साल्हेरच्या लढाईतील सूत्रबद्ध हालचाली, वेळकाळाचे गणित, युद्ध कारवायांचे नियंत्रण हे सारेच अद्वितीय होते. या युद्धाने मराठ्यांचा आत्मविश्वास इतका वाढला की, बलाढ्य मुघलच काय, हिंदुस्थानातल्या कोणत्याही शत्रूचा सामना मराठे सहज करू शकतात हे सर्वांना कळून चुकले. साल्हेरचा रणसंग्राम ही राज्याभिषेकानंतरच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचीच नाही, तर शिवरायांनंतरही मराठे ज्या प्रकारे मुघलांविरुद्ध नेटाने लढले त्याची, आपण कुणालाही हरवू शकतो ह्या मराठ्यांच्या दृढ विश्वासाची ही नांदी ठरली, हे दिसून येते. त्यामुळेच साल्हेरच्या रणसंग्रामाचे महत्त्व अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण होते.
बर्याचदा युद्धातील जय-पराजयापेक्षा महत्त्वाचे ठरतात ते युद्धाचे परिणाम. वणी-दिंडोरीच्या कांचनबारीतील लढाईत मराठ्यांनी मुघली फौजांना मैदानी युद्धातही धूळ चारल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढीला लागला होता. 1670च्या उत्तरार्धात मोरोपंतांनी बागलाणातील त्रिंबकगड, अहिवंत, रवळा-जवळा, मार्कंडा, औंढा, पट्टा, अचला असे अनेक किल्ले घेतले. प्रतापराव गुजरांनी बहादुरपुर्यावर धाड टाकली. शिवरायांनी स्वत: कारंजावर आणि वर्हाडावर स्वारी केली. मुल्हेरची बाजारपेठ उद्ध्वस्त केली. साल्हेर किल्ल्याला वेढा टाकून फार वेळ न काढता मराठे दोर टाकून किल्ल्यावर चढले आणि किल्लेदार फत्तुल्लाखानाला यमसदनास धाडून 5 जानेवारी 1671 रोजी साल्हेर किल्ला ताब्यात घेतला.
साल्हेरचा किल्ला महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला. कळसूबाईची उंची 5427 फूट, तर साल्हेरची 5263 फूट. गडाचा विस्तारही मोठा. बागलाणात इतका भव्य किल्ला दुसरा नाही. एका बाजूस मोसम, तर दुसर्या बाजूस आराम या नद्यांनी किल्ल्याभोवतालची खोरी सजवलेली. सटाणा या इथल्या मुख्य शहरापासून वायव्येला वीस मैलाच्या अंतरावर साल्हेर किल्ला आहे. किल्ल्यावर बारा महिने पाण्याने भरलेला भलामोठा गंगासागर तलाव आहे. सर्वोच्च टेकडीवर भगवान परशुरामाचे मंदिर आहे. इथून समोर डोंगरावर एक मोठे भोक आहे. इथे उभे राहून परशुरामांनी कोकणभूमी तयार करण्यासाठी समुद्रावर बाण सोडला, त्या वेळी डोंगराला भोक पडले अशी आख्यायिका आहे. साल्हेरच्या पूर्वेला जोडून उभा आहे सालोटा किल्ला आणि घेर्यात उभे आहेत मुल्हेर, मोरा, हारगड असे एकाहून एक सरस किल्ले. गुजरातच्या डांग आणि नाशिकच्या बागलाण अशा दोन प्रांतांतील दळणवळणाच्या घाटसीमेवर साल्हेर उभा असल्यामुळे त्याचे भौगोलिक महत्त्व अधिक आहे.
शिवरायांनी मुघलांच्या बागलाण प्रांतातील किल्ले घेतले, साल्हेर घेतला, मुल्हेर बाजारपेठ लुटली, म्हणून औरंगजेबाचा तिळपापड झाला. त्याने शहजादा मुअज्जम, महाबतखान, दिलेरखान, जसवंतसिंह, दाऊदखान अशा सर्व सरदारांना दख्खनवर तुटून पडण्याचे आदेश दिले. पण थोड्याच काळात या सरदारांचे एकमेकांशी पटत नसल्याचे त्याच्या लक्षात आले.
