इथे ओशाळली नैतिकता!

विवेक मराठी    22-May-2024   
Total Views |
app
 
 स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी अतिशी यांच्यापासून संजय सिंह यांच्यापर्यंत ‘आप’च्या काही नेत्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी आपण यावर काही भाष्य करावे आणि भूमिका स्पष्ट करावी, अशी इच्छा नैतिकतेचा टेंभा मिरविणारे अरविंद केजरीवाल यांना झालेली नाही. त्यांचे हे मौन संशय वाढविणारे आहे. केजरीवाल यांची अनेक रहस्ये विभव कुमार यांना ठाऊक असल्याने केजरीवाल यांचे हात दगडाखाली अडकले आहेत आणि त्यामुळे ते विभव कुमार यांच्यावर कारवाई करण्यास कचरत आहेत, असा गंभीर आरोप मालीवाल यांनी केला आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात मूलभूत प्रश्न बाजूला पडता कामा नये. तो म्हणजे मालीवाल यांना मारहाण का करण्यात आली आणि ती करणार्‍यावर ‘आप’ने तातडीने काही कारवाई का केली नाही? एक खरे; अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने ‘आप’ची पुरती शोभा झाली आहे.
 
 
आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी केलेली मारहाण केवळ आक्षेपार्ह नाही तर निषेधार्ह आहे. हा वाद ‘आप’मधील अंतर्गत वाद आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा प्रश्न महिलांच्या प्रतिष्ठेचा आहे आणि म्हणूनच या प्रकरणाची दखल घ्यायला हवी. मालीवाल यांना झालेल्या या मारहाणीनंतर विभव कुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. हे सगळे भाजपाचे कारस्थान असल्याचा कांगावा ‘आप’ने केला आहे. त्या पक्षाच्या नेत्या अतिशी यांनी मालीवाल यांचा वापर भाजपा प्याद्याप्रमाणे करीत आहे, असे म्हटले आहे. याच वर्षीच्या प्रारंभी दिल्लीतून राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत ‘आप’च्या तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यातील ज्या नावाने देशाचे लक्ष वेधले गेले ते स्वाती मालीवाल यांचे होते. वयाच्या चाळिशीच्या उंबरठ्यावर असताना मालीवाल यांना खासदार होण्याची संधी ज्या पक्षाने दिली तोच पक्ष आता मालीवाल यांची पाठराखण न करता त्यांना भाजपाचे प्यादे ठरवीत आहे. अतिशी यांच्यापासून संजय सिंह यांच्यापर्यंत ‘आप’च्या काही नेत्यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी आपण यावर काही भाष्य करावे आणि भूमिका स्पष्ट करावी, अशी इच्छा नैतिकतेचा टेंभा मिरविणारे अरविंद केजरीवाल यांना झालेली नाही. त्यांचे हे मौन संशय वाढविणारे आहे. केजरीवाल यांची अनेक रहस्ये विभव कुमार यांना ठाऊक असल्याने केजरीवाल यांचे हात दगडाखाली अडकले आहेत आणि त्यामुळे ते विभव कुमार यांच्यावर कारवाई करण्यास कचरत आहेत, असा गंभीर आरोप मालीवाल यांनी केला आहे. या आरोप-प्रत्यारोपांच्या वातावरणात मूलभूत प्रश्न बाजूला पडता कामा नये. तो म्हणजे मालीवाल यांना मारहाण का करण्यात आली आणि ती करणार्‍यावर ‘आप’ने तातडीने काही कारवाई का केली नाही? एक खरे; अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने ‘आप’ची पुरती शोभा झाली आहे.
 

