ते कलासक्त रसिक आहेत आणि हाडाचे कलावंतही. त्याच्या खुणा त्यांच्या आसपास विखुरलेल्या दिसतात. त्याचवेळी, डोळस दृष्टीचे, प्रश्नाच्या तळाचा वेध घेणारे चिंतनशील लेखक आणि ध्येयधुंद पत्रकारही आहेत. विवेकसह अनेक ठिकाणी त्यांचं आजवर प्रकाशित झालेलं लेखन आणि सर्व प्रकारची संकटं झेलत त्यांनी दहा वर्षं चालवलेलं ‘असिधारा’ साप्ताहिक हे त्यांच्यातल्या संवेदनशील आणि ध्येयनिष्ठ पत्रकाराची साक्ष आहेत. लेखकाआधी ते बहुआयामी वाचक आहेत. ते ही कसे...तर, विशिष्ट विचारसरणीचीच पुस्तकं वाचण्याचं बंधन स्वत:वर न घालणारे, वेगवेगळे विचारप्रवाह समजून घेत अतिशय गांभीर्याने वैविध्यपूर्ण वाचन करणारे, त्यातल्या अनेक लेखक-कवींशी स्नेहधाग्याने जोडले गेलेले वाचक. इतकं कॅलिडोस्कोपिक जगणं क्वचितच एखाद्याच्या वाट्याला येत असावं. यातली अनेक गुणवैशिष्ट्यं जन्मजात तर काही इथवरच्या प्रवासात कमावलेली. आणि यातली कुठलीच गोष्ट संघविचारांशी आयुष्यभर बांधीलकी जपण्यात अडसर ठरली नाही हे विशेष!
त्यांचं बाह्यरूप एखाद्या तत्त्वचिंतक ऋषिमुनिसारखं, विचारांची मांडणी थेट संतपरंपरेशी नातं सांगणारी आणि लाभलेलं आईचं काळीज...अनेकांच्या आयुष्यावर सावली धरणारं...गिरीश यशवंत प्रभुणे नावाचं आगळंवेगळं रसायन यातून घडलं आहे. त्यातलं काही मांडायचा हा प्रयत्न.
पुनरुत्थान गुरुकुलम्च्या प्रवेशद्वारातून आत शिरलो की बाहेरच्या जगाशी असलेला आपला संपर्क क्षणार्धात तुटतो. हा माझ्यासह तिथे येणार्या सर्वांचाच अनुभव. शहरीकरण, आधुनिकीकरणाच्या खुणा मिरवणार्या बाह्य जगापासून सर्वस्वी वेगळं असं जग गुरुकुलम्च्या वास्तूत नांदतं आहे. काळीसावळी, तरतरीत, चमकत्या डोळ्यांची ऊर्जावान मुलं आपल्या अस्तित्वाने या वास्तुतलं चैतन्य अक्षुण्ण राखताहेत.
आम्ही काकांना भेटायला गेलो तो, रविवार होता...साप्ताहिक सुट्टीचा दिवस. बहुतेक मुलांचा वास्तूत मुक्त संचार चालू होता. त्यांच्या आवाजाने वास्तू भरून गेली होती. गेली 20/25 वर्षं ज्या गिरीशकाकांना मी ओळखते त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं त्यांचं कार्यालय...सर्व बाजूंनी पुस्तकांनी वेढलेलं. सर्व विचारधारांची पुस्तकं काकांच्या टेबलवर गुण्यागोविंदाने नांदतात. त्या पुस्तकांच्या गर्दीतच कामाचे कागदही आहेत. हे साहचर्यही सवयीचंच असावं...खुर्चीला काकांची शबनम अडकवलेली...आजूबाजूच्या गोंगाटाचा जराही त्रास न झालेले काका आमच्यासह येणार्या जाणार्या सगळ्यांशीच आत्मीय संवाद साधत होते. दर 2/3 मिनिटांनी ’काका’ म्हणत त्यांना बिलगणार्या प्रत्येक मुलाचं तितक्याच आत्मीयतेने ऐकून घेत होते. कोणाच्या हातावर गोळी ठेवून त्याला खुश करत होते तर कोणाला लवकरच आईला फोन लावण्याचं आश्वासन देत शांत करत होते तर कोणाला अन्य मुलांच्या सांगण्यावरून लटके रागे भरत होते. त्यांच्या कपाळावर ना अठी पडली होती ना स्वरांत त्रासिकपणा...‘विठू माझा लेकुरवाळा’ या शब्दांनी मूर्तरूप घेतलेलं मी पाहत होते...अनुभवत होते.
काकांचं बोलणं गोष्टीवेल्हाळ...प्रश्नोत्तरं या पारंपरिक साच्यात न बसणारं...ओघवतं, प्रवाही बोलणं. ‘देता किती घेशील दो कराने’, अशी ऐकणार्याची गत होते. हा पूर्वानुभव असतानाही मी प्रश्न सोबत घेऊन गेले. ते बाजूलाच राहिले आणि काकांनी घडवलेल्या विलक्षण सफरीत त्यांच्यामागून जात राहिले.
