लोकार्पन

भावड्याची चावडी

विवेक मराठी    29-May-2024   
Total Views |
पप्या लाडंलाडं म्हन्ला. त्यावं सोनीमावशीणं तेच्या गालावं यावड्या जोरात पंजा उमटवला का त्या झटक्याणं पप्याची माण तीन-चारदा गरागर फिरली आनि त्येची केसंच वाळून ग्येली.. “जा.. चांगली कापडं घाल आन् तय्यर हू..!” पप्या टावीलमदी झुरळ शिरल्यागत पळाला. हिकडं पिंकी “मम्मे, लगीच बलिवलंय. पावनं जमल्यात..!” सांगत आली तशी सोनीमावशी म्हन्ली, “डांबरीवं जाऊन रिक्षा थांबीव. म्या आलीच पप्याला घिऊण.”
 

satire article 
 
 अर्कचित्र - अमोघ वझे 
 
“पप्या, पयल्यांदा हिकडं यं..!” सोनीमावशीनं आवाज टाकला तसा आंगनात कुत्र्यांचं बिस्कीट चोरून खात आसल्याला पप्या टरकून सोनीमावशीफुडं यून हुबा र्‍हायला. “आंगूळ क्येलीस..!?” सोनीमावशीणं जरब्येनं इच्यारलं. “कवाच..!” पप्याच्या त्वांडातून शबूद घरंगळले. “कालची न्हाय आजची इच्यारतीय म्या.” सोनीमावशीनं चोरी पकड्याली म्हनल्यावं पप्याणं जीभ भाईर काडून डोळा मारला आनि सदर्‍याचं टोक बोटानं पिरगटून पायाच्या आंगट्याणं जिमिनीचे पोपडे काडाय लागला. सोनीमावशीणं पप्याचा कान पिरगटून त्येला मोरीत कोंबला. माजघराच्या दाराआड लपून ह्यो तमाशा बगनार्‍या पिंकीला ‘पिंके, संज्याला मोबाइल लाव आन् तय्यारी कुठवर आली इच्यार आनि फ्रॉक बदलून घी.. निगायाचं हाय..!’ आसा हुकूम सोल्डा. पिंकी फोन लावस्तवर पप्या कावळ्याची आंगूळ आटपून टावील लावून सोनीमावशीसमूर यून हुबा र्‍हायला. “मम्मे, दूकू पुशून दी ना..!” पप्या लाडंलाडं म्हन्ला. त्यावं सोनीमावशीणं तेच्या गालावं यावड्या जोरात पंजा उमटवला का त्या झटक्याणं पप्याची माण तीन-चारदा गरागर फिरली आनि त्येची केसंच वाळून ग्येली.. “जा.. चांगली कापडं घाल आन् तय्यर हू..!” पप्या टावीलमदी झुरळ शिरल्यागत पळाला. हिकडं पिंकी “मम्मे, लगीच बलिवलंय. पावनं जमल्यात..!” सांगत आली तशी सोनीमावशी म्हन्ली, “डांबरीवं जाऊन रिक्षा थांबीव. म्या आलीच पप्याला घिऊण.”
 
 
हिकडं ‘धी गावटी चानक्य मल्टिफर्फझ ष्टेडेम’च्या बाँकेट हॉलमदी तीस-चाळीस टाळकी बसल्याली. संज्याणं बरफ टाकून कूलर सोल्ड्याले. टाइमपासला कोल्ड्रिंक्स वाटल्याली. त्यामुळं मंडळी गारेगार हून बसल्याली. सोनीमावशीची रिक्षा डायरेक हॉलच्या दारात यून थांबली तशी पब्लिकणं म्हागं वळून पाह्यलं. पयले सोनीमावशी उतारली. तिच्या म्हागनं पांडर्‍या कपड्यातला, त्येल लावून भांग पाडल्याला, त्वांड पांडरं पडस्तवंर पावडर थापल्याला, नवे कोरे शँडल घाटल्याला पप्या भाईर आला. चलत चलत लोकांसमूर यून थांबला तशी पब्लिकमदी कुजबुज सुरू जाली. ती ह्येरूण संज्याणं माइक हातात घेटला आनि बोर मारायला सुर्वात क्येलीं.. ‘जमलेल्या माज्या तमाम..’ ह्ये आयकून सोनीमावशीनं संज्याच्या पायावं जोरात पाय धिला. त्यो दर्द लपविता लपविता संज्याच्या च्येरा लालेलाल जाला. येक म्होट्टा औंढा गिळूण “फुडील सूत्र सोणीमावशींकडं सोपवतो..” यवडंच कसंबसं बोलूण सोनीमावशीच्या कानाला लागून ‘घाला गोंधूळ..!’ आसं कुजबजूण माइकसमुरणं गायप जाला..
 