app 
 
या प्रकरणाच्या खोलात जाण्यापूर्वी विभव कुमार आणि स्वाती मालीवाल कोण हे पाहणे आवश्यक. याचे कारण त्यानेच त्यांच्यातील वादाचे गांभीर्य समजू शकेल. 43 वर्षीय विभव कुमार यांनी दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्याप्रमाणेच पत्रकारितेचे पदविका शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया प्रभृतींनी ‘कबीर’ या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली होती तेव्हापासून विभव कुमार केजरीवाल यांच्याशी जोडले गेले. नोएडा येथील एका शैक्षणिक संस्थेतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या स्वाती मालीवाल यांनी काही काळ खासगी कंपनीत काम केले; मात्र त्यास लवकरच रामराम ठोकत त्या ‘परिवर्तन’ संस्थेत काम करू लागल्या. ही स्वयंसेवी संस्था 2000 च्या दशकात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह दिल्लीतील काही नागरिकांनी स्थापन केली होती. केजरीवाल यांच्या संपर्कात मालीवाल त्या वेळी पहिल्यांदा आल्या. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली 2011 साली दिल्लीत भ्रष्टाचारविरोधी आंदोलन झाले, त्यात केजरीवाल यांच्यासह या दोघांचा सक्रिय सहभाग होता. आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर हजारे राळेगणला परतले, तर केजरीवाल यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी राजकारणात प्रवेश केला आणि ‘आप’ या पक्षाची स्थापना केली. या सगळ्या प्रवासात मालीवाल आणि विभव कुमार केजरीवाल यांची साथ करीत होते. दिल्लीत ‘आप’चे सरकार सत्तेत आल्यानंतर केजरीवाल यांनी विभव कुमार यांना आपले स्वीय सचिव नेमले, तर मालीवाल यांना दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविली. 2020 साली केजरीवाल यांनी विभव कुमार यांना पुन्हा सचिवपदी नेमले, तर मालीवाल यांना महिला आयोग अध्यक्षपदाची 2018 आणि 2021 अशी दोनदा मुदतवाढ दिली. तात्पर्य, विभव कुमार काय किंवा मालीवाल काय, हे दोघे केजरीवाल यांचे अनेक वर्षे सहकारी आहेत. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी एकत्रितपणे काम केले आहे.
 
 
app
 
मुख्यमंत्री निवासस्थानी घडलेल्या घटनेची पक्षाने दखल घेतली आहे आणि विभव कुमार यांच्यावर कठोर कारवाई होईल, अशी ग्वाही ’आप’चे नेते संजय सिंह यांनी दिली होती. असे असताना प्रत्यक्षात मात्र केजरीवाल यांनी ती करणे टाळले आणि अतिशी यांच्यासारख्यांनी मालीवाल यांनाच लक्ष्य केले. परिणामतः विभव कुमार यांच्यावर कारवाई होईल, या अपेक्षेने सुरुवातीस शांत बसलेल्या मालीवाल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीच; पण सगळा घटनाक्रम विस्ताराने कथन केला. केजरीवाल हे गेले अनेक दिवस दिल्ली सरकार मद्यविक्री धोरणातील गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात होते. 10 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 1 जूनपर्यंत जामीन मंजूर केला. 13 मे रोजी मालीवाल केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी गेल्या होत्या आणि भेटीची प्रतीक्षा करीत होत्या. तेवढ्यात तेथे विभव कुमार आले; त्या दोघांत बाचाबाची झाली. त्यानंतर विभव कुमार यांनी आपल्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, त्यामुळे आपल्याला जखमा झाल्या, हात सुजला, आपल्याला चालायला त्रास होत होता, असे गंभीर आरोप मालीवाल यांनी केले. याची वाच्यता झाल्यानंतर ‘आप’ने सुरुवातीस अशी घटना घडल्याचे मान्य केले आणि पक्षाने गंभीरपणे त्याची दखल घेतल्याचा दावा केला. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. उलटपक्षी केजरीवाल विभव कुमार यांना आपल्यासह लखनौला घेऊन गेले. मालीवाल या भाजपाच्या संगनमताने विभव कुमार यांच्यावर बेछूट आरोप करीत असल्याचा आरोप अतिशी यांनी केला. एक व्हिडीओे जारी करीत मालीवाल मुख्यमंत्री निवासस्थानी सुरक्षा दलाशी कशी हुज्जत घालत आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त मालीवाल यांना दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करण्यावाचून पर्याय राहिला नाही. मध्यंतरीच्या काळात दिल्लीतील एम्स रुग्णालयातील संबंधित विभागाने मालीवाल यांची वैद्यकीय चाचणी करून अहवाल दिला; त्यांच्या चेहर्‍यावर खरचटल्याच्या खुणा असल्याचे, शरीरावर प्रामुख्याने डावा पाय आणि उजवा डोळा येथे जखमा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी त्यानंतर मुख्यमंत्री निवासस्थानामधील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले. त्याच्याशीदेखील छेडछाड केली गेल्याचा संशय पोलिसांना आहे.
 