त्यांच्या गतायुष्यात डोकावून पाहिलं तर लक्षात येतं की, बहुदा भटकेपण त्यांच्या पाचवीलाच पूजलं गेलं असावं. खूप काही सोसायला लावतानाच विचारसमृद्ध-अनुभवसमृद्ध करणारं असं हे भटकेपण. बालपणी भटक्या तांड्यातल्या मित्रांसोबत राहण्यासाठी घर सोडलं तर कधी लेखक होण्याच्या उसळलेल्या अनावर ऊर्मीपायी घराचा उंबरा ओलांडला. संघ प्रचारक म्हणून काही काळ घरापासून दूर राहिले तसे ग्रामायणसारख्या अनोख्या प्रयोगासाठी पत्नीवर घर सोपवून निमगाव-म्हाळुंगीला वस्ती केली. मग त्यांच्या आयुष्यात आला यमगरवाडीचा मोठा थांबा. काळोखात जन्म घालवणार्या, गुन्हेगारीचा जन्मजात शिक्का बसलेल्या फासेपारध्यांच्या आणि भटके -विमुक्तांमधल्या पंचवीसेक जातिजमातीतल्या मुलांच्या आयुष्यात उजेड आणणारा संघपरिवारातला प्रयोग म्हणजे यमगरवाडी येथील भटके-विमुक्त विकास परिषदेचा प्रकल्प...परिषदेचे संघटन मंत्री म्हणून जबाबदारी आलेल्या गिरीशकाकांकडे या कामाचं नेतृत्व आलं. याला कारण निमगाव-म्हाळुंगीच्या कामातून त्यांच्या गाठिशी असलेला पूर्वानुभव. या समाजाविषयी मनात असलेली अपरंपार आस्था आणि त्यांच्या उत्थानाची असलेली तळमळ. यमगरवाडीचं काम करत असतानाच त्यांच्या लक्षात आलं की फक्त आधुनिक शिक्षण देऊन या मुलांना कारकुनीचं काम करण्यापुरतं सक्षम बनवणं हा उद्देश असता कामा नये. तसं झालं तर वंशपरंपरेने त्यांच्याकडे आलेलं भारतीय ज्ञानाचं समृद्ध भांडार काळाच्या ओघात अस्तंगत होईल. ते जगापुढे कधी येणार नाही. या विचारातूनच भटके विमुक्त समाजातल्या मुलांमधल्या पारंपरिक कौशल्यांना काळानुरूप झळाळी देणारं शिक्षण हवं, यावर चिंतन सुरू झालं. या निमित्ताने झालेल्या वैचारिक घुसळणीत पुनरुत्थान गुरुकुलम् या त्यांच्या पुढच्या प्रयोगाची बीजं होती....त्यातूनच त्यांची पावलं मनुष्यघडणीच्या या नव्या प्रयोगाकडे वळली... गेली 22 वर्षं त्यांच्यातला प्रयोगशील समाजसुधारक या प्रयोगात रमला आहे. तिथे स्थिरावला आहे का, हे मात्र ठामपणे सांगता येणं अवघड. कारण आताशी कुठे त्यांना पंच्याहत्तरावं लागलं आहे...समाजघडणीचे नित्यनूतन विचार जोवर त्यांना स्फुरत आहेत आणि त्याला तंदुरूस्त शरीराची साथ आहे तोवर गिरीश प्रभुणे नावाची व्यक्ती स्थिरावली असं ठामपणे म्हणणं अवघडच! जे गिरीश प्रभुणे नावाच्या कॅलिडोस्कोपला भेटले आहेत, त्यांना हे पटेल. त्यांनाच काय, खुद्द गिरीशकाकांनाही पटेल.
1955-56 सालातली, बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्या सुमारास घडलेली गोष्ट. बाबासाहेबांबरोबर त्यांच्या अनुयायांनीही बौद्ध धर्म स्वीकारला आणि आमच्या शाखेत येणार्यांची संख्या एकदम 10/15वर आली. संघाच्या पद्धतीनुसार, येत नसलेल्यांच्या घरी जायचं मोरूभाऊंनी ठरवलं. शाखा सुटल्यावर आम्ही 10/15 जणंं त्या वस्तीवर गेलो. तिथली सगळी मुलं..मोठी माणसं आमच्या शाखेत येत होती. मोरूभाऊंनी त्यांना शाखेत न येण्याचं कारण विचारलं. त्यावर,‘आता आम्ही हिंदू नाही राहिलो’, असं ते म्हणाले. तेव्हा हिंदू हा शब्द मी प्रथम ऐकला. म्हणजे काय झालं ते कळण्याचं माझं वय नव्हतं. मोरूभाऊ त्यांना म्हणाले,‘अरे म्हणून काय झालं? तुम्ही बौद्ध झाला असलात तरी शाखेत या.’ त्यांना ते पटलं असावं, कारण1/2 दिवसानंतर पुन्हा ते सगळे शाखेत यायला लागले.”
