बाभूळझाड फुलतंच आहे!

विवेक मराठी    01-Mar-2024   
Total Views |

 Kavyashree Nalavde
सांगलीजवळच्या जयसिंगपूरच्या माळावर बनवलेलं आपलं उत्पादन थेट सिंगापुरात विकून आलेली उद्योजिका काव्यश्री नलावडे! प्रतिकूलतेला तोंड देताना कमावलेला टणक ताठ कणा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या समृद्धीचं सोनेरी लोलक मिरवणारी ही धडाडीची उद्योजिका. स्वत:च्या कॉमर्स पार्श्वभूमीशी काहीही संबंध नसलेला उद्योग अपघाताने तिच्या हाती आला. मेकॅनिकल इंजीनिअरिंगसारख्या क्षेत्रात मातबर पुरुषांसमोर ती ठामपणे टणक खोडासारखी उभी राहिली आणि तिच्या बहरलेल्या उद्योगाच्या हिरव्यागार पालवीने दोन्ही मुली, दोन्ही कुटुंबं आणि कामगार या सार्‍यांनाच आपल्या सावलीत सामावून घेतलं. अशा या जिद्दी उद्योजिकेची कहाणी...
 
अस्सल लाकूड, भक्कम गाठ, ताठर कणा, टणक पाठ
 
वार खात, गारा खात, बाभूळझाड उभेच आहे..
 
प्रतिकूल परिस्थितीत, रखरखीत माळरानावर, वार्‍यापावसात ताठ उभं राहणारं हे वसंत बापटांचं ‘बाभूळझाड’, तर
 
लवलव हिरवी गार पालवी, काट्यांची वर मोहक जाळी
 
घमघम करती लोलक पिवळे, फांदी तर काळोखी काळी..
 
ही इंदिरा संतांची ‘बाभळी’.
 
 
सांगलीजवळच्या जयसिंगपूरच्या माळावर बनवलेलं आपलं उत्पादन थेट सिंगापुरात विकून आलेली उद्योजिका काव्यश्री नलावडे हे या दोन्ही वर्णनांचं लोभस मिश्रण आहे! प्रतिकूलतेला तोंड देताना कमावलेला टणक ताठ कणा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या समृद्धीचं सोनेरी लोलक मिरवणारी ही धडाडीची उद्योजिका. स्वत:च्या कॉमर्स पार्श्वभूमीशी काहीही संबंध नसलेला उद्योग अपघाताने तिच्या हाती आला. मेकॅनिकल इंजीनिअरिंगसारख्या क्षेत्रात मातबर पुरुषांसमोर ती ठामपणे टणक खोडासारखी उभी राहिली आणि तिच्या बहरलेल्या उद्योगाच्या हिरव्यागार पालवीने दोन्ही मुली, दोन्ही कुटुंबं आणि कामगार या सार्‍यांनाच आपल्या सावलीत सामावून घेतलं.
 
 
काव्यश्रीचे वडील रावसाहेब गळतगी हे शिक्षक, शिवाय कानडीतले उत्तम काव्यरचनाकार. आई मालतीदेखील शिक्षिका. पुढे वडिलांच्या आजारपणामुळे तीन मुलांचा व वडिलांच्या उपचाराचा भार एकट्या आईवर पडू लागला. मग मुलांचं शिक्षण नीट व्हावं, म्हणून सांगलीला मामाकडे त्यांची रवानगी झाली. मामा चंद्रकांतराव पाटील अतिशय कष्टाळू व चोख व्यापारी. दहावीनंतर ‘मथुबाई गरवारे’ला कॉमर्सला प्रवेश, तिथे मग स्पर्धा-नाटकं-एन.एस.एस.-अंधश्रद्धा निर्मूलन या सर्वांत उत्साहाने काव्यश्री पुढे असायची. शिकायची प्रचंड इच्छा होती, सीए व्हायचं स्वप्न होतं, मात्र एकंदर परिस्थिती पाहता ‘हिचं लग्न लवकर करून टाका’ हा आईला मिळत असलेला सल्ला फारसा चुकीचा नव्हता. निदान पदवी घेतल्याशिवाय लग्न करायचं नाही, हे तिच्या मनात पक्कं होतं. ‘मला शिकू दिलं नाहीस तर कृष्णा नदीत जीव देईन’ या धमकीला घाबरून आईने घाई केली नाही आणि शिक्षण पदरात पडलं. मात्र नंतर लगेच अशोक सांगले याचं स्थळ आलं. मुलगा इंजीनिअर, चांगल्या नोकरीत, शिवाय थोडी शेती.. सर्वांना स्थळ पसंत पडलं. एन.एस.एस.मध्ये हुंडाबंदीची शपथ घेतलेल्या काव्यश्रीने दोनच बाबी पाहून होकार दिला - एक, लोक हुंडा मागत नाही आहेत; दुसरं, आईने शिकू दिलं, आता तिचा भार कमी करायला हवा. विसाव्या वर्षी संसार सुरू झाला.
 


