- रवींद्र गोळे
9594961860
भटके समाजाच्या जीवनात स्वातंत्र्यसूर्याची किरणे पडली तरी, त्यांची स्थिती आगीतून फुफाट्यात अशी झाली. काटेरी तुरुंगातून बाहेर येताना अज्ञान, असुरक्षितता, अंधश्रद्धा आणि दारिद्—याचे गाठोडे डोक्यावर घेऊन भटके आले. तसेच पारधी समाजाला जन्मजात गुन्हेगार ठरविले गेले. हिंदू समाजातील या दुर्लक्षित समूहास मुख्यधारेत सामावून घेण्याची प्रक्रिया गिरीश प्रभुणे काकांच्या चळवळीतून सुरू झाली आणि देशव्यापी ठरली. भटके विमुक्त जाती व जमातीमध्ये स्व जागरण केले पण भटके विमुक्त विकास परिषद एका जातीची किंवा जमातीची काकांनी होऊ दिली नाही. गेल्या तीस पस्तीस वर्षांची गिरीश प्रभुणे काकांच्या कामाची ही फलश्रुती आहे.
महाराष्ट्रातील भटके विमुक्त जाती आणि जमातीच्या चळवळीचा अभ्यास करताना पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या कामाची दखल घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. साधारणपणे 1990च्या आसपास सोलापुरात संघशीक्षा वर्ग सुरू असताना मिनार एक्सप्रेसवर दरोडा घालणारे पारधी पोलीस गोळीबारात ठार अशी बातमी आली. आणि या बातमीचा छडा लावण्यासाठी संघशीक्षा वर्गातून काही मंडळी बाहेर पडली, त्यापैकी एक होते गिरीश प्रभुणे. हे प्रकरण पारधी हत्याकांडाचे होते. गिरीश प्रभुणे, चंद्रकांत गडेकर,महादेव गायकवाड या मंडळीनी प्रत्यक्ष घटना स्थळी भेट दिली, मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. या निमित्ताने एक नवा विषय संघ स्वयंसेवकांसमोर आला. खरंतर संघात सर्व समाजातील संघ स्वयंसेवक. अगदी भटक्या समुहातील सुद्धा. पण समाज म्हणून एकात्मिक विचार करण्यास भाग पाडणारी ती घटना होती. गिरीश प्रभुणे ग्रामायणचे काम करत असताना पारधी समाज, त्यांच्या समस्या, पोलीस व समाजाचा दृष्टिकोन याविषयी अनेक अनुभव गाठीशी बांधून होते. मिनार एक्सप्रेस घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून भटके विमुक्त जाती व जमातीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. खरं तर याआधी अनेक छोटे छोटे प्रयोग संघ स्वयंसेवक करत होते. या निमित्ताने भटके विमुक्त विकास परिषद नावाचा संघटनात्मक ढाचा उभा राहिला. या नव्या संघटनेच्या संघटनमंत्री पदाची जबाबदारी गिरीश प्रभुणे यांच्या खांद्यावर आली.
संघ भटके विमुक्त समाजात काम करू लागला म्हणजे काय? आणि त्याच काळात अन्य संघटना, नेते भटके समाजात काय काम करत होते? या दोन प्रश्नांची उत्तरे शोधली की प्रभुणे काकांनी नेतृत्व केलेल्या चळवळीचे वेगळेपण काय होते हे लक्षात येईल.
शौर्य, बलिदान आणि संस्कृती रक्षणाचा गौरवशाली वारसा असलेला भटका समाज बिट्रीशांच्या कुटनितीचा शिकार झाला. आणि जन्मजात गुन्हेगार म्हणून त्यांच्यावर शिक्का मारला गेला. अगदी आपल्या देशात स्वातंत्र्यसूर्य उगवल्यानंतरही पाच वर्षे भटके समाज काटेरी कुंपणाच्या तुरुंगात खितपत पडला होता. 31 ऑगस्ट 1952रोजी पंडित नेहरू यांनी सोलापूर सेटलमेंटच्या तारा कापल्या आणि भटके समाजाला विमुक्त केले. भटके समाजाच्या जीवनात स्वातंत्र्यसुयाची किरणे पडली आणि त्यांची स्थिती आगीतून फुफाट्यात अशी झाली. काटेरी तुरुंगातून बाहेर येताना अज्ञान, असुरक्षितता, अंधश्रद्धा आणि दारिद्—याचे गाठोडे डोक्यावर घेऊन भटके आले. पुढे दहा वर्षे कुणाला खंत ना खेद अशी स्थिती राहिली. 1962साली गं. भा. सरदार यांनी पुण्यात बिर्हाड मोर्चा काढला आणि समाजाचे, सरकारचे भटके समाजाकडे लक्ष वेधले. 1970च्या दशकात भटके विमुक्त समाजातील शिकलेली पिढी पुढे आली. आणि न्याय हक्कांसाठी भांडू लागली. बाळकृष्ण रेणके, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, दादासाहेब मोरे ही त्यातील महत्त्वाची नावे. या मंडळीनी भटके आणि विमुक्त समूहासाठी संघटना बांधल्या. जन प्रबोधन केले. आपले हक्क, अधिकार यांच्या साठी आंदोलन सुरू केली. पुढील काळात ज्या जातीचा नेता त्या जातीची संघटना अशी स्थिती निर्माण झाली. संपूर्ण भटके विमुक्त समुहाचा विचार करेल असे संघटन, आंदोलन निर्माण झाले नाही. असे असले तरी या आंदोलनाचे मुख्य बिंदू हे तत्कालीन समस्या व आणि दारिद्र्य निर्मुलन हेच राहिले. या आंदोलनातून काही गोष्टी साध्य झाल्या, त्या पुढीलप्रमाणे होत्या. 1) शिक्षण प्रसार 2) अस्मिता जागरण 3) जातीय संघटन 4) राजकीय भान.

तत्कालीन प्रश्न, अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढणार्या या संघटना पुढील काळात कोणत्यातरी राजकीय पक्षाशी जोडल्या गेल्या. संघटना समाजापेक्षा राजकीय विषयावर अधिक सक्रिय झाल्या.
या पार्श्वभूमीवर संघ आणि गिरीश प्रभुणे यांचे वेगळेपण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. वर म्हटल्याप्रमाणे संघात भटके विमुक्त समुहातील स्वयंसेवक खूप आधीपासून काम करत होतेच, आपल्या समाजातील भल्या बुर्याचा ते विचारही करीत होते, पण संघटनात्मक स्वरूपात ते काम नव्हते. भटके विमुक्त विकास परिषदेचे संघटनमंत्री म्हणून गिरीश प्रभुणे यांच्याकडे काम आल्यावर या विषयावर मुळातून विचार सुरू झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
संघाचे काम सुरू झाले, म्हणजे काय तर तो विषय संघ स्वयंसेवक मुळापासून समजून घेऊ लागले. गिरीश प्रभुणे त्यातील अग्रेसर. भारतीय समाजव्यवस्था, गावगाडा, गावगाड्यातील ताणेबाणे, आलुतेदार बलुतेदार, यांचा पलीकडे जाऊन भटके समाजाचा अभ्यास करावा लागणार होता. त्यासाठी गिरीश प्रभुणे काकांनी भटके विमुक्त समाजातील काही प्रमुख समाजगटावर लक्ष केंद्रित केले. सुरूवातीच्या काळात पारधी समाज हा प्रभुणे यांच्या अभ्यास आणि कृतीचा विषय झाला. या विषयात प्रभुणे इतके गुंतले की लोक त्यांना गिरीश पारधी म्हणून ओळखू लागले.