काकांचा जन्म 1949चा. त्यांचे वडील महाराष्ट्र राज्य वीज महामंडळात नोकरी करत. त्यांची सतत बदली होत असे. काका वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षीच बाल स्वयंसेवक म्हणून संघात जाऊ लागले. तेव्हा ते चिपळूण इथे राहत. चिपळूणच्या मोरूभाऊ जोशींच्या वाड्यात भरणार्या त्यांच्या शाखेत 50/60 हून अधिक मुलं असायची. दररोज मैदानी खेळ खेळायला मिळतात याचं गिरीशला बालसुलभ आकर्षण होतं. त्याविषयी सांगताना काका म्हणाले, ‘तेव्हा एक प्रसंग असा घडला ज्यामुळे हिंदू असणं म्हणजे काय या प्रश्नाने मनात ठाण मांडलं. 1955-56 सालातली, बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला त्या सुमारास घडलेली गोष्ट. बाबासाहेबांबरोबर त्यांच्या अनुयायांनीही बौद्ध धर्म स्वीकारला आणि आमच्या शाखेत येणार्यांची संख्या एकदम 10/15वर आली. संघाच्या पद्धतीनुसार, येत नसलेल्यांच्या घरी जायचं मोरूभाऊंनी ठरवलं. शाखा सुटल्यावर आम्ही 10/15 जणंं त्या वस्तीवर गेलो. तिथली सगळी मुलं..मोठी माणसं आमच्या शाखेत येत होती. मोरूभाऊंनी त्यांना शाखेत न येण्याचं कारण विचारलं. त्यावर,‘आता आम्ही हिंदू नाही राहिलो’, असं ते म्हणाले. तेव्हा हिंदू हा शब्द मी प्रथम ऐकला. म्हणजे काय झालं ते कळण्याचं माझं वय नव्हतं. मोरूभाऊ त्यांना म्हणाले,‘अरे म्हणून काय झालं? तुम्ही बौद्ध झाला असलात तरी शाखेत या.’ त्यांना ते पटलं असावं, कारण1/2 दिवसानंतर पुन्हा ते सगळे शाखेत यायला लागले.” आपण हिंदू आहोत म्हणजे काय, या प्रश्नाने माझ्या मनात ठाण मांडलं ते तेव्हापासून. त्याचा शोध घेणं, अनेक जाणकारांकडून शंका निरसन करून घेणं पुढे अनेक वर्षं चालू होतं.”
बौद्ध वस्तीवरची ही मुलं जशी शाखेत येत होती तशी शाळेतही छोट्या गिरीशच्या वर्गात होती. ‘शाखेत एकत्र खेळणारे आम्ही शाळेत मात्र वेगवेगळे बसवले जायचो. कोणी कोणात मिसळत नसे. अपवाद फक्त माझा. शाखेतल्या या मित्रांशी बोलण्यासाठी मी माझी जागा सोडून जाई. आमच्या वर्गशिक्षकांना हे मुळीच आवडत नसे. एरव्ही माझ्याविषयी जिव्हाळा असणार्या त्या शिक्षिका मी त्या मुलांच्यात जाऊन बसलो की रौद्र रूप धारण करत. मला अक्षरश: फोडून काढत. एकदा तर त्यांनी घागर-बादलीतून पाणी आणून भर वर्गात माझ्या डोक्यावर पाणी ओतलं. आणि भिजलेल्या मला फोडून काढलं. त्या माराने कळवळून मी रडत होतो. शेजारच्या वर्गात असलेल्या माझ्या बहिणीने माझी त्या मारातून सुटका केली. इतकी शिक्षा करण्याएवढा कोणता अपराध माझ्या हातून घडला ते मात्र मला समजलं नाही. पुढे 3/4 वर्षांनी थोडा मोठा झाल्यावर संघाची शाखा आणि बाहेरचं जग यातला फरक मला समजायला लागला. माणूस म्हणून सर्वांना एकत्र आणणारी, जोडणारी शाखा मला अधिक जवळची वाटायला लागली ती तेव्हापासून. संघाशी आत्मीय नातं जुळलं ते कायमचं...”समाजाला लागलेला जातिभेदाचा कलंक मिटावा याचा विचारही तेव्हापासूनच कळत नकळत त्यांच्या मनात सुरू झाला असावा.