 
 
त्या घटनेनंतर आणखी एक व्हिडीओ जारी केला. त्यात मालीवाल यांच्या चेहर्‍यावर कोणत्याही जखमा नसून किंवा त्यांची मनःस्थिती ठीक नसल्याची चिन्हे दिसत नसून त्या लंगडण्याचे केवळ नाटक करीत होत्या, असा आरोप ‘आप’ने केला. एका अर्थाने मालीवाल यांचे हे चारित्र्यहननच. राष्ट्रीय महिला आयोगाने विभव कुमार यांना नोटीस पाठवली आहे. चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विभव कुमार यांना अटक केली आहे. तरीही केजरीवाल यावर बोलण्यास तयार नाहीत, हे खटकणारे आहे. विभव कुमार यांची केजरीवाल यांच्याशी असणारी निकटता सर्वश्रुत आहे. ते स्वीय सचिव असले तरी केजरीवाल यांच्यापर्यंत पोहोचायचे तर विभव कुमार यांना वळसा घालून पोहोचता येत नाही असे त्यांचे स्थान आहे. केजरीवाल यांच्या फोनपासून इन्शुलिनपर्यंत सर्व व्यवस्था विभव कुमार पाहतात, असे म्हटले जाते. मात्र याचाच एक अर्थ असाही होतो की, केजरीवाल यांच्या सर्व ’व्यवहारांची’देखील माहिती विभव कुमार यांना असू शकते. ज्या मद्यविक्री धोरणामधील भ्रष्टाचारामुळे ‘आप’चे काही नेते तुरुंगात आहेत त्याच प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विभव कुमार यांचीही चौकशी केली होती. शिवाय दिल्ली जल बोर्डातील कथित गैरव्यवहार प्रकरणीदेखील ते संशयित आहेत. त्यांच्याशी निगडित डझनभर ठिकाणांवर ईडीने काहीच महिन्यांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. विभव कुमार यांना ’टाइप-6’ गटातील बंगला देण्यात आला होता. हे कोणत्या नियमांनुसार आहे, असा प्रश्न उपस्थित करीत दिल्ली दक्षता संचालनालयाने हे नियमांच्या विरोधात आहे, असा निर्वाळा दिला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या बंगल्याचे विभव कुमार यांना झालेले वाटप रद्द केले होते. सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात ईडीने मद्यविक्री धोरण गैरव्यवहारसंदर्भात विभव कुमार यांची कसून चौकशी केली होती. आता ईडीने ‘आप’मधील नेतेच नव्हे तर संपूर्ण पक्षालाच आरोपी करण्याचा निर्णय केला आहे. मद्यविक्री धोरणातून मिळालेला बेहिशेबी पैसा पक्षाने गोवा निवडणुकीत वापरला, असा ईडीचा आरोप आहे. तेव्हा आता यातून विभव कुमार किती काळ अस्पर्शित राहतील, ही शंकाच आहे. मात्र तत्पूर्वीच मारहाणप्रकरणी त्यांची रवानगी पोलीस कोठडीत झाली आहे. नोएडा येथे एका शासकीय कर्मचार्‍यावर केलेल्या कथित हल्लाप्रकरणी खटला विभव कुमार यांच्याविरोधात प्रलंबित आहे. असे गुन्हे दाखल असणार्‍या व्यक्तींना सरकारी पदावर राहता येत नाही. त्यामुळे दिल्ली दक्षता संचालनालयाने अलीकडेच विभव कुमार यांची मुख्यमंत्र्याचे स्वीय सचिव म्हणून असणारी नियुक्ती रद्द केली होती. त्याविरोधात विभव कुमार यांनी केंद्रीय प्रशासकीय लवादाकडे (कॅट) दाद मागितली होती. मात्र सेवा खंडित करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास ‘कॅट’ने नकार दिला होता.
 
