पितांबरीची शाश्वत फायदेशीर वृक्ष लागवड(मिलिया डुबिया, चंदन, रक्तचंदन, बांबू)

विवेक मराठी    20-Jul-2024   
Total Views |
आजच्या काळात शाश्वत पर्यावरणाबरोबरच शाश्वत शेतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शाश्वत उत्पन्न मिळवायचं असेल तर शाश्वत फायदेशीर वृक्ष लागवडीची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर पितांबरीने बांबू, चंदन, मिलिया डुबिया, रक्तचंदन आदी झाडांची लागवड केली आहे.
 
krushivivek
 
पितांबरीने ’बांबू’ या वनपिकाची यशस्वी लागवड केली असून त्याचे उत्पादनही येण्यास सुरुवात झाली आहे. या यशस्वी लागवडीमुळे पितांबरीमार्फत बांबूपासून विविध अगरबत्ती काड्यांची निर्मिती, रोपांसाठी आधारकाठीपासून ते बायोचारपर्यंत विविध प्रक्रिया केल्या जात आहेत. याबरोबरच महाराष्ट्रातील हवामानास अनुकूल अशा पाचहून अधिक बांबूंच्या प्रजातींची निवड करून त्यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. विशेष म्हणजे या बांबू रोपांची नर्सरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विक्रीदेखील केली जाते.
 
 
बांबू शेतीच्या यशस्वी प्रयोगांनंतर पितांबरीने वनशेतीवर भर देण्याचे ठरवले. यातूनच राजापूर तालुक्यातील ताम्हाणे येथे 11 एकरवर मिश्र वनशेतीचे मॉडेल उभारण्यात आले आहे. यासाठी डोंगरउतारावरील कमी सुपीक जमीन निवडण्यात आली असून यामध्ये मुख्य करून चंदन, रक्तचंदन व मिलिया डुबिया या व्यापारीदृष्ट्या फायदेशीर प्रजातींची निवड करून लागवड करण्यात आली. सद्यःस्थितीत 3000 चंदनाची झाडे, 1000 रक्तचंदन तसेच 1000 मिलिया डुबियाची लागवड करण्यात आली आहे.
 
 
पितांबरीने चंदनाच्या शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. चंदनाच्या शेतीसोबतच मोठ्या प्रमाणात चंदन रोपांची विक्रीसुद्धा केली जात आहे. विशेष सांगायचे झाल्यास एक लाखाहून अधिक चंदन रोपांची पितांबरी नर्सरीकडून विक्री करण्यात आली. त्यापैकी माणगा, सफेद चंदन यांसारखी एकूण 50 हजार रोपे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने पितांबरीकडून खरेदी केली आहेत.
 
 
चंदन ही एक परोपजीवी वनस्पती असल्यामुळे या रोपांच्या शेजारी एका यजमान झाडाची (Host Plant) आवश्यकता असते. यासाठी तुरीच्या रोपांची ’होस्ट प्लांट’ म्हणून लागवड केली गेली.
 
 
चंदनाची लाकडी सामग्री उच्च दर्जाची मानली जाते आणि याचा वापर सुगंधी तेल, साबण, अगरबत्ती, धार्मिक कार्ये आणि औषधांमध्ये होतो, तर रक्तचंदनाचे लाकूड त्याच्या लाल रंगामुळे आणि औषधी गुणधर्मांमुळे प्रसिद्ध आहे. याचा वापर फर्निचर, सजावटी सामान, औषधांमध्ये होतो.
 
 
krushivivek
 
चंदन आणि रक्तचंदन शेतीमध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळवता येतो. योग्य व्यवस्थापन आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवून या शेतीत यशस्वी होण्याची संधी आहे.
 
 
याबरोबरच रक्तचंदन, मिलिया डुबिया या वृक्षांची 610 फूट अंतराने ओळ पद्धतीने लागवड केली गेली. लागवडीच्या वेळी ’पितांबरी गोमय सेंद्रिय खताचा’ वापर करण्यात आला. लागवडीनंतर पहिले एक वर्ष मुबलक पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात प्रति झाड दिवसाला चार-पाच लिटर पाणी, तर हिवाळ्यात हेच पाणी दोन-तीन दिवसांच्या अंतराने देण्यात आले. यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो तसेच किडींपासूनही पहिले वर्ष योग्य निगा राखणे गरजेचे असते. यामध्ये सुरुवातीच्या काळात चंदन या रोपांमध्ये मर रोगाचे प्रमाण 5-10% पर्यंत असते तरी चंदन या रोपांचे गॅप फिलिंग त्वरित करणे गरजेचे असते. याव्यतिरिक्त मिलिया डुबिया व रक्तचंदन यामध्ये मर आढळत नाही.
 
