मिझोराम हे भारतातील राज्य शेतीप्रधान संस्कृतीशी जोडले गेले असल्याने इथे साजरे होणारे सण शेतीशी आणि पूर्वजांशी संबंधित असतात. वर्षाच्या सुरुवातीला पेरणीचा हंगाम सुरू व्हायच्या आधी साजरा होणारा चापचार कूट, वर्षाच्या मध्यावर साजरा होणारा मिमकूट व आणि कापणीच्या आधी साजरा केला जाणारा पालकूट हे मिझोराममधील प्रमुख उत्सव आहेत.
शाई पर्वतरांगेत पश्चिमेला बांगला देश आणि पूर्वेला म्यानमारला लागून असलेले भारतीय राज्य म्हणजे मिझोराम. ’मि’ म्हणजे लोक, ’झो’ म्हणजे पर्वत आणि ’राम’ म्हणजे राज्य असा मिझोराम या शब्दाचा गहन अर्थ आहे. मिझोरामचा बराच भाग डोंगरांनी व्यापलेला आहे. त्यामुळे यातील बर्याच ठिकाणी दळणवळण विकसित होईपर्यंत बाहेरच्या जगाशी तसा कमीच संबंध होता. म्हणून कितीही कठीण असले तरीही आपल्या गरजेपुरती शेती त्यांना करावीच लागत असे. हे संपूर्ण राज्य डोंगरांच्या कडेकपारीत केल्या जाणार्या शेतीप्रधान संस्कृतीशी जोडले गेले असल्याने इथे साजरे होणारे सण शेतीशी आणि पूर्वजांशी संबंधित असतात. वर्षाच्या सुरुवातीला पेरणीचा हंगाम सुरू व्हायच्या आधी साजरा होणार चापचार कूट, वर्षाच्या मध्यावर साजरा होणारा मिमकूट व आणि कापणीच्या आधी साजरा केला जाणारा पालकूट हे मिझोराममधील प्रमुख उत्सव आहेत.
वर्षाच्या सुरुवातीला मिझोराममध्ये साजरा केला जाणारा चापचार कूट हा परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला उत्सव आहे. त्याची मुळे मिझो लोकांच्या कृषी पद्धतीच्या लोककथांमध्ये सापडतात. हा वार्षिक उत्सव, कापणीचा हंगाम संपल्यावर आणि नवीन पिकांच्या लागवडीच्या आधी मिझोराममध्ये, तसेच म्यानमारच्यादेखील काही राज्यांमध्ये उत्साहाने साजरा केला जातो. हा उत्सव म्हणजे मिझो लोकांच्या जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. चापचार कूट हा शब्द मिझो भाषेतून आला आहे. चापचार म्हणजे पेंढा आणि कूट म्हणजे कापणे किंवा साफ करणे. हा सण कृषिकार्याशी जोडलेला आहे. शतकानुशतके मिझो जनता ‘झूम’ म्हणजे डोंगरउतारावर केली जाणारी शेती म्हणून ओळखल्या जाणार्या पारंपरिक शेती पद्धतीने शेती करते. कापणीनंतर उरलेला पेंढा जाळून मग पुन्हा लागवड केली जाते. मिझो पौराणिक कथेनुसार या उत्सवाची अशी आख्यायिका एका तरुण मिझो जोडप्याभोवती फिरते. या जोडप्याला त्यांचे डोंगरउतारावर शेती करताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. परंतु जेव्हा ते हे कार्य पूर्ण करण्यात यशस्वी झाले, तेव्हा त्यांनी एक भव्य उत्सव आयोजित करून आनंद व्यक्त केला. ज्याने चापचार कूट उत्सवाचा पाया घातला. कालांतराने, हा उत्सव वार्षिक कार्यक्रमात विकसित झाला, जो मिझो संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला. सामान्यत: फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये चापचार कूट साजरा केला जातो. पेरणीच्या हंगामाची पूर्ववर्ती म्हणून ह्या सणाचे महत्त्व आहे. हा उत्सव म्हणजे वर्षाअखेरीस भरपूर पिकांसाठी देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धत आहे. मिझो समुदायासाठी एकत्र येण्याचा, ऐक्य आणि सौहार्द वाढवण्याचा एक प्रसंग आहे. हा उत्सव म्हणजे मिझो जीवनाचे सार आहे, जिथे मिझो जनतेची सांस्कृतिक ओळख शेतीच्या चक्रासोबत एकत्र विणली गेली आहे. आधुनिक युगात चापचार कूट हा उत्सव आपल्या कृषी पद्धतीच्या पलीकडे जाऊन सांस्कृतिक अभिमानाचे आणि मिझो लोकांच्या चिरस्थायी भावनेचे प्रतीक बनला आहे. चापचार कूटच्या केंद्रस्थानी एक प्रतीकात्मक विधी असतो. आपण ज्या पद्धतीने होळी पेटवतो, त्या पद्धतीने मिझो लोक पेंढ्याची होळी करतात. हा विधी कापणीच्या हंगामाचा शेवट आणि आगामी पेरणीच्या चक्राची तयारी दर्शवतो. कापणी केलेल्या पिकांचे अवशेष एकत्र केले जातात आणि समारंभपूर्वक जाळले जातात. जमिनीच्या शुद्धीकरणासाठी आणि सरलेल्या वर्षात विपुल धान्यासाठी देवतांप्रती कृतज्ञता दर्शवणारा अग्नी या निमित्ताने पेटवला जातो. अग्नीभोवती जमून मिझो लोक सामूहिक प्रार्थना करतात.
जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात साजरा केला जाणारा मिमकूट हा सण शेतीपेक्षा अधिक पूर्वजांशी जवळीक साधणारा आहे. पावसाळ्यात मिझोराममध्ये अनेक रानभाज्या खाल्ल्या जातात. रानभाज्या हा प्रत्येक मिझो व्यक्तीचा आवडता पदार्थ, म्हणूनच आपल्या वारलेल्या पूर्वजांना या सणादरम्यान रानभाज्या, भाकरी आणि मक्याचे जेवण अर्पण करण्याची प्रथा आहे. गेलेल्या आत्म्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व परिवाराने एकत्र येऊन त्यांच्या आठवणीत रमून जावे म्हणून हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मात असणार्या पितृपक्षासारखेच या सणाचे महत्त्व आहे. असे मानले जाते की, मिझो व्यक्तीचा आत्मा हा भारत-म्यानमार सीमेवर असलेल्या म्यानमारच्या चीन राज्यातील रिह दिल या तळ्यावरून अनंताच्या प्रवासाला जातो. त्यामुळे या सणाच्या दिवशी म्यानमारच्या चीन राज्यातून व भारतातील मिझोराममधून अनेक जण या तळ्याला भेट देऊन आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थना करतात.
मिझो संस्कृतीतील शेवटचा उत्सव म्हणजे डिसेंबर महिन्यात साजरा केला जाणारा पाल कूट. हा उत्सव कापणीच्या हंगामाशी संबंधित आहे. हा सण ऋतुचक्राची सांगता दर्शवतो. कापणीच्या आधी देवाचे आभार व्यक्त करण्याची पद्धत म्हणून हा उत्सव साजरा करतात. ऐतिहासिक संदर्भानुसार पूर्वीच्या काळात मिझो लोक टिआऊ नदीच्या पूर्वेकडील भागात राहत असत. ही नदी म्यानमारमधील चीन टेकड्यांमधून वाहते. पौराणिक कथेनुसार कोण्या एकेकाळी मिझो जनतेला 3 वर्षे पाऊस न पडल्याने मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. बाहेरच्या जगाशी तसा संबंध नसल्याने जेवणाचे बरेच हाल झाले. पाऊस नसल्याने, पीक कापणी अत्यंत कमी होत होती. त्यानंतर स्थानिकांनी देवाकडे प्रार्थना केली आणि पुढील वर्षी भरपूर पाऊस पडला. भरपूर पाऊस पडल्याने भरघोस पीक कापणी झाली आणि दर वर्षी हा उत्सव साजरा करण्याची प्रथा पडली.