 
विभव कुमार यांचा ‘आप’च्या सर्वोच्च वर्तुळात असणारा संचार पाहता केजरीवाल यांच्या मौनाचे भाषांतर करणे कठीण नाही. आपल्या सर्वांत विश्वासू सहकार्‍याचा बचाव करण्यासाठी कितीही तारेवरची कसरत करावी लागली तरी ती करण्याची केजरीवाल यांची तयारी दिसते. असे केल्याने या प्रकरणातील शिंतोडे आपल्यावरही उडू शकतात याचे भान त्यांना नसावे किंवा तसे असूनही ते मौन बाळगत असतील तर ती त्यांची अपरिहार्यता असू शकते. या प्रकरणी केजरीवाल यांचे मत वार्ताहरांनी विचारले तेव्हा त्या प्रश्नाला बगल देत त्यांनी माइक शेजारी उभे असणारे अखिलेश यादव यांना सोपविला हे जनतेच्या नजरेतून सुटलेले नाही. आपल्या विश्वासू सहकार्‍याचा बचाव करण्याच्या नादात केजरीवाल आपल्याच पक्षाच्या महिला खासदारावर अन्याय करीत आहेत आणि पर्यायाने आपली आणि आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन करीत आहेत. मालीवाल यांच्या कथित खोटेपणाचे पुरावे म्हणून ‘आप’कडून निलाजरेपणाने व्हिडीओ जारी केले जात आहेत. ते केजरीवाल रोखू शकले नाहीत. याचा एक अर्थ त्यांना हे मान्य आहे असा होतो. मात्र विभव कुमार यांची स्वीय सचिव म्हणून सेवा खंडित केल्यानंतरदेखील ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी नेमक्या कोणत्या अधिकारात वावरत होते, या प्रश्नाचे उत्तर केजरीवाल यांनी दिलेले नाही. तो छडा आता तपास यंत्रणांना लावावा लागेल. या सगळ्यामागे भाजपाचा हात आहे, असा थयथयाट करून केजरीवाल त्याचे राजकीय भांडवल करू शकणार नाहीत. महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या मालीवाल यांच्यावर शारीरिक हल्ला मुख्यमंत्र्यांच्याच निवासस्थानी झालेला असताना केजरीवाल साळसूदपणाचा आव आणून त्याचे खापर भाजपावर फोडू पाहतात हेच मुळात शहाजोगपणाचे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. यातून काय तो उलगडा लवकरात लवकर होणे आवश्यक.
 
 
तथापि प्रश्न केवळ विभव कुमार यांचे काय होणार, हा नाही. प्रश्न एका महिलेवरील हल्ल्याकडेदेखील गांभीर्याने न पाहता आपले हितसंबंध जपण्यास प्राधान्य देण्याच्या आढ्यतेचा आहे. आपल्याच पक्षातील दोन नेत्यांमध्ये ’आप’परभाव करून केवळ लाभाचा विचार करण्याच्या निलाजरेपणाचा आहे. घडलेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश केजरीवाल यांनी स्वतःहून दिले असते; चौकशी पूर्ण होईपर्यंत विभव कुमार यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले असते आणि मुख्य म्हणजे या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट आणि पारदर्शीपणे मांडली असती, तर ‘आप’ला आपली इभ्रत काही अंशी तरी वाचवता आली असती. आत इभ्रत गेली आणि तपासातून आणखी काय काय कुलंगड्या बाहेर पडतात याचे भयही वाढले. मालीवाल यांच्याशी विभव कुमार यांनी गैरवर्तणूक केली, असे प्रारंभी मान्य करून नंतर ‘आप’ने केलेले घूमजाव अनेक प्रश्नांचे मोहोळ उठवून देणारे आहे. 2019 साली दिल्लीतील बावीस लाख विद्यार्थ्यांनी महिलांचा आदर राखण्याची आणि महिलांची प्रतिष्ठा जपण्याची शपथ घेतली होती. तेव्हा मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्वीट करत असे म्हटले होते की, ‘आपल्याला अशी दिल्ली करायची आहे जेथे महिलांना गरज असेल तर रात्रीदेखील घराबाहेर निर्भयपणे पडता आले पाहिजे.’ आता साडेतीन वर्षांनी केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानी पाऊल टाकलेल्या स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ला झाला आणि तेथून बाहेर पडताना त्या भयभीत झालेल्या दिसत होत्या. केजरीवाल यांचा हा दुटप्पीपणा पाहून नैतिकतादेखील ओशाळली असेल!
 
9822828819

राहुल गोखले

विविध मराठी / इंग्लिश वृत्तपत्रांतून राजकीय, सामाजिक व आंतरराष्ट्रीय विषयांवर नियमित स्तंभलेखन
दैनिक / साप्ताहिक / मासिकांतून इंग्लिश पुस्तक परिचय सातत्याने प्रसिद्ध
'विज्ञानातील सरस आणि सुरस' पुस्तकाला राज्य सरकारचा र.धों. कर्वे पुरस्कार