राजकारणात पूर्ण हयात गेलेल्या शरद पवारांना तडीपार कोणाला म्हणतात याची पूर्ण जाण असावी. तसेच, ज्या कारणासाठी अमित शहा यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने गुजरातेत प्रवेशबंदीची अट घातली होती ते मूळ कारण म्हणजेच घटनाही ज्ञात असावी.
मूळ पक्षाचे विभाजन होऊन हाती लज्जारक्षणापुरता उरलेला तोळामासा पक्ष, जे काही उरलेसुरले निष्ठावान बरोबर आहेत ते ही फारसे भरवशाचे नाहीत... त्यातच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण अपेक्षाभंग आणि हे कमी म्हणून की काय, भाजपा अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली सडेतोड टीका यामुळे बिथरलेल्या शरद पवारांनी शहा यांच्या टीकेला उत्तर देताना पायरी सोडली. त्यांनी जाहीरपणे अमित शहांना तडीपार म्हटल्याने सनसनाटी बातम्यांना चटावलेल्या काही वृत्तवाहिन्यांना खाद्य मिळाले असेलही पण, त्याने ना शरद पवारांचे भले झाले ना त्यांच्या विकलांग पक्षाचे.
निष्ठावंतांनी ‘जाणता राजा’ म्हणून त्यांचे कितीही देव्हारे माजवले असले तरी या उपाधीस ते पात्र नाहीत हे शरद पवारांनी या निमित्ताने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. भाजपच्या अधिवेशनात अमित शहा पवारांविषयी जे बोलले ते उघड गुपित होते. ‘1978 सालापासून शरद पवार यांनी दगाफटक्याचे राजकारण केले. ते 20 फूट खोल गाडण्याचे काम या विधानसभा निवडणूक निकालांनी केले,’ असे अमित शहा म्हणाले. या दोन्ही विधानांची महाराष्ट्राची जनता साक्षीदार आहे. वास्तविक शरद पवारांनी थोडे आत्मपरिक्षण केले असते तर त्यांना जाहीर नाही तरी, स्वत:च्या मनाशी याची कबुली देता आली असती. पण असे करण्याने ‘जाणता राजा’ या उपाधीला बट्टा लागेल असा भ्रम होऊन सडेतोड टीकेला सणसणीत प्रत्युत्तर देण्याच्या नादात अतिशय आक्षेपार्ह टीका त्यांनी केली.
राजकारणात पूर्ण हयात गेलेल्या शरद पवारांना तडीपार कोणाला म्हणतात याची पूर्ण जाण असावी. तसेच, ज्या कारणासाठी अमित शहा यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाने गुजरातेत प्रवेशबंदीची अट घातली होती ते मूळ कारण म्हणजेच घटनाही ज्ञात असावी. 23 नोव्हेंबर 2005ला गुजरातमधील गुंड आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हस्तक सोहराबुद्दिन शेख हा सपत्नीक प्रवास करत असताना गुजरात पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि त्यानंतर तीन दिवसांनी त्याचा चकमकीत मृत्यू झाला. हे प्रकरण सोहराबुद्दिनच्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेल्याने गुजरात सीआयडी आणि सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केली. या प्रकरणी संगमरवर व्यापार्यांच्या सांगण्यावरून अमित शहांनी सोहराबुद्दिनचे एनकाऊंटर घडवल्याचा आरोप होता. या चौकशीदरम्यान सीआयडीचे पोलीस निरिक्षक व्हि.एल.