मेहेर मूस

विवेक मराठी    10-Aug-2024   
Total Views |
अंटार्क्टिकासह 180 देशांत फिरलेली
पहिली भारतीय महिला पर्यटक
(1944 - 8 मे 2024)
 
 
vivek
 
180 देशांच्या व्हिसाचे स्टँप मारून घेतलेले 18 पासपोर्ट सदैव बरोबर घेऊन ती फिरते. तिचं अधिकाधिक फिरणं विमानानं झालं; पण जगाच्या पाठीवरची सर्वाधिक लांबीची रेल्वेयात्रा करण्याची तिची इच्छा होती. भूलोकीचं सौंदर्य तिनं अनुभवलं; पण तारांगणात फिरून आकाशलोकीचं तारकासौंदर्य पाहण्याची मनीषा ती बाळगून होती. इतक्या वर्षांच्या प्रवासाचा आणि वाटेल ते खाण्याचा प्रकृतीवर परिणाम झालाच. मे 2024 मध्ये तिचं निधन झालं आणि जग एका असाधारण पर्यटकाला, फिरस्त्याला मुकलं.
 
पर्यटन हा तसा प्रत्येकाचाच आवडता छंद; पण प्रत्येकाची आवडती पर्यटनस्थळे वेगवेगळी. कुणी गडकिल्ले पायाखाली घालण्यासाठी आयुष्य वेचतो, तर कुणी पूर्व-पश्चिम किनार्‍यांवरची दीपगृहे पाहण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करतो. कुणी डॉक्टर अकरा महिने प्रॅक्टिस करून बारावा महिना मनाला येईल त्या ठिकाणी फिरण्याकरिता खर्च करतो, तर कुणी सारा देश पायाखाली घालायचा याच एका उद्देशानं पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण अशी पायी भटकंती करतो. कुणी देशाच्या सीमा ओलांडून पर्यटन करण्याच्या निमित्ताने अनेक देश फिरतो, तर कुणी देशांपेक्षा छोटीछोटी बेटं पाहणं पसंत करतो. कुणाला हे सारं प्रवासवर्णन तपशीलवार लिहायला आवडतं, तर कुणी समानधर्मी फिरस्ते शोधून त्यांची संघटनात्मक मोट बांधण्याचा प्रयत्न करतो.
 
 
असे प्रयोग करणार्‍या धाडसी-साहसी महिलांची, पुरुषांची वर्णने आपण वाचली असतील; परंतु आपल्या महाराष्ट्रात जन्मलेल्या, महाबळेश्वरजवळच्या पाचगणीत शालेय शिक्षण घेतलेल्या, त्यानंतर मुंबईतील सोफिया कॉलेजमधून बीए ऑनर्स आणि मुंबईच्याच गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केलेल्या मेहेर मूस या अंटार्क्टिकावर जाणार्‍या पहिल्या भारतीय महिला होत्या हे किती जणांना माहीत असेल?
 
 
मेहेर मूस या तब्बल 180 देश फिरलेल्या आणि त्या प्रवासाचे पुरावे म्हणून आपले 18 पासपोर्ट कायम जवळ मिरवणार्‍या मूळच्या मुंबईकर. अलीकडेच 8 मे 2024 रोजी त्यांचं निधन झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मेहेर यांना नोकरी लागली ती एअर इंडियात फ्लाइट अटेंडंट म्हणून. स्वाभाविकपणेच मेहेर यांना देशोदेशी फिरण्याची संधी त्यातून प्राप्त झाली. त्यातली सात वर्षं तर त्यांनी नैरोबी-जपान-न्यूयॉर्क मार्गावर काम केलं; परंतु थोड्याच दिवसांत त्यांची बदली ग्राऊंड स्टाफ म्हणून झाली आणि फिरणं बंद होऊ लागलं. मेहेर यांनी एअरलाइनच्या टुरिझम प्रमोशन डिपार्टमेंटला बदली करून घेतली आणि त्यानिमित्तानं त्यांचं विदेशात फिरणं पुन्हा सुरू झालं.
 
 
तब्बल 37 वर्षं मेहेर यांनी त्या डिपार्टमेंटला काम केलं. काही काळ त्या एअरलाइनच्या युरोपातील कचेर्‍यांमध्येही काम करत राहिल्या आणि निवृत्त झाल्यानंतर तर पर्यटन सल्लागार, वक्ता आणि पर्यटन लेखक म्हणूनही त्यांनी काम केलं. नोकरीकाळातील वाचवलेल्या रजा त्यांनी आर्थिक मोबदल्यात परावर्तित करून घेतल्या, सवलतीच्या दरात मिळालेली तिकिटे वाचवून त्यावर प्रवास केला आणि तेही पुरेसं झालं नाही तेव्हा कर्ज काढून प्रवास करत आपली प्रवासाची हौस भागवून घेतली.
 