त्याच दरम्यान जी अधूनमधून घरातून बाहेर पडण्याची सवय लागली ती कायमचीच. या विषयी सांगताना काका म्हणाले,“वडील एम.एस.इ.बी.त होते. चिपळूणहून वडिलांची बदली सातारा रोडला झाली. सातार्यापासून 10 किलोमीटरवर राहत होतो. जरंडेश्वरचा डोंगर...कृष्णा नदी, वसना नदी...कूपर फॅक्टरी असा सगळा परिसर. तिथे रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत मी जायला लागलो. जनार्दन ज्ञानू जाधव नावाचा आमच्या वर्गात एक मुलगा होता, ...तो महानुभाव पंथातला होता. त्याच्या घरात कृष्णाची भक्ती होती. जाधव, मी, भोसले आणि पवार शाळेत एका बाकावर बसायचो. पवार कैकाडी समाजाचा होता. ते सगळ्यांकडे भिक्षेसाठी जात असत. जाधव आणि पवार दोघेही सहा महिने वर्गात असायचे, सहा महिने फिरतीवर. तरी दोघांचा परिक्षेत कायम पहिला/ दुसरा नंबर असेे. माझा त्यांच्या नंतर. मी त्यांच्या घरी-पालावर जायला लागलो. तिथे डुकरं, कुत्री आजूबाजूला फिरत असायची. त्यांची आई जंगलात लाकडं तोडायला जायची. एकंदरीत खूप वाईट अवस्था असायची. त्यांच्याबरोबर मी ही दुसर्याच्या शेतातला ऊस तोडायला जायचो. आंबे पाडायला जायचो. मी त्यांच्याबरोबर फिरत असायचो. चोरी करू नये हे माझ्या घरचे संस्कार होते. त्यांच्या मात्र ते गावीही नव्हतं. त्याचवेळी भीमनगर या बौद्ध वस्तीत मी शाखा घ्यायचो. दररोज बुद्धवंदनेने त्या शाखेची सुरुवात व्हायची. तिथे या वस्तीवरची मुलंही यायची. मात्र आपण यापेक्षा वेगळं काही केलं पाहिजे असं पवार, जाधव म्हणायचे. आपण सगळे एक आहोत असं काम करायचं, असं जाधवचं म्हणत असे. ते करण्यासाठी आपण घर सोडायचं असं त्याने सांगितलं. म्हणजे घर फक्त मला सोडायचं होतं. कारण त्याचं गाव तर सतत बदलत असायचं. मग मी गेलो त्यांच्याबरोबर. रोज अन्न मागून आणायचं, दुसर्यांच्या शेतातली कणसं कापून म्हणजे चोर्या करून आणायची असं चालू होतं. मात्र हे काही बरोबर नाही असं मला वाटत असे. आईची, मोठ्या बहिणीची खूप आठवण यायची. घरचेही माझा सगळीकडे शोध घेत होते. पोलीस स्टेशनला कळवलं होतं. एकदा वडिलांच्या ऑफीसची गाडी त्या भागात आली, त्यांनी मला पाहिलं. ते मला घरी घेऊन गेले. वडिलांनी खूप मारलं. ‘तुला काय कमी आहे? असं का करतोस?’ असं ते विचारत होते. माझ्याकडे त्याचं समाधानकारक उत्तर नव्हतं. त्यानंतर पुढे महिनाभर तरी मला बघायला आजूबाजूचे लोक घरी येत होते.”
याच काळात म्हणजे शाळेत असतानाच काकांना वाचनाचं वेड लागलं होतं. ते अक्षरश: अफाट वाचत होते. त्यांचे वडील स्वत: उत्तम वाचक असल्याने वाचनाचं महत्त्व जाणत होते. परवडत नसूनही छोट्या गिरीशला त्यांनी लायब्ररी लावून दिली होती. त्यातूनच लेखनाला प्रेरणा मिळाली. बहुतांश लेखन होई ते शाळेच्या वह्यांमधून. मग त्यावरून शाळेत मार बसत असे. त्यांचं लेखनकौशल्य बघून एकदा ज्येष्ठ कादंबरीकार ना.ह. आपटे यांच्याकडे शाळेतल्या बाई घेऊन गेल्या. तेव्हा ‘लाटांखाली संथ पाणी’ या कादंबरीची त्यांच्या मनात जुळवाजुळव सुरू होती. काही प्राथमिक लेखनही झालं होतं. ते लेखन ना.ह. आपटे यांनी वाचलं. अतिशय आस्थेनं कादंबरी लेखनासंदर्भात मार्गदर्शन केलं. आणि काकांना समजावलंं,“घर सोडून हिंडू नको. त्या लोकांंना सवय असते. तू खूप शिकलास तर माझ्यासारखा मोठा लेखक होशील.”
लेखनकलेला प्रोत्साहन देतानाच शिक्षणही पूर्ण व्हावं अशी तळमळ असणारे शिक्षक काकांना लाभले. त्यातल्या माळी नावाच्या शिक्षकांची गोष्ट त्यांनी सांगितली. त्यांचं काकांवर खूप प्रेम होतं आणि त्यांचं वाचनवेडही माहीत होतं. म्हणूनच याचं पुढे कसं होणार याची चिंता त्यांना लागलेली असायची. काका म्हणाले,“परीक्षा जवळ आली की मला खूप भीती वाटायची. कारण पूर्ण वर्षभरात अवांतर वाचनात मी खूप वेळ घालवलेला असायचा. आता आपण परीक्षेत काही पास होणार नाही. मग वडिलांचा मार खावा लागणार या भीतीने मी घरातून निघून जायचो. परीक्षेलाच बसायचो नाही. मग माळी सर मुलांना पाठवून मला शोधून काढायचे. तिथे माझ्या बरोबर भटक्यांची मुलं असायची. ती मासे पकडत असायची. मी बसून असायचो. तिथपर्यंत मला शोधत आलेली मुलं शाळेत घेऊन जायची. बाकीच्यांची परीक्षा होऊन गेलेली असली तरी माझी स्वतंत्र परीक्षा घेतली जायची. असा मग मी पास होऊन पुढच्या वर्गात जायचो. दैवयोगाने मला असे चांगले शिक्षक, चांगली माणसं मिळत गेली. नाहीतर मी कुठे गेलो असतो?” या प्रश्नामागचा कृतार्थ भाव आपल्यापर्यंत पोचतो.
