@रवींद्र जोशी
आज संपूर्ण जगाचे लक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वेधून घेतले आहे. विजयादशमी सन 2025 ते 2026 हे संघाचे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे या विश्वव्यापी संघटनेचे आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनाविषयी जनमानसात तीव्र उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांचा जन्मदिन वर्षप्रतिपदा, 1 एप्रिल 1889...! या पार्श्वभूमीवर डॉ. हेडगेवारांनी 1929 ते 1940 पर्यंत लिहिलेल्या पत्रांचे वाचन करण्याची संधी आणि त्या अनुषंगाने लेखन करण्याची प्रेरणा मिळाली.आजच्या युवा पिढीने परमपूजनीय डॉ. हेडगेवारांचे राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत अंत:करण व संघाच्या क्रमिक विकासात त्यांनी लिहिलेल्या पत्रांचे योगदान अल्पांशाने का होईना समजून घेणे, यासाठी हा लेखनप्रपंच आहे. या लेखमालेत मूळ पत्रांचा समावेश करताना थोडक्यात त्या वेळच्या परिस्थितीचा उल्लेख करणार आहे.
डॉ. हेडगेवारांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देत जो रणसंग्राम केला होता त्यामुळे त्यांना दोनदा सश्रम कारावास भोगावा लागला होता.
1921 ला असहकार आंदोलनात सहभागी झाल्याने एक वर्ष आणि 1930 ला जंगल सत्याग्रह केला म्हणून, न्यायमूर्ती भरुचा यांनी यवतमाळ कारागृहात कलम 117 खाली सहा महिने सश्रम कारावास आणि कलम 379 खाली तीन महिने अशी एकूण 9 महिने शिक्षा सुनावली होती.
महात्मा गांधींनी 6 एप्रिल 1930 ला समुद्रस्नान करून मिठाचा निर्बंध मोडून सत्याग्रहाचे रणशिंग फुंकले. त्याच्याही पूर्वी विदर्भात 1917 मध्ये इंग्रज सरकारने चराऊ राने राखीव वन विभागात समाविष्ट केल्यापासून जनमानसात असमाधान होते व त्याला वाचा फोडण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या चमूतील माधवराव काणे चळवळ करीत होते.
विदर्भातून सुदूर समुद्रकिनारी जाण्याऐवजी, इंग्रजांचे निर्बंध आम्ही मानीत नाही, असा निर्धार सामुदायिक पद्धतीने प्रकट करणे, हाच सत्याग्रहाचा मुख्य हेतू ध्यानात घेऊन जंगलासंबंधीचे निर्बंध आपण मोडावेत, असा विचार विदर्भात मूळ धरू लागला.
डॉ. हेडगेवारांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध जंगल कायदा मोडण्यासाठी सत्याग्रहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. संघाची स्थापना होऊन जेमतेम पाच वर्षे झाली होती. संघाचे कार्य अकोला, यवतमाळ, खामगांव, पुसद, अमरावती या भागांत पोहोचले नव्हते. यानिमित्ताने कारागृहात येणार्या कार्यकर्त्यांना आत्मसात करून कामाचा विस्तार करता येईल, असाही भाव त्यांच्या मनात होता. देशाचे स्वातंत्र्य मिळविणे आणि टिकविणे यासाठी संघटना ही वृत्ती तरुणांमध्ये निर्माण झाली पाहिजे, असा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यामुळे जंगल सत्याग्रहात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी डॉ. परांजपे यांना सरसंघचालक पदाचे काम सोपवले. नागपूरच्या कामाची जबाबदारी बाबासाहेब आपटे व बापूराव भेदी यांच्यावर सोपवली.
डॉ. हेडगेवारांनी जंगल सत्याग्रह करण्यापूर्वी, लोकनायक बापूजी अणे यांनी विदर्भातील पुसद येथे ‘जंगल सत्याग्रह’ केला होता व त्यांना इंग्रजी सत्तेने जेलमध्ये डांबले होते. डॉ. हेडगेवारांनी यवतमाळजवळ 21 जुलै 1930 रोजी सत्याग्रह करण्यापूर्वी ही तरुण मंडळी कारागृहात बापूजी अणे यांना भेटायला गेली होती.
पुढे डॉ. हेडगेवारांचे चरित्रलेखन करणारे ना.ह. पालकर यांना लोकनायक बापूजी अणे यांनी सांगितले की, वेळप्रसंगी दुष्टांचे मनगट फोडू शकतील असे दणकट व खणखणीत तरुण डॉ. हेडगेवारांच्या तुकडीत पाहून मला धन्यता व समाधान वाटले.
डॉ. हेडगेवार आणि त्यांच्या सहकार्यांना यवतमाळला शिक्षा सुनावली होती; परंतु तेथून त्यांना अकोला कारागृहात ठेवण्यात आले. डॉ. हेडगेवार तुरुंगात होते. संघ आणि संघाच्या शाखेतील स्वयंसेवक हिंदू संघटनेचे कार्य करीत होते.
1930 च्या संघाच्या विजयादशमी उत्सवात गावोगावी विविध शाखांमध्ये ’मना, तुला सुखाचा अधिकार नाही!’ या उत्कट भावनेने ओतप्रोत प्रेरक निबंधाचे वाचन करण्यात आले.
त्यात लिहिले होते, ’देशाचे पारतंत्र्य नष्ट होऊन सारा हिंदू समाज बलशाली व आत्मनिर्भर होईपर्यंत मना, तुला वैयक्तिक सुखाची अभिलाषा धरण्याचा अधिकार नाही.’
न्यायमूर्ती भरुचा यांनी 21 जुलै 1930 रोजी एकूण 9 महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती; परंतु नियतीने ही शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच 14 फेब्रुवारी 1931 ला अचानक डॉ. हेडगेवारांची सुटका केली. 17 फेब्रुवारी रोजी ते नागपूरला पोहोचल्यावर असंख्य लोकांनी व संस्थांच्या वतीने त्यांचा जयजयकार करीत पुष्पहार अर्पण केले. एक भव्य मिरवणूक हत्तीखान्याच्या मैदानावर पोहोचली. तेथे डॉ. परांजपे यांनी स्वागतपर भाषण करून डॉ. हेडगेवारांनी सरसंघचालक पदाची सूत्रे स्वीकारावीत, अशी विनंती केली.
डॉ. हेडगेवारांनी सरसंघचालक या नात्याने कार्यविस्तारासाठी प्रवास सुरू केला. भेटीगाठी सुरू झाल्या. कार्यकर्त्यांच्या उदासीनतेचा, हताशा, निराशेचा सूर बोलण्यातून, पत्रातून व्यक्त होऊ लागला आणि...
डॉ. हेडगेवारांचे हे शब्दचैतन्य उराशी बाळगून लाखो स्वयंसेवकांच्या तप:पूत साधनेतून भारताच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे, तो उष:काल आपण पाहात आहोत, अनुभवत आहोत...
(क्रमशः)
लेखक ‘कुटुंब प्रबोधन’ या गतिविधीचे अखिल भारतीय संयोजक आहेत.