35 एकरांवरचा करवंद शेतीचा यशस्वी प्रयोग

विवेक मराठी    21-Sep-2024   
Total Views |
 
Karwand farming
 
हिंगोली जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी मधुकर पानपट्टे यांनी सुमारे 35 एकर क्षेत्रामध्ये रानावनात आढळणार्‍या करवंद शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या माध्यमातून ते वर्षाकाठी लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत. करवंदासारख्या दुर्लक्षित व काटक झुडुपवर्गीय फळपिकांतील हा राज्यातला पहिला यशस्वी प्रयोग मानला जात आहे.
ष्काळी मराठवाड्यात करवंदाची लागवड करणे ही अशक्य असलेली गोष्ट शक्य करून दाखविली आहे ती हिंगोली जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकर्‍याने. मधुकर पानपट्टे असे त्या शेतकर्‍याचे नाव. आपल्या अथक परिश्रमातून; जिद्द, चिकाटी आणि प्रयोगशीलतेतून बेभरवशाच्या शेतीला त्यांनी जी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे त्याची ही गोष्ट.
 
 
कळमनुरी तालुक्यातील कांडली या छोट्याशा गावात मधुकर पानपट्टे यांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झाला. ग्रामीण मातीच्या संस्कारातून पुढे आलेले हे व्यक्तिमत्त्व. लहानपणापासून अतिशय हुशार, कुशाग्र बुद्धिमत्तेचे. उमेदीच्या काळात ते एका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) कार्यरत होते; परंतु गावाकडची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. लहानपणापासून शेतीची आवड होतीच. कुटुंबाची साथ होती. नोकरीचा राजीनामा देऊन ते गावी परतले. घरच्या शेतीची जबाबदारी घेतली. निळ्या आभाळाखाली शेतशिवारात अनेक प्रयोग त्यांनी केले आहेत. ते शेतकर्‍यांना शेतीसाठी आवश्यक छोटीमोठी यंत्रे वा मोटारी पंप दुरुस्त करून द्यायचे. काही यंत्रे विकत आणण्याऐवजी स्वतःच विकसित करण्याकडे त्यांचा कल असायचा. तसेच त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग करीत चिकित्सक पद्धतीने शेतीत टप्प्याटप्प्याने बदल घडविण्याचा निर्णय घेतला. प्रथम पारंपरिक शेती पद्धतीचा अंगीकार केला; पण याद्वारे उत्पादन खर्च निघेना. आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक स्तरावर शेती क्षेत्रात होत असलेल्या स्थित्यंतराची माहिती घेऊन नव्याने शेती विकसित करण्याचा त्यांनी चंग बांधला.
 
 
Karwand farming
 करवंद उत्पादक शेतकरी मधुकर पानपट्टे
 
पुढे, पानपट्टे यांनी कांडली भागात काही जमीन विकत घेतली. या जमिनीत तीन-चार रानटी गुलाबी करवंदाची झाडे होती, ती त्यांनी तशीच ठेवली. काही वर्षांत फळधारणा झाली. ही आलेली पांढरी-गुलाबी करवंदे बाजारपेठेत नेऊन विकली. चांगला भाव मिळाला. या रानमेव्याला चांगला भाव मिळतो, तर याची शेती केल्याने आपल्या जीवनमानात सुधारणा होऊ शकते, या विचाराने त्यांनी करवंदाची शेती करण्याचा निर्णय घेतला. याखेरीज आधुनिक आणि स्मार्ट शेती करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होतेच. त्यांच्या करवंद शेतीची संकल्पना त्यांच्यासमोर आली. विशेष म्हणजे, करवंद बागेला ना कीड लागते ना रोग. फक्त रोपटे खरेदी करण्यासाठीच पैसे लागतात. त्यानंतर कुठेही एक रुपया खर्च करण्याची आवश्यकता नाही. शून्य उत्पादन खर्च असणारी करवंद शेती शेतकर्‍यांना तारणारी आहे. शिवाय चांगला पैसा देणारे हे पीक असल्याचा अनुभव पानपट्टे सांगतात.
 