त्यानंतर गिरीश काका पुन्हा घर सोडून गेले, ते मोठा लेखक होण्याच्या ओढीने. त्यासाठी पुण्यापर्यंत ते चक्क चालत गेले. पुण्यात जवळचे नातेवाईक राहत असतानाही ओरडा पडेल या भीतीने संभाजी उद्यानात राहिले. मात्र योग इतका चांगला की तिथेच त्यांची लेखक श्री. ज. जोशींशी भेट झाली. त्यांनी पु.भा. भावेंशी भेट घडवून आणली. भावेंनीही घरी परतण्याचा आणि शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. त्यांच्याकडे आलेल्या ‘सोबत’कार ग.वा.बेहरेंनी तर काकांची कहाणी ऐकून वडिलकीच्या नात्याने चक्क मुस्कटात लगावली आणि घरी परतण्याचा आदेश दिला. मग त्यानंतरची तीन वर्षं म्हणजे नववी ते अकरावी ते कुठेही गेले नाहीत. याच काळात त्यांना शाळेव्यतिरिक्त गुंतवून ठेवण्यासाठी वडिलांनी आपल्या कार्यालयात काम लावून दिलं. ट्रान्सफॉर्मर ठेवलेल्या जागेत जी खडी पसरलेली असे त्यातलं गवत उपटण्याचं काम होतं. या कामाचा जो मेहनताना मिळे त्यातून पुस्तकं खरेदी कर, लेखनासाठीची सामग्री खरेदी कर असं करत असत. याच तीन वर्षात ‘लाटांखाली संथ पाणी ’ही कादंबरी लिहून झाली. आणि त्यांच्या अब्दुल गफूर गनि शेख या मित्राने त्याची प्रेस कॉपी तयार करून ती मेनका प्रकाशनाला पाठवली. मेनका प्रकाशन हे प्रामुख्याने रोमँटिक कादंबर्यांसाठी प्रसिद्ध होतं. अशा प्रकाशन संस्थेने आपल्या मुलाचं पुस्तक छापलं म्हणजे त्याने नक्कीच काहीतरी भानगड करून ते लिहिलं असणार असं वाटून वडलांनी काकांचा चांगलाच समाचार घेतला. ही कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा काका पुण्यात संघ शिक्षा वर्गात होते. त्यामुळे पुस्तक प्रकाशनाची वार्ता पू. गोळवलकर गुरूजींपासून वर्गातल्या सगळ्यांपर्यंत पोचली.
संघ शिक्षा वर्गातून आल्यावर काकांनी प्रचारक म्हणून जाण्याचा निर्णय घेतला. वडील म्हणाले,“ तू प्रचारक म्हणून जायचं म्हणतोयस. पण तुला वेळेवर खाण्याचं, उठण्याचं भान नसतं. संघ प्रचारक असा नसतो. तिथे शिस्तीत रहावं लागतं. तुला कसं जमायचं?” त्यांची काळजी रास्त असली तरी काका ठरवल्याप्रमाणे प्रचारक म्हणून मुळशी आणि भोर तालुक्यात गेले.
कोळवणला एका डॉक्टरांच्या घरी त्यांची जेवायची व्यवस्था होती. तिथला एक अनुभव काकांनी सांगितला,“पंधरा दिवसांनी डॉक्टरांकडे परत गेलो तेव्हा त्यांच्याकडे तुकाराम जाधव म्हणून विस्तारक जेवायला आला होता. मी गेलो तेव्हा तो डोंगरात गवत कापायला गेल्याचं डॉक्टरांच्या पत्नीने सांगितलं. विस्तारक म्हणून आलेल्या मुलाला गवत कापायला पाठवलं हे ऐकून मला राग आला. गवताचा भारा घेऊन तो आला, तेव्हा मी डॉक्टरीणबाईंकडे माझी नाराजी व्यक्त केली. त्यावर तो म्हणाला,’अहो रागावता कशाला? इतक्या वयस्कर बाई दोन गायींसाठी चारा आणायला डोंगरात जाणार हे मला बरोबर वाटलं नाही. हे काम मी घरी रोजच करतो. म्हणून मीच त्यांना चारा आणून देतो सांगितलं. जर आपण इथे सर्वजण घर म्हणूनच राहतो तर शाखा ही सुद्धा घरासारखीच आहे. मी इथे जेवतो, खातो तर घरातलं काम केलं म्हणून काय बिघडलं?’ माझ्यापेक्षा लहान असलेल्या मुलाच्या या विचारांचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला.
दोन वर्षं प्रचारक म्हणून काम केल्यावर कै. दामूअण्णा दातेंनी काकांना थांबायला सांगितलं. कारण तोवर वडील निवृत्त झाले होते. बाकी भावंडं लहान असल्याने घरची जबाबदारी घ्यायला हवी होती. अर्थार्जन करणं भाग होतं.
मात्र प्रचारक म्हणून निघण्याच्या आधी वर्षभर एक विलक्षण घटना त्यांच्या आयुष्यात घडली होती. काकांना त्यांच्या आयुष्याची नायिका सापडली होती. एका जवळच्या नातेवाईकांच्या लग्नात ज्या मुलीने काकांचं लक्ष वेधून घेतलं तीच पुढे काकांची सहचारिणी झाली. या विवाहाने एका आगळ्यावेगळ्या सहजीवनाचं उदाहरण घालून दिलं. फार विलक्षण आठवण आहे ही...
