अपेक्षा ठरवताना...

विवेक मराठी    02-Apr-2024   
Total Views |
wedding
आपण, आपले आई-वडील, आपलं कुटुंब आणि एकूणच आपलं अनुभवविश्व याबाहेरही बरंच मोठं जग आहे. जोडीदार म्हणून आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती ही याच विश्वातून येणार आहे. ती आपल्याच चौकटीत बसते आहे का हे बघणं म्हणजे झापडं लावून चालण्यासारखं आहे. विशेषतः अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेमध्ये, जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो, तेव्हा डोळ्यावर आपल्याच अपेक्षा/मागण्यांच्या चष्म्यातून न बघता समोरच्या व्यक्तीकडे एक स्वतंत्र माणूस म्हणून बघत जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
‘लापता लेडीज’ नावाचा एक सुंदर सिनेमा नुकताच येऊन गेला. त्यातल्या एका प्रसंगात सून आपल्या सासूने केलेल्या भाजीची स्तुती करते आणि त्यावर सासू ‘इश्श, स्वयंपाकाचं कौतुक थोडीच करतात’, असं म्हणत ते हसण्यावारी नेते खरी; पण सासूला ते कौतुक मनापासून आवडलेलं असतं आणि मग ती सांगते की, तिच्या माहेरी ती भाजी वेगळ्या पद्धतीने केली जायची जे तिला फार आवडायचं; पण इकडे सासरकडच्या मंडळींची वेगळी पद्धत होती. सून म्हणते की, तुम्ही स्वतःसाठी तुम्हाला हव्या त्या पद्धतीने भाजी करत जा की! सासू यावरही हसते आणि मग म्हणते, ‘खरं तर इतक्या वर्षांत एवढं काय काय बदललं आहे की, आता माझं मलाच लक्षात नाही की मला काय आवडत होतं.’ हे वाक्य पडद्यावरच्या सासूने उद्गारलं तेव्हा थिएटरमध्ये बसलेल्या तमाम स्त्रियांच्या तोंडून संमतीदर्शक उसासे बाहेर पडले. त्यांचा आवाज जाणवण्याइतका मोठा होता!
 
  
आज माझ्या पिढीच्या म्हणजे लग्नाळू वयातल्या मुला-मुलींच्या मनात लग्नाविषयीची जी काही भली-बुरी प्रतिमा असेल ती कशी बरं निर्माण होते याचा विचार केला तर, त्याचं सर्वात पहिलं उत्तर म्हणजे त्यांचे आई-वडील. या मुला-मुलींनी त्यांच्या आई-वडिलांना स्वत:च्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना ऐकलं आहे. खरं तर मला अमुक अमुक करायचं होतं; पण लग्न झालं आणि राहून गेलं... लग्न झाल्यावर ती एक इच्छा अपुरीच राहिली... मला अमुकतमुक फार आवडायचं; पण लग्नानंतर ते करता आलं नाही... मी माझा हा छंद जोपासायचो; पण लग्न झालं, जबाबदार्‍या आल्या आणि ते मागेच पडलं... मी होते म्हणून निभावून नेऊ शकले, ही आणि अशी अनेक वाक्यं कानावर पडतच ही पिढी मोठी झाली आहे. त्यांच्या मनात ‘लग्न ही एक जखडून टाकणारी व्यवस्था आहे’ किंवा ‘लग्न झालं की आवडीच्या गोष्टी सोडाव्या लागतात’ हा विचार मनात घर करणार हे स्वाभाविक नाही का? लग्न ही सुंदर गोष्ट आहे, लग्नामुळे माझ्या आयुष्यात काही तरी मोलाची भर पडली, असं ठासून म्हणणारे पालक विरळाच. याचा अर्थ सगळे स्वत:च्या संसाराला नावं ठेवतात असं नव्हे. किंबहुना बहुसंख्य पालक असंच म्हणतात की, त्यांचं वैवाहिक जीवन छान आहे; पण वेगळे काही निर्णय घेतले असते, तर आपल्या आयुष्यात याहून अधिक काही तरी चांगलंही होऊ शकलं असतं, हा न उच्चारला जाणारा संवादही मुलं-मुली ऐकत असतात. मुला-मुलींच्या डोळ्यासमोर लग्नाच्या नात्याची, सहजीवनाची सर्वात पहिली आणि सर्वात जवळून बघण्यात असणारी ही प्रतिमा आहे. आपण वाचून-ऐकून-पाठांतर करून शिकतो त्यापेक्षा किती तरी जास्त गोष्टी, जास्त प्रभावीपणे निरीक्षणातून शिकत असतो. पहिला शब्दही बोलता येण्याच्या आधीपासून आपण आपल्या आईवडिलांचं सहजीवन बघत मोठं होत असतो. आपण त्यातून जे शिकतो, त्याचं जे आकलन होतं त्याचा स्वाभाविक परिणाम आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा ठरवताना होत असतो.
 