 
मिलिया डुबिया ही अतिशय जलद वाढणारी वनस्पती आहे. मिलिया डुबियाचे लाकूड मऊ, टिकाऊ आणि हलके असते. याचा वापर पेट्रोकेमिकल्स, कागद आणि इतर अनेक उद्योगांमध्ये होतो. मिलिया डुबियाच्या पानांचा आणि फळांचा औषधी उपयोग केला जातो. त्यात अँटिऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. मिलिया डुबिया ही जमिनीची सुपीकता सुधारण्यास मदत करते. ती पडीक जमिनीवरही वाढू शकते. मिलिया डुबियाची झाडे 15 ते 20 मीटर उंच वाढू शकतात. त्यांची पाने एकाकी किंवा जोड्याने येतात आणि त्यांचा आकार अंडाकृती किंवा लहान त्रिकोणी असतो. फुले लहान, पांढरी किंवा गुलाबी असतात आणि त्यांचा वास सुगंधी असतो. फळे लहान, गोल आणि काळ्या रंगाची असतात.
 
 
 
अर्थशास्त्राचा विचार केल्यास चंदन आणि रक्तचंदनाच्या लाकडाची बाजारात मोठी मागणी असते. चंदन आणि रक्तचंदनाचे झाड साधारणतः 15 वर्षांनी काढले जाते. एका एकरमध्ये सुमारे 400 झाडांची लागवड करता येते. रक्तचंदनाच्या लाकडाची किंमत साधारणतः 3000/- ते 5000/- रुपये प्रति किलो असू शकते. एका एकरमध्ये लागवडीच्या 15 ते 20 वर्षांनंतर सुमारे दोन-तीन क्विंटल लाकूड मिळू शकते. म्हणजेच एकूण विक्री किंमत साधारणतः दोन-तीन कोटी रुपये होऊ शकते.
 
 
मिलिया डुबियाचा विचार केल्यास एकरी 400 रोपे लागतात. पाच-सहा वर्षांत यांचे सरासरी 10 ते 12 क्विंटल वजनाचे लाकूड एका झाडापासून आपल्याला मिळते. याचा सध्याचा दर सरासरी 400/- ते 500/- रुपये प्रति क्विंटल इतका आहे. तरी एकरी किमान 16 लाखांपर्यंत आपल्याला सहज उत्पन्न मिळू शकते; परंतु याची लागवड किमान एक एकर असणे गरजेचे आहे.
 
 
वनपिकांची लागवड खासगी जागी करता येते का? त्याची कापणी करता येते का? यामध्ये वन विभागाचा हस्तक्षेप असतो का? असे या पिकांच्या लागवडीबाबत शेतकर्‍यांच्या मनात अनेक संभ्रम असतात. तरी या पिकांच्या लागवडीवेळी केवळ पीक-पाणी योजनेतून जून-जुलै महिन्यात आपल्या सातबारामध्ये ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी व काढणीच्या वेळी ही नोंदणी वन विभागाला दाखवल्यास त्यांच्याकडून आपणास परवानगी मिळते व कोणताही कायदेशीर अडथळा येत नाही.
 
 
पितांबरी नर्सरीमध्ये चंदन, रक्तचंदन, मिलिया डुबिया, बांबूबरोबरच इतर सर्व प्रकारची वनशेतीची खात्रीशीर रोपे मिळतात. आपण वनशेती करण्यास इच्छुक असल्यास वरील सर्व रोपे आपल्याला पितांबरी नर्सरीतून उपलब्ध होऊ शकतात. तेव्हा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धन व आर्थिक समृद्धी या दुहेरी फायद्याचा नक्कीच लाभ घेतला आहे.
 
 
या लेखावर वाचकांच्या प्रतिसादाचे स्वागत असून आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमाकांवर संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 9820979166, 8383864818, 8779858835
Website: www.pitambari.com

रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.ची सुरुवात 1989 मध्ये श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री वामनराव प्रभुदेसाई यांनी लहान घरगुती व्यवसाय म्हणून केली होती. ती हळूहळू एक आघाडीची उत्पादन आणि विपणन कंपनी बनली आहे. होमकेअर डिव्हिजनमध्ये एफएमसीजी उत्पादनांसह सुरुवात करून, आता संस्थेकडे एकाच छताखाली 10 विभाग आहेत उदा; होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्रीकेअर, फूडकेअर, सौर, धूप, परफ्युमरी, डिजीकेअर, कृषी पर्यटन आणि निर्यात विभाग.