सोलंकी यांनी आपल्या जबाबात गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांचे नाव घेतले. तेव्हा अमित शहांनी आत्मसमर्पण केले आणि ओढवलेल्या प्रसंगाला निर्भीडपणे सामोरे गेले. सुमारे 3 महिने अमित शहांना कारावास भोगावा लागला. मात्र तीनच महिन्यांत त्यांची जामिनावर सुटका करताना सर्वोच्च न्यायालयाने दोन वर्षे गुजरातेत प्रवेशबंदीची अट घातली. त्यामागे सोहराबुद्दिन खटल्याची चौकशी निष्पक्ष व्हावी हा न्यायालयाचा हेतू होता. ती तडीपारी नव्हती. मात्र विरोधकांनी त्याचा स्वार्थी हेतूने ‘तडीपारी’ असा गवगवा केला. ही घटना 2010 मधली. पुढे 2012 साली न्यायालयाच्या रितसर परवानगीने अमित शहा यांनी गुजरात विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यात विजयीही झाले. 2014 मध्ये या खटल्याशी संबंधित सर्वांना सीबीआय न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. या नंतरही विघ्नसंतोषी लोकांनी विरोधात याचिका दाखल केल्या तरी त्यांना न्यायालयाने केराची टोपली दाखवली. हा या प्रकरणाचा धावता इतिहास. पवारांना तो पूर्णपणे माहीत असणारच. पण त्यांना हे ही ठाऊक आहे की, सर्वसामान्य जनता कुठे हे सर्व लक्षात ठेवून बसते. म्हणूनच जनता हा तपशील विसरली असण्याची शक्यता गृहित धरून त्यांनी तडीपारीचा मुद्दा वर काढला. त्यांच्या भजनी लागलेल्या वृत्तवाहिन्यांनी ही बातमी तेजीने चालवण्याचा प्रयत्न केलाही पण, त्यात अपेक्षित यश मिळाले नाही.
समाजमाध्यमांवरून आणि काही वृत्तवाहिन्यांवरून या संदर्भातल्या तथ्याचा आणि टीकेचा समोरून भडिमार होऊन या आरोपातली हवाच निघून गेली. आता आरोपाचा धुरळा खाली बसल्यावर जनतेच्या लक्षात राहणार आहे ती पवारांची कपटनीती आणि कावेबाजपणा.
पवारांची राजकीय कारकीर्द ऐन भरात असताना त्यांच्या हेलिकॉप्टरमधून कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची माणसे फिरत होती. ते मुख्यमंत्री असतानाच दाऊदचे साम्राज्य फोफावले. शेतकर्यांच्या जमिनी हडप करणारे बहुचर्चित लवासा प्रकरण हे देखील पवारांचेच कर्तृत्व. अशा अनेक प्रकरणात न्यायालयाने पवारांकडे बोट दाखवले आहे. थोडक्यात, पवारांची कारकीर्द अशा कारनाम्यांनी भरलेली आहे. असे असताना त्यांना ‘जाणता राजा’ म्हणून संबोधणार्या निष्ठावंतांची कीव करावी तितकी कमीच.
गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी गेल्या 5 वर्षांत अतिशय निधडेपणाने घेतलेले देशहिताचे निर्णय सर्वज्ञात आहेत. पवारही ते जाणून आहेत. पण गेली अनेक वर्षे पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत असलेल्या पवारांना या वास्तवाशी काही देणेघेणे नाही. आता सत्तासुंदरी त्यांच्या दृष्टीच्या पार पल्याड गेल्यावरही त्यांची अशी केविलवाणी धडपड चालूच आहे. म्हणूनच टीकेला प्रत्युत्तर देण्याची संधी त्यांनी साधली. मात्र आता काळ बदलला आहे आणि वेळही, हे जाणत्या राजाला समजलेच नाही.
‘अकेला देवेंद्र क्या करेगा?’ असे उद्दामपणे विचारणार्या मुलीचेच ते वडील आहेत. या प्रश्नाचे सणसणीत उत्तर या विधानसभा निवडणूक निकालांनी दिले आहेच. आता उरलासुरला पक्ष तरी बापलेकीने स्वकर्तृत्वाने कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे. त्याऐवजी अशी बेधडक, बिनबुडाची विधाने करण्यात जर धन्यता मानली तर तो पक्षही लवकरच सूक्ष्मदर्शकाखालीच शोधावा लागेल. जणू त्याच मार्गावर पवारांनी टाकलेले हे पुढचे पाऊल आहे....आत्मघाती पाऊल.