 
पण गंमत ही की, त्याचा सरसकट समान परिणाम होत नाही. म्हणजे जो परिणाम मुलावर होईल तोच मुलीवर होईल असं नाही किंवा जो परिणाम सांगलीमधल्या मुलीवर होईल तोच पुण्यातल्या मुलीवर होईल असं नाही. कारण बघितलेल्या गोष्टींवर प्रक्रिया करण्याची पद्धत आणि क्षमता प्रत्येकाची वेगळी असते. उदाहरणार्थ विचार करा की, एक घर आहे जिथे वडिलांना चहा अगदी हातात आणून देणारी आई आहे, ती जेवायलाही वाढते, जेवणानंतर स्वयंपाकघरातली आवराआवरही करते. आता अशा घरातल्या लहानपणापासून हे सगळं बघणार्‍या मुलाला असं वाटण्याची शक्यता अधिक आहे की, माझ्या बायकोने माझ्यासाठी हेच केलं पाहिजे. त्याच घरातल्या त्याच्या बहिणीला असं वाटू शकेल की, लग्नानंतर हे असं करावं लागणार असेल तर मला मुळीच लग्न करायचं नाही! किंवा अजून एखाद्या मुलीला वाटेल की, हे असंच असतं आणि मीपण हेच करायचं आहे. अशा अजून किती तरी शक्यता आहेत! हे घडणं स्वाभाविक जरी असलं तरी आई-वडिलांच्या सहजीवनाबद्दलची आपली मतं, त्याआधारे तयार झालेली लग्नाविषयीची आपली मतं तर्काच्या कसोटीवर तपासून घ्यायला हवीत. यामध्ये चांगली आणि वाईट अशी दोन्ही मतं आली. आपल्या आई-वडिलांचं सहजीवन अतिशय सुंदर आहे असं वाटत असेल तरी तो तुमच्या स्वतःच्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा ठरवताना आधार म्हणून घेणं धोक्याचं आहे! आपल्या आई-वडिलांचं लग्न ज्या काळात झालं, तो काळ आणि आजचा काळ यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. लग्नाच्या नात्याकडून काय हवं, ही अपेक्षाही कालानुरूप बदलत गेली आहे.
 
 
अनेकदा आम्हाला दिसून येणारी एक गोष्ट म्हणजे नवर्‍याबद्दल अपेक्षा ठरवताना वडिलांबद्दल असणार्‍या प्रतिमेशी तुलना करणार्‍या मुली आणि बायकोबद्दल अपेक्षा ठरवताना आईबद्दलच्या आपल्या डोक्यातल्या प्रतिमेशी तुलना करणारी मुलं. पन्नाशी-साठीला पोहोचलेल्या आपल्या आई-वडिलांकडे बघून पंचविशी-तिशीमधल्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवणं कितपत योग्य आहे? या अशा अपेक्षांना खतपाणी घालणं पालकांनीदेखील टाळायला हवं. मला माझ्या वडिलांसारखा कर्तृत्ववान मुलगा नवरा म्हणून हवा, असं आपल्या मुलीचं वाक्य ऐकून किंवा माझ्या आईसारखी घर, कुटुंब, काम सगळं सांभाळणारी प्रगल्भ बायको हवी, असं आपल्या मुलाच्या तोंडून ऐकून आई-वडिलांना अगदी भरून येतं. आपल्या मुला-मुलीला आपली कदर आहे याचं त्यांना बरं वाटतं. ते स्वाभाविकच आहे; पण अशा वेळी पालकांनी हे सांगणं गरजेचं आहे की, ‘आई’ म्हणून किंवा ‘वडील’ म्हणून मी वेगळा असतो; ‘बायको’ किंवा ‘नवरा’ म्हणून मी वेगळा असतो. तेव्हा ‘पापा की परी’ आणि ‘आईचा लाडका सोन्या’ या दोन्ही वर्गवारींत बसणार्‍या मुला-मुलींनी त्यातून बाहेर येऊनच आपला जोडीदार शोधणं आवश्यक आहे.
 