“नात्यातलं एक लग्न पुण्यात होतं. आमची परिस्थिती बेताची असल्याने मी एकटाच गेलो होतो. पाच रूपयांचा अहेर पाकिटात घालून दिला होता. हाफपँट घालून गेलेला मी. या लग्नासाठी वधूची बहीण - संध्या भालेराव जी माझी बायको आहे ती इंदोरहून आली होती. तेव्हा ती इंदोर आकाशवाणीवर गात असे. ही काळीसावळी, तरतरीत मुलगी मला खूप आवडली. हे जमलेल्या भावंडांच्या लक्षात आल्यावर ते चिडवायला लागले. संध्याकाळी निघायची वेळ झाली तेव्हा तिनेच पुढे येऊन मला विचारलं,“तू त्या भाऊंचा मुलगा ना? मी तुझ्याविषयी ऐकलेलं आहे. तू शाळेत जात नाहीस, घरातून पळून जातोस.” ती माझ्यापेक्षा 4/5 वर्षांनी लहान होती पण धीट होती. तिने मला सरळच विचारलं, ’‘तू आज दिवसभर माझ्या मागे आहेस. तुझ्या मनात काय आहे?”
मला काय उत्तर द्यावं कळेना. मला तू आवडलीस हे म्हणण्याचंही धाडस नव्हतं. तिने विचारलं, ’पुढे काय करणार आहेस?’ मी म्हटलं,‘प्रचारक जाणार.’ त्यावर प्रचारक म्हणजे काय? असा तिचा प्रश्न. मी सांगितलं, संघाचं काम आहे. त्यावर संघ म्हणजे काय हा पुढचा प्रश्न. तिला यातलं काहीच माहीत नव्हतं. पगार मिळतो का तिथं? असं विचारल्यावर मी म्हटलं, नाही ते देशाचं काम आहे. ती म्हणाली, ’ठीके. तू जा प्रचारक. परत केव्हा येणार?’ असं काही सांगता येणार नाही, एवढंच मोघम मी सांगितलं. त्या पहिल्या भेटीत आमच्यात संवाद झाला तो एवढाच.
त्याचा धागा धरून तिने मला प्रचारक असतानाच्या काळात पत्रं लिहिली. ती सगळी मोतीबागेच्या पत्त्यावर आली. रघुवीरजी क्षीरसागर म्हणून जिल्हा कार्यवाह होते त्यांच्याकडे ही शंभरेक पत्रं जमा झाली होती. मला मात्र दोन वर्षं याची गंधवार्ताही नव्हती. दोन वर्षांनी प्रचारक म्हणून थांबून नोकरी बघायला दामूअण्णांनी सांगितलं, त्याचवेळी त्यांनी रघुवीरजींना सगळा हिशेब दे आणि भेट असंही सांगितलं. रघुवीरजींनी माझी खोदून खोदून चौकशी केली आणि पत्रांनी भरलेली ती पिशवी माझ्या हातात ठेवली. ती पत्रं वाचल्यावर मला प्रेमपत्र काय असतं हे समजलं. पु.शि.रेगेंची सावित्री, शरच्चंद्रांची राजलक्ष्मी या माझ्या आवडत्या नायिका साक्षात झाल्या. मग मी तिला लिहिलं, ’तुझी पत्रं मी वाचली. मला जशी हवी तशी तू आहेस. पण तुला जशी अपेक्षा आहे तसा मी असेनच असं नाही. अजून मला माझा मार्गही सापडलेला नाही. मला लेखनावरती जगायचं आहे. आता मी चिंचवडला स्थायिक होईन. इथे खोली घेतली की तुला कळवतो.’ कळवतो असं लिहिलं तरी पत्र मिळाल्यावर लगेच ती इंदोरहून पुण्यात आली. मोतीबागेतून माझा पत्ता घेऊन चिंचवडला भेटायला आली. माझ्याशी बोलून घरी पोचल्यावर तिने तिच्या वडिलांना सांगितलं. ते माझ्या घरच्यांशी बोलले आणि घरच्यांनी मला न विचारताच लग्नाचा मुहूर्तही ठरवला. नोकरी लागायच्या आधीच आमचं लग्न झालंही! तिने म्हटल्याप्रमाणे इथवरच्या आयुष्यात मला साथ दिली. सर्व वादळांमध्ये माझ्या पाठिशी भक्कमपणे उभी राहिली. ती नसती तर माझ्यासारख्याशी कोणी लग्न केलं असतं?”