जानेवारीनंतर दाऊदखानाने जवळजवळ महिन्याभराच्या वेढ्यानंतर किल्लेदाराशी बोलणी करून अहिवंत पुन्हा मिळवला. पुढे मुघलांनी मार्कंडा, अचला, रवळा-जवळाही मिळवले. चिडून महाबतखानाने पावसाळ्याच्या तोंडावर मोहीमच सोडली आणि नगरला निघून गेला. पुढे 1671च्या सप्टेंबरमध्ये अफगाणिस्तानच्या मोहिमेसाठी महाबतखान उत्तरेला परतला. औरंगजेबाने दाऊदखानाला बोलावून घेतले. आता दख्खनची भिस्त पडली दिलेरखान आणि बहादुरखान यांच्यावर!
दिलेरखान हा अनुभवी सेनापती होता. त्याने मिर्झाराजा जयसिंगाबरोबरच्या पुरंदर मोहिमेतील जबाबदारी यशस्वीरित्या पेलली होती. बहादुरखानाला बरोबर घेऊन त्याने साल्हेरला वेढा टाकला. राव अमरसिंह आणि मुहकमसिंह चंदावत, इख्लासखान मियाँना अशा नामचिन सरदारांसह जवळपास चाळीस हजाराचे सैन्य त्याच्याजवळ होते. वेढा जरी टाकला, तरी दिलेरखानाने राजांच्या मुलखात धुमाकूळ घालत पुण्यापर्यंत चाल करण्याचा धूर्त डाव आखला. तो स्वत: नाशिकमार्गे पुणे आणि बहादुरखान नगरच्या बाजूने सुप्यापर्यंत स्वराज्याचा मुलूख उद्ध्वस्त करण्यासाठी अर्धे सैन्य घेऊन निघाला.
वाटेतच रवळ्या-जवळ्याजवळ उत्तरेला कणेरगड हा किल्ला होता. किल्ला तसा लहानच होता, म्हणून शिबंदीही फारशी नव्हती. पण कणेरगडाचा किल्लेदार रामजी पांगेरा मोठा धीराचा माणूस होता. मरेन पण किल्ला देणार नाही अशा निग्रहाचा कसलेला मावळा. मुघलांशी लढून आलेले सातेकशे मराठे किल्ल्यात विसाव्याला आले होते. दिलेरखानाने कणेरगडाला वेढा घातला. एवढासा तो कणेरगड, क्षणार्धात काबीज करू अशी त्याची समजूत. पण रामजीने किल्ला लढवायचा ठरवले. दिलेरखानाच्या मोठ्या फौजेपुढे आपले काहीच चालणार नाही, हे माहीत असतानाही सातशे मावळ्यांना घेऊन तो महादिव्याला तयार झाला. सकाळी अचानक गडाचा दरवाजा उघडून रामजीसह सारे मराठे दिलेरच्या फौजेवर तुटून पडले. तुंबळ युद्ध झाले. एकेक मराठा दहा दहा मुघलांशी झुंजत होता. दिलेरखान आवाक झाला. तो पुरंदराच्या लढाईत सुलतानढवा करणार्या मुरारबाजीला पुन्हा एकदा रामजीच्या रूपात पाहत होता. प्रचंड पराक्रम करत त्या रणगर्दीत एकेक मराठा दिसेनासा झाला. रामजी पांगेराने कणेरगडासाठी प्राणांची आहुती दिली. गड दिलेरखानाच्या ताब्यात आला खरा, पण त्याने मराठ्यांच्या काटक वृत्तीचा पुन्हा एकदा अनुभव घेतला. शिवरायांच्या सैन्याचे मनोबळ खच्ची करणे केवळ अशक्य आहे, हे त्याला समजून चुकले. लगोलग, वणी दिंडोरीमार्गे चाकण करीत तो पुण्यास भिडला. भयंकर कत्तल केली.
