फ्यामिली

विवेक मराठी    27-Mar-2024   
Total Views |
‘’मानसं ठिवली हाईत नव्हं लिहूण द्यायाला...? मंग कशापाय मस्ती आल्यागत वागताय...!? आनि ज्योकिंग क्येलीच पायजेले आसं कुनी सांगिटलंय का तुम्माला...!?” ‘’कुनी सांगिटलं न्हाईये, आमचाच ष्टडी हाय तसा. भाश्नात थोडा ह्युमरपना आसला की पब्लिक येंजॉय करतं..!” आद्याच्या बापाणं सफाई पेश क्येली.. ‘’चुलीत घाला तुमचा त्यो ष्टडी...” रश्मिआक्का फनकारली... ’‘कसली घानेरडी ज्योक मारलीत...!? ल्हानपनी म्या ल्हान हुतो...!? हो...!? खरंच..!? तुमच्या या बोलन्यानं ‘तुजा नवरा आत्ता तरी म्होट्टा झालाय व्हय गं आक्के..!?’ आसं इच्यारलं मला बायांणी. चार बायांत इज्जात ग्येली माजी तुमच्या त्या ज्योकपायी...”
 
vivek
 
संज्या थरथरत्या हाताणं सातवा च्या घिऊन सैपाकघरातूण रश्मिआक्काजवळ आला. रश्मिआक्काणं बशीतनं कप उच्यालला आनि संतापाच्या भरात त्यो उक्कळता च्या डायरेक नरड्यात वतला. ठॉप टू बॉठम च्या हानतानी पाहूण आज आपली खैर णाही ह्ये आद्याच्या बापाला समजून चुकल्यालं. रश्मिआक्काणं त्येला भाश्नावरणं आल्याधरणं कापडं बी बदलू न द्येता भित्ताडाला ट्येकूण उभा क्येल्ता. आपला गुण्हा काय ह्ये न समजल्याणं आद्याचा बाप हात म्हागं बांधून आपल्याला त्वांड उघडायला कदी भ्येटंन येती वाट पाहत हुबा र्‍हायल्याला. सेवटी उक्काळता च्या नरड्यात वतल्याणं पित्त खवळल्याली रश्मिआक्का आद्याच्या बापावं फुटली.
 