 Kavyashree Nalavde 
 
दोन वर्षांत पूजा जन्माला आली. पण काव्यश्रीचा चळवळा स्वभाव तिला स्वस्थ बसू देईना. आपल्या दोन मैत्रिणींना सोबत घेऊन तिने ‘त्रिवेणी उद्योग’ हा गृहउद्योग स्थापन केला. तिळगुळाचे लाडू करण्यापासून सुरुवात झाली आणि पापड, दिवाळीचा फराळ अशा अनेक गोष्टी बनवून त्याची विक्री सुरू झाली. आसपासच्या सहकारी बझारमध्ये आणि दुकानांमध्ये माल चांगला खपू लागला. महिन्याला येणारे वीस-पंचवीस हजार फार महत्त्वाचे होते, कारण त्याच सुमारास सांगले यांच्या मनातही उद्योग करायचे विचार येऊ लागले होते. जवळच्या अकिवाटे इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये एक प्लॉट घेऊन त्यांनी ‘पूजा इंडस्ट्रीज’ या नावाने मेकॅनिकल वर्कशॉप सुरूही केलं. तोपर्यंत दुसरी कन्या शरयूदेखील परिवारात दाखल झाली होती. पूजा इंडस्ट्रीजचा जम बसला नसला, तरी ‘त्रिवेणी’मुळे घरात पैसा येत होता. पण अशोक यांना अचानक तीव्र काविळीने ग्रासलं. काव्यश्रीच्या धडपडीला इथे मात्र अपयश आलं आणि अवघ्या तीन वर्षांच्या आजाराने अशोक यांचा बळी घेतला.
 
 
फक्त अठ्ठावीस वर्षांचं वय, पदरात दोन लहान मुली. अशोक यांच्या ट्रीटमेंटच्या काळात उद्योग सांभाळणं शक्य नव्हतं, त्यामुळे तो उद्योगही बंद झालेला. पहिल्या बारा दिवसांचे विधी पार पडले आणि काव्यश्रीला वास्तवाची चरचरीत जाणीव झाली. त्या वेळी मामा पुढे सरसावले आणि काव्यश्रीला घेऊन ‘पूजा इंडस्ट्रीज’मध्ये आले. तिला ऑफिसमध्ये अशोक यांच्या खुर्चीत बसवून म्हणाले, “ही तुझी खरी जागा आहे. घरात बसशील तर लोकांच्या खोट्या सहानुभूतीच्या लाटेत वाहून जाशील. हे तुमचं दोघांचं स्वप्न आता तू पूर्ण करायचं आहेस.”
 
