मराठी भाषेतील पहिली महिला कादंबरीकार
(20 जानेवारी 1861 - 30 जानेवारी 1948)
स्त्रीस्वातंत्र्याचाच नव्हे तर स्त्री-पुरुष समतेचा विचार मांडणारी महत्त्वपूर्ण विदुषी, असा सार्थ गौरव लाभलेल्या काशीबाई कानिटकर मराठी साहित्यात कादंबरी, चरित्र आणि कथा प्रकारात लेखन करणार्या पहिल्या मराठी लेखिका म्हणून गणल्या जातात. त्यांचा लेखनप्रवास विवाहापूर्वी निरक्षर असल्यापासून सुरू झाला आणि विवाहोत्तर साहित्यिक होण्यापर्यंत विकसित झाला.
विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी घेतलेली पहिली भारतीय महिला डॉक्टर, असं जिचं वर्णन केलं जातं, त्या आनंदीबाई गोपाळ जोशींवर 1889 सालीच, म्हणजे आनंदीबाई गेल्यानंतर अवघ्या दोनच वर्षांत चरित्रात्मक पुस्तक लिहिणार्या काशीबाई कानिटकर या मराठी सारस्वतात ओळखल्या गेल्या त्या पहिल्या कादंबरीकार म्हणून. 20 जानेवारी 1861 रोजी वडिलांची, म्हणजे अण्णासाहेब बापट यांची सातारा जिल्ह्यातील अष्टे या गावी बदली झाली असताना सरकारी मामलेदार कचेरीच्या वाड्यात एका अत्यंत सुखवस्तू व सुशिक्षित कुटुंबात काशीबाईंचा जन्म झाला. बापट कुटुंब मूळचे कोकणातील गोळफ गावचे; पण अनेक वर्षांपूर्वी ते वाईजवळच्या मेणवली गावी स्थलांतरित झाले होते. काशीबाईंचा जन्म तीन मुलींनंतर झाला असल्याने त्याचे अप्रूप कुणालाच नव्हते.
काशीबाईंची सख्खी आणि सावत्र आई या थोडेफार शिकलेल्या होत्या, लिहित्या-वाचत्या होत्या. वडील तर साक्षात मामलेदार होते; पण काशीबाईंना शाळेत घालण्याचा विचारच कुणी केला नाही. काशीबाईंचा स्वभाव दांडगट होता. त्या जे काही शिकल्या ते धाकट्या भावाकडून. घरात मुलामुलींना वेगवेगळे वागवले जात असे. त्याबाबत काशीबाईंनीच एके ठिकाणी लिहिले आहे, आम्हा मुलींना बसण्यास पाट नसत, जमीन ओली असेल तरच पाट मिळे; पण मुले पाटाशिवाय बसत नसत. चुकून मांडायचा राहिलाच तर एखाद्या बहिणीला आणून द्यावा लागे. आम्ही मुलीच्या जातीत जन्माला आलो, त्यामुळे आम्ही कमी प्रतीच्या, हे बहुधा देवानेच ठरवलेले असावे असे आम्हास वाटे.
काशीबाईंचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी पुण्यात राहणार्या गोविंदराव कानिटकर यांच्याशी झाला. कानिटकर कुटुंब मूळचं रत्नागिरी जिल्ह्यातील पालशेत गावचं. विवाह झाला तेव्हा गोविंदराव मुंबईत शिकत होते. काशीबाई सावळ्या होत्या, गोविंदराव गोरेपान आणि देखणे होते. त्यांचा जोडा जमला तो गोविंदरावांच्या आजोबांमुळे. आजोबा पूर्वी गंगाधरशास्त्री पटवर्धन यांच्याकडे नोकरीस होते. पटवर्धनांची सून पंढरपूरला देवदर्शनासाठी आली असताना तिने काशीला पाहिले, तिला ती पसंत पडली. पत्रिका जमल्या, लग्न ठरले. कानिटकरांपैकी कुणीही काशीबाईंना पाहिलेही नव्हते.
कानिटकर कुटुंबात नाराजी प्रकट होऊ लागल्यानंतर आजोबांनी सांगितले, मी कुल-शील-लौकिक-पत्रिका पाहून लग्न ठरवले. तुम्हाला सुंदर मुलगी हवी असेल तर तुमची तुम्ही शोधा. मी त्यांना नाही म्हणून सांगतो; पण एक लक्षात ठेवा, मी तुमच्या कामात पडणार नाही. मी पागोटे घालून घरातून निघून जातो कसा, पुन्हा येणारच नाही. आजोबांनी दिलेला हा दम सार्थ ठरला आणि विवाहविधी निर्विघ्न पार पडला. काशीबाई नुसत्याच अनुरूप नव्हत्या असे नव्हे, त्या शाळेतही गेलेल्या नव्हत्या. गोविंदरावांना ते खटकत होते; पण आजोबांपुढे त्यांचे काही चालले नाही. गोविंदरावांनी आपली नाराजी मित्रांशी बोलताना व्यक्त केली होती, ती काशीबाईंनी ऐकली आणि जेव्हा जेव्हा माहेरी जायची संधी मिळे, तेव्हा काशीबाई भावाकडून शिकू लागल्या, वाचू लागल्या. काशीबाईंचे पुस्तकी शिक्षण, इंग्रजी शिक्षण आणि सार्वजनिक समारंभात वावरायचे शिक्षण एकाच वेळी सुरू झाले.