 
आपण मोठं होताना अनेक जोडप्यांना बघत असतो. आई-वडील हे सगळ्यात जवळून आणि लहानपणापासून बघितलेलं जोडपं, त्यामुळे त्यांचा परिणाम मोठा असतो; पण जसजसे मोठे होत जातो तसतसे अनेक जोडपी बघतो. आई-वडील, मामा-मामी, भाऊ-वहिनी, मित्र-मैत्रिणी अशी किती तरी उदाहरणं आणि या जोडप्यांकडे बघून त्यातून आपल्याला आवडीच्या-नावडीच्या गोष्टी एक एक गोळा करत आपली आपल्या जोडीदाराकडून असणार्‍या अपेक्षांची यादी बनत जाते, आपल्या जोडीदाराबद्दलच्या अपेक्षेची एक प्रतिमा उभी राहते. मनात प्रतिमा तयार होणं, हा खूप स्वाभाविक भाग आहे. सिनेमाचं ट्रेलर बघून सिनेमाबद्दल प्रतिमा निर्माण करण्यापासून ते भाषण कलेवरून राजकीय नेत्याची प्रतिमा निर्माण करण्यापर्यंत आपला मेंदू काम करतच असतो. किंबहुना आपल्या कल्पनाशक्ती आणि सृजनाचा तो अविभाज्य भाग आहे; पण प्रश्न निर्माण होतात जेव्हा प्रतिमेलाच वास्तव मानून आपण पुढे जाऊ लागतो. या प्रतिमेच्या चौकटीत अडकल्याने होतं असं की, वास्तवापेक्षा प्रतिमेच्याच प्रेमात पडायला होतं आणि आपल्या अपेक्षांची चौकट तर्कशुद्ध विचारांच्या आधारावर आहे का हे न तपासता, तीच चौकट घेऊन जोडीदाराचा शोध सुरू होतो. एकदा अशी चौकट तयार झाली की, अपेक्षा या अपेक्षा न राहता मागण्या बनू लागतात आणि मग गडबड होण्याची शक्यता वाढते.
 
 
आपण, आपले आई-वडील, आपलं कुटुंब आणि एकूणच आपलं अनुभवविश्व याबाहेरही बरंच मोठं जग आहे. जोडीदार म्हणून आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती ही याच विश्वातून येणार आहे. ती आपल्याच चौकटीत बसते आहे का हे बघणं म्हणजे झापडं लावून चालण्यासारखं आहे. विशेषतः अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेमध्ये, जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो, तेव्हा डोळ्यावर आपल्याच अपेक्षा/मागण्यांच्या चष्म्यातून न बघता समोरच्या व्यक्तीकडे एक स्वतंत्र माणूस म्हणून बघत जाणून घेणं महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे कोरी पाटी ठेवून भेट झाली तर समोरच्याला अधिक नेमकेपणाने जाणून घेण्याची शक्यता तर वाढेलच; पण त्याबरोबर आपली आणि त्या व्यक्तीची अनुरूपता अधिक विवेकनिष्ठ पद्धतीने तपासून घेणं शक्य होईल. थोडक्यात, अपेक्षांच्या मागण्या न होऊ देता त्यांना अपेक्षाच ठेवून, मोकळ्या मनाने जोडीदार निवडीच्या प्रक्रियेत पुढे जाणं हिताचं आहे.

तन्मय कानिटकर

तन्मय कानिटकर यांनी पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी (LLB) आणि कम्युनिकेशन स्टडीज या विषयांत पदव्युत्तर (MSc) शिक्षण पूर्ण केले आहे. ते सुशासनासाठी कार्यरत असणाऱ्या परिवर्तन संस्थेचे संस्थापक विश्वस्त आहेत. ते पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन या पुण्यातील थिंक टँकचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी उत्तराखंड, पश्चिम महाराष्ट्र येथे पूरग्रस्त भागात जाऊन मदतकार्य केले. त्यांनी ग्रीनअर्थ सोशल डेव्हलपमेंट कन्सल्टन्सी येथे ‘शासनव्यवस्था’ या विषयातील तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यांनी सकाळ, लोकमत, महाराष्ट्र टाईम्स यासारखी दैनिके; लोकप्रभा, विवेक, माहेर, ऑनलाईन पोर्टल्सवर सामाजिक-राजकीय विषयांवर विपुल लेखन. त्यांचा कथासंग्रह आणि लग्न-नातेसंबंध विषयावरील लेखसंग्रह अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.