सामाजिक परिवर्तनाचा एक ऐतिहासिक लढा

विवेक मराठी    11-Jun-2024   
Total Views |
 
vivek
 
श्रीक्षेत्र पंढरपूरचे, महाराष्ट्राचे हृदय संबोधले गेलेले श्री. विठ्ठल मंदिर हरिजन बांधवांसाठी खुले होण्यासाठी, थोर देशभक्त साने गुरुजींनी केलेल्या प्राणांतिक अन्न सत्याग्रहाच्या यशस्वी आंदोलन पर्वाचा इतिहास, हा महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण चळवळीतील, सामाजिक परिवर्तनाचा एक ऐतिहासिक लढा आहे.
 
 
खरं तर साने गुरुजींच्या मंदिरमुक्ती लढ्याला ज्या सनातन्यांनी प्रखर विरोध केला त्या गटाचे मुख्य, वैचारिक मार्गदर्शक पंडितप्राण भगवानशास्त्री धारुरकर यांचे घर आमच्याच गल्लीत आमच्या घराजवळच होते. त्यांच्याच घरात सनातन्यांनी कलश विठोबाची स्थापना केली होती. कलश विठोबा म्हणजे हरिजन प्रवेशाने विठ्ठलाची मूर्ती बाटण्यापूर्वी मूर्तीतील देवत्व-तेज, मंत्राद्वारे काढून जलरूपात संचित केलेला एक तांब्या-कलश. हरिजन मंदिरप्रवेशाने देव बाटला आहे, असा भ्रम असलेली सर्व सनातन मंडळी तेथे नित्य दर्शनास येत होती. या कलश विठोबाचा दरवर्षी ठरावीक तिथीला वाढदिवस समारंभपूर्वक भजन, प्रवचन, कीर्तनाद्वारे आमच्या गल्लीत मोठा मांडव घालून साजरा होत असे. (पण पुढे तो बंद झाला.) या कलश विठोबाच्या स्थापनेमागचा इतिहास मला लहानपणी माहीत नव्हता, तो 1972 सालच्या विठ्ठलमुक्ती रौप्य महोत्सवानिमित्तच्या कार्यक्रमातून कळला. कलश विठोबाची स्थापना म्हणजे भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणत पारमार्थिक समतेसाठी चंद्रभागेच्या वाळवंटात क्रांतीचा झेंडा फडकवणार्‍या सकल संतांच्या उदार मानवधर्मी उपदेशाच्या विपरीतच नव्हे तर विरोधी, अत्यंत संकुचित कृती होती. साने गुरुजींनी हरिजनांसाठी मंदिरमुक्तीचा लढा पुकारून संतांच्या मानवधर्मी उपदेशाचाच उद्घोष केला होता. संतांनी व्यक्त केलेले पारमार्थिक समतेचे उदात्त विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा साने गुरुजींनी भीमपराक्रम केला. मुखी संतांचा उदात्त विचार आणि कृती, आचार माणुसकीविरुद्ध, अशा दांभिकांवर साने गुरुजींनी कठोर शब्दांत प्रहार केले नाहीत तर मातृहृदयी तळमळीने आर्जव केली, विनवणी केली, आवाहन केले, हीच साने गुरुजींची थोरवी. गुरुजींना समाज द्वेषाने तोडायचा नव्हता तर जोडायचा होता. सामाजिक कटुता-सामाजिक द्वेष न वाढता सद्भावनेने मंदिरमुक्ती व्हावी अशी त्यांची तळमळ होती.
 
 
सामाजिक लढ्यातील नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी साने गुरुजींपासून खूप काही शिकण्यासारखे आहे. अनेक शतके, अनेक पिढ्या चालत आलेल्या कालबाह्य प्रथा, परंपरांबद्दल विद्यमान पिढीतील बडवे-उत्पात यांना कोणताही दोष न देता, शिव्या न देता ही कालबाह्य प्रथा स्वतःहून दूर करा, असे साने गुरुजींनी कळकळीने आर्जवी आवाहन केले. संघर्षापेक्षा संवादावर भर देण्याचा त्यांचा मार्ग होता. साने गुरुजींच्या यशस्वी लढ्याचा, विशेषतः परिवर्तनवाद्यांनी अभ्यास करून योग्य तो बोध-धडा घेतला पाहिजे. साने गुरुजींचा हा लढा निरंतर प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे.
 
 
 
पुस्तक खरेदी करण्यासाठी 

भेटवा विठ्ठला

https://www.vivekprakashan.in/books/bhetwa-vithala/
 
 
 
विवेक प्रकाशित भेटवा विठ्ठला या पुस्तकातील सर्व घटना, प्रसंग आणि वक्तव्ये ही काल्पनिक नसून शंभर टक्के सत्य व त्या त्या वेळी प्रसिद्ध वृत्तपत्रांतील, विशेषतः साप्ताहिक गोफणमधून घेतलेली आहेत. त्यातील अनेक मान्यवरांची वक्तव्ये आजही थक्क करणारी खेदकारक आहेत. काही वक्तव्यांतील भाषा असंसदीय - असुसंस्कृत वाटली तरी ती वक्तव्ये तशीच केली गेली होती हे सत्य आहे. विशेषतः शंकराचार्यपदासारख्या धार्मिक नेत्यांची अशी भाषा आजही खेदकारक वाटते. असो. आता हा इतिहास आहे. काहींना तो आठवणे त्रासदायक असू शकतो.
 
