@8668541181
बहिरमची यात्रा म्हणजे दोन राज्यांतील हिंदी आणि मराठी भाषक लोकांमधील सांस्कृतिक संगम आहे. सलग दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारी यात्रा म्हणून विदर्भात आणि आता सर्वदूर बहिरमच्या यात्रेचा लौकिक आहे. बहिरम यात्रेला पौराणिक माहात्म्य आहे. बहिरम अर्थात भैरवनाथ हे बर्याच कुटुंबांचे कुलदैवत आहे. यात्रेत देवदर्शनाबरोबरच अध्यात्म, चित्रपट, मनोरंजन, महाप्रसाद, खाद्यसंस्कृती, महिला मेळावा, कीर्तन, प्रदर्शन, पशुविक्री, कृषी साहित्य अशा सर्व गोष्टी एकाच ठिकाणी सलग दीड महिना बघायला मिळतात.
तीर्थक्षेत्र कारंजा बहिरम हे गाव चांदुर बाजार तालुक्यात आहे. अमरावती शहरापासून उत्तरेस परतवाडा-बैतुल मार्गावर पासष्ट किलोमीटर अंतरावर बहिरम गाव येते. वर्हाड प्रांताच्या अचलपूर परिसरात वाकाटक, राष्ट्रकूट व यादव या राजवंशांचे राज्य होते. त्यांतील वाकाटक व राष्ट्रकूट हे राजवंश भगवान शंकराचे भक्त होते. बहिरम देवस्थान परिसरात असलेल्या भांडे तलावानजीक असलेले प्राचीन शिवलिंग त्या इतिहासाची साक्ष आजही देते. अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरचा संदर्भसुद्धा बहिरमशी जोडला जातो. भगवान श्रीकृष्ण व कौंडण्यपूर राजा रुख्मी यांच्यामध्ये युद्ध झाले होते. तेव्हा बलराम यांच्या सैन्यात गवळ्यांचा समावेश होता. ते सैनिक म्हणजेच गवळी वर्हाडात थांबले. ते गवळी बांधव बहिरम डोंगराच्या पायथ्याशी हेटी करून राहू लागले. त्या हेटीचे गवळ्यांच्या गावात रूपांतर झाले आणि त्या तीर्थस्थळावर बहिरमबुवाची म्हणजेच भैरवाची भव्य-दिव्य मूर्ती बघण्यास मिळते.
बहिरमच्या यात्रेला लोकसंस्कृतीत वेगळे महत्त्व आहे. ही यात्रा दीड महिन्यांची असते आणि ही परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे. काहींच्या मते ती हजारो वर्षांपासून भरत आहे. यात्रा किंवा जत्रा ही विविध प्रदेशांच्या संस्कृतीचा एक भाग राहिली आहे. प्रत्येक प्रदेशागणिक यात्रांचे स्वरूप, महत्त्व आणि थाट वेगवेगळा आहे. त्या त्या भागातील धार्मिक व काळानुसार या यात्रांची मर्यादा ठरलेली आहे. प्रत्येक भागातील यात्रेच्या पद्धती निरनिराळ्या असल्या, तरी भाव आणि भक्ती एकसारखीच असते. प्रत्येक यात्रेत भरपूर मनोरंजन, मिठाई, खेळण्यांची दुकाने, भिंगरीवाले, आकाश पाळणेवाले बघायला मिळतात; परंतु प्रत्येक ठिकाणचे एक खास महत्त्वही असते.
बहिरमची यात्रा साधारण 350 वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. ‘बहिरमबुवा’ हे सातपुड्याच्या कुशीत वसलेले लोकदैवत आहे. या ठिकाणाबाबत एक आख्यायिकाही आहे. शंकर-पार्वती प्रवास करीत असताना एकदा या ठिकाणी थांबले होते. त्या वेळी निसर्गकुशीतील हे ठिकाण पार्वतीला आवडले. पार्वतीने शंकराला येथे दर वर्षी येण्याची गळ घातली. त्यावर शंकराने “माझा एक अंश नेहमीसाठीच या ठिकाणी ठेवतो” असे सांगितले. शंकराचे रुद्ररूप असलेले हे ठिकाण ‘भैरवाचे ठिकाण’ म्हणून ओळखले जाऊ लागले. भैरवाचा अपभ्रंश होऊन कालांतराने हे ‘बहिरम’ नावाने ओळखले जाऊ लागले. या ठिकाणी शिव-पार्वतीने तीन दिवसांचा मुक्काम केला होता. त्यामुळे त्यांच्या स्नानासाठी दैवी शक्तीने खास काशीचे पाणी आणण्यात आले. त्या पाण्याचा इथला काशी तलाव प्रसिद्ध आहे. याशिवाय ज्या तलावातून पूर्वीच्या काळी भांडीकुंडी निघत होती, (ती भांडी घेतल्यानंतर ती परत करण्याची अट होती. काही व्यक्तींनी ती भांडी चोरून नेल्यामुळे तेथून भांडी येणे बंद झाल्याची आख्यायिका आहे.) तो ‘भांडी तलाव’ही येथे आहे, परंतु मृतावस्थेत. येथे विश्वामित्र, कपिल ऋषींनी काही दिवस तप केल्याचेही सांगितले जाते.