 
गुलाबी करवंदाचा प्रयोग
 
 
2011-12 सालची गोष्ट. मधुकररावांना यशस्वी शेती व्यवसायाची नस सापडली. त्यांची कष्ट करण्याची क्षमता अफाट होती. शेतीचे परिपूर्ण ज्ञान त्यांनी अवगत करून घेतले. याचा धांडोळा घेऊन रखरखत्या उन्हात फळबागच काय, जिथे भाजीपाला घेणे शक्य नाही अशा भागात करवंद शेतीचा मार्ग पत्करला. करवंदाची रोपे आणली. अडीच एकरांवर करवंदाची लागवड करून व्यवस्थापन केले. त्यातील काही रोपे वेगळ्या वाणाची निघाली. त्या वेळी त्यांनी यासाठी आणखी अभ्यास करून स्वतः रोपांचे री-कलम केले.त्यांना त्यात यश मिळाले. त्यानंतर त्यांनी अडीच एकरांवर गुलाबी करवंदाच्या (कॅरिसा कारंडस) रोपांची लागवड केली. एकरी सरासरी साडेपाचशे रोपांची लागवड केली. एकरी 25 हजार खर्च आला. पहिली दोन वर्षे बागेची योग्य निगा राखली. रोपे मोठी होईपर्यंत पाणी दिले. तिसर्‍या वर्षी फळधारणा झाली. प्रति एकर 59 क्विंटल उत्पन्न मिळाले. याला बाजारात चांगला दर मिळाला.
 
 
पानपट्टे यांच्याकडे सध्या 35 एकरांवर पाच प्लांटमध्ये करवंद बाग पाहायला मिळते. पहिला प्लांट अडीच एकरांचा (लागवड वर्ष 13). दुसरा प्लांट हा एक एकरावर (आठ वर्षे) आहे. तिसरा प्लांट हा पाच एकरांवर आणि चौथा दोन एकर आणि पाचवा 15 एकर अशी एकूण 35 एकरांवर करवंदाची लागवड केली आहे. ही सर्व करवंदे चवीला आंबट, जांभळाच्या आकाराची आहेत. एका झाड सरासरी 32 किलो उत्पन्न देते. यास ना रासायनिक खतांची गरज आहे, ना कीटकनाशकांची. जून ते ऑगस्ट हा फळाचा हंगाम काळ असतो. याखेरीज या बागेत आंतरपीक म्हणून दोन एकरांवर पेरूची लागवड केली आहे. याद्वारे अधिकचे उत्पन्न मिळवत आहेत.
 

Karwand farming 
 
शेतकरी व व्यापार्‍यांच्या भेटी
 
 
पानपट्टे यांच्या करवंद शेतीची वार्ता मराठवाडा व आजूबाजूच्या जिल्ह्यांत पोहोचली आहे. शेतकरी भेटायला येऊ लागले. पानपट्टे सांगतात, “माझ्या करवंद शेतीचा शोध घेत जळगावचे एक व्यापारी (फूड प्रोसेसिंग- चेरी फॅक्टरी) माझ्या शेतावर आले. करवंदाची बाग बघून ते आनंदित झाले. व्यापारी म्हणाले, महाराष्ट्रात हे पीक घेतले जात नाही. आम्ही प. बंगाल, उत्तर प्रदेश या राज्यांतून करवंद आयात करतो. हे फळ आम्हाला महाराष्ट्रातच मिळणार असेल, तर उद्योगाच्या व दळणवळणाच्या दृष्टीने आम्हाला फायदेशीरच आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला दरवर्षी करवंदे मोठ्या प्रमाणात दिली तर तुम्हालाही यातून नफा मिळेल. इथूनच माझ्या करवंद शेतीच्या यशस्वितेला सुरुवात झाली. रूक्ष वाटणारी ही शेती घरबसल्या पैसे आणून देणारी ठरू लागली.”
पहिल्या वर्षी जळगावच्या व्यापार्‍याने 27 रुपये किलो दराने करवंदांची खरेदी केली. उत्कृष्ट दर्जाची उत्पादने आणि वेळेवर पुरवठा यामुळे पुढील वर्षात करवंदास मागणी वाढू लागली. एकरी दीड ते दोन लाख नफ्याची हमी मिळत गेली.
 