शिवरायांना रयतेची आणि स्वराज्याची चिंता लागली होती. मुघली चढाईला जोरकस तडाखा देण्याचे त्यांनी ठरवले. या वेळी मोरोपंत कोकणात, तर प्रतापराव गुजर औरंगाबादच्या बाजूला होते. राजांनी दोघांना साल्हेरकडील दिलेरखानाच्या मुख्य छावणीवर हल्ला चढवण्याची आज्ञा केली. दोघेही तातडीने निघून दिंडोरीला एकत्र आले. एकूण सैन्य चाळीस हजार झाले. त्यात आनंदराव मकाजी, रुपाजी भोसले, गोदाजी जगताप, व्यंकाजी दत्तो, सिधोजी निंबाळकर, खंडोजी आणि संताजी जगताप, नागनाथ, मुकुंद बल्लाळ, विसाजी बल्लाळ, मानाजी मोरे आणि सूर्यराव काकडे असे एकाहून एक शूर मराठी सरदार होते. 1672च्या फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात हे सारे सैन्य साल्हेर-मुल्हेर पाशी गोळा झाले. व्यूहरचना नक्की झाली. साल्हेरचा परिसर डोंगराळ असल्यामुळे पायदळाचेच महत्त्व लढाईत अधिक होते. त्यामुळे साल्हेरच्या दक्षिणेला असलेल्या डोंगरमाळेपलीकडे मोरोपंतांचे पायदळ तैनात झाले. मदतीला प्रतापरावांचे काही घोडदळ होतेच. सकाळीच प्रतापरावांच्या घोडदळाने मुल्हेरच्या बाजूने मुघली छावणीवर हल्ला करायचा. पहिली चढाई ठरली आणि ठरल्याप्रमाणे दिवस उगवतानाच मुघली छावणीवर प्रतापरावांनी हल्ला केला. अचानक आलेल्या हल्ल्याने भांबावलेले मुघल सावरून लढायला लागले. पाऊण-एक तास जोरदार मारामारी झाली. दातओठ खाऊन मुघली घोडदळाने मराठ्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. आणि अचानक प्रतापरावांच्या सैन्याने रणातून पळ काढला. मुल्हेरच्या दिशेने धावणार्या त्या घोडदळामागे मुघल त्वेषाने धावू लागले. जवळजवळ पंचवीस मैल पाठलाग केला. हे मुघली घोडदळ लांबपर्यंत झालेल्या दौडीने थकून गेले, पण मराठ्यांना पळवून लावण्याचा आनंद त्यांना होत होता. पाठलाग सोडून माघारी परतायचे त्यांनी ठरवले खरे, पण काय होते आहे हे कळायच्या आधीच त्यांच्या पिछाडीवरून ‘हर हर महादेव’चा घोष कानी पडला. ताज्या दमाची मराठी घोडदळाची तुकडी त्यांच्या अंगावर येत होती. लगेच पुढे चालणार्या प्रतापरावाचे घोडदळही उलट फिरले आणि पुढून-मागून झालेल्या त्या मराठी हल्ल्याच्या मधोमध मुघली फौज सापडली. त्यांच्या आनंदाचा, आत्मविश्वासाचा चक्काचूर झाला होता. भयंकर कत्तल. बघता बघता अवघी मुघली फौज आडवी झाली. जे थोडे बचावले, ते साल्हेरच्या छावणीकडे, तर काही मुल्हेरकडे कसेबसे धावत सुटले. काही अवधीतच मुघली फौज नेस्तनाबूत झाली. भरपूर घोडे आणि शस्त्रे मराठ्यांच्या हाती सापडले. पहिल्या आघाडीत विजयी होऊन सारी मराठी फौज साल्हेरच्या मुघली छावणीकडे धावत सुटली.
सकाळी जेव्हा प्रतापरावाच्या फौजांनी माघार घेत मुघली घोडदळाला पाठलागावर घेतले, तेव्हाच मोरोपंतांच्या पायदळाने छावणीवरच हल्ला केला. सावरून मुघल लढणार, तोच मराठ्यांनी छावणीला चहूबाजूंनी घेरले. तुंबळ युद्ध झाले. दिवसभर मराठे आणि मुघल रणसंग्रामात अटीतटीने लढत होते. मुघलांकडील राजपूत सरदार प्राणपणाने लढले, पण उपयोग झाला नाही. मुहकसिंह, राव अमरसिंह चंदावत ठार झाले. मुघलांचे अनेक मुख्य सरदार धराशायी झाले. मुखमसिंह आणि इख्लासखान मियाँना जखमी अवस्थेत कैद झाले. जवळपास दहा हजार मुघलांची कत्तल झाली होती. साल्हेर मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार झाला होता. मात्र या युद्धात शिवरायांचा बालपणीचा जिवलग मित्र सूर्यराव काकडे गोळी लागून धारातीर्थी पडला. एकंदर चार-पाच हजार मराठे कामी आले. दिवस उलटेपर्यंत साल्हेरची संपूर्ण मुघली छावणी नेस्तनाबूत झाली होती. प्रतापरावाकडून मार खाऊन आलेले घोडेस्वार साल्हेरला पोहोचले खरे, पण सर्व छावणीच उद्ध्वस्त झालेली पाहून माघारी फिरले आणि मुल्हेरकडे आश्रयाला गेले, तर काही मुघली पायदळ मोरोपंतांना शरण गेले.