 
मामांचं सांगणं मनोमन पटलं, येऊन बसायला सुरुवात तर केली. पण पुढे काय? जॉबपार्ट्स, मशीन्स, व्हर्निअर, लेथ हे शब्दही माहीत नव्हते. कुठून सुरुवात करायची याचाही अंदाज नाही. कंपनीवर कर्ज होतं. बँकेत जाऊन “किती कर्ज आहं ते सांगा, मी फेडेन” असं म्हटल्यावर मॅनेजर म्हणाले, “असं विचारायला येणारी मी पहिलीच व्यक्ती पाहतो आहे!” चार कामगार, त्यांचे पगार, बिलं हेही प्रश्न होते. मग काम मिळवण्यासाठी काव्यश्रीची वणवण सुरू झाली. ही कॉमर्स झालेली, अननुभवी मुलगी काय जॉबवर्क करणार, हा अविश्वास तिला जाणवायचा. अनेकदा समोरचा माणूस ‘बसा’ असंही म्हणत नसे. निराशा, अपमान याव्यतिरिक्त काहीच हाताला लागेना. दररोज सांगली-जयसिंगपूर हेलपाटे मारायचे, किरकोळ कामं असतील ती करून घ्यायची आणि महिनाअखेरीस जेमतेम कारखान्याचं वीजबील भरता येईल इतकी रक्कम हातात यायची. सहा महिने आईकडून पैसे घेऊन कसेतरी कामगारांचे पगार केले. शेवटी नाइलाजाने आता युनिट बंद करावं लागणार हे दिसू लागलं. पण हार मानण्याचा स्वभाव नव्हता. एक अखेरचा प्रयत्न म्हणून कारखान्यासमोरच असलेल्या एका कंपनीत धडक मारली. तिथले जी.एम. पी.के. कांबळेसाहेब हे फार कडक आहेत, अशी ख्याती असल्याने आजवर काव्यश्रीने हे धाडस केलंच नव्हतं.
 
 
मात्र कांबळेसाहेबांनी तिला बसवून, चहा देऊन तिची नीट विचारपूस केली. हा अनुभव नवा आणि खूप सुखावणारा होता.कांबळेसाहेबांनी काही जॉब दिले आणि “हे जमतात का पाहा, मग पुढचं बघू” या त्यांच्या आश्वासनाने आनंदित होऊन काव्यश्री ते जॉब घेऊन परतली. वस्तुत: काम अगदी काही तासांत होण्यासारखं होतं. पण पहिलाच जॉब उत्तमच करायचा या निर्धाराने तिने आधीच आठ दिवसांची मुदत मागून घेतली आणि अनेक लोकांना भेटून त्या कामाची नीट माहिती करून घेऊन मग तो जॉब उत्तमपणे पूर्ण करून दिला. कांबळेसाहेबांनाही काम पसंत पडलं आणि मग मात्र कामाचा ओघ सुरू झाला.

 Kavyashree Nalavde
 
पहिल्याच जॉबचे एकरकमी एकोणीस हजार रुपये मिळाले! त्यामुळे आत्मविश्वास चांगलाच दुणावला. मग हळूहळू अन्य कामं मिळू लागली. कामं वाढत गेली, तशी मशीन्स आणि कामगार यांची संख्याही वाढत गेली. तरीही पहिली काही वर्षं अत्यंत खडतर होती. राहणं सांगलीत, काम जयसिंगपूरमध्ये. रोज इकडेच यायचं, म्हणून मुलींना जयसिंगपूरच्या शाळेत घातलेलं. दरम्यान मिरजेच्या महाबळ यांच्याकडून एक जॉब मिळाला होता. मग खरी कसरत सुरू झाली. छोट्या दुचाकीवर दोन्ही मुली, त्यांची दप्तरं, सगळ्यांचे डबे हे घेऊन जयसिंगपूरला जायचं, त्यांना शाळेत सोडून कारखान्यात काम करायचं, संध्याकाळी दिवसभर केलेले महाबळांचे जॉब गाडीवर लादायचे, मुलींना घेऊन सांगलीला सोडायचं, जॉब मिरजेला नेऊन द्यायचे, पुन्हा दुसर्‍या दिवसाकरता जॉब गाडीवरून आणायचे की सकाळी ते घेऊन मुलींसह परत जयसिंगपूर! सुरुवातीच्या काळात ऑर्डर वेळेत व नीट पूर्ण व्हाव्यात यासाठी स्वत: लेथवर आठ तास उभं राहून कामही करावं लागे. यात शारीरिक कष्ट, धावपळ होत होतीच, पण त्याबद्दल तिची कधी तक्रार नव्हती. व्यवसायाचे अन्य ताणतणाव, पेचप्रसंग यात आई, भावंडं आणि मामा यांचा मानसिक आधार होता. पण कधीकधी व्यावहारिक सूचना आणि प्रत्यक्ष मदतही गरजेची असते. काव्यश्रीच्या भावाचा मित्र शरद नलावडे हा तिची धडपड जवळून पाहत होता. त्याचं स्वत:चं इंजीनिअरिंग वर्कशॉप होतं, त्यामुळे या व्यवसायातल्या अडचणी, खाचाखोचा तो जाणून होता. त्याच्या सहकार्याने काव्यश्री एक एक प्रश्न सोडवत पुढे जात होती.
 