गिरीश प्रभुणे यांनी पारधी समाजात काम सुरू केले. पारध्यांच्या पालावर जाऊन, त्यांच्या जातपंचायतीत बसून त्यांनी पारधी समाजाची स्थिती गती समजून घेतली. समकालीन वास्तव, सामाजिक दृष्टीकोन आणि अन्याय अत्याचाराच्या घटना या विषयावर त्यांनी ठोस काम केले. पारधी समाज हा जन्मजात गुन्हेगार ठरवला गेल्याने कोणत्याही क्षणी पोलीस आपल्याला अटक करतील. अशी भिती सोबत घेऊन जगणारा समाज स्थिर केला पाहिजे. गिरीश प्रभुणे यांचा हा विचार कार्यकर्त्यांनी उचलून धरला आणि त्यातूनच एक सकारात्मक अभुतपूर्व आंदोलन झाले. सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील पारधी गिरीश प्रभुणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अपूर्व चंद्रा यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले. आमच्या हाताला काम द्या. आमच्यावर मारलेला जन्मजात गुन्हेगार हा शिक्का पुसून टाका. अशी या उपोषणाची मुख्य मागणी होती. प्रशासनही सकारात्मकपणे या उपोषणाचा विचार करू लागले. पुढे मंगळवेढा तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत पारधी रस्ते बनवण्यासाठी काम करू लागले. याच काळात प्रथमवसनाचा आग्रह धरत भटके विमुक्त विकास परिषदेने पारधी समाजासाठी मगर सांगवी येथे प्रथमवसन केले. मुक्ती नगर. पन्नास पारधी कुटुंब येथे राहू लागली. स्थानिक राजकीय विरोध संघ कार्यकर्त्यांनी मोडून काढला. शासनाकडून मिळालेल्या गायरान जमीनीवर विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा निर्माण करून देण्याचे शासनाने आश्वासन दिले. मुक्ती नगरमध्ये सुरू झालेल्या बेकरीची उत्पादने पारधी आसपासच्या गावात जाऊन विकू लागले. त्यांना चरितार्थाचे साधन उपलब्ध झाले. काकांनी ज्या विषयाचे बीजारोपण केले त्याला आता फळ लागली आहेत. किमान एक हजार तरूण शिकले, नोकर्या करू लागले, स्वतः चे घर घेऊन संसार करू लागले. पारधी म्हटले की भिती, ससेहोलपट, पोलीस व सामाजिक अत्याचार यापासून ते कोसो दूर झाले आहे. भारतीय नागरिक म्हणून ते सन्मानाने जीवन जगत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटलांनी ही सामाजिक व शैक्षणिक क्रांती घडवून आणली होती, ती पाहून महर्षी विठ्ठल रामजी शिंदे म्हणाले होते की, ’अक्रोडाला फळे आली’. गिरीश प्रभुणे काकांनी जे काम केले ते पाहून माजी कुलगुरू डॉ. देवदत्त दाभोलकर म्हणाले होते, आमच्या पिढीला गावकुसाबाहेरच जग कळले. तिथपर्यंत समाजाचे टोक असते असं वाटत होते. इथे तुम्ही जमिनीच्या तळागाळापलीकडे हिंदू समाज आहे आणि तो घरदार, जमीन, गावापासून वंचित आहे. सामान्य गुलामीतलंसुद्धा जीवन त्याच्या वाटणीला नाही. सार्या यातना, आक्रोश आपल्यापर्यंत पोहचला. आणि त्यावर आपण उपाय शोधत आहात. असंच काम सार्या भारतभर झालं तर कोणती समस्या राहणार नाही. आम्ही काम केली झाडू घेऊन हरिजन वस्त्या स्वच्छ केल्या. संडास साफ केले. मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केले. पण तुम्ही समाजाच्या अंतरंगात प्रवेश केलात.