पुण्यावर हल्ला करून दम टाकणार्या दिलेरखानाला ही बातमी कळली. न कल्पिलेल्या शिवरायांच्या ह्या युद्धनीतीने त्याला जबर धक्का बसला. पण उपयोग नव्हता. तो तातडीने साल्हेरकडे निघाला, परंतु छावणी संपूर्ण नष्ट झाल्याचे कळताच चरफडत नाइलाजाने तो चांदवडच्या दिशेने निघून गेला.
साल्हेरच्या लढाईची नेमकी तारीख सापडत नसली, तरी बहुधा 1672 फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात हा रणसंग्राम झाला, हे निश्चित समजते. या युद्धाची माहिती जशी मुघली कागदपत्रांत येते, तशी मुंबईकडल्या इंग्रजांच्या पत्रांतही मिळते. सभासदाने तर आपल्या बखरीत या लढाईचे अगदी रोमांचक वर्णन केले आहे - ‘दुतर्फा दहा हजार माणूस मुर्दा जाहले. घोडे, उंट, हत्ती यांस गणना नाही, रक्ताचे पूर वाहिले, रक्ताचे चिखल जाहले, त्यामध्ये पाय रुतो लागले, असा कर्दम जाहला.’ सूर्यराव काकडेच्या बलिदानाबाबत सभासद लिहितो, ‘सूर्यराव म्हणजे सामान्य योद्धा नव्हे! भारती जैसा कर्ण योद्धा, त्याच प्रतिभेचा असा शूर पडला!’
साल्हेरच्या रणसंग्रामाचे महत्त्व अनेक अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण होते. स्वराज्याच्या मुलखाबाहेर मुघली मुलखात ही लढाई झाली. मुघली मुलखात लढण्याची मराठ्यांची ही पहिलीच वेळ नव्हती, तर याअगोदर सुरत, कारंजा, रामनगर, जालना, वणी दिंडोरी अशा लांब लांब मजला मारत शिवरायांच्या सैन्याने पराक्रम गाजवला होता. पण या युद्धाने मराठ्यांच्या सेनाबळाचे भव्य दर्शन मुघलांना झाले. शिवराज्याभिषेकाच्या आधी लढलेला हा सर्वांत मोठा रणसंग्राम. गनिमी काव्याच्या छापेतंत्राने सुरुवात झालेले शिवरायांचे युद्धशास्त्र आता पारंपरिक मैदानी खेळांतही तरबेज झाले होते, हेच इथे लक्षात येते. सुमारे चाळीस हजार मराठी सैन्य या युद्धात लढले गेले.. म्हणजे मुघलांच्या सैन्याइतके तुल्यबळ सैन्य महाराजांनी इतक्या वर्षांत निर्माण केले होते. या युद्धात घोडदळ आणि पायदळ यांचा समान वापर झाला. आपण रणांगणातून पळ काढतो आहोत असे शत्रुसैन्याला भासवून, त्याला पाठीवर घेत मुख्य छावणीपासून लांब नेणे, लांब नेल्यानंतर मागून-पुढून हल्ला करीत कात्रीत पकडणे, दुसरीकडे एकाकी पडलेल्या मुख्य छावणीवर चहूबाजूंनी भयंकर हल्ला चढवून ती नेस्तनाबूत करणे ही योजना प्रतापराव आणि मोरोपंत अशा कसलेल्या सेनानींची होती. त्यामागे शिवरायांच्या असामान्य युद्धनीतीचा अभ्यास होता. घोडदळ आणि पायदळ यांच्यातील इतका समन्वय तत्कालीन लढायांमध्ये क्वचितच आढळतो. साल्हेरच्या लढाईतील सूत्रबद्ध हालचाली, वेळकाळाचे गणित, युद्ध कारवायांचे नियंत्रण हे सारेच अद्वितीय होते. या युद्धाने मराठ्यांचा आत्मविश्वास इतका वाढला की, बलाढ्य मुघलच काय, हिंदुस्थानातल्या कोणत्याही शत्रूचा सामना मराठे सहज करू शकतात हे सर्वांना कळून चुकले. साल्हेरचा रणसंग्राम ही राज्याभिषेकानंतरच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचीच नाही, तर शिवरायांनंतरही मराठे ज्या प्रकारे मुघलांविरुद्ध नेटाने लढले त्याची, आपण कुणालाही हरवू शकतो ह्या मराठ्यांच्या दृढ विश्वासाची ही नांदी ठरली, हे दिसून येते. मुघलांनाच नाही, तर तकालीन सर्व सत्ताधीशांना आणि परकीय व्यापारी सत्तांनाही या रणसंग्रामाने पुरता वचक बसला.