 
 
मात्र तिचं वय आणि तिचं एकटेपण पुरुषांच्या जगात डोळ्यावर येत होतंच! दररोज ये-जा करताना असंख्य नजरा पाठीला चिकटल्या आहेत याची जाणीव, कधी वसाहतीतल्या कुणी पुरुषाने अडवून काहीबाही प्रस्ताव देणं याने खूप मनस्ताप व्हायचा. या अडचणी शरदलाही जाणवत होत्या. आणि एक दिवस ध्यानीमनी नसताना त्याने काव्यश्रीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. हा विचार काव्यश्रीच्या मनाला शिवलाही नव्हता. आर्थिक स्थैर्य आणि मुलींना वाढवणं इतकंच ध्येय डोळ्यासमोर होतं, शिवाय वयातलं अंतर, जैन व मराठा असा जातीतला फरक, मुलींची जबाबदारी असे असंख्य प्रश्न होते. सर्व साधकबाधक विचार केला, घरच्यांशी चर्चा केली आणि पूर्ण विचारान्ती दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. विवाहामुळे सामाजिक आणि भावनिक स्थैर्य मिळालं आणि व्यवसायात एक खंदा सहकारी!
 
 
शरद यांच्या दृष्टीने हा निर्णय तितकाच अवघड होता. पण एकदा निर्णय घेतल्यावर दोघेही ठरवलेल्या बाबींवर ठाम राहिले.पाच वर्षं दोघं स्वतंत्रपणे आपले व्यवसाय पाहत होते. पूजा इंडस्ट्रीकडे नवनवीन कामं येऊ लागली, तशी स्वयंचलित सी.एन.सी. मशीन्सची जोड अपरिहार्य होती. काव्यश्रीने धाडसाने गुंतवणूक केली. 2007 साली पहिलं सी.एन.सी. मशीन आलं. आता अधिक कामं घेणं शक्य होतं आणि आवश्यकही! मग प्रथम काम मिळालं ते कुलकर्णी पॉवर टूल्स(केपीटी)चं. मग नवं काम आणि नवं मशीन असं करत करत एकाची पाच सी.एन.सी. मशीन्स झाली.इंजीनिअरिंग टेक्नॉलॉजीलाच दरमहा सत्तर ते ऐंशी हजार ऑइल फिल्टर्स जाऊ लागले. फाइन ग्रूप मिरज, सानिका टेक्नॉलॉजी यांना विविध पार्ट्स बनवून दिले जात. मग बजाजचंही काम मिळालं आणि आता बजाजच्या आकुर्डी आणि वाळुंज युनिटला त्यांच्या दुचाकी वाहनांना आवश्यक असणारी ऑइल फिल्टर्सची पूर्ण यंत्रणा पूजामधून जाते.
 
 
आता वीस सी.एन.सी. आणि चार व्ही.एम.सी. मशीन्स आहेत आणि कामगार-संख्या पन्नासच्या वर गेली आहे. पाचशे चौरस फुटांच्या बांधकामावरून पाच हजार चौ.फुटांपर्यंत कारखाना विस्तारला, तेव्हा शरददेखील पूर्णपणे याच व्यवसायात सहभागी झाले. आता पूजा इंडस्ट्रीज, पूजा टेक, शरयू मशीन्स ही तिन्ही युनिट्स सामावून घेऊ शकेल अशी मोठी इमारत उभी राहिली आहे. नव्या आर्थिक वर्षात नव्या भव्य जागेत स्थलांतर होईल.
 