भटके विमुक्त समाजात काम करताना प्रभुणे काकांनी काय केले? या प्रश्नाचे उत्तर शोधताना असे म्हणता येईल की, काकांनी भटके विमुक्त समाजाला आपण कोण आहोत? आपला गौरवशाली वारसा काय आहे? या देशाच्या उन्नतीमध्ये आपले योगदान काय आहे? हे समजून सांगितले. कधी काळी भारतात सोन्याचा धूर निघत असे. म्हणजे समृद्धी आणि नवनिर्मिती सहप्रवासी होत्या. आणि याचे सूत्रधार होते या भटके कारागीर जमाती, भटके व्यापारी जमाती. हजारो बैल, घोडे घेऊन बंजारा, वंजारी तांडे व्यापारासाठी प्रवास करत. वडार, पाथरवट, आपल्या कौशल्य आणि पारंपरिक ज्ञानातून लेणी मंदिरे घडवत. अंजिठा, वेरूळ ही त्यांची अजरामर साक्ष. विविध धातू वितळवून देवाच्या मूर्तीपासून लांब पल्ल्याच्या तोफा ओतण्याचे काम ओतारी करत. भारताचा आत्मा असलेल्या आयुर्वेदाचे परंपरेने जतन करत मानवी जीवन सुखकर करण्याचे काम वैदू करत. शेतकर्यांच्या उपयोगाची असणारी पाटी, टोपली, कणग कैकाडी करून देत. दारोदार जाऊन तिथी, वार, नक्षत्र, मुहूर्त सांगण्याचे काम जोगी, गोसावी, बाळसंतोषी करत. एकूणच गावगाडा आणि भटके विमुक्त समाजाचे परस्पर संबंध हे घट्ट आणि अकृत्रिम स्वरूपाचे होते. म्हणूनच संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ, संत तुकारामांच्या अभंगात या भटके समाजाचे संदर्भ सापडतात. हाच इतिहास गिरीश प्रभुणे काकांनी भटके विमुक्त जमातींना पुन्हा पुन्हा सांगितला आणि आपल्या ‘स्व’ची जाणीव करून दिली.
काकांनी भटके विमुक्त जाती व जमातीमध्ये स्व जागरण केले पण भटके विमुक्त विकास परिषद एका जातीची किंवा जमातीची होऊ दिली नाही. स्वतंत्र भारतात भटके विमुक्त समाजातील सामाजिक संघटनेचा, चळवळीचा इतिहास पाहिला तर असे लक्षात येईल की, ज्या जातीचा नेता त्या जातीची संघटना. भलेही त्या संघटनेच्या नावात अखिल भारतीय भटके विमुक्त जाती व जमाती असा उल्लेख असेल. पण दुर्दैवाने ती संघटना एका समुहाची आणि विशिष्ट प्रदेशाची राहिली. काकांनी संघटनमंत्री म्हणून या वास्तवाला छेद दिला असे आपण ठामपणे म्हणून शकतो. नंदीबैलवाल्यांची पाठराखण करणारा पारधी आणि बहुरूप्याची काळजी घेणारा मरिआईवाला केवळ गिरीश प्रभुणे काकांनी केलेल्या कामातून अनुभवास येऊ शकला. त्या त्या जाती जमातीच्या उन्नती व विकासाचा विचार जरूर केला पण सर्वांमध्ये एकच भाव उत्पन्न करूनच. आपण सर्वजण हिंदू आहोत. या राष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे आम्ही वारसदार आहोत. हा भाव काकांनी जागवला. आणि त्याची ठायी ठायी अनुभुती येईल असा कृती आराखडा तयार करून काम केले. हा कृती आराखडा दोन पातळीवर होता. एक म्हणजे भटके विमुक्त जाती व जमातीचे संघटन करताना त्यांचे तत्कालीन प्रश्न सोडवत आपल्या मुळांची पुन्हा ओळख करून देणे आणि दुसरे म्हणजे आपल्या लेखन व वाणीतून समाजात प्रबोधन करणे. ज्या समाज बांधवांच्या मनात गैरसमज आणि संशयाची जळमटे साचली आहेत ती दूर करण्यासाठी गिरीश प्रभुणे काकांनी प्रयत्न केला. आणि समाज गंगेचा निर्मळ प्रवाह मोकळा केला.
गिरीश प्रभुणे काकांनी हे काम संघकाम म्हणून केले. गेले शंभर वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू समाजाचे संघटन करत आहे. त्याच हिंदू समाजातील दुर्लक्षित समुहास मुख्यधारेत सामावून घेण्याची प्रक्रिया गिरीश प्रभुणे काकांच्या कामातून सुरू झाली असून आज ती देशव्यापी झाली आहे. भटके विमुक्त जाती व जमातीमध्ये सामाजिक व राजकीय नेतृत्व विकसित होते आहे. आणि ते नेतृत्व आपल्या चिरंतन तत्त्वज्ञान व गौरवशाली इतिहासाचा शोध घेऊ लागले आहे. गेल्या तीस पस्तीस वर्षांची, गिरीश प्रभुणे काकांच्या कामाची ही फलश्रुती आहे.