 
‘’कोन लिहूण द्येतं ओ तुमची भाश्नं...!?” रश्मिआक्काच्या या सवालावं भाईर आंगनात लिखानात ष्ट्रगल काराया आलेल्या दोनच्यार ल्येखकड्यांची पळापळ जाली.. आद्याच्या बापाणं औंढा गिळला.. त्यो काई बोलनार यवड्यात रश्मिआक्का पुन्ना फुटली. ‘’सांगा णा... कोन लिहून द्येतं तुम्माला आसली भाश्नं..!? आनि भाश्नात ज्योकिंग कराया पायजेल आसं कुनी सांगिटलं तुम्माला..!? कस्ली घानेरडी ज्योक मारलीत...!” आद्याच्या बापाणं निस्ती नजर वर करूण पाह्यलं तं संज्या आगीत त्येल वतावं तसा आटवा च्या घिऊन रश्मिआक्काम्होरं यताणी दिसला. तिच्या च्या नरड्यात वतन्याची ग्याप काडून आद्याच्या बापाच्या दाताच्या फटीतणं शबुद भायेर सांडले, ’‘म्याच लिवल्यालं त्ये भाशन...!” आटवा च्या नरड्यात ढकलून रश्मिआक्का कोकालली, ‘’मानसं ठिवली हाईत नव्हं लिहूण द्यायाला...? मंग कशापाय मस्ती आल्यागत वागताय...!? आनि ज्योकिंग क्येलीच पायजेले आसं कुनी सांगिटलंय का तुम्माला...!?” ‘’कुनी सांगिटलं न्हाईये, आमचाच ष्टडी हाय तसा. भाश्नात थोडा ह्युमरपना आसला की पब्लिक येंजॉय करतं..!” आद्याच्या बापाणं सफाई पेश क्येली.. ‘’चुलीत घाला तुमचा त्यो ष्टडी...” रश्मिआक्का फनकारली... ’‘कसली घानेरडी ज्योक मारलीत...!? ल्हानपनी म्या ल्हान हुतो...!? हो...!? खरंच..!? तुमच्या या बोलन्यानं ‘तुजा नवरा आत्ता तरी म्होट्टा झालाय व्हय गं आक्के..!?’ आसं इच्यारलं मला बायांणी. चार बायांत इज्जात ग्येली माजी तुमच्या त्या ज्योकपायी...” रश्मिआक्का वयतागून बोलत हुती. ‘’पन आमी ल्हानपनी खरंच ल्हान हुतो..!” आद्याच्या बापाणं थातुरमातुर सारवासारव करायचा प्रेत्न क्येला. त्यावंर उत्तर म्हनून रश्मिआक्काणं संज्यानं आनल्याला नौवा च्या ढोसला आनि वर घसा ग्वाड ग्वाड हुतूया म्हनून फुडच्या च्याला साकर कमी घालायला सांगिटली. तिचं लक्ष आद्याच्या बापाकं ग्येलं. आद्याच्या बापाणं सदर्‍याचं टोक त्वांडात धरूण चावत हुता. त्यावरणं रश्मिआक्काच्या ध्येणात आलं का यानं आजून काय तरी कांड क्येल्यालं आसनार. न्हईतर सदर्‍याचं टोक तोंडात धरून गबाळ्यावानी शूण्यात नजर लावून बगनार न्हाई. तिचा आंदाज यकदम खरा निग्ला. आद्याच्या बापाला आपन भाश्नात काय काय बोल्लो ह्ये आटवून घाम फुटत हुता. आपन शेठबद्दल जे बोल्लो त्ये जर का हिला समजलं नसंन तरच बरं हाय आसा इच्यार त्येच्या मणात येत आसतानीच रश्मिआक्का नव्याणं आद्याच्या बापावर उसळली. ‘’आजून काय बोल्लात..!? आलंय माज्या काणावं...” रश्मिआक्काणं गुगली टाकली. ’‘छे, कुटं काय..!? म्या शेठच्या फ्यामिलीबद्दल कायच नाय बोल्लो..!” शेव्हागचा बाप आसल्याच्या थाटात फुडं जाऊन छकडी मारायच्या नादात आद्याच्या पापाची दांडी उडाली. रश्मिआक्काणं फुडं त्येला तसाच तानला.. ‘’फ्यामिली..!? कुनाची..!?” आद्याचा बाप पुन्ना स्वॅग माराया ग्येला. ‘’शेठची ओ म्या म्हन्लं आपल्याला कशी फ्यामिली हाये तशी ज्याला फ्यामिलीच न्हाय त्येला त्येचं म्हत्व कस्काय समजंन..!? नाय क्का..!?”
 
आद्याच्या बापाचं बोलनं आयकून रश्मिआक्काला, जो तो सोत्ताला ‘शेठ का परिवार’ का म्हनून घेतूया ह्येचं कोडं उलगाडलं. ‘’फ्यामिलीच नसंन तं फ्यामिलीसाटी प्ल्यानिंग कस्काय करनार येकांदा मानूस..!? फ्यामिली प्यानिंग लै मत्वाचं ए..!” आद्याचा बाप यक्साईटमेण मदी जादाचं बोलूण ग्येला. त्यातलं ‘फॅमिली प्ल्यानिंग’ रश्मिआक्काच्या टक्कुर्‍यात ग्येलं. आद्याच्या बापानं टाकलेल्या गुगलीवं खरी छकडी शेठनं मारल्याली. द्येशाची जन्ता हीच माजी फ्यामिली आजं डिक्लेर मारलं आनि समद्यांची पंचाईत क्येली. रश्मिआक्का मातुर ‘फ्यामिलीसाटी प्ल्यानिंग आनि फ्यामिली प्ल्यानिंग’ यातला फरक न कळनार्‍या आद्याच्या बापाकं बगत र्‍हायली. ‘’खरंच ह्यो बाबा म्होट्टेपनीबी ल्हानच र्‍हायलाय कायनू बाई..!?” या सवालानं तिला परेशान क्येलं.

केदार दिवेकर

केदार अच्युत दिवेकर
व्यावसायिक संगीतकार म्हणून १४ वर्षे कार्यरत.
 
‘मीरा’ या आगामी मराठी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन आणि संगीत अशा जबाबदाऱ्या सांभाळणारा कलाकार.