निमगाव-म्हाळुंगीचा प्रयोग
काकांच्या पुढच्या कामाचा मूलाधार म्हणता येईल असा हा प्रयोग. ’माणूस’कार माजगावकरांनी त्यांच्या ग्रामायन संस्थेचा हा प्रयोग गिरीशकाकांच्या हाती सोपवला ही गोष्टच त्या दोघांमधलं स्नेहाचं, परस्परविश्वासाचं नातं अधोरेखित करणारी. आपापल्या विचारधारांशी ठाम राहूनही असा समाजोपयोगी उपक्रम करता येतो याचं हे उदाहरण ठरावं. इथे भटके-विमुक्तांचं आयुष्य अधिक जवळून पाहायची संधी गिरीशकाकांना मिळाली. समरस होऊन जगणं म्हणजे त्यांच्यातलं एक होऊन जगणं, त्यांच्या घासातला घासही आनंदाने खाणं...अभावातही आनंदाने जगता येतं आणि तसं जगायला लागणार्या भौतिक गरजा खूप कमी असतात याची खूप खोलवर जाणीव काकांना झाली. ग्रामविकासाचे खूप मूलभूत प्रयोग या गावात करता आले. त्यात यश मिळाल्याने समाधान मिळालं आणि दलितांपेक्षाही वंचित, अभावाचं जिणं जगणार्या या समाजासाठी काम करण्याची अक्षय प्रेरणा या कामाने दिली. तिथून पुढचे टप्पे म्हणजे यमगरवाडी आणि पुनरुत्थान गुरुकुलम...
काकांना पत्नीबद्दल वाटणारी कृतज्ञता शब्दांतून व्यक्त झाली. काकूंनी दिलेली साथ खरोखरच फार मोलाची होती, आजही आहे. काकांबरोबरचं सहजीवन म्हणजे सत्त्वपरीक्षा होती काकूंची...सतीचं वाणंच ते. शिक्षिका म्हणून नोकरी करत तीन मुलांच्या संगोपनासह संपूर्ण घराची जबाबदारी पूर्णपणे स्वत:च्या खांद्यावर तर घेतलीच, आणि आयुष्यभर काकांना त्यांचं आवडतं काम करत राहण्याचं स्वातंत्र्य दिलं. त्याचा कधीही, कुठेही गाजावाजा केला नाही. काकांच्या कामातून आलेल्या आर्थिक संकटांचा भारही उचलला. कामाची गरज म्हणून काकांना जेव्हा जेव्हा घरापासून दूर रहावं लागलं त्याबद्दलही कधी तक्रार केली नाही. आजही ते दोघे चिंचवडमध्ये राहत असले तरी काकूंचा मुक्काम घरी असतो आणि काका त्यांच्या पुनरूत्थान गुरुकुलम मधल्या मठीत राहतात. तिथे जेवणाची व्यवस्था असली आणि काकांनाही उत्तम स्वयंपाक येत असला तरी त्यांचा रोजचा डबा घरून येतो. परस्परांवरच्या प्रेमाचा हा किती वेगळा आणि लोभस आविष्कार!
काका 50 वर्षांपूर्वी चिंचवडला आले ते चापेकर वाड्यामागच्या पुरंदरे वाड्यात. क्रांतिवीर चापेकरांचा हा वाडा होता. पण त्याची काळाच्या ओघात पार दुर्दशा झाली होती. तिथे दारूची भट्टी लागते हे समजल्यावर अस्वस्थ झालेले काका संघाच्या काही स्वयंसेवकांना घेऊन वाड्यावर गेले. वाड्याचा गैरवापर न करण्याची आधी त्या लोकांना विनंती केली. त्याला जेव्हा जुमानत नाहीत असं लक्षात आलं तेव्हा भांडणं झाली, मारामारीही करावी लागली. पण पुढच्या 8/15 दिवसांत दारूची भट्टी बंद झाली. नंतर चापेकर स्मारक समिती स्थापन करून वाड्याची देखभाल सुरू झाली. वाड्यात चापेकरांचा पुतळा उभारला गेला. या समितीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामं या भागात चालू झाली. जी आजही चालू आहेत. काका दीर्घकाळ या स्मारक समितीचे कार्यवाह होते. 2011 नंतर समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. या समितीच्या माध्यमातून समाजोपयोगी कामांबरोबरच अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम पार पडले. 1980 मध्ये घेतलेले महाराष्ट्रव्यापी दलित साहित्य संमेलन हे यापैकी एक. त्याला 700 दलित साहित्यिक उपस्थित होते. त्यानंतर 1983 मध्ये अखिल भारतीय शाहीर संमेलन घेण्यात आले. मसापच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष या नात्याने या भागात काकांनी अनेक साहित्यविषयक उपक्रमही घेतले. गेल्या 50 वर्षात चापेकर समितीने या परिसरात एकूण चार शाळा सुरू केल्या. जून 2006 मध्ये शिवराज्याभिषेकाच्या सुमुहूर्तावर काकांच्या पुढाकाराने सुरू झालेलं पुनरुत्थान गुरुकुलम हा देखील चापेकर समितीचाच उपक्रम. आज काका या उपक्रमात पूर्णपणे गुंतलेले आहेत. औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक आणि आयुष्यात उपयोगी पडणार्या शिक्षणावर भर देणारी ही प्रयोगशाळाच आहे. बागकाम, शिवणकाम, वनौषधी निर्मिती, पक्षी निरीक्षण, खगोलशास्त्र, संभाषणकला, गायन-वादन, चित्रकला, मूर्तिकला, शेतीकाम याच्याबरोबरच विज्ञान आणि संगणकाचं शिक्षण देणारी अशी ही प्रयोगशाळा आहे. इथे वैदू, गोसावी, बहुरूपी, वासुदेव, नंदीवाले, नाथजोगी, पिंगळा या कलाकार जमातीची मुलं आहेत तशी वडार, ओतारी, सिकलकरी, घिसाडी, कैकाडी, बेलदार या कारागीर जमातीचीही मुलं आहेत. या सर्व जमातींकडे अतिशय मोलाचं असं भारतीय ज्ञानाचं संचित आहे. त्याचं जतन करणं आणि या मुलांमध्ये हे ज्ञान नव्याने रूजवून हा ज्ञानप्रवाह अधिकाधिक मजबूत करणं हा विचार त्यामागे आहे.
