अर्कचित्र - अमोघ वझे
रश्मिआक्का बांध फोडून बोलंत हुती. आद्याचा बाप डोळे तानून तिचा आवतार बगत समुर हुबा र्हायल्याला. तिला न्येमकं काय लागलंय ह्ये कळाया मार्ग नवता.. मोटाभायशी झाल्याली बंद दाराआडची चर्चा का बाप्पू गडकर्यानं धुडकावल्याली ऑफर?
रश्मिआक्काच्या घराम्होरं जिपडं थांबलं. त्यातनं रश्मिआक्का आनि तिचा पदर धरल्याला आद्या उतारले आन् घराकडं चालाय लागले. जिपड्याच्या डायवरणं “ओ ताई.. पयशे द्या की. तशाच कशा चाल्ल्या?” आसा सवाल टाकल्यावं रश्मिआक्का भाणावं आली. गुमानं जिपडंवाल्याचे पयशे धिले आनि आद्याला खेचंत घराकडं निगाली.
घरात घुसली तं आद्याचा बाप खुर्चीत तंगडीवं तंगडी टाकून बसल्याला यकदम उठला. रश्मिआक्काला खुर्ची धिली आनी पंख्याचं बटान दाबलं. खटरखटर करत पंखा वारा घालाया लागला, पन रश्मिआक्का काय थंड व्हायचं चिन्ह दिसंना. सेवटी आद्याच्या बापाणं हिम्म्त गोळा करूण इच्यारलं “काय जालं मिटींगमदी?” “काय हुयाचं हाय? त्वांडावं न्हाई म्हन्ले आनि हाकलून धिलं!” रश्मिआक्का खेकासली. “पानी बी इच्यारलं न्हाई तुमच्या मोटाभायनं. ल्येकराला माफ करा म्हन्लं तं उल्टं मालाच आयकवंल की तुमचं ल्येकरू लफडी करतंय आनि तुम्मी नाक घासत येताय.. कवंर आयकून घ्यायाचं? तुमच्या ल्येकराला सांगा की सुदरायला. निसत्या दाढीमिश्या वाडवून मर्द होत नसत्यात. ल्येकरू तं ल्येकरू, त्येचा बाप बी उरफाटं बोलतुया.. आवरा जरा घरच्यांला. तुमी लेडीज म्हनून नीट सांगिटलं. तुमचं ल्येकरू यकटं घावलं आसतं तर कुदावलं आसतं पोरांनी! फाट्यावर मारलं.. निग्ले मंग तितनं तुमचं कार्टं घिऊन.” रश्मिआक्का येका दमात बोल्ली. “तुमाला बी आक्कल न्हाई का ओ? कुटं बी काय बी बोल्ता व्हंय?” त्येच्यावर घसारल्याणं आद्याचा बाप दचाकलाच. “या तुमच्या कार्ट्याची लफडी निस्तरून यष्टीत बसायाला आनी त्यो गडकर्याचा बाप्पू आडवा यायाला.. मला म्हन्ला, “वैनी, कुटं यष्टीनं जाऊन र्हायला, चला घरला सोडून देतो नं..” वाटलं, बरं झालं बै. घामाघुम होऊन जान्यापरीस एशीत बसून जाऊ. म्हनून बसले गाडीत. गाडीत गडकर्याच्या बाप्पूनं जे त्वांड सोडलं.. बै बै बै! कानं किटले माजे. तुमच्यावरणं बी बोल्ले माला. काय बी बरळता काओ तुम्मी? आमच्या प्यानेलला या, समितीचा आद्याक्ष बनवतो म्हन्ले तुमी परवा? त्यावर “वैनी, आपलं व्हीजन आसं आपलं व्हीजन तसं” म्हनत कसले कसले आकडे फ्येकले माज्या त्वांडावं. भरीस भर म्हनून तुमच्या या कार्ट्याला आकडे मोजाया लावले. डोळे पार चकने हुईस्तवर बोटं मोडीत बसवल्यालं तुमच्या कार्ट्याला. समदी आकडेफेक जाल्यावं म्हन्ले, “आद्याच्या पप्पांला सांगून द्या नं.. आमाले टिनपाट ऑफर टाकून र्हायले त्यापेक्षा सोत्ताचं कमरेचं सुटलंय त्ये सांभाळून घ्या नं म्हणा.. आन् तुमच्या आद्याचीबी ‘दिशा’ चुकून र्हायली ना. त्याईले बी सांगून द्या पंचायतीच्या पंचायती सोड आन् कायतरी कामधंदा बग. नायतं माला सांगून द्या, मी लावून द्येतो नं त्याईले धंद्याले.” माला बै काय बोलावं सुचंनाच. घरापतूर सोडत्याल म्हनून गप र्हायल्येले. पन कसलं काय? गुळगुळीत डांबरीवरणं फाट्यापतुर आनलं आनी खाली उतरवून जिपाड करून धिलं. म्हन्ले, “शेठ कडं मिटींग हाय. तिकडं जायला उशीर होऊन र्हायला. तवा हितनं तुमचं तुमी जावा.” त्येनंबी मारलं फाट्यावं. मंग आलो जिपाडात बसून खाडबुड खाडबुड रस्त्यावरणं. वर तुमचं ह्ये कार्ट म्हनतंय, “मम्मे, बाप्पू गडकर्याचा रस्ता मस्त गुळगुळीत आन् आपला आसा खाडबुड खाडबुड का म्हनून?” आता काय सांगू ह्येला? कामं कराया भायेर हिंडावं लागतया. घरकोंबड्यावानी घरात बसून कामं कशी व्हत्याल? म्या येकट्या बैनं किती करावं? बारकं पोरगं रानातंच र्हातंय.. ब्येडकं धरतंय, पाली सरडे धरतंय. बोलाया ग्येलं का “पर्यावरनाला म्हाजी गरज हाय” म्हनतंय आनी पुन्ना रानात जातंय. म्होट्टं तरी मानसातलं निगंल म्हन्लं तर त्ये बी न्हाई ती लफडी करतंय. घरातला पुरूस मानूस म्हनून जाऊन निस्तरून या म्हन्लं तं लोकाचे पाय धराया बसलं की उठता येत न्हाई, म्हनून तितं बी मलाच धाडलंय!”
रश्मिआक्का बांध फोडून बोलंत हुती. आद्याचा बाप डोळे तानून तिचा आवतार बगत समुर हुबा र्हायल्याला. तिला न्येमकं काय लागलंय ह्ये कळाया मार्ग नवता.. मोटाभायशी झाल्याली बंद दाराआडची चर्चा का बाप्पू गडकर्यानं धुडकावल्याली ऑफर?