 
विक्रीचे नियोजन
 
पानपट्टे यांच्या करवंदाला इंदौर, जळगाव, हैदराबाद, कोलकाता आणि दिल्ली या महानगरांत ग्राहकांची मागणी आहे. विशेषतः गुलाबी करवंदांना उत्तर भारतातील व्यापार्‍यांकडून मागणी आहे. प्रक्रिया करून त्यापासून अवीट गोडीची कॅप्सूलच्या आकाराची चेरी तयार केली जाते. खाऊच्या मसालापानांतही त्याचा वापर केला जातो, त्यामुळे पानपट्टे यांना खास चेरीसाठी 200 टनांची ऑर्डर मिळाली आहे. सरासरी 50 ते 70 रुपये प्रतिकिलो दराने ते करवंदाची विक्री करतात.
 
 
Karwand farming
 
या शेतीतून 10 मजुरांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे, तर हंगाम काढणीकाळात रोज 100 मजुरांना रोजगार उपलब्ध होतो.
 
दिवाळीत करवंद प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी
 
चवीला आंबटगोड असलेले करवंद चेरीचे आरोग्याला बहुगुणी फायदे आहेत. आकाराने लहान आणि रंगाने लाल असलेल्या करवंदांत आरोग्यासाठी अनेक गुणकारी फायदे आहेत. यामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, मँगनीज, तांबे, लोह ही प्रमुख जीवनसत्त्वे आढळून येतात.
 
 
करवंदापासून चटणी, सरबत, केक, जॅम, ज्युस, केक यांसारखे अनेक पदार्थ बनवले जातात. बाजारपेठेतील मागणी, कच्च्या मालाची उपलब्धता लक्षात घेऊन पानपट्टे यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 या काळात करवंद प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
 
 
शून्य उत्पादन खर्च आणि उत्पन्नाची हमी असलेल्या करवंद शेतीचे महत्त्व शेतकर्‍यांना समजू लागले आहे. त्यासाठी राज्य-परराज्यांतील शेतकरी पानपट्टे यांच्याकडून सल्ला व मार्गदर्शन घेतात. दर्जेदार करवंद रोपाची निर्मिती करून शेतकर्‍यांना पुरविण्याचे कार्य पानपट्टे करतात.
 
 
मधुकर पानपट्टे यांच्या या प्रयोगशील शेतीची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचे हे कार्य तरुण शेतकर्‍यांना स्फूर्ती देणारे आहे.
 
 
करवंद शेतीचे स्वरूप
 * वाण - करवंद - पांढरा + गुलाबी
(सात प्रकारची वाणे असतात)
* फूल कालावधी - फेब्रुवारी ते जून
* फळ - गडद गुलाबी फळकाढणीसाठी योग्य
* फळकाढणी कालावधी - ऑगस्ट ते सप्टेंबर
* व्हिटॅमिन सी
* पीक अंतर - 4 बाय 16 फुटांवर लागवड
* खत - आवश्यकता नाही
* कीटकनाशक - कीटकांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही.
* पाणी - सुरुवातीची दोन वर्षे सोडल्यास पाण्याचीही आवश्यकता नाही
उत्पादने - जाम, जेली, लोणचे, टॉपिंग
 
संपर्क
मधुकर पानपट्टे
कांडली, ता. कळमनुरी, जि. हिंगोली
@89990 47269

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.