काशीबाई प्रार्थना समाजात जात, पण तेही चोरून. घरी सासूबाई किंवा सासरे यांना न विचारताच जावे लागे. एकदा सदाशिव पांडुरंग केळकर यांनी समाजात येणार्या सर्व स्त्रियांना निबंध लिहून आणण्यास सांगितले. काशीबाईंनी ‘पृथ्वीची आकर्षण शक्ती आणि ग्रहण’ या विषयावर निबंध लिहून नेला. पुढच्या आठवड्यात केळकर यांनी पुन्हा एकदा सर्व स्त्री सभासदांना ‘पूर्वीच्या स्त्रिया आणि हल्लीच्या स्त्रिया’ या विषयावर निबंध लिहिण्यास सुचवले. काशीबाईंनी तोही लिहिला. सदाशिवरावांनी तो काशीबाईंकडून मागून घेतला आणि काशीबाईंना काहीही कल्पना न देता तो ‘सुबोध’ पत्रिकेत छापून आणला.
काशीबाईंच्या सासर्यांना तो आवडला नाही. अपराधाची शिक्षा म्हणून काशीबाईंच्या तोंडाला कुलूप ठोकण्यात आले. घरातील मंडळींचा काशीबाईंच्या या शिक्षणास-लेखनास विरोध होता; पण गोविंदरावांचे मात्र प्रोत्साहन होते. त्यांनी काशीबाईंना मराठी-इंग्रजीचे धडे देण्यास सुरुवात केली, पुस्तके आणून दिली. काशीबाई संस्कृतही शिकत होत्याच. गोविंदरावांची शिकवण्याची पद्धत फारशी उत्साहवर्धक नसावी, त्यामुळे काशीबाई रात्री-पहाटे अभ्यास करत. गोविंदराव-काशीबाईंना तीन मुलगे आणि तीन मुली झाल्या. वकिलीचा व्यवसाय फारसा न चालल्याने गोविंदरावांनी सब-जज्जची नोकरी धरली. त्यांच्या गावोगावी बदल्या होऊ लागल्या. नेवासात बदली झाली असताना 1886 साली काशीबाईंनी कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली. ‘मनोरंजन’ आणि ‘निबंधचंद्रिका’ या मासिकांतून 1892 सालापर्यंत त्या कादंबरीचे 36 भाग प्रकाशित झाले आणि 1903 साली ती कादंबरी पुस्तकरूपाने प्रकाशित झाली.
हरी नारायण आपटे यांचा आणि कानिटकर कुटुंबाचा घरोबा होता. हरी नारायण काशीबाईंना बहीण मानत. काशीबाईंनी आपले लेखन सुरू ठेवावे, असे प्रोत्साहनपर मार्गदर्शन हरी नारायणांनी केल्यानंतर काशीबाईंनी आपली कादंबरी पूर्ण केली. पुढे त्यांनी हरी नारायणांचे चरित्रही लिहिले आणि हरिभाऊंनी लिहिलेली पत्रे पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली. डॉ. आनंदीबाई जोशी यांचे पती गोपाळराव यांच्याशीही कानिटकर कुटुंबाचा घरोबा होता. त्यातूनच त्यांनी डॉ. आनंदीबाई जोशी यांचे चरित्र लिहायला घेतले आणि पहिली कादंबरी प्रकाशित होण्याआधी चार वर्षे पहिले चरित्रलेखन प्रकाशितही केले.
हरिभाऊ जसे 1919 ला गेले, तसेच गोविंदरावही 1919 साली गेले. 1870 ते 1918 असे 48 वर्षांचे वैवाहिक सहजीवन त्यांना लाभले. आपली पत्नी अशिक्षित आहे, सावळी आहे, या कारणासाठी तिला नाकारायला निघालेल्या गोविंदरावांनी पुढे तिची शिक्षण-लेखनातील प्रगती पाहून तिला भारत महिला परिषद, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदी ठिकाणी सहभागी व्हायला उत्तेजन दिले. काशीबाईंच्या मताला गोविंदराव मान देत असत. पुणे येथील ग्रंथकार संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून गेलेले गोविंदराव पत्नीलाही संमेलनात सहभागी करून घेत. एकाच घरात दोन बुद्धिमान साहित्यिक राहत असूनही त्यांनी परस्परांना आधार दिला. गोविंदरावांच्या मृत्यूनंतर काशीबाई बनारसला राहू लागल्या आणि बनारस हिंदू विद्यापीठात मराठी शिकवू लागल्या.
1921 साली त्यांनी आपले आत्मचरित्र लिहिले, जे 1975 साली सरोजिनी वैद्य यांच्या संपादकीय संस्कारानंतर पुन्हा प्रकाशित झाले. रमाबाई रानडे यांच्या बरोबरीने काशीबाईंनी सेवा सदनच्या कार्यात भाग घेतला. 1909 साली वसंत व्याख्यानमालेत गजानन भास्कर वैद्य यांच्या भाषणाला काशीबाई अध्यक्ष होत्या.वसंत व्याख्यानमालेतील भाषणाचे अध्यक्षपद स्त्रीने भूषवण्याची परंपरा तिथूनच सुरू झाली. 30 जानेवारी 1948 रोजी काशीबाई यांनी या जगाचा निरोप घेतला. अनेक क्षेत्रांत पहिलेपण मिरवणारी ही स्त्री नेमकी महात्मा गांधींच्या हत्येच्या दिवशीच निवर्तली, त्यामुळे तिच्या निधनाची जेवढी दखल घेतली जायला हवी होती तेवढी मात्र घेतली गेली नाही.