बहिरमबाबांचे मंदिर जवळपास 125 फूट उंचीवर आहे. त्याच्या शेजारी गणेशाची आठ ते दहा फूट उंच सुंदर मूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर दगडाचा नंदी आहे. दोन-अडीच एकराच्या परिघात हा मंदिर परिसर आहे. त्यानंतरच्या खालच्या बाजूस सुमारे 100 एकरांत यात्रा भरते. बहिरमबुवाची सध्याची मूर्ती भव्य दिसत असली, तरी पायथ्याशी दगडाचा एक चौथरा आहे. त्याखाली भैरव घोड्यावर बसलेले असल्याचे मानले जाते. आधी एका सुपारीएवढा देव तयार करण्यात आला होता. त्यावर शेंदूर, लोणी लावण्यात येत होते. शेंदूर, लोणी, दूध, तुपामुळे पुढे मोठी मूर्ती तयार झाल्याचेही काही जण सांगतात.
येथे नवस फेडण्यासाठी अनेक प्रदेशांतून लोक येतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी परिसरातील महिला येथे पूजेसाठी येतात. गूळ, फुटाणे, रेवड्या हा या देवाचा मुख्य प्रसाद आहे. बहिरमची यात्रा सुरुवातीला वर्षातून दोनदा भरत असे, ती केवळ दहा दिवस - पहिली कार्तिक पौर्णिमेला व दुसरी मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला. कालांतराने, मुहूर्तावरील यात्रा तारखेवर आली. आता सरकारी आदेशानुसार 20 डिसेंबर ते 31 जानेवारी या काळात ही यात्रा भरते. बहिरमची यात्रा म्हणजे ग्रामीण भागातील सुपरमार्केट किंवा मॉल असेच म्हणता येईल. एकाच ठिकाणी विविध वस्तू मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे ही जत्रा.
या यात्रेच्या स्वरूपात काळानुरूप बदल झाला आहे. पूर्वी सरदार मंडळी आपापल्या शक्तीचे प्रदर्शन करीत. घोडे-सैनिकांसह राहुट्या टाकलेल्या असत. त्यानंतरच्या काळात गावोगावचे श्रीमंत, प्रतिष्ठित नागरिक राहुट्या, तंबू, डेरे टाकून येथे मुक्काम करीत असत. मोठ्या जेवणावळी उठत. त्यात खास मातीच्या भांड्यांमध्ये शिजवलेल्या मटणाचे महत्त्व असे. या जेवणावळीत निमंत्रणाची गरज राहत नसे. देवाला नवस केल्याप्रमाणे शाकाहारी जेवणावळीही उठायच्या. यात्रेचा हंगाम म्हणजे, शेतीच्या उत्पन्नाचे पैसे मिळणे सुरू होण्याचा काळ. त्यामुळे या यात्रेत आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात होत असे. पूर्वी बैलगाडी, शेतीची विविध अवजारे, बैल, दोर अशा शेतीशी संबंधित वस्तूंची मोठी विक्री होत असे. ठिकठिकाणच्या प्रसिद्ध तयार वस्तू विक्रीसाठी येत असत. मातीची भांडी, लाकडाच्या वस्तू, बांबूच्या वस्तू यांची विक्री होई. करमणुकीसाठी तमाशांचे फड रंगू लागत. परंतु कालांतराने त्यात वाईट प्रवृत्ती शिरल्या. लोकआंदोलनानंतर तमाशे बंद झाले. आता लोककला, बाळमेळावा, शेतकरी जागृती, कृषीविषयक अशा कार्यक्रमांचे आयोजन असते. याला जोडून तमाशाचा कार्यक्रमही होतो. त्याला पोलिसांचा बंदोबस्त असतो.
यात्रा दीर्घकाळ चालत असल्याने पूर्वीच्या सरदारांनंतर इंग्रजांचे तालुका मामलेदार यात्राकाळात तेथेच तळ ठोकून बसत होते. बहिरम येथून सरकारी कामकाज चालत होते. आताही काही सरकारी कार्यालये तेथे नेण्याचा प्रयोग झाला होता. अमरावती जिल्हा परिषदेच्या वतीने येथे आता कृषीविषयक प्रदर्शन भरवले जाते. यात्रेतून प्रबोधनाचाही प्रयत्न केला जात आहे. पूर्वीएवढी ‘मजा’ राहिली नाही म्हणून अनेक ‘शौकीन’ सध्या यात्रेच्या स्वरूपाबद्दल नाक मुरडत असले, तरी आजही या यात्रेचे महत्त्व कमी झालेले नाही. यात्राकाळात एका रविवारी येथे लाख-दोन लाख भाविकांची सहज गर्दी होते. गावसंस्कृतीपासून दुरावलेले शहरी भागातील अनेक जण यात्रेला आवर्जून येतात. तंबू-राहुट्यांमध्ये मुक्काम करत येथील जेवणाची लज्जत घेतात. यात्रेत खरेदी करतात. यात्रा कशी असते हे पुढील पिढीला दाखवतात आणि परत माघारी जातात. विदर्भात बहिरमबुवा यात्रा आपले वेगळेपण जपत आजही सुरू आहे.