हिंदूंचा वंशविच्छेद

बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे दुर्लक्षिलेले हत्याकांड

विवेक मराठी    05-Dec-2024   
Total Views | 36
लेखक - अक्षय जोग
 
1947ला भारत-पाकिस्तान फ़ाळणीनंतर पश्चिम व पूर्व पाकिस्तानातील हिंदू-बौद्ध अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरू झाले व निर्वासितांचा लोंढा भारतात आला. 1950ला अत्याचारात इतकी वाढ झाली की, नेहरू सरकारलाही त्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य झाले. पूर्व पाकिस्तानला कोळशाचा पुरवठा बंद करून व भारत-पूर्व पाकिस्तान सीमेवर अतिरिक्त भारतीय सैन्य तैनात करून पाकिस्तानवर दडपण आणून नेहरू-लियाकत करार करून हिंदू-बौद्ध अल्पसंख्याकांच्या संरक्षणाचे आश्वासन घेण्यात आले; पण दोन वर्षांतच ते आश्वासन फ़ोल ठरून पूर्व पाकिस्तानातील पाच लक्ष अल्पसंख्याक घरदार सोडून भारतात आश्रयासाठी आले.
 

Bangladesh violence 
 
1 जोगेंद्रनाथ मंडल (1904 ते 1968) बंगालमधील अनुसूचित जाती समुदायाचे नेते होते. त्यांनी मुस्लीम लीगसोबत राजकीय युतीही केली होती व त्यांची ’सहकारी पत व ग्रामीण कर्ज’ (Co-operative Credit and Rural Indebtedness) मंत्री म्हणून नेमणूक झाली होती. तसेच 1946ला ते सुर्‍हावर्दीच्या मंत्रिमंडळात विधि, पूल कामगार व गृहबांधकाम (Law, Pull Worker and Construction of House Minister) मंत्री होते. मुस्लीम लीगच्या पाकिस्तान मागणीत त्यांना सामायिक हेतू दिसला म्हणून त्यांनी त्यास पाठिंबा दिला. मंडलांच्या मते, बंगालमधील मुस्लीम व अनुसूचित जातींचे आर्थिक हितसंबंध सारखेच होते व दोघेही शैक्षणिकदृष्ट्या मागास होते.2 फाळणीनंतर ते पाकिस्तानात राहिले व तेथे त्यांची पाकिस्तानातील पहिले विधि (कायदा) व कामगारमंत्री म्हणून नेमणूक झाली; पण थोड्याच कालावधीत त्यांना दलित-मुस्लीम युतीतील फोलपणा लक्षात आला व हिंदूंवर होणारे भयावह अत्याचार पाहिल्यावर त्यांनी 8 ऑक्टोबर 1950ला पाकिस्तानच्या पंतप्रधानांना आपला राजीनामा देताना विस्तृत पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात, हिंदू मुलींचे अपहरण व बलात्कार काही प्रमाणात कमी झाले आहेत, कारण सध्या कुठल्याही जातीची 12 ते 30 वयातील हिंदू मुलगी पूर्व बंगालमध्ये राहत नाहीये. ग्रामीण भागात त्यांच्या पालकांसोबत राहणार्‍या काही डिप्रेस्ड क्लासमधील मुलींनाही मुस्लीम गुंडांनी सोडले नाही. अनुसूचित जातीतील मुलींवरील बलात्काराच्या बर्‍याच घटनांविषयीची मला माहिती मिळाली आहे.3 आधी मुस्लीम व अनुसूचित जातींचे आर्थिक हितसंबंध एकच आहे म्हणणारे मंडल नंतर राजीनामा देताना ‘पाकिस्तानात हिंदूंसाठी भयाण भविष्य’, ‘हिंदूंना चिरडण्याचे सरकारचे धोरण’, ‘पाकिस्तान हिंदूंसाठी शापित’ असे स्पष्ट उल्लेख करतात. ते राजीनामा पत्र मुळातूनच वाचण्यासारखे आहे. राजीनामा देऊन मंडल नंतर भारतात स्थायिक झाले.
 
  पूर्वप्रसिद्धी : दै. मुंबई तरूण भारत
 
संदर्भ
1. गोडबोले, पृष्ठ 68
2.Dalit History Month - Remembering Jogendra Nath Mandal: 23 Apr 2017
3. Mukherji, Dr. Saradindu. Hindus Betrayed- Religious Cleansing in Bangladesh, India Policy Foundation Publication, 2013

अक्षय जोग

सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रवाद, भारतीय स्वातंत्र्यलढा व क्रांतिकारक ह्या विषयाचे अभ्यासक. www.savarkar.org संकेतस्थळाच्या कार्यात सहभाग. विश्व संवाद केंद्र, पुणे कार्यकारिणी सदस्य.
राजकारण
लेख
संपादकीय