1970च्या निवडणुकीत शेख मुजीब उर्-रहमान ह्यांच्या अवामी लीगचा विजय, पश्चिम पाकिस्तानचा मुजीब पंतप्रधान होण्यास विरोध, मुजीबांना झालेली अटक अशा नाट्यमय घडामोडींनंतर रझाकार व पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानातील भीषण वंशविच्छेद सुरू केला.
बांगलादेशातील स्थानिक संघटनांच्या माहितीनुसार 30 लाख हिंदू या नरसंहारात मारले गेले; पण दुर्दैवाने भारताने ह्याविषयी दु:ख प्रगट करणारा एक शब्दही काढला नाही. या नरसंहाराचे वर्णन भारताने ‘हिंदू’ शब्दाचा उल्लेख टाळून ‘बंगाली नागरिकांवर झालेले अत्याचार’ अशा शब्दांत केले. 1971ला भारतात आलेले 90% निर्वासित ‘हिंदू’ होते, ही गोष्ट पंतप्रधान इंदिरा गांधींनी भारतीय जनतेपासून काळजीपूर्वक लपवून ठेवली होती.1 युद्धानंतरच्या न्यायालयीन चौकशीमध्ये पाकिस्तानी सैनिकी अधिकार्यांनी मान्य केले की, हिंदूंना वेचून लक्ष्य केले होते. तुम्हाला सर्वांत जास्त तातडीने कशाची गरज आहे? असा प्रश्न सिनेटर एडवर्ड केनडींनी एका छावणीच्या व्यवस्थापकाला विचारला असता तो म्हणाला, ’स्मशानांची’.2 ह्यावरून ह्या हत्याकांडाची भयानकता लक्षात येते. दोन लाख मुली-स्त्रियांवर (काहींच्या अनुमानानुसार 4 लाख) स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले.3 बांगलादेश सरकारच्या म्हणण्यानुसार या युद्धात 90 लाख नागरिकांना स्थलांतर करावे लागले. पाकिस्तानी लष्कर व जमाते-ए-इस्लामीच्या नेत्यांनी केलेल्या लैंगिक अत्याचारांच्या कहाण्या आजही अंगावर काटा आणतात. मुजीबांनी जमातेवर बंदी घातली; पण खलीदा झियांच्या राज्यात जमाते राज्यकर्ते बनले होते.4 दुसर्या महायुद्धादरम्यान नाझींनी केलेल्या ज्यू वंशविच्छेदाशी ह्या हिंदू वंशविच्छेदाची तुलना करता येईल.
ढाक्यातील अमेरिकी उपदूतावासाचे प्रमुख ’आर्चर ब्लड’ ह्यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निक्सन आणि सुरक्षा सल्लागार किसिंजर ह्यांना अनेक अहवाल पाठवून ह्या वंशविच्छेदाची माहिती देऊन पाकिस्तानवर दबाव टाकण्याची, जाब विचारण्याची, वंशविच्छेदाचा निषेध करून आवाज उठवण्याची विनंती केली होती; पण निक्सन व किसिंजरनी ह्याकडे सरळ दुर्लक्ष केल. ह्यास दोन प्रमुख कारणे होती. एक म्हणजे निक्सन व किसिंजर ह्यांचा भारतद्वेष आणि पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांच्याबद्दलची व्यक्तिगत घृणा व दुसरे म्हणजे स्वदेशात व जगात नाचक्की न होता व्हिएतनाममधून अमेरिकी सैन्य काढून घेण्याच्या दृष्टीने चीनबरोबर वाटाघाटी करण्याव्यतिरिक्त अमेरिकेपुढे कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. यासाठी अमेरिकेला आवश्यक असणारी एका मध्यस्थाची गरज पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा जनरल याह्या खान पूर्ण करत होते. ह्या सर्व प्रकरणाची माहिती गॅरी बास ह्यांनी ’द ब्लड टेलिग्राम’ ह्या पुस्तकात विस्तृतपणे दिली आहे.
संदर्भ
1. महाजन, ब्रिगेडिअर हेमंत. बांगलादेशी घुसखोरी, भारतीय विचार साधना प्रकाशन, दुसरी आवृत्ती, 2017, पृष्ठ 203-204
2. बास, गॅरी. अनुवाद: दिलीप चावरे, द ब्लड टेलिग्राम, डायमंड प्रकाशन, 2016, पृष्ठ 320
3.Hossain, Anushay. The Female Factor: Bangladesh Protests Break Boundaries, 13 Feb 2013, Forbes
4. महाजन, पृष्ठ 205
4. बांगलादेश स्वातंत्र्यानंतरही हिंदू वंशविच्छेद सुरूच
स्रोत:
Census 2011 Bangladesh: The vanishing Hindus!, 4 May 2015, News Bharati English
Courtesy: Census 2011 Bangladesh: The vanishing Hindus!, 4 May 2015, News Bharati English
स्रोत:
Census 2011 Bangladesh: The vanishing Hindus!, 4 May 2015, News Bharati English
पूर्वप्रसिद्धी : दै. मुंबई तरूण भारत