशीर मार्गाने हे आंदोलन झाले.
 
 
त्यानंतर अवघ्या चारपाच तासांतच,’जी चादर जाळली त्यावर कुराणातल्या आयाती होत्या’ अशी आवई उठवत आणि तसे प्रक्षोभक संदेश पाठवून पद्धतशीरपणे तिथे 500/600 जणांचा जमाव जमला. त्यांनी तुफान दगडफेक, मोठ्या प्रमाणात वाहनांची जाळपोळ करायला सुरुवात केली. निवडक दुकानांची नासधूसही केली. या बरोबरच पोलीसांवर हल्ला चढवला त्यात काही पोलीस जखमी झाले आणि भर म्हणून जमावाने महिला पोलीसांचा विनयभंग केला. हे सगळे चालू असताना ’सुल्तान औरंगजेब झिंदाबाद’ या व अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ही दोन गटांमधली दंगल नव्हतीच. मुस्लीम समुदायातील समाजकंटकांकडून हा हल्ला घडविण्यात आला. हा सार्वभौम भारताच्या संविधानाद्वारे स्थापित प्रशासन व सुव्यवस्थेवर केलेला हल्ला होता. या दंग्यामागचा सूत्रधार - मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा फहीम खान आणि आणखी 51 जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या हल्ल्याचे धागेदोरे बांग्लादेशापर्यंत पोचत असल्याचे तपासातून पुढे येत आहे.
 
 
विहिंप-बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनातील प्रतीकात्मक चादरीवर कुराणातली आयत लिहिलीच नव्हती हे पोलीस तपासाअंती स्पष्ट झाले आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात निवेदनही दिले आहे.
 
 
अराजक घडवून आणण्यासाठी या आंदोलनाचे निमित्त केले जात असले तरी हे राम मंदिर निर्माणानंतर देशातल्या विविध भागांत विखुरलेल्या धर्मांध, जिहादी मनोवृत्तीच्या मुस्लीम गुंडांनी साधेसरळ जीवन जगू पाहणार्‍या मुस्लीम समुदायाला सरसकट भडकवण्याचे आणि त्यातूनच दंगलीसदृश वातावरण निर्माण करण्याचे सत्र चालू केले आहे.
 
 गत वर्षी विजयादशमीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी शहरात निघालेल्या संघ संचलनादरम्यान ’अल्ला हू अकबर’च्या चिथावणीखोर घोषणा एका गटाने दिल्या. त्यानंतर उत्तर प्रदेशातील संभल येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणाच्या आदेशावरून लोकांची माथी भडकवण्यात आली व तिचे पर्यवसान दंगलीत झाले. आठवड्यापूर्वी, भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स चषक जिंकल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ मध्य प्रदेशात महू येथे देशप्रेमी नागरिकांनी विजयी मिरवणूक काढली त्यावरून दंगल घडविण्यात आली. तर, अगदी अलीकडे मुंबईजवळील कल्याण परिसरात बालांच्या एका संघशाखेवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पकडण्यात आलेल्या सर्वांची नावे एका विशिष्ट समुदायातली असणे हा योगायोग नक्कीच नाही. ही झाली जिहादी मानसिकतेची अगदी अलीकडची काही उदाहरणे. प्रत्येक ठिकाणी कारण वा निमित्त वेगळे वापरण्यात आले आहे.
 
 
ज्या मुद्द्यावरून नागपूरात वातावरण तापले तो मुद्दा औरंगजेबाच्या कबरीचा. औरंगजेबाच्या कबरीचे महीमामंडन करणार नसल्याची नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहेच. मात्र या आधी सत्तेत असलेल्या राजकीय नेत्यांनी केलेले औरंगजेबाच्या कबरीचे महीमामंडन पुसण्यासाठी कबर उखडून टाकण्याऐवजी वेगळा पर्याय दिसतो का?
 
 औरंगजेबाची क्रूरकृत्ये सांगणारे संग्रहालय या परिसरात उभे करावे. यातून कबरीचा महीमा आणि महीमामंडन करणारेही निश्चितच संपतील.
मराठ्यांचा पूर्ण बीमोड झाल्याशिवाय पुन्हा उत्तरेत पाऊल टाकणार नाही अशी प्रतिज्ञा करून आलेला क्रूरकर्मा, धर्मांध शासक औरंगजेब. त्याच्या जुलुमातून जन्मदात्यासह रक्ताची भावंडेही सुटली नाहीत. त्याने छत्रपती संभाजीराजांचे अनन्वित हाल केले. तरीही सिंहाच्या त्या नीडर छाव्याने धर्मासाठी बलिदान केले. असे नीडर नेतृत्व हरपल्यानंतरही शूर मराठे सरदार प्राणाची बाजी लावून त्वेषाने औरंगजेबाशी लढत राहिले. त्यांनी इतकी कडवी झुंज दिली की मराठेशाही संपविण्याचे स्वप्न पाहता पाहता शेवटी जख्ख म्हातार्‍या औरंगजेबाला महाराष्ट्रातच प्राण सोडावा लागला. ही कबर त्याच्या पराभवाचे व नामुष्कीचे प्रतीक आहे. मराठेशाहीने दिलेल्या चिवट, कडव्या झुंजीचे ते प्रतीक आहे. पण हे वास्तव आतापर्यंत कोणीच पुन्हा पुन्हा ठासून सांगितले नाही. आता मात्र राष्ट्रप्रेमी युती सरकारची सत्ता असल्यामुळे हे अपूर्ण कर्तव्य त्यांनी पुढे सरसावून बजावायला हवे. त्यासाठी या परिसरातच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शूर मराठे सरदार व मावळे यांच्या पराक्रमाच्या यशोगाथा उभ्या करायला हव्यात. त्यांच्या नावे शौर्यस्तंभ उभे करायला हवेत आणि जसे ‘द होलोकॉस्ट’ या नावाने जर्मनीचा हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरने ज्यूंवर केलेल्या अनन्वित अत्याचाराचे कायमस्वरूपी संग्रहालय उभे करण्यात आले तसे औरंगजेबाची क्रूरकृत्ये सांगणारे संग्रहालय या परिसरात उभे करावे. यातून कबरीचा महीमा आणि महीमामंडन करणारेही निश्चितच संपतील.
 
 औरंगजेब कबरीतून नव्हे तर मनामनातून हद्दपार व्हायला हवा.
इथे यायचे ते, एका क्रूरकर्म्याचा काळाकुट्ट इतिहास समजून घेण्यासाठी आणि आपल्या पराक्रमी पूर्वजांपासून प्रेरणा घेण्यासाठी! ‘रामजन्मभूमीत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आता प्रत्येकाच्या मनमंदिरात रामाची प्रतिष्ठापना व्हायला हवी’, असे पूजनीय सरसंघचालक प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात म्हणाले होते. तसा, औरंगजेब कबरीतून नव्हे तर मनामनातून हद्दपार व्हायला हवा. त्या कबरीभोवती मराठेशाहीची गौरवगाथा रचण्याची नियतीने पुढे आणलेली ही संधी आहे. कबर उखडण्याची नव्हे तर समाजाचे या संदर्भातले विचारवळण बदलण्याची ही वेळ आहे.
 
 
मराठेशाहीने जेरीस आणलेल्या औरंगजेबासारख्या शत्रूला महाराष्ट्राच्या मातीतच दफन करावे लागले, हा मुघलांच्या नामुष्कीचा इतिहास का मिटवावा? उलट तेथेच हिंदूनृसिंहांचे स्मारक उभारणे हेच श्रेयस्कर!
राजकारण
लेख
संपादकीय