 
दरम्यान स्वत:च्याच एक तक्रारीमुळे काव्यश्रीने कांस्ययंत्र बनवलं. अनेक वर्षं अनेक प्रकारचे ताणतणाव सोसल्याने तिची झोप उडाली होती. निद्रानाशाचा पारंपरिक भारतीय उपाय म्हणजे काशाच्या वाटीने पायाला तेल वा तूप चोळणं. याचं आधुनिक रूप म्हणजे कांस्ययंत्र. या कांस्ययंत्राची निर्मिती काव्यश्रीच्या कारखान्यातही होऊ लागली. नुकत्याच सिंगापूरला झालेल्या ‘नमस्ते भारत’ या मोठ्या प्रदर्शनात या यंत्राची उत्तम विक्री करून आणि विक्री प्रतिनिधी नेमूनच ती परतली. काव्यश्रीच्या कारखान्यात तयार झालेली सुमारे सातशे कांस्ययंत्रं लोकांना आरोग्याचा लाभ देत आहेत.
 
 
दोन्ही मुली इंजीनिअर झाल्या, त्यांची लग्नं झाली. थोरलीने आता याच व्यवसायात पाऊल टाकत कोल्हापूरजवळ तिचं स्वतंत्र युनिट सुरू केलं आहे. धाकटी आता स्वतंत्रपणे डिझायनिंगची कामं करतेच, शिवाय शरयू मशीन्सचं सारं डिजिटल मार्केटिंग तीच पाहते. कारखाना सांभाळून काव्यश्री सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहे. अकिवाटे औद्योगिक वसाहतीच्या मंडळाची अध्यक्ष म्हणून तिने काम पाहिलं. तिथल्या आयटीआयला तिचं नेहमी मार्गदर्शन असतं. शिवाय मागील वर्षीपासून शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणूनही ती काम पाहते आहे. जिल्हा उद्योग केंद्र, मिटकॉन, दैनिक सकाळ यासह अनेक उद्योजकता पुरस्कार तिला मिळाले आहेत.
 
 
आता पुढे काय? या प्रश्नावर ती हसून म्हणते, “काम हाच देव मानला, त्यामुळे दुसर्‍या कशात मन गुंतत नाही. पण आता राहून गेलेल्या गोष्टी करायच्यात. खूप फिरायचं आहे आणि मुख्य म्हणजे तरुण मुलामुलींना दिशा देईल असं काही काम करायचं आहे..” काव्यश्रीचा स्वभाव पाहता याही गोष्टी ती उत्तमपणे करेल आणि हे आनंदी, उद्योगी बाभूळझाड फुलतच राहील, यात शंकाच नाही!

विनीता शैलेंद्र तेलंग

विनीता शैलेंद्र तेलंग (D.pharm.Post Dip.in Ayu.Pharm.)

 पुनर्वसु आयुर्वेदीय औषधी निर्माण या नावाने स्वतःचा आयुर्वेदिक औषध निर्मितीचा 1995 पासून व्यवसाय .सुमारे शंभर उत्पादने . बेळंकी व हरीपूर येथे चालणाऱ्या कामातून स्थानिक महिलांना रोजगार .

१९८८ ते ९० अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे औरंगाबाद येथे पूर्ण वेळ काम .

 भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या संस्थेच्या संचालक मंडळाच्या सदस्य. या संस्थेतर्फे तीन अनाथाश्रम, एक अल्पमुदत निवासस्थान, कुटुंब सल्ला केंद्रे इ .उपक्रम चालतात .नुकत्याच सुरु केलेल्या नर्सिंग विभागाची संपूर्ण जबाबदारी . अनेक अन्य सामाजिक कामात सक्रिय.

त्याचबरोबर अनेक संगीत व नुत्यविषयक कार्यक्रमांचे निवेदन व सूत्रसंचालन. काव्य लेखन, विविध अंक संपादन याबरोबर ग्राहक हित, सा.विजयंत, सा. विवेक, विश्वपंढरी, प्रसाद ,छात्रप्रबोधन या अंकात नैमित्तिक लेखन. अनेक स्मरणिकांचे संपादन,  रा.स्व.संघाची पश्चिम महाराष्ट्र महिला समन्वय समिती सदस्य .