या सगळ्या सण-उत्सवांची तयारी आठवडाभर आधीपासून सुरू होते. आजूबाजूची कुटुंबे एकमेकांना मदत करण्यासाठी एकत्र येतात. समुदायाची भावना आणि सामायिक जबाबदारी या उत्सवादरम्यान मुलांना शिकवली जाते. मिझोरामचे रस्ते विविध रंगांनी रंगवले जातात. मिझो पुरुष त्यांचे पारंपरिक वस्त्र पुआन आणि पारंपरिक वस्त्राचा शिवलेला शर्ट परिधान करतात, तर बायका पुआनचेई परिधान करतात. मिझो समुदायाची समृद्ध सांस्कृतिक विविधता आणि अभिमान त्यांच्या वस्त्रातून आणि पारंपरिक दागिन्यांमधून दिसून येतो. चापचार कूट उत्सवातील सर्वात आकर्षक पैलूंपैकी एक म्हणजे उत्सवादरम्यान केली जाणारी पारंपरिक मिझो नृत्ये. या नृत्यांमध्ये चेरॉ नृत्य आणि बांबू नृत्य केंद्रस्थानी आहे. या नृत्यप्रकारात पुरुष बांबूच्या दांड्यांचे जमिनीवर गुंफण करतात आणि स्त्रिया योग्य समन्वय साधून पारंपरिक ठेक्यावर त्या गुंफणामध्ये ताल धरतात. चेरॉ हे फक्त नृत्यच नाही, तर मिझो लोकांच्या कौशल्याचा आणि चपळतेचा मंत्रमुग्ध करणारा नमुना आहे. हे नृत्य सहसा पारंपरिक मिझो वाद्यांसह केले जाते. नर्तकांच्या मोहक हालचाली आणि सांस्कृतिक वाद्यांवर केले जाणारे तालबद्ध वादन वातावरणात एक वेगळीच ऊर्जा भरतात, ज्यामुळे सहभागी आणि प्रेक्षक दोघेही तल्लीन होऊन जातात.
या सर्व सणांमध्ये अध्यात्मालादेखील महत्त्व आहे. हे सण-उत्सव मिझो लोकांच्या समृद्ध भविष्यासाठी प्रार्थना करण्याचा, समुदायासाठी ईश्वराकडून आशीर्वाद मिळवण्याचा आणि भूमीने दिलेल्या विपुल पिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रसंग आहे. कोणताही मिझो उत्सव भव्य मेजवानीशिवाय पूर्ण होत नाही. ह्या उत्सवादरम्यान पारंपरिक मिझो पदार्थ बनवले जातात. भात, कंदमुळे आणि मांस यावर मिझो लोक आपली गुजराण करतात. आधुनिक युगातदेखील ह्यात बदल झालेला नाही. या उत्सवांदरम्यान मिझो समुदायाच्या पाककौशल्याचे दर्शन घडते. मिझो संस्कृतीत बांबूला मोठे महत्त्व आहे. बांबू करी, बांबूचे लोणचे, डुकराचे भाजलेले मांस, त्याचबरोबर इतर विविध रानभाज्या, बटाट्याची भाजी आणि भात असा बेत केला जातो. या उत्सवाच्या निमित्ताने मित्र, शेजारी आणि कुटुंब एकत्र येतात आणि पारंपरिक मेजवानीचा आनंद घेतात. या सगळ्याच उत्सवाचा एक अविभाज्य भाग म्हणजे झू म्हणून ओळखले जाणारे पारंपरिक मिझो पेय. हे स्थानिकरित्या तांदळापासून तयार केले जाणारे मद्य आहे. या पेयाचे सांस्कृतिक महत्त्व म्हणजे कुटुंबे एकत्र येऊन हे पारंपरिक पेय तयार करतात. मिझोराम हा थंड हवेचा प्रदेश असल्याने येथे शरीराला गरम ठेवण्यासाठी पारंपरिकरित्या चालत आलेले हे पेय प्यायले जाते. सगळे पारंपरिक मिझो सण-उत्सव साजरे करण्याची पद्धत अधिकांशी अशीच असते.
सांस्कृतिक विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात शोधले तर साम्य आणि केला तर फरक हा प्रत्येक पारंपरिक सण-उत्सवात आढळतो. मिझोराममधील बहुतांश जनतेचे 1895नंतर ख्रिस्तीकरण झाले आहे. त्यामुळे 21व्या शतकात हे पारंपरिक सण-उत्सव मागे पडत चाललेले दिसत आहेत. सध्याच्या तरुण जनतेला आपल्या पिढीजात चालत असलेल्या सणांपेक्षा पाश्चिमात्य सणांचे जास्त अप्रूप आहे. म्हणूनच पुढील 50 वर्षांत मिझो जनतेची ओळख असलेले हे सण-उत्सव काळाच्या ओघात मागे तर पडणार नाहीत ना? असा प्रश्न आपल्यासमोर आ वासून आहे.