विदर्भातील अमरावतीमध्ये एक असा ‘बाप’ आहे, ज्याची तब्बल 123 मुले अंध, अपंग किंवा पूर्णंत: मतिमंद आहेत. यातील अनेक मुले तर अशी आहेत, ज्यांना अन्न आणि माती यातील फरक समजत नाही. काही मानसिकदृष्ट्या विकलांग, काहींना शारीरिक व्याधी आहेत तर काहींचे जीवन कायमचे अंधारमय आहे अशा मुलांना ‘शंकरबाबा पापळकर’ या अवलिया बापाने मागील जवळपास 30 वर्षांपासून आपल्या मायेच्या पंखाखाली घेतले आहे, सामान्यातील असामान्यत्व जपणारे शंकरबाबा पापळकर यांना समाजसेवेसाठी या वर्षी मिळालेला पद्मश्री पुरस्कार खर्या अर्थाने अभिमान आणि प्रेरणादायक आहे.
साधारपणे 1990 साली सुरू झालेल्या त्यांच्या या नंदनवनाचे नाव आहे ‘स्व. अंबासपंत वैद्य अंध, अपंग, मतिमंद, बेवारस मुलांचा आश्रम’. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-चिखलदरा रोडवर वझ्झर फाटा येथे शंकरबाबांचा आश्रम आहे. शंकरबाबा एकेकाळी धोब्याचे काम करायचे. रस्त्याच्या कडेला टेबल ठेवत त्यावर लोकांच्या कपड्यांना इस्त्री करण्याचे काम ते आनंदाने करायचे. या कामातच असताना ते कविता गुणगुणायचे. सुरेश भटांची गझल आणि मीरेपासून गालिबपर्यंतचे सगळे गझलनवाज त्यांना मुखोद्गत होते. कविता-शेर म्हणता म्हणता ते दारिद्य्र, कष्ट आणि घाम अशा सार्या अनुभवांवर लिहू लागले. पुढे ‘देवकीनंदन गोपाला’ या नावाचे साप्ताहिक काढले आणि त्याचे संपादक झाले. त्यांच्या नियतकालिकावर गाडगेबाबांच्या विचारांचा प्रभाव होता.
1991 साली नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये त्यांना एक मुलगी सापडली. त्यांनी तिला आश्रमात आणले. कांतीसारखी गोरीपान होती, म्हणून कांती हेच नाव ठेवले. तिचे धनंजय डोळसकर या तरुणाशी अकोल्यात कांतीचे लग्न करून दिले. अशीच एक दुसरी घटना आहे शैलजा या मूकबधिर मुलीची. खरे तर आई-वडिलांनी तिला फेकून दिले. भंडार्यातील एका नालीत ती पडून होती. बाबांनी तिला आश्रमात आणले. कु. शैलजा शंकर पापळकर हे नाव दिले. आज त्याच विद्यालयात शैलजा नोकरीला आहे. पगार मिळाला, तेव्हा त्यांनी तिच्या अभिनंदनासाठी एक खास कौतुक सोहळा आयोजित केला होता. तिचे लग्नही लावून दिले. विशेष म्हणजे या आश्रमातील एकही मुलगा त्यांचा नाही. सार्वजनिक संडासाच्या टाकीत, मुंबईच्या फलाटावर, अकोल्याच्या स्टेशनलगतच्या नाल्यात किंवा कचरापेटीत फेकून दिलेली अशी ही मुले आहेत. काही तर चक्क सरकारनेच स्वत:होऊन त्यांच्याकडे पाठवली आहेत. या अनाथ मुलांच्या संगोपनाचे आणि पुनर्वसनाचे काम बाबा करत आहेत.
आज वझ्झर येथील आश्रमात मानसिकदृष्ट्या विकलांग, शारीरिक व्याधिग्रस्त असलेली अनेक मुले आहेत, काही अंध, मूक-बधिर आहेत. 18 वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना बालगृहात ठेवता येत नाही, असा नियम आहे. परंतु अपंग, मतिमंद, दृष्टिहीन मुले व मुली कुठे जाणार? असा सवाल करून या मुलांच्या पुनर्वसनासाठी सरकारने कायदा करावा, अशी गेली कित्येक वर्षे शंकरबाबांची मागणी आहे.
या सगळ्या मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्यावरील उपचार आणि त्यांचे विवाह लावून देण्याची जबाबदारीदेखील शंकरबाबा यांनीच सांभाळली आहे. आजवर 30 मुला-मुलींचे लग्न करून देताना त्यांच्या योग्य पुनर्वसनाचे यशस्वी तंत्र शंकरबाबा यांनी तयार केले आहे. या मुलांची ते अहोरात्र सेवा करत आहेत. शंकरबाबा यांनी याच मुलांच्या मदतीने आश्रमाच्या आसपासच्या 25 एकरांमधल्या उजाड माळरानावर जवळपास 15 हजार झाडांचे जंगल तयार केले आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून बाबा व त्यांचा सगळा चमू कमालीचा व्यग्र असतो. रोज पहाटे हे शेकडो हात नवनव्या प्रजातींची नवनवीन झाडे लावण्यासाठी झटत असतात. गेल्या दहा-बारा वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात बाबांनी स्वत: रोपटी विकत आणून लावली आहेत.
शंकरबाबा पापळकर यांच्यासारखी अवलिया माणसे आहेत, म्हणून समाज टिकून आहे. केंद्र सरकारने अशा व्यक्तींना पद्म पुरस्कार देत पुरस्काराची उंची अधिक वाढवली, त्याबद्दल सरकार कौतुकास पात्र आहे. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार जाहीर केला, याचा शंकरबाबा यांना आनंद आहे. “बेवारस, दिव्यांग मुला-मुलींच्या आयुष्यात समाधानाचे चार क्षण फुलवण्याचे भाग्य आपल्याला लाभले. समाजातील सर्वच घटकांनी आपल्या या कार्याला साथ दिली. या पुरस्काराचा मी स्वीकार करतो” अशा शब्दात शंकरबाबा पापळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.