 
देव बाटला, मंदिर भ्रष्ट-अपवित्र झाले म्हणून 1947 साली पंढरीतील ज्या काही वारकरी महाराज मंडळींनी मंदिरावर बहिष्कार टाकला होता, त्यांना पुढे आपली चूक लक्षात आली व त्यांनी समारंभपूर्वक मंदिरप्रवेश करून विठ्ठल दर्शन घेतले, ही गोष्टी मुद्दाम नमूद करण्यासारखी आहे. त्यांच्या या कालसापेक्ष सामाजिक बदल स्वीकारण्याच्या भूमिकेचीही दखल सामाजिक परिवर्तनाच्या टप्प्यातील एक प्रमुख घटना आहे.
 
 
साने गुरुजींनी या लढ्याचे यश-श्रेय स्वतःकडे न घेता, ते श्रेयापासून कटाक्षाने दूर राहिले, हे त्यांचे मोठेपण त्यांच्या आत्मविलोपी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन आहे. ना त्यांनी जागोजागी स्वतःचे सत्कार करून घेतले, ना यशाचे ढोल पिटवत दौरे केले. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजींचा खरा संत म्हणून गौरव केला तो योग्य व समर्पक आहे. संतांचे कार्य ना श्रेयासाठी असते, ना सत्कारासाठी, ना पुरस्कारासाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभुती।
 
 
साने गुरुजींच्या या पंढरपूरमधील प्राणांतिक उपोषण सत्याग्रहाकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे लक्ष होते. अस्पृश्यता हा समाजावरील कलंक आहे, तो कायद्यांपेक्षा स्वेच्छेने दूर झाला पाहिजे, अशा मताच्या देशभरातील लोकांचे लक्ष या लढ्याकडे होते. विठ्ठलमंदिर हरिजनांसाठी खुले होेणे, मुक्त होणे हे एक प्रातिनिधिक साधन होते. साने गुरुजींना सेनापती बापट यांनी दिलेली खंबीर साथही मोलाची होती. विशेष योगायोगाची गोष्ट म्हणजे या दोेघांचेही नाव पांडुरंग होते (पांडुरंग सदाशिव साने, पांडुरंग महादेव बापट). साने गुरुजींना महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांचा व संस्थांचा पाठिंबा होता तसेच पंढरपुरात स्थानिक पातळीवर माजी आमदार बाबूराव जोशी, काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव बडवे, हिंदू महासभेचे शंकरराव बडवे आणि कोळी समाजाचे नेते श्री. ग.सा. तथा गणपतराव अभंगराव यांची भरभक्कम सक्रिय साथ होती. गणपतराव अभंगराव हे सत्याग्रहकाळातील अनेक सभांचे अध्यक्षच होते. हा एक शुभसंकेत होता, कारण अभंगराव हे कोळी समाजाचे नेते होते आणि कोळी समाज हा चंद्रभागेच्या वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिराचा सर्वेसर्वा, वहिवाटदार - पुरोहित समाज होता. पंढरपूरच्या स्थलमाहात्म्यात, इतिहासात पुंडलिकाचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे, कारण पुंडलिका भेटी परब्रह्म आले अशी आख्यायिका आहे.
 
 
गणपतराव कोळी (अभंगराव) हे आमच्या वडिलांचे (माधवराव ताठे गुरुजी) घनिष्ठ स्नेही होते. ताठे-अभंगराव असे आमचे कौटुंबिक संबंध होते. त्यांचे नाव गणेश असले तरी सर्व जण त्यांना गणपतराव म्हणूनच संबोधत. काही जण दादा म्हणत. त्यांचे आमचे घरी नियमित येणे-जाणे होते. त्यांचे महाराष्ट्र निवास नावाचे लॉज होते व पंढरीत येणारे नाटक-चित्रपटांतील कलावंतांचे ते माहेर होते. स्वतः गणपतराव अभंगराव हे नाटकवेडे व कलावंत होते. त्यांनी सामाजिक कार्याच्या मदतीसाठी अनेक नाटके बसवून त्यात भूमिका केल्या होत्या. साने गुरुजींच्या कार्यास निधी जमविण्यास, 9 ऑगस्टच्या क्रांतिदिनी पंढरपुरात आचार्य अत्रे लिखित कवडीचुंबक नाटक त्यांनी बसवले होते व त्यात पंपूशेठ ही मुख्य भूमिकाही गणपतराव अभंगराव यांनी केली होती. ते माजी नगराध्यक्ष व ऑनररी मॅजिस्ट्रेट होते. अशा या आमच्या कै. गणपतकाकांच्या पुण्यस्मृतीस माझे हे अक्षरपुष्प अर्पण करण्यास मला विशेष आनंद होतो.
- विद्याधर ताठे

विद्याधर मा. ताठे

संत साहित्याचे अभ्यासक असून, एकता मासिकाचे माजी संपादक आहेत.