पद्मश्री
काकांना पद्मश्री मिळाली. यानिमित्ताने प्रसारमाध्यमांनी काकांच्या कामाबद्दल भरभरून लिहिलं आणि त्यांचं काम अनेकांपर्यंत वेगाने पोचायला मदत झाली. औत्सुक्याने काम पहायला अनेकांचे पाय गुरुकुलमकडे वळले. त्यात अजूनही खंड नाही. यातून एक झालं...कामातल्या आर्थिक विवंचना कमी झाल्या. लोकांची या विषयातली आस्था, जिज्ञासा वाढली. काकांसाठी पद्मश्रीमुळे झालेली ही उपलब्धी मोलाची. त्यातून या कामाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनेकांचे हात लागले. त्यापलीकडे हा बहुमान मिरवावा असं काही त्यांना वाटत नाही. इतकंच काय, दोन वेळा गुरुकुलममधल्या मुलांनी त्यांना न विचारता त्यांच्या कपाटातून हे पदक पहायला नेलं आणि आपल्याकडेच ठेवलं तरी काकांना त्याचा पत्ता नाही. लक्षात आल्यावरही त्यावरून मुलांना ओरडणं तर दूरच...त्यांचंच तर आहे हे पदक ही भावना! पद्मश्रीचं मोल वाढवणारी.
शेकडो वर्षांच्या विस्मृतीनंतर ज्ञानाची पुन:स्थापना करणं हे मुळातच आव्हानात्मक. एक प्रकारचं प्रवाहाविरूद्ध पोहणंच. पण काका आयुष्यभर तेच करत आल्याने त्यांच्यासाठी अशक्य नाही. आव्हानात्मक मात्र नक्कीच आहे. एका जागी स्थिर न राहिलेल्या या भटक्या जमातींचे अनेक प्रश्न आहेत. स्वत:चं घर नाही, जमीन नाही यापासून ते आधार कार्ड नाही असे प्रश्न तर आहेतच शिवाय आर्थिक विवंचनेपायी असलेले सगळेच प्रश्न आहेत. सगळे एकमेकांत गुंतलेले आहेत. ते एकेक करून सोडवणं आणि माणूस म्हणून अधिकाधिक गुणवत्तापूर्ण जगण्यासाठी सक्षम करणं यासाठी गिरीशकाकांसह तिथले शिक्षक आणि स्वयंसेवी वृत्तीने काम करणारे कार्यकर्ते गुंतले आहेत.
आज सुमारे साडेचारशे मुलं या निवासी गुरुकुलात शिकत आहेत. पहाटे पाचला उपनिषदं, भगवद्गीता, कबीराचे दोहे यांच्या नित्यपठणाने इथला दिनक्रम सुरू होतो. इथूनच या गुरुकुलाचं वेगळेपण लक्ष वेधून घेतं. ही मुलं शालेय अभ्यासाव्यतिरिक्त अनेक उपक्रमांत मग्न असतात. अवांतर वाचन तर सगळेच करतात त्याव्यतिरिक्त शिवणकाम, मातीकाम, वेल्डिंग यातही तरबेज होत आहेत. जेवणदायी आणि जीवनदायी शिक्षण देणारं, स्वावलंबनाबरोबरच उद्याचा उत्तम नागरिक घडविणारं हे गुरुकुल...हे गुरुकुल ज्यांच्या पिढ्यानपिढ्या कोणत्याही प्रकारच्या गुणवत्तापूर्ण जगण्यापासून वंचित राहिल्या अशांना घडवत आहे. त्यांच्यात मुळातच असलेली बुद्धिमत्ता जगासमोर यावी, ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावेतच पण त्यांच्याकडून या देशासाठी अत्युच्च योगदान दिलं जावं हे ही अपेक्षित आहे.
ध्येय उदात्त आहे आणि वाट अनेक आव्हानांनी भरलेली...काका एकीकडे मुलांच्या जगण्यालाही आकार देत आहेत आणि शिक्षकही घडवत आहेत...भटके आणि विमुक्त असलेल्या गिरीश काकांसारखी व्यक्ती वाट दाखवत असल्यावर हे ध्येय गाठणं शक्य आहे, याची खात्रीच आहे.
https://twitter.com/AshwineeMayekarमुंबई तरुण भारतमध्ये रविवार पुरवणी संपादक म्हणून पत्रकारितेला सुरुवात. दूरदर्शन- सह्याद्री वाहिनीवर वृत्त विभागात काम. गेली काही वर्षं साप्ताहिक विवेकची कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी. भारतीय स्त्री शक्ती तसेच ज्ञान प्रबोधिनी या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय सहभाग.