 
सोनीमावशीणं माइकसमूर जाऊन येक म्होट्टा स्वास घेटला तसा हॉलच्या भाईर हुब्या आसल्याल्या घारुआन्नाची कमेंटरी सुरू जाली.. ‘हिला आत्ताच स्वास लागला कायनू. आजून लै बगायाचं हाय म्हनावं..!’ आत सोनीमावशी इमोशनल टाकीत हुती. “आमच्या आत्याबै न्हेमी म्हनायच्या ह्यो आमचा पप्या घरान्याचं नाव म्होट्टं करनार..! ल्हान आसताणी त्येणं आज्जीच्या कडंवर बसूण पंचायतीच्या लै वार्‍या क्येलेल्या हैत. तवाधरनं त्यो राजकारनाच्या शेत्रातच खातूय पितूय..!” पिंकी मदीच पचाकली.. “मम्मे, त्ये आपलं मंगळसुत्राचा ठरल्याला ड्वायलाक मार ना लौकर, म्या रडन्यासाटी णवा कोरा रुमालबी आनलाय..!” सोनीमावशीणं तिला डुळ्यांनीच गप करत फुडं बोलाया सुर्वात क्येली.. “म्या सोत्ता माजं मंगळसूत्र या गावासाटी कुहुर्बाण क्येलंया..!”
 
सोनीमावशीच्या त्वांडातनं ‘कुहुर्बाणी’ आयकूण ‘कुहुर्बाणी कुहुर्बाणी कुहुर्बाणी’ गान्यावं नाचायचा पप्याचा इच्यार हुता ह्ये न्येमकं ह्येरूण सोनीमावशीणं डुईवरचा पदर सारका क्येल्याणं पप्या गबसला. “तर आज म्या ह्यो माजा मुलगा, जो की माष्टर पप्पू, तुमा जन्तेला मी आर्पन करते. येचा सांबाळ करा. येला पदरात घ्या..!” सोनीमावशी ह्ये बोलत आसतानी पप्या समुरच्या भित्ताडावंच्या पालीकं बगत हुता.. तिनं हाळूच जाऊन चिलाट धरलं तसा खुश हून पप्याणं टाळी हानली. त्येची टाळी आयकून पब्लिकणं बी टाळी हानली.
 
 
“जो येतुय त्यो माज्या पोराला/पोरीला सांबाळा म्हनतूय. त्यो आद्याचा आजाबी ह्येच म्हन्ला- माज्या पोराला सांबाळा. घ्येतला आद्याच्या बापाला उरावं आडीच वरीस. तिकडं सुप्रीचा बाप बी आसंच म्हनतुया. हिकडं ही बया पप्याला सांबाळा म्हनतीया. मायला, पब्लिकणं काय पांजरपोळ उघडलाय का काय नू..!?” घारुआन्ना ब्येंबाटलं.. “तुजा पोरगा तुला नगं जाला आसंन तं द्येवाला सोड. आमच्या उरावं नगं घालूस..!’ सेवटलं वाक्य सोनीमावशीला आयकू जाईन येवड्या जोरात बोलूण घारुआन्ना फष्ट्रेशनमदी तितनं निगालं. ‘धी गावटी चानक्य मल्टिफर्फझ ष्टेडेम’च्या बाँकेट हॉलमदी खोट्या रडन्याचा आनि इमोशनल आत्याचाराचा अंक सुरू झाल्ता. सोनीमावशी रडून दावत हुती आन् पब्लिक मजा घेत हुती..!

केदार दिवेकर

केदार अच्युत दिवेकर
व्यावसायिक संगीतकार म्हणून १४ वर्षे कार्यरत.
 
‘मीरा’ या आगामी मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत अशा जबाबदाऱ्या सांभाळणारा कलाकार.