 
एअर इंडियाच्या पर्यटन विभागात काम करत असताना तिला भारताचं बौद्ध सर्किट पूर्व आशियातील देशात लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करण्याचं काम देण्यात आलं. तिची नियुक्ती भगवान बुद्धांचं जन्मस्थान लुम्बिनीत करण्यात आली. त्याच निमित्तानं त्यांचं थायलंडमध्ये जाणं झालं. तिथे त्यांची भेट झाली तत्कालीन थाई राजाच्या बहिणीशी. तिच्या ओळखीतून ती दलाई लामांना भेटली, बौद्ध धर्माशी संबंधित अनेक कार्यशाळांमध्ये ती सहभागी झाली. चार वर्षांच्या तिच्या इटलीमधील नियुक्तीच्या काळात सायप्रस, बल्गेरिया, माल्टा आणि युगोस्लाव्हियासारख्या मध्य युरोपीय देशांत भारतीयांना पर्यटनाच्या संधी उपलब्ध करण्यात तिनं पुढाकार घेतला.
 
 
अशा अनेक नियुक्त्यांच्या निमित्तानं मेहेरनं जगातील अनेक असामान्य पर्यटनस्थळांना भेट दिली. त्यात जगाच्या पाठीवरच्या पर्वतरांगा होत्या; अ‍ॅमेझॉन, मिसिसिपी, यांगत्सेसारख्या महानद्या होत्या; मेलानेशिया आणि पोलिनेशियामधील बेटं होती; पण सारं जग जसं परिचित देशांच्या आणि खंडांच्या पर्यटनाचीच आस धरून असतं, तसं मेहेरचं नव्हतं. किंबहुना तिचं ध्येयच हे होतं की, जिथे कुणीही जात नाही, जे करत नाही, तिथे जायचं आणि ते ते धाडस तिथे जाऊन करायचं.
 
 
मेहेर एकही दिवस रजा किंवा साप्ताहिक सुटी न घेता काम करत राहायची आणि मग शिल्लक रजा सलग घेत लांबच्या प्रवासाला एकटीच निघून जायची. तिनं असा एक प्रवास केला आफ्रिकेमधून, मार्को पोलो मध्य आशियात ज्या मार्गावरून फिरला त्या मार्गावरून. अशाच एका प्रवासात तिची भेट झाली स्वीडिश अमेरिकन प्रवासी लार्स एरिक लिन्डब्लाडशी. त्यानं तिला आमंत्रण दिलं त्याच्याबरोबर अंटार्क्टिकावर चलण्याचं. त्यासाठी गरज होती आफ्रिकन व्हिसाची; पण तो काळ होता आफ्रिकेतील राजकीय उलथापालथींचा. कसाबसा तिनं पासपोर्टवर परवानगीचा शिक्का मारून घेतला; पण मादागास्करला जाणार्‍या तिच्या विमानात काही तांत्रिक दोष निर्माण झाला, तिला आपले प्लॅन बदलावे लागले आणि केप टाऊनमधून जहाज पकडून ती अंटार्क्टिकाला गेली.
 
 
भारतातील सर्व राज्यं आणि सर्व केंद्रशासित प्रदेश तर ती फिरलीच, भारतातील सर्व खाद्यपदार्थांच्या चवी तिने चाखल्याच; परंतु जगभरच्या प्रवासात तिनं बारा गावचंच नव्हे तर 180 देशांचं पाणी प्यायलं, तिथली फळं खाल्ली आणि अ‍ॅमेझॉनमध्ये फिरताना पेरूतील कीटक-कृमी घशाखाली उतरवले, बारा प्रकारची हरणं आणि मृग खाल्लेत, साप खाल्लेत. मिझोरममध्ये फिरताना मुंग्यांची चटणी खाल्ली आहे. कॅमेरूनमध्ये मुंगूस खाल्लं, माकडाचा मेंदू खाल्ला. पापुआ न्यू गिनिआमधील मगर खाल्ली. मेक्सिकोतील अळ्या खाल्ल्या, ग्रासहॉपर खाल्ले. नायजेरियात शेतात धुडगूस घालणारे महा-उंदीर खाल्ले. मेहेर उत्तम स्वयंपाक करत असे. जगभर फिरताना ती नुसते चविष्ट पदार्थ खात नसे, त्यांची रेसिपी शिकून संधी मिळेल तिथे त्या डिशेस बनवून इतरांना खायलाही घालत असे.
 
 
180 देशांच्या व्हिसाचे स्टँप मारून घेतलेले 18 पासपोर्ट सदैव बरोबर घेऊन ती फिरत राही. तिचं अधिकाधिक फिरणं विमानानं झालं; पण जगाच्या पाठीवरची सर्वाधिक लांबीची रेल्वेयात्रा करण्याची तिची इच्छा होती. भूलोकीचं सौंदर्य तिनं अनुभवलं; पण तारांगणात फिरून आकाशलोकीचं तारकासौंदर्य पाहण्याची मनीषा ती बाळगून होती. इतक्या वर्षांच्या प्रवासाचा आणि वाटेल ते खाण्याचा प्रकृतीवर परिणाम झालाच. मे 2024 मध्ये तिचं निधन झालं आणि जग एका असाधारण पर्यटकाला, फिरस्त्याला मुकलं.

सुधीर जोगळेकर

  